आज २७ फेब्रुवारी, महान साहित्यिक कै. कुसुमाग्रज यांची जयंती. आज त्यांचा ९९ वा जन्मदिन, आजपासून त्यांच्या जन्मशताब्दिवर्षाला प्रारंभ होत आहे. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणार्या आणि आपला ठसा उमटविणार्या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे.
कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तिचे परखड बोलही त्यांचेच.