उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ०४ : ट्रुम्सो – नॉर्दर्न लाइट्स् (ऑरोरा) डिनर क्रूझ
...दोन तास असंच गावभर भटकत राहिलो. जसा सूर्य क्षितिजाखाली गेला तसे तापमान वेगाने खाली येऊ लागले. -२ अंशापर्यंत वर आलेले तापमान आता तीन चार अंशांनी नक्कीच खाली गेलं असणार. कुडकुडणारी पावले आपोआपच हॉटेलच्या दिशेने वळली. रूमवर आलो तेव्हा साडेचार वाजले होते. अजून बराच वेळ मोकळा होता. थोडा थकवा आला होता आणि रात्रीच्या ऑरोरा क्रूझसाठी ताजेतवाने राहता यावे यासाठी दोन तास झोप घेण्याचा निर्णय घेतला.
गजर सातचा लावला होता पण साडेपाचलाच जाग आली. आता ताजेतवाने वाटत होते. येवढ्या लांब फिरायला येऊन उगाच लोळत राहण्यापेक्षा खोलीबाहेर पडा आणि काय ते जिवाचं ट्रुम्सो करून घ्या, इथं काय परत परत येणार आहेस? असं मनाला बजावून पंधरा मिनिटात सगळा सरंजाम पेहरून बाहेर पडलो. थंडीचा जोर वाढला आहे हे हॉटेलबाहेर पहिले पाऊल टाकताच समजलं. अंधारही बराच दाटून आला होता. पण दुपारच्या भटकंतीमुळे ट्रुम्सो आता पहिल्या दिवसाप्रमाणे अनोळखी वाटत नव्हतं. आता उरलेल्या तासाभरात हमरस्ते सोडून फिरायची सुरसुरी आली. हमरस्ता सोडून दोनतीन गल्ल्या आत गेलो की मग कुठल्याही पॉश शहराचा मेकअप केलेला मुखवटा सोडून खरेखुरे दर्शन होते... माझा हा फार जुना छंद आहे...
क्षितिजापासून आकाशाच्या साधारण २५-३०% टक्के उंचीपर्यंत एक हिरवट झाक असलेला पांढऱ्या प्रकाशाचा फराटा तयार झाला होता. हळू हळू तो वाढत जवळजवळ डोक्यावरून पलीकडच्या क्षितिजाकडे पसरू लागला. त्याच वेळेस विरुद्ध दिशेने तसाच एक फराटा क्षितिजावर अवतरून पहिल्याच्या दिशेने वर येत होता. साधारण १०-१५ मिनिटांत ते एकमेकाला भिडले आणि आकाशात आमच्या डोक्यावर एक कमान तयार झाली !
सूर्य ही एक अणुभट्टी असून तिच्यात चार हायड्रोजन अणूंचा संयोग करून एक हेलियमचा अणू बनण्याची क्रिया प्रचंड मोठ्या प्रमाणावर अव्याहत चाललेली आहे. दर मिनिटाला हजारो टन हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर करण्याच्या या प्रक्रियेत इतकी प्रचंड ऊर्जा बाहेर पडते की सूर्याच्या अंतरंगाचे तापमान दीड कोटी अंश सेल्सियस पेक्षा जास्त असते आणि पृष्ठभागावरचे ६००० अंश सेल्सियस पेक्षा जास्त असते. थोडक्यात सूर्यामध्ये सतत लक्षावधी अणूसंयोगी अणुस्फोट होत असतात. या प्रक्रियेत वेगळे झालेले भारीत इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स प्रचंड वेगाने सूर्यांभोवतीच्या अवकाशात सौर वाऱ्यांच्या स्वरूपात पसरतात. जेव्हा हे कण पृथ्वीच्या वातावरणात घुसतात आणि प्राणवायू व नत्रवायूच्या अणूंवर आदळतात तेव्हा प्रकाशाच्या वेगवेगळ्या आकृत्या तयार होतात... हे आहे ऑरोराचं अत्यंत सोपे स्पष्टीकरण.
नंतर बराच वेळ तो प्रकाशझोत आकार बदलत राहिला आणि त्याच्या बाजूला तसलेच पण त्याच्या मानाने बरेच छोटे फराटे निर्माण होत राहिले...
.
.
ऑरोराच्या उजेडाची प्रखरता कमी असते तसेच त्याचा आकार सतत बदलत असतो त्यामुळे त्याचा पॅनोरामिक व्ह्यू घेणे शक्य नसतो ह्याचे फार दुःख झाले. मात्र कॅमेऱ्यामधल्या काही सोयींनी हे रंग नीट पकडता येतात. साधारणपणे ISO १६०० पेक्षा जेवढा जास्त व अॅपरचर जेवढे जास्त तेवढे चांगले. ट्रायपॉड वापरून एक्सपोजर १० ते ३० सेकंद ठेवून जास्त चांगली चित्रे येतात. एक्सपोजरची वेळ प्रकाशाच्या प्रखरपणावर व फोटो काढण्याच्या जागेवर अवलंबून असते: कमी प्रखर ऑरोराला जास्त वेळ; हालणाऱ्या बोटीवर असल्यास शक्य तेवढी कमी वेळ, इ… हे सगळे जरा प्रयोग करूनच ठरवावे लागते. खूप जास्त एक्सपोजर ठेवल्यास बदलणाऱ्या प्रकाशझोतांचे फोटो फज होतात. मानवी डोळ्यांच्या जडणघडणीमुळे रेटायनामधले रंग दाखवणारे शंकू कमी उजेडातले रंग नीट पाहू शकत नाहित. त्यामुळे प्रकाशाचे रंग फोटोत (अधिक वेळेच्या एक्सपोजरमुळे) डोळ्यांनी दिसतात त्यापेक्षा अधिक स्पष्ट दिसतात. मात्र प्रकाशाचा नाट्यमय नाच डोळ्यांनी बघायला जी मजा येते ती केवळ अवर्णनीय आहे.
पाऊण तास हा ऑरोराचा खेळ पाहून समुद्रावरच्या वार्याने सगळेच कुडकुडू लागले होते. खाली केबिनमध्ये कॉफी घ्यायला गेलो आणि साहजिकच सहप्रवाशांच्या बरोबर थोड्या गप्पा सुरू झाल्या. वीसेक मिनिटे झाली असतील तेवढ्यात कप्तान परत केबिनमध्ये आला आणि म्हणाला, "टेरेसवर चला. ऑरोराचे नवीन प्रकाशझोत तयार झाले आहेत." सगळे परत आपली थंडीनिरोधक आयुधे चढवून परत वर गेलो... आणि काय सांगावे... केवळ अत्यानंद ! आम्ही खाली गेल्यामुळे बहुतेक ऑरोरा रागावला असावा... त्याने आकाशात नुसता रोषणाई सुरू केली होती...पुढच्या तासाभरात पुर्वी फोटोत बघितलेल्या प्रकाशांच्या जवळ जवळ सगळ्या आकृत्यांचे त्याने प्रदर्शन मांडले आणि आकाशाचा अर्धा भाग पूर्णपणे भरून टाकला. आम्ही सगळे बोचरी थंडी आणि सागरी वाऱ्याचे झोत विसरून निसर्गाचा हा चमत्कार बघत आणि सहप्रवाशांचे वेगवेगळ्या चमत्कारिक आकारांकडे लक्ष वेधत राहिलो. काही निवडक फोटो खाली देत आहे...
.
.
.
.
.
.
.
यातले काही फोटो आम्ही सहप्रवाशांनी एकमेकाशी देवाणघेवाण केलेल्यापैकी आहेत. कारण आकाशाच्या एवढ्या मोठ्या भागावर चालणारा निसर्गाचा एवढा मोठा खेळ एका कॅमेर्यात पकडणे मानवी आणि कॅमेर्यांच्या शक्तीबाहेरचे होते. कप्तानानेही सांगितले की त्याने अनेक वर्षांत इतका दमदार ऑरोरा बघितला नव्हता. अनेकदा आठवडाभर वाट पाहूनही एखादा फुसका प्रकाशझोतही न पाहता परत गेलेले लोकांची उदाहरणेही त्याच्या अनुभवात होती. या पार्श्वभूमीवर मला दुसर्या दिवशीच माझे या सहलीतील एक नंबरचे आकर्षण पुरेपूर दिसले होते यासारखी आनंदाची गोष्ट अजून काय असणार?
जे काय बघितले ते अवर्णनीय होते... अनेक वर्ष टोचणी देणारे मन तृप्त झाले आणि आज पूर्ण समाधानाने झोप आली.
(क्रमशः)
====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...
====================================================================प्रतिक्रिया
In reply to कळस आहे हा भाग. by प्रचेतस
In reply to अप्रतिम फोटो.... पुढच्या by Mrunalini
In reply to अप्रतिम फोटो.... पुढच्या by Mrunalini
In reply to जबरदस्त ...!!! by nishant
In reply to जबरदस्त ...!!! by nishant
In reply to __/\__ आणि टाळ्या! by आदूबाळ
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
या चित्रात पृथ्वीचे विद्युतचुंबकीय क्षेत्र दिसते आहे... सौरवारे याला वळसा घालून पलिकडे जातात आणि त्यांच्या उर्जेने पलिकडचा भाग चपटा होत होत सौरवारे पृथ्वीकडे खेचले जाऊन वातावरणात घुसले की त्यांचे हवेतल्या अणूंबरोबर होणार्या टकरीने ऑरोरा निर्माण होतो.
In reply to हे चित्र बराच वेळ मिळत नव्हतं... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बाबौ! by आदूबाळ
In reply to तुम्हाला एक शुभेच्छा ! by चौकटराजा
In reply to निव्वळ अप्रतिम....... by नन्दादीप
In reply to शब्दातित!!! by स्मिता.
In reply to शहराच्या आतल्या भागाचे फोटो by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अप्रतिम!! by जुइ
In reply to अफलातून... by धन्या
एक आगाऊ शंका : तुम्हाला फोटोवर वॉटरमार्क नाही का टाकावासा वाटत? ईंटलेक्च्युअल प्रॉपेर्टीच्या बाबतीत तुम्ही अगदीच अडाणी दिसता :))
फोटोपेक्षा जास्त महत्वाचा माझ्या सहलीचा आनंद मी मिपावरच्या मित्रांशी वाटून घेत आहे (आणि त्यामुळे तो द्विगुणित पण होत आहे हा आपला एक गुप्त फायदा :) , कोणाला सांगू नका बरं का)... त्यापुढे या फोटोंची काय पत्रास ! ;)In reply to ऑरोरा by निनाद मुक्काम …
असेच क्षण उतारवयात जेव्हा आपला पैसा ,यश ,कीर्ती व आपली प्रकृती जेव्हा आपल्याला साथ देत नाही तेव्हा साथ देतात ,
सहमत... पण यापुढे जाऊन मी तर म्हणेन की हे असे क्षण आपले कायम सखे-सोबती बनून राहतात... वय, पैसा ,यश ,कीर्ती व प्रकृती यांच्या कोणत्याही स्थितीत. आणि ते क्षण हीच खरी साठवण !In reply to मस्त by रणजित चितळे
खंत हीच की उत्तर धृवावर सुद्धा इतके निटनेटके सुबक रस्ते व ओळीत आखलेल्या इमारती. आपल्याकडे आपण कायदा धाब्यावर बसवून बसवून काय केलेल आहे.
आपल्याकडे सगळे* आहे फक्त कमी आहे ती राजकीय इच्छाशक्तीची... आणि जोपर्यंत जनता अगतीकपणे आपले शासक निवडण्याऐव़जी खंबीरपणे लोकसेवक निवडून द्यायला शिकत नाही तोपर्यंत काहितरी चांगले निर्माण निर्माण करण्याची राजकीय इच्छाशक्ती निर्माण होणार नाही... ना जगात इतर कुठे असे झाले आहे, ना भारतात होईल.
* तांत्रीक कौशल्य आपल्याकडे भाराभर पडलेले आहे... खाडी देशातले उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात भारतीय अभियंत्यांचा सिंहाचा वाटा होता आणि अजून चालू आहे. ७० सालांत बनवलेला पुणे कँपातल्या म. गांधी रस्त्याला आणि डेक्कनवरच्या जंगली महाराज रस्त्याला पंधराच्यावर वर्षे एकही खड्डा पडला नव्हता... त्या कॉन्ट्रॅक्टरला परत काम मिळाले नाही अशी वदंता ऐकली आहे. असो.In reply to मस्त by रणजित चितळे
In reply to अप्रतिम!! ऑरोराचे फोटो बघून by श्रिया
कळस आहे हा भाग.