मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०४ : आफ्रिकेतल्या सफरी आणि आफ्रिकेबाहेरचे पहिले पाऊल (२ लाख ते १३५,००० वर्षांपूर्वी)

डॉ सुहास म्हात्रे · · भटकंती
===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)... ===================================================================== ...आपल्या मार्गदर्शकांचा इतका पूर्वपरिचय झाल्यावर आता त्यांच्या विश्वासार्हतेची खात्री पटायला हरकत नाही. त्यामुळे यापुढे प्रवासात जी काही आश्चर्यकारक माहिती मिळणार आहे तिची मजा नि:शंकपणे घेणेही सुकर होईल. तर कसा कंबर आणि पुढच्या भागापासून अनेक सहस्र किमी चा आणि २ लाख वर्षांच्या मुदतीचा प्रवास करायला तयार व्हा ! जनुकशास्त्राने मानवाच्या उत्क्रांतीमधील अनेक जुन्या वंशवादी थियर्‍या केराच्या टोपलीत भिरकावून दिल्या आणि मानवाची उत्पत्ती २ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये झाली असा सिद्धांत तर मांडला. पण जोपर्यंत त्याला त्या काळातल्या प्राचीन मानवी अवशेषाची साथ मिळत नव्हती तोपर्यंत सिद्धांत पूर्णपणे सिद्ध होऊन शास्त्रीय सत्य म्हणणे कठीण जात होते. विशेषतः अगोदरच प्रस्थापित झालेल्या काही सिद्धान्ताचे पुरस्कर्ते तरी ते मानणे कठीण होते. गंमत म्हणजे आफ्रिकेत उत्क्रांत होऊन आधुनिक मानवाच्या १०-१५ लाख वर्षे अगोदर जगभर पसरणार्‍या आदिमानवांचे अवशेष सापडत होते पण आधुनिक मानवाचे १ लाख वर्षांअगोदरचे शास्त्रीय कसोट्यांवर खात्रीलायकपणे खरे उतरणारे अवशेष मिळत नव्हते. ही समस्या दूर केली इथिओपियातील ओमो किबिश नावाच्या ठिकाणावर मिळालेल्या आधुनिक मानवी अवशेषांनी. त्यांचे वय २ लाख वर्षे ठरवले गेले. नंतर इथिओपियामध्येच हेर्टो नावाच्या खेड्यात सापडलेल्या तीन मानवी कवट्यांच्या जीवाश्मांनी. Potassium-argon रेडिओ-डेटिंग पद्धतीने या जीवाश्माचे वय १५४,००० ते १६०,००० वर्षे ठरविले. हे सगळे आधुनिक मानवाचे सर्वात प्राचीन अवशेष. त्यामुळे त्यांना खास Homo sapiens idaltu ह्या सबस्पिसिजचा मान दिला गेला. यातले idaltu म्हणजे मराठीत "थोरले" ! नंतर त्यांच्या शेजारीच सन १९९७ मध्ये एका पाणघोड्याच्या कवटीचा जीवाश्म गोळा करताना एकूण दहा मानवी कवट्यांचे अवशेष, दगडी हत्यारे आणि काही प्राण्याचे अवशेष सापडले. शात्रज्ञांच्या दृष्टीने हे एक भांडारच होते. त्यातल्या एका मुलाच्या कवटीचे शेकडो चौरस मीटरवर विखुरलेले २०० पेक्षा जास्त भाग शास्त्रज्ञांनी परिश्रमाने गोळा केले आणि ते जोडून त्या कवटीची जुळवणी केली. जुळवणीनंतर असे दिसून आले की ती कवटी मुलाच्या मृत्यूनंतर साफ करून तिच्या तुटलेल्या कडा घासून गुळगुळीत बनवल्या होत्या आणि बहुतेक ती कोणत्यातरी समारंभात (worshipping ritual) वापरले जाणारे उपकरण असावे असे दिसत होते. यावरून या ठिकाणी आणि वेळेस माणूस केवळ अस्तित्वात नव्हता तर मानवी संस्कृती स्थापन होण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचे स्पष्ट होत होते. या सगळ्या पुराव्यांनी जनुकीय शास्त्राने मांडलेल्या सिद्धांतांना अवशेषांचे सबळ पुरावे मिळून त्यांचा निर्विवाद विश्वासूपणा सिद्ध झाला. मग मात्र विरोधकांनाही माघार घेऊन आपल्या संशोधनात जनुकशास्त्राचे आधुनिक हत्यार सामील करणे भागच पडले. यामुळे सर्व संशोधनात एकसूत्रीपणा आला आणि येथून पुढे जनुकशास्त्राला मानवी इतिहासाच्या संशोधनात अग्रगण्य स्थान मिळाले.  आवांतरः मानवी जीनोमवर चाललेल्या संशोधनाने भविष्यात शक्य असलेल्या अनेक शतकोटी डॉलर्सच्या फायद्यावर डोळा ठेवून औषधे बनवणार्‍या अनेक महाकंपन्याही हिरीरीने या संशोधनात उतरल्या आहेत. अर्थात यात जगावेगळे अथवा बेकायदेशीर असे काही नाही. अशा संशोधनाचा फक्त मानवाचा इतिहास माहिती करुन घेण्यापलीकडे सध्याचे मानवी जीवन सुधारण्यासाठीही उपयोग व्हावा ही इच्छाही त्यामागे आहेच. मात्र सुरुवातीला त्यातील काही कंपन्यांनी मानवी जीनोम (किंवा त्याचा भाग) पेटंट करण्याचा प्रयत्न केला. याला शह म्हणून या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या अनेक Not-for-Profit संस्थांनी स्वतःचे संशोधन public platforms वर आणि जालावर सर्वांसाठी विनामूल्य खुले करण्यास सुरुवात केली. काही बाबतीत कायद्याचे निर्णयही Not-for-Profit वाल्यांच्या बाजूने लागले आहेत त्यामुळे आता पूर्णपणे माहीत झालेल्या मानवी जीनोमच्या रचनेवर सर्व मानवजातीचा हक्क आहे. फक्त काही खास शोधपद्धती आणि जनुकिय रोगावरच्या उपचारपद्धतीचे पेटंट घेता येते. आता येथून पुढे हा आधुनिक मानव कुठे कुठे गेला याचा शोध जास्त जोमाने सुरू झाला. पण आपल्या मूळ जागेपासून जवळ जवळ ४०,००० वर्षे तो आपली जागा सोडून जाण्याच्या फंदात पडलेला दिसत नाही. त्याचे मुख्य कारण त्या काळी झालेला हिमयुगाचा कहर हे असावे... या काळाचे "मदर ऑफ आईस एजेस" असे केले जाते. त्याने मानवाला पूर्व आफ्रिकेत केवळ खिळवून ठेवले एवढेच नव्हे तर अनेक जणांचा बळी घेतल्याने आधीच मोजकी असलेली Homo sapiens sapiens ची संख्या १०,००० पर्यंत खाली आली होती. थोडक्यात आधुनिक मानव जवळ जवळ निर्वंशतेपर्यंत (near-extinction event) पोहोचला होता आणि कसाबसा तगून होता. मात्र १६०,००० वर्षांपूर्वी हवामानात थोडी सुधारणा होऊ लागल्यावर त्यांच्यातल्या भटक्यांची चुळबूळ सुरू झाली. त्यांचे चार गट रिफ्ट व्हॅली सोडून बाहेर पडले. सुरुवातीला ह्या सगळ्यांची जीवनपद्धती जगण्यासाठी शिकार करणे आणि फळे व कंदमुळे गोळा करणे (hunter-gatherer) याभोवती गुंफलेली होती. नक्की कशामुळे हे मानव आपली मूळ जागा सोडून बाहेर पडले याचा फक्त अंदाजच बांधावा लागतो. बहुतेक जास्त आणि सहज शिकार मिळत असलेल्या भूमीच्या शोधात हे मूळ जागेपासून दूर जात जात हळू हळू सर्व आफ्रिकेत पसरले असावे. हे मार्गक्रमण खालील चित्रात दाखवले आहे...   १. त्यांचा एक जथा दक्षिणेकडे जात जात केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. त्यांचे आताचे वारसदार म्हणजे आफ्रिकन पिग्मीज जे अजून hunter-gatherer आहेत आणि कालाहारी मधले Khoisan Bushmen, ज्यांच्यातले काही जण hunter-gatherer आहेत तर इतर गोपाल झाले आहेत. २. दुसरा जथा दक्षिण-पश्चिमेस काँगोच्या नदीच्या खोर्‍यात पोहोचला. यांचे वंशज बांटू भाषा बोलतात. हे उत्तम शेतकरी बनले आणि यांनी सहाराच्या दक्षिणेकडील भागात लोखंडाचा वापर सर्वप्रथम सुरू केला. ते नंतर पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे वळले. त्यांनी सर्व आफ्रिकाभर बांटू भाषा आणि शेतीचा प्रसार केला. ३. तिसरा जथा पश्चिमेकडे जात जात आताच्या आयव्हरी कोस्ट पर्यंत पोहोचला आणि त्यांनी तेथे शेती सुरू केली. यांच्यातल्या काही उत्तरेकडे गेलेल्यांच्या वंशजांना आता बर्बर म्हणून ओळखले जाते. बर्बर पारंपरिक गोपालक आहेत. ४. चवथा जथा इथिओपियात जवळच थोडेसे उत्तरपूर्वेला गेला. हवामान आणि अन्नाची उपलब्धता ही दोन कारणे सर्व प्राण्यांच्या स्थलांतरास कारणीभूत ठरत आली आहेत. प्राचीन मानवही याला अपवाद नव्हता असेच दिसते. आफ्रिकेच्या उष्णप्रदेशीय गरम हवेला आणि तेथील वर्षारण्यांवर अवलंबून असलेल्या जीवनशैलीला सरावलेल्या मानवाला आफ्रिकेतच भरपूर शाकाहारी आणि मांसाहारी आहार उपलब्ध होता. त्याचबरोबर त्या वेळेस उत्तरेकडे असलेल्या हिमयुगीन अतिथंड हवेमुळे त्याला आफ्रिका सोडून जाणे योग्य वाटले नसावे किंवा तसे करण्याची निकडही भासली नसावी. याचा अर्थ असा नाही की त्या काळात धाडसी धडपडे प्रवासी अजिबात नव्हते ! मात्र सहलीची कोणतीही आधुनिक साधने उपलब्ध नसल्याने त्यांनाही हवामानाच्या भरवशावर सहलीचा आराखडा ठरवावा लागत होता. हिमयुगात तापमान खूप खाली जात असले तरी थोडे जास्त थंड (glacial period) आणि थोडे जास्त गरम (inter-glacial period) असे तापमानाचे चढउतार सतत चालू असतात. या हवामानाच्या बदलाने आफ्रिकेला इतर जगाशी जोडणार्‍या केवळ दोनच मार्गांची उघडझाप होत होती आणि सर्वसाधारणपणे एका वेळेस एकच मार्ग खुला होत असे. ते मार्ग खालीलप्रमाणे होते: १. उत्तरेकडे "आताचा इजिप्त --> सिनाइ मार्गे आशिया": हवा गरम झाली की या मार्गाने युरेशियात शिरकाव शक्य होत असे. २. दक्षिणेकडे "आताचा इथिओपिया --> जिबूती --> येमेन": हवा थंड झाली की धृवाजवळ गोठून अडकलेल्या पाण्यामुळे समुद्राची पातळी खाली जावून आफ्रिका ते येमेन पायी अथवा कामचलावू तराफ्यांनी जाणे शक्य होत असे. एका छोट्या गरम हवामानाच्या कालखंडाचा फायदा घेत आफ्रिकेतून सर्वात पहिला बाहेर पडणारा जथा १२०,००० वर्षांपूर्वी इथिओपियातून निघाला आणि नाईल नदीच्या काठाने उत्तरेकडे जात जात सिनाईमार्गे लेव्हांत (Levant) पर्यंत पोहोचला हे तेथे गुहांत सापडलेल्या आधुनिक मानवांच्या सांगाड्यांवरून सिद्ध झाले आहे. या प्रवासाचा मार्ग खालच्या चित्रात लाल रंगाने दाखवला आहे.  लेव्हांत म्हणजे आधुनिक इजिप्तच्या सिनाई पासून आधुनिक टर्कीच्या अंतोलिया राज्यापर्यंतचा भूमध्य समुद्राभोवतालचा अर्धचंद्राकृती भूभाग. यात आजचे सिनाई, जॉर्डन, इझ्रेल, लेबॅनॉन, सिरिया, इराक व टर्कीचा अंतोलिया हे भूभाग सामील आहेत. लेव्हांतला मानवी प्रवासात फार महत्वाचे स्थान आहे आणि "सुपिक चंद्रकोर" (The fertile Crescent) म्हणूनही ओळखले जाते. या जथ्याचा प्रवासाबद्दल पुढच्या भागात अधिक माहिती येईल. ===================================================================== आतापर्यंत आपण मानवाच्या दोन लाख वर्षांच्या प्रवासापैकी जवळ जवळ अर्ध्या काळाचा मार्ग चाललो आहोत. हा मार्ग बराच सरळ आणि साधा होता. शिवाय सुरुवातीचा काल असल्याने वेग खूप कमी होता. पुढे अजून वेगवान, जास्त धाडसी आणि यापेक्षा खूप मोठे मार्गक्रमण करायचे आहे ! आतापर्यंत बर्‍याच जणांच्या मनात "हाच मार्ग होता किंवा हीच वेळ होती हे कशावरून नक्की समजायचे?" असा विचार खचितच आला असणार. तेव्हा आताच जर ही शंका दूर केली तर हेच नव्हे तर पुढचे अधिक गुंतागुंतीचे मार्ग समजायला मदत होईल. हा लेख सुगम ठेवण्यासाठी शास्त्रीय माहितीच्या खूप खोलात न जाता या पद्धतीची केवळ तोंडओळख करून घेऊया. प्रवासाचा मार्ग निश्चित कसा करतात? त्या काळचा मानवाचा सुरुवातीचा प्रवास मजल दरमजल जमिनीवरून चालत अथवा तुलनेने बर्‍याच उथळ पाण्यातून चालत अथवा अत्यंत प्राथमिक अवस्थेतील तराफे व होडक्यांनी झाला आहे. त्यामुळे आजच्या सारखे भरा बॅग आणि पोचा दिवसभरता पृथ्वीच्या विरुद्ध बाजूच्या ठिकाणी असे शक्य नव्हते. हा प्रवास एका पिढीत काही किलोमीटर (शंभर किमी म्हणजे डोक्यावरून पाणी गेले !) असे. शिवाय मूळ जथ्यातले काही लोक पुढे जात असत काही वाटेवरच कायमची वस्ती करत असत कारण हा प्रवास कोण्या एका गंतव्य स्थानाला जाण्यासाठी नसून मुख्यतः राहण्यासाठी चांगले ठिकाण आणि खाण्यासाठी चांगले व सहज मिळाणारे अन्न शोधण्यासाठी होता. अर्थातच या प्रवासात मूळ स्थानापासून शेवटच्या स्थानापर्यंत मानवी वस्तीची साखळी निर्माण होत गेली. एवढ्या मोठ्या प्रवासात या साखळीला सहाजिकपणे अनेक फाटे फुटले... माणसाच्या भूमीप्रेमामुळे काही अपवाद वगळता ही साखळी आणि तिचे फाटे बर्‍यापैकी सलग राहिले आहेत. सद्याच्या सहज आणि वेगवान प्रवासाच्या काळातही जर आजच्या लोकसंखेसंबद्धीचे आकडे पडताळले तर असेच दिसते की ९०% टक्के किंवा जास्त लोक आपल्या आठवणीतल्या पूर्वजांच्या वस्तीच्या ठिकाणी किंवा त्याच्या जवळपासच राहत आहेत. एवढ्या पूर्वतयारीनंतर आता खालील चित्र बघूया:  असे समजूया की मानवी जथा जेव्हा निघाला तेव्हा त्याच्या जनुकांत 'अ' आणि 'ब' उत्परिवर्तने होती. अर्थात ही उत्परिवर्तने पिढ्या दर पिढीत पुढे जात आज अस्तित्वात असणार्‍या पिढीपर्यंतच्या जनुकात दिसतील. पण नंतर काही पिढ्यांमध्ये नवीन उत्परिवर्तने निर्माण होत राहणारच. समजा त्या जथ्याच्या दोन शाखा वेगळ्या मार्गांवरून प्रवास करू लागल्या आणि एका शाखेत 'क' तर दुसरीत 'ड' उत्परिवर्तन निर्माण झाले. अर्थातच ही उत्परिवर्तने पुढच्या सर्व शाखावार पिढ्यांत दिसतील.... आणि असेच प्रवासाच्या शेवटच्या स्थानापर्यंत पुढे चालू राहील. वरच्या विश्लेषणावरून असे दिसते की आपण जर जगातल्या अनेक स्थानांवर असलेल्या आजच्या मानवांची जनुके गोळा केली आणि त्यांच्यातील उत्प्रिवर्तनांचे विश्लेषण करून ती जगाच्या नकाश्यावर त्या व्यक्तीच्या आजच्या स्थानाप्रमाणे मांडली, तर आपल्याला मानवाचे मूळ स्थान, त्याचा प्रवासाचा (फाट्यांसह) मार्ग अगदी त्याच्या वंशजांच्या आजच्या स्थानापर्यंत ठरवता येतो. लाखो लोकांची जनुके गोळा करणे, त्यांची महत्वाची १,५०,००० उत्परिवर्तने आहेत की नाहीत यासाठी अचूक तपासणी करणे, ती माहिती जगाच्या नकाश्यावर मांडणे आणि त्यावरून विश्वासू निष्कर्ष काढणे ही वर सांगितली एवढी सोपी कृती नाही हे सांगायला नकोच ! या कामाकरिता संशोधकांचे अतुलनीय श्रम आणि खास निर्माण केलेले बरेच संगणकीय हार्डवेयर आणि सॉफ़्टवेयर कामी येत आहे. प्रवासाचा काल निश्चित कसा करतात? याकरिता गणितीय अथवा सांख्यिकी (statistics) पद्धत वापरली जाते. किती पिढ्यांमध्ये एक उत्परिवर्तन होवू शकेल याचे खूप निरीक्षणे करून आणि शास्त्रीय प्रतिमाने (models) वापरून शास्त्रज्ञांनी उत्परिवर्तनाचे वय नक्की करण्याची एक पद्धत बनवली आहे. मात्र हा पुरावा गणितीय असल्याने त्यावर शंभर टक्के विश्वास तेव्हाच ठेवला जातो जेव्हा त्याच्याशी जुळणारा काहीतरी सबळ जीवशास्त्रीय पुरावा मिळतो... अन्यथा त्याचे स्वरूप केवळ सिद्धांत / थियरी असेच राहते. याच कारणाकरिता जनुकशास्त्राने ठरवलेले मानवाच्या मूलस्थानाची जागा इथिओपियामधील ओमो किबिश आणि हेर्टोमध्ये आधुनिक मानवाचे जीवाश्म मिळाल्यानंतरच शास्त्रिय सत्य म्हणून पक्की झाली. असो. आतापर्यंत आपली शास्त्रिय पृष्ठभूमी बर्‍यापैकी मजबूत झाली आहे. पुढच्या भागापासून आपण आपले लक्ष केवळ पुढच्या प्रवासाची मजा घेण्यावर केंद्रित करू शकू. (क्रमशः ) ===================================================================== महत्त्वाचे दुवे १. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens २. https://genographic.nationalgeographic.com/ ३. http://www.smithsonianmag.com/ ४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration ५. http://www.bradshawfoundation.com/ ===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)... =====================================================================

वाचन 33593 प्रतिक्रिया 0