आधीचे भाग:
संध्याकाळचे सहा वाजत आले होते. आदित्यने आपली कार ओरियन टॉवरच्या बी-२ बेसमेंट पार्किंगमध्ये उभी केली आणि तळमजल्यावर येण्यासाठी तो लिफ्टमध्ये शिरला. पॅनलवरचे ‘G’ हे बटण दाबल्यावर दरवाजे बंद होत असताना अचानक त्याला ‘मॉन्टब्लँक सिग्नेचर’ ह्या परफ्यूमचा सुपरिचित सुगंध जाणवल्याने तो चपापला. त्याने आपल्या अवतीभोवती एकदा नजर फिरवली, पण लिफ्टमध्ये त्याच्याशिवाय कोणीही नव्हते.
आपल्याला भासच झाला असावा, असा विचार करत आदित्य लिफ्टमधून बाहेर पडला आणि ‘शुक हयाम’कडे वळला. सहाच्या ठोक्याला आत शिरल्यावर त्याने सवयीने डावीकडच्या रांगेतल्या शेवटच्या सहा आसनी टेबलाकडे नजर टाकली. कोपऱ्यातल्या, भिंतीलगतच्या खुर्चीवर तामीर बसलेला दिसला.
त्याच्या शेजारच्या मधल्या खुर्चीवर आदित्य बसत असतानाच, मोबाइलवर बातम्या वाचण्यात तल्लीन झालेल्या तामीरचे त्याच्याकडे लक्ष गेले. “बरोब्बर ठरलेल्या वेळी आलास,” मनगटावरच्या घड्याळाकडे बघून हसत तो म्हणाला. मग अचानक काही जाणवल्यासारखे त्याने नाकपुड्या फुलवून दोन-तीन वेळा काहीतरी हुंगल्यासारखे केले आणि बसल्या जागेवरून दिसणाऱ्या संपूर्ण रेस्टॉरंटवर त्याची शोधक नजर फिरू लागली.
त्याच्या ह्या सर्व क्रिया शेजारी बसून पाहिलेल्या आदित्यने त्याला विचारले, “तू दोन-तीन वेळा हुंगून तुला जाणवलेला सुगंध ‘मॉन्टब्लँक सिग्नेचर’चाच असल्याची खात्री करून घेत होतास ना?”
आदित्यच्या ह्या प्रश्नाने आश्चर्यचकित झालेल्या तामीरने आ वासून दोन क्षण त्याच्याकडे पाहिले आणि लगेच भानावर येत, “तुला कसे काय समजले रे?” असा त्याला प्रतिप्रश्न करत, वेटरला दोन काफे शाखोरची ऑर्डर दिली.
“अरे आताच काही मिनिटांपूर्वी मी बेसमेंट पार्किंगमधून इकडे येत असताना लिफ्टमध्ये मलाही तो सुगंध जाणवल्याने मी चपापलो होतो. पण लिफ्टमध्ये माझ्याशिवाय अन्य कोणीच नव्हते. इवाप्रमाणे तो परफ्यूम वापरणाऱ्या ह्या शहरात आणखीन कितीतरी महत्त्वाकांक्षी महिला असतील. कदाचित त्यांच्यापैकीच माझ्या आधी लिफ्टने वरती आलेली एखादी महिला इथेही आली असावी, किंवा येऊन गेली असावी. अनेकदा हे निव्वळ योगायोग अथवा आपल्या मनाचे खेळ असतात रे, बाकी काही नाही,” आदित्य उत्तरला.
“अच्छा. असं असेल तर मग ठीक आहे. बाय द वे... मगाशी फोनवर तू म्हणाला होतास की तुझी आई चिंताग्रस्त होती. काय झालं होतं तिला, तब्येत ठीक आहे ना तिची, की आपली नेहमीची तुझ्या लग्नाची काळजी?” तामीरने विचारले.
“तब्येत वगैरे अगदी ठीक आहे रे तिची, पण आज अमावस्या असल्याने तिला खूप काळजी वाटत होती माझी,” आदित्य उत्तरला.
त्याच्या उत्तराचा काही अर्थबोध न झालेला तामीर म्हणाला, “म्हणजे रे काय आदित्य? मला तू बोललेलं काहीच समजलं नाही.”
त्याला समजावून सांगण्याच्या सुरात आदित्य म्हणाला,“अरे, आमच्याकडे बरेच लोक अमावस्येची रात्र अशुभ मानतात. त्या रात्री अतृप्त आत्मे आणि वाईट शक्तींचा संचार असतो, असा समज आहे. माझी आई जुन्या वळणाची आहे. आज इतक्या दिवसांनी आपण ऑफिसला जाणार आणि अमावस्येच्या रात्री तिथे उशिरापर्यंत थांबणार, हे दुपारी समजल्यापासून ती बेचैन झाली. तिची समजूत काढताना माझ्या नाकी नऊ आले.”
“आईची काळजी मला समजते”. तामीर म्हणाला. “माझ्या आईनेही लहानपणी मला अशा रात्रींबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या.”
“कसल्या गोष्टी?” आदित्यने उत्सुकतेने विचारले.
“लिलीथची कथा.” तामीरने टेबलवर आलेल्या काफे शाखोरचा घोट घेतला आणि सांगायला सुरुवात केली.
“माझी आई रात्री झोपण्यापूर्वी मला अनेकदा ही लोककथा सांगायची. ती म्हणायची, जगातली पहिली स्त्री हव्वा नसून लिलीथ होती. देवाने आदम आणि लिलीथ ह्या दोघांनाही एकाच मातीपासून घडवलं होतं. त्यामुळे लिलीथ स्वतःला आदमच्या बरोबरीची मानायची. पण आदमने तिला आपल्या अधिपत्याखाली राहायला सांगितलं, तेव्हा तिने त्याला स्पष्ट नकार दिला. त्या दोघांमध्ये खूप वादावादी झाली. रागाच्या भरात तिने देवाचं गुप्त नाव उच्चारलं आणि तांबड्या समुद्राच्या ओसाड किनाऱ्याकडे निघून गेली.”
तामीर क्षणभर थांबला.
“देवाने तिला परत आणण्यासाठी तीन देवदूत पाठवले, सनोय, सनसनोय आणि सेमंगेलोफ. पण लिलीथ परत आली नाही. पुढे ती रात्रीची शिकारीण बनली, अशी लोककथा आहे. अंधाऱ्या रात्री ती खिडक्यांपाशी घुटमळते आणि पाळण्यातल्या बाळांवर, बाळंतिणींवर झडप घालते, एकट्या पुरुषांना संमोहित करून त्यांची जीवनऊर्जा शोषून घेते, असं सांगितलं जातं. मात्र ज्या पाळण्यावर त्या तीन देवदूतांची नावं लिहिलेली असतील, तिथे ती येत नाही, अशीही एक समजूत आहे.”
“ह्या कथेत अमावस्येचाही उल्लेख आहे?” आदित्यने कुतूहलाने विचारले.
तामीरने होकारार्थी मान हलवली.
“आई म्हणायची, ज्या रात्री आकाशात चंद्र नसतो, त्या रात्री लिलीथला मोकळं रान मिळतं. ‘तामीर, अशा रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबू नकोस,’ अशी तिची सक्त ताकीद असायची.” तो किंचित हसला. “अर्थात, ही लोककथा आहे. तिच्यात काहीच तथ्य नाही. पण लहानपणी आईच्या तोंडून ती ऐकताना मात्र चांगलीच भीती वाटायची.”
“म्हणजे तुझ्या आईच्या कथेनुसार आज लिलीथची रात्र आहे!” आदित्यने हसत म्हटले.
“कथेनुसार,” तामीरने लगेच दुरुस्ती केली. मात्र त्याच्या आवाजातला गंभीर सूर कमी झाला नव्हता.
काही क्षण शून्यात नजर हरवून शांत बसल्यावर तामीर म्हणाला, “ मगाशी तू म्हणालास ते बरोबर होतं. तो परिचित सुगंध जाणवल्यावर मला इवाचीच आठवण आली होती. तिच्या बाबतीत घडलेली गोष्ट मी विसरू शकत नाही. आणि कधी कधी मला वाटतं... इवाच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे.”
चमकून त्याच्याकडे पाहत आदित्य म्हणाला, “तामीर, तू हे काय बोलतोयस?”
“इवा ॲशफोर्ड कॅपिटल बँकेत सुखात होती. मीच तिला स्टर्लिंग क्रेस्टमध्ये येण्याचा सल्ला दिला. मी तिला सांगितलं होतं की इथे भविष्यात पुढे जाण्याच्या अधिक संधी मिळतील. तिने माझ्या सल्ल्यावर विश्वास ठेवला आणि नोकरी बदलली.”
त्याचा आवाज हळूहळू कातर होत गेला. “मी तिला हा सल्ला दिलाच नसता तर? कदाचित आज ती जिवंत असती! माझ्यामुळेच ती ह्या इमारतीत आली, आणि इथेच तिचा मृत्यू झाला.”
तामीरने दोन्ही हातांनी काफे शाखोरचा मग घट्ट धरला. त्याच्या चेहऱ्यावर स्वतःविषयीचा राग आणि असहायतेची भावना स्पष्ट दिसत होती.
काही वेळ टेबलाभोवती एकदम शांतता पसरली.
संध्याकाळचे सात वाजून गेले होते. वेटर त्या दोघांच्या काफे शाखोरचे रिकामे मग्स घेऊन जात असताना अचानक आदित्यचे लक्ष शुक हयामच्या प्रवेशद्वाराकडे गेले. समोरून नोआ आणि सारा आत येताना त्याला दिसल्या. वाढदिवसानिमित्त इवाने ऑर्डर केलेला मोरपिशी रंगाचा ड्रेस परिधान करून, आदित्यने ऑर्डर केलेला मोठा पांढराशुभ्र टेडी बेअर छातीशी कवटाळून त्यांच्या टेबलाच्या दिशेने नोआच्या पुढे चालत येणारी सारा खूप गोड दिसत होती.
टेबलापाशी आल्यावर नोआ तामीरच्या समोरील भिंतीलगतच्या खुर्चीवर बसली. आदित्यच्या समोरच्या मधल्या खुर्चीवर आपला टेडी बेअर ठेऊन त्या शेजारच्या खुर्चीवर सारा विराजमान झाली. सगळ्यांचे हाय-हॅलो झाले.
साराने नोआकडून आपली छोटी सॅक मागून घेत त्यातला डिजिटल म्युझिक प्लेअर, स्केचबुक आणि रंगीत पेन्सिल्सची पेटी काढली, कानांवर हेडफोन चढवून हिब्रू बालगीते ऐकत, टेबलावर आपल्यासमोर स्केचबुक उघडून त्यात रेखाचित्र काढण्याच्या उद्योगाला ती लागली.
तामीरने कोणाला काय खायला हवे ते विचारून नोआ, आदित्य आणि स्वतःसाठी सबिखची, आणि सारासाठी बबका केकची ऑर्डर दिल्यावर तो वॉशरूमकडे जायला निघाला.
तामीरच्या चेहऱ्यावरचे उदास भाव नोआच्या नजरेतून सुटले नव्हते. तामीर वॉशरूममध्ये गेल्यावर तिने लगेच आदित्यला त्याच्या या उदासपणामागचे कारण विचारले. त्यावर नोआ इथे येण्यापूर्वी त्याच्या आणि तामीरमध्ये काय चर्चा झाली होती, याचा थोडक्यात गोषवारा आदित्य तिला सांगत असताना तामीर परत येऊन आपल्या खुर्चीत बसला.
“अरे, घरीसुद्धा हा मधूनमधून असंच बोलतो,” तामीरकडे काळजीयुक्त नजर टाकत नोआ आदित्यला म्हणाली. “इवाच्या मृत्यूला हा कारणीभूत नाही, हे मी त्याला कितीतरी वेळा समजावलंय. मी काय सांगते हे त्याला समजतं, पण मनाला ते पटवून देणं त्याला जमत नाही. असे विचार आले की ह्याला रात्र रात्र झोप लागत नाही, म्हणून मलाही त्याची काळजी वाटते.”
पाण्याचा घोट घेण्यासाठी थांबलेली नोआ पुढे बोलू लागली, “तुझी अमावस्येबद्दलची माहिती माझ्यासाठी नवीन असली तरी लिलीथच्या लोककथा मी सुद्धा लहानपणी ऐकल्या आहेत. आता तुम्हाला खरं सांगते, इवाच्या बाबतीत घडलेल्या घटनेनंतरचे पहिले चार-पाच दिवस तुझ्या आई प्रमाणेच माझ्याही मनात भीती उत्पन्न करणारे काही विचार येत होते.”
“कुठले विचार?” समोर आलेल्या सबिखचा घास घेण्यापूर्वी आदित्यने उत्सुकतेने विचारले.
नोआ पुढे बोलू लागली, “स्टॉकहोममध्ये असताना तिची इच्छा असेल त्या रविवारीच चर्चमध्ये जाणाऱ्या इवा बरोबर, तिला सोबत म्हणून मी पण कधी कधी चर्चमध्ये जायचे. तिथली धार्मिक प्रवचने मला प्रचंड कंटाळवाणी वाटत असत, पण काहीवेळा त्यात सांगितल्या जाणाऱ्या ख्रिस्ती लोककथा किंवा दंतकथा रोचक असायच्या. तिथेच मी ‘फ्रायडे द थर्टीन्थ’ ह्या दिवसाबद्दलच्या काही लोककथा ऐकल्या होत्या.
इवाचा दुर्दैवी मृत्यू झाला तो दिवस होता शुक्रवार दिनांक तेरा मार्च, अर्थात ‘फ्रायडे द थर्टीन्थ’. ख्रिस्ती परंपरेतील लोकसमजुतीनुसार अशुभ मानल्या जाणाऱ्या दिवशी आपल्याला सोडून गेलेल्या इवाचे मृत्यूपश्चात काय झाले असेल?. तिला मुक्ती मिळाली असेल का?. हे आणि असे अनेक प्रश्न मला पडायचे. त्यांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नांत काही अभद्र विचार मनात येऊन मी खूप अस्वस्थ व्हायचे.”
“कमाल आहे नोआ तुझी. तुझ्या मनातं विचारांचे असे काहूर माजले असूनही तुझी बेचैनी तू मला कधी जाणवू दिली नाहीस.” आश्चर्य आणि कुतूहल मिश्रित नजरेने नोआकडे पाहत तामीर म्हणाला.
त्यावर मंद स्मित करीत नोआ म्हणाली, “अवघे चार-पाच दिवस चाललेली माझ्या मनाची घालमेल जाणून घेण्याची त्यावेळी तुझी मनःस्थितीही नव्हती, आणि तुला तेवढा वेळही नव्हता. त्या दुर्घटनेनंतर पुढचे चार दिवस, तुझी आणि आदित्यची चाललेली धावपळ मला दिसत होती. मायदेशात इवा अनाथ, पोरकी असली तरी इथे ती आपल्या परिवाराची सदस्य होती. तिचा मृतदेह स्वीडनला पाठवण्यात काहीच अर्थ नसल्याने इवाचे अंत्यसंस्कार इथेच, तेल अवीवमध्ये करण्याचा तुम्ही दोघांनी घेतलेला निर्णय खरोखर स्तुत्य होता. हा निर्णय अंमलात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि स्वीडिश दूतावासाकडून परवानगी मिळवण्यासाठी केलेली धडपड प्रशंसनीय होती. आपल्या कर्तव्यपूर्तीत तुम्ही दोघेही कमी पडला नाहीत ह्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान वाटतो.”
एवढे बोलून भावुक झालेल्या नोआने सबिखचा एक तुकडा खाल्ला आणि सगळ्यांचा मूड थोडा हलका करण्यासाठी हेडफोनवर गाणी ऐकत चित्र काढण्यात मशगूल असलेल्या साराच्या खांद्यावर थोपटत म्हणाली, “एवढा वेळ कुठलं स्केच काढत बसली आहेस, दाखव की ते आम्हाला...”
साराने नोआसमोर सरकवलेले स्केचबुक उचलून त्यातले चित्र बघणाऱ्या नोआच्या चेहऱ्यावरचे भाव झपाट्याने बदलू लागले आणि स्केचबुक छातीशी धरत तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. काही क्षण त्याच अवस्थेत बसलेल्या नोआने डोळे उघडून पाहीले तेव्हा तामीर, आदित्य आणि सारा संभ्रमित मुद्रेने तिच्याकडे बघत असल्याचे तिला जाणवले.
तामीर आणि आदित्यचा संभ्रम दूर करण्यासाठी नोआने साराचे स्केचबुक त्यांच्यासमोर ठेवल्यावर ते दोघे चित्राकडे निरखून पाहू लागले.
आठ वर्षांच्या चिमुरडीने काढलेले एक सामान्य रेखाचित्र होते ते... त्यात अशी किती अचूकता आणि बारकावे असणार? पण चित्रात अनेक त्रुटी आणि विस्कळीत रेषा असूनही त्या रेखाचित्रात खुर्चीत बसलेली महिला इवाच असावी असा अंदाज आपल्याप्रमाणे तामीर आणि आदित्यलाही आल्याचे; त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच नोआच्या लक्षात आले.
खात्री करून घेण्यासाठी, “सारा, तू हे कोणाचे स्केच काढले आहेस?” असा प्रश्न नोआने तिला विचारल्यावर “इवाचे”, असे निरागस उत्तर तिने दिले खरे, पण त्यानंतर नोआ, तामीर आणि आदित्य आपल्याकडे काहीशा विचित्र नजरेने का पाहात आहेत हे मात्र त्या बिचारीच्या लक्षात येत नव्हते. त्यामुळे आपल्याकडून काही चूक झाली का? असा प्रश्न पडून ती कावऱ्याबावऱ्या नजरेने आळीपाळीने त्या तिघांकडे पाहू लागली.
आपल्या अंदाजाला पुष्टी मिळाल्यावर तामीरने गंभीरपणे टेबलावरच्या चित्रातल्या इवाच्या सूटवर दोन वेळा तर्जनीने स्पर्श करत सूचक नजरेने आदित्यकडे बघितले. पुन्हा त्या चित्राकडे बघितल्यावर आदित्यनेही त्याच्या काहीतरी लक्षात आल्यासारखी मान डोलावली. समोर बसून हे सर्व पाहिल्यावर नोआनेही मग आपल्या भुवया उंचावत प्रश्नार्थक मुद्रेने आदित्यकडे बघितले.
१३ मार्च रोजी, म्हणजे ज्या रात्री इवाचा मृत्यू झाला त्या दिवशी तिने नवा लालचुटुक पॅन्ट सूट आणि गळ्यात मोठे लाल ठिपके असलेला पांढरा स्कार्फ परिधान केला होता. एरवी फिकट रंगाचे कपडे घालणाऱ्या इवाला ती वेशभूषा चांगली शोभूनही दिसत होती. पण कुठल्याही गोष्टीसाठी इवाची स्तुती करण्याआधी, तिची थोडी टिंगल-टवाळी करण्याच्या त्यांच्या सामायिक सवयीला तामीर आणि आदित्य त्या दिवशीही जागले होते. संध्याकाळी लिमोनना प्यायला खाली जात असताना लिफ्टमध्ये त्या रंगसंगतीवरून इवाची चेष्टा-मस्करी करून तिला उचकवण्याचा दोघांनी निष्फळ प्रयत्न केला होता.
तामीर आपल्या कृतीतून साराने काढलेल्या चित्रातील लाल रंगाच्या पेन्सिलने रंगवलेला इवाचा सूट आणि लाल ठिपक्यांच्या स्कार्फकडे निर्देश करत असल्याचे आदित्यच्या चटकन लक्षात आले, आणि लिफ्टमधला त्या दिवशीचा प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर त्या क्षणी तरळून गेला.
आता शुक हयाममध्ये उपस्थित असलेल्या तामीर, आदित्य, नोआ आणि सारापैकी फक्त दोनच व्यक्ती अशा होत्या ज्यांनी १३ मार्च रोजी इवाला जिवंतपणी शेवटचे पाहिले होते. तामीरने घरी जाण्यापूर्वी ‘होली लँड सिप्स’मध्ये आणि आदित्यने बेसमेंट पार्किंगकडे जाण्यापूर्वी लिफ्ट लॉबीमध्ये.
साराच्या अर्भकावस्थेपासून इवाने तिला आपल्या अंग-खांद्यावर खेळवले होते. बालपणापासून जवळपास प्रत्येक वीकएंडला सारा तिला बघत आली असल्याने तिच्यासाठी इवा चिरपरिचित होती. त्यामुळे इवाची कायमस्वरूपी केशभूषा म्हणता येण्यासारखा तिचा ब्लंट कट साराच्या स्मरणशक्तीत अगदी पक्का नोंदला गेला असणे सहज शक्य होते. परंतु कार्यालयीन औपचारिक वेशभूषेतल्या इवाला तिने कधी पाहिले असण्याची शक्यता मात्र धूसर होती. त्यामुळे साराने काढलेल्या इवाच्या चित्रात हे तपशील बघून आपण मनापासून हादरल्याचे आदित्यने नोआला सांगितले.
आदित्यचे बोलणे मन लावून ऐकल्यावर नोआने थोड्या दबक्या आवाजात त्या दोघांना उद्देशून विचारले, “आणखी काही गोष्टी तुमच्या लक्षात नाही आल्या का?”
तामीर आणि आदित्यने पुन्हा ते चित्र निरखून पाहिले पण दोघांनाही त्यात आणखी काही जाणवले नाही म्हणून तामीरने विचारले “आणखी कोणत्या गोष्टी नोआ?”
उत्तरादाखल नोआ तोंडाने काहीच बोलली नाही. आधी तिने तामीर आणि आदित्य बसलेल्या खुर्च्यांमागच्या आपल्या समोरच्या भिंतीला खेटून ठेवलेल्या सर्व्हिस काउंटरकडे बघितले; आणि मग आपली मान किंचित उचलून भिंतीवरच्या पेंटिंगकडे ती एकटक बघत राहिली.
नोआने केवळ नजरेने दिलेला इशारा बरोबर समजलेल्या तामीर आणि आदित्यनेही आधी मान वळवून मागचे सर्व्हिस काउंटर आणि भिंतीवरच्या पेंटिंगचे व्यवस्थित निरीक्षण केले आणि त्या दोघांची नजर पुन्हा टेबलावरच्या साराने काढलेल्या चित्रावर येऊन खिळली.
दोन-चार वेळा पुन्हा मान मागे वळवून सर्व्हिस काउंटर आणि पेंटिंगकडे पाहून बारकाईने साराच्या चित्राचे तुलनात्मक निरीक्षण केल्यावर नोआ कुठल्या गोष्टींबद्दल बोलत आहे ते दोघांच्याही लक्षात आले. आधी भांबावलेल्या नजरेने एकमेकांकडे पाहून झाल्यावर तामीर आणि आदित्यने एक कटाक्ष साराच्या दिशेने टाकला आणि मग त्यांची नजर नोआच्या चेहऱ्यावर स्थिरावली, पण त्यांच्या नजरेत तेच भाव कायम होते.
टेबलावर काही क्षण विलक्षण शांतता पसरली. नोआ, तामीर आणि आदित्यच्या प्लेट्समधले सबिख संपलेले पाहून मगाशी नोआने तिघांसाठी ऑर्डर केलेली काफे शाखोर त्यांच्यासमोर येऊन काही मिनिटे झाली होती, पण त्या तिघांपैकी कोणालाही आपला मग उचलून कॉफीचा घोट घेण्याचे अजून सुचले नव्हते. आपण काढलेले चित्र पाहिल्यापासून बरोबरच्या तिघांचे वागणे बदलले आहे ह्याची जाणीव साराला झाली होती. पण आपण नक्की काय गडबड केली आहे ह्याचा उलगडा होत नसल्याने तिने निमूटपणे आपला बबका केक संपवायला घेतला होता...
साराने काढलेल्या रेखाचित्रात, समोरच्या भिंतीलगतच्या सर्व्हिस काउंटरवरची निळ्या रंगाची फुलदाणी आणि तिच्यात खोचलेली पिवळी फुले, भिंतीवरच्या पेंटिंगमध्ये दिसणारा हिरव्या कुरणातला काळ्या रंगाचा घोडा आणि आकाशातला सूर्य ह्या गोष्टींच्या आकृत्या ओबडधोबड असल्या तरी व्यवस्थितपणे ओळखू येत होत्या. आणि...
ह्या पार्श्वभूमीवर लाल सूट परिधान केलेली चित्रातली इवा ज्या खुर्चीत बसलेली दिसत होती; ती साराच्या समोरची आणि आदित्यच्या शेजारची एकमेव रिकामी खुर्ची होती...
क्रमशः
मिसळपाव
प्रतिक्रिया