बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग ८ – थाईलँड, उत्तरेकडील अल्पपरिचित नागरी व ग्रामीण प्रदेश
थाईलँड म्हंटले की शक्यतो बँकॉक व समुद्र असेच समीकरण असते. या भागात उत्तरेकडील बव्हंशी अपरिचित असलेल्या भागाची सफर.
उत्तर सयाम तुलनेत दुर्गम आहे. डोंगराळ भागात अनेक आदिवासी जमाती अजूनही पारंपरिक पद्धतीने जीवन व्यतीत करतात. तशी मोठी शहरे या भागातही आहेत, मेकाँग नदीच्या सुपीक खोऱ्यातील प्रदेश असल्याने सुबत्ताही आहे. इतिहासात वेगवेगळ्या जमातींचे येथे वर्चस्व असल्याने मुख्य सयाम पेक्षा येथील लोकजीवन वेगळे जाणवते. प्राचीन काळी हिंदू राज्ये असलेला हा प्रदेश कालांतराने कधी ब्राह्मी तर कधी लाओ, व अलीकडे थाई सत्तेच्या अंमलाखाली आला. आजही येथे गणेश, ब्रह्मा, लक्ष्मी व इंद्र या प्रमुख देवता आहेत. मूर्तिपूजा व उपचारांची लोकांना आवड आहे.
फित्सानुलोक (विष्णुलोक): सयामचा सद्य राजवंश या स्थानाशी निगडित असल्यानेही याला वेगळे महत्व आहे. या शहरात देशातील सर्वात प्रसिद्ध बौद्ध मंदिरांपैकी एक, श्री रत्तन महाथाट हे मंदिर आहे. प्रसन्न अशी बुद्धाची सोन्याची मूर्ती व भिंतीवरील सुवर्णरेखन उल्लेखनीय! ख्मेर शैलीतील शिखर, थाई पद्धतीचा मंडप हे स्थापत्य विशेष. सुखोथाई व सी सत्चनालई ही प्राचीन नगरे येथून जवळ आहेत.
च्यांग राई : उत्तर सीमेवरील एक महत्वाचे शहर. लाओ, ब्राह्मी व थाई संस्कृतीचा मिलाफ या प्रदेशात पाहावयास मिळतो. दूरवर पसरलेली भात शेती व क्षितिजावरच्या डोंगररांगा यामुळे हा प्रदेश अतिशय नयनरम्य आहे. आजूबाजूस असणारी खेडीदेखील स्वयंपूर्ण व समृद्ध आहेत.
ब्लॅक हाऊस
च्यांग सान - मेकाँग च्या किनाऱ्यावर वसलेले लाओस सीमेवरील हे छोटेसे प्राचीन नगर. काही भग्न स्तूप व तटबंदीचे अवशेष आजही पाहावयास मिळतात.
में साई - हे सयाम चे उत्तरेकडील टोक. ब्रह्मदेशाच्या सीमेवरील हे महत्वाचे व्यापारी केंद्र. आयात-निर्यात उद्योगामुळे बरीच भरभराट झालेली येथे दिसून येते. तसेच सीमावर्ती नगरांचे तस्करी, गुन्हेगारी, घुसखोरी इत्यादी रोगही इथे आहेतच. परंतु निसर्गाचे वरदान असल्याने अतिशय नितांत सुंदर असा हा प्रदेश आहे.
पुढील भागात 'सुवर्ण त्रिकोण' व लाओस भेट
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान