Skip to main content

कथा - वेव्हलेंथ (भाग - १)

लेखक टर्मीनेटर यांनी शनिवार, 07/11/2026 10:33 या दिवशी प्रकाशित केले.

साडेचार वाजले होते. अफेका येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये लॅपटॉपसमोर बसलेल्या आदित्यचा मोबाइल पुन्हा वाजला. स्क्रीनवर तामीरचे नाव झळकत होते.

“आदित्य... अरे, कोणाशी एवढा वेळ बोलत होतास? कितीतरी वेळापासून तुझा फोन व्यस्त लागत होता.”

“आईचा कॉल आला होता रे तामीर... आज खूप उदास आणि चिंताग्रस्त होती. तिची समजूत काढायला बराच वेळ लागला.”

“अच्छा. मीटिंग संध्याकाळी सात वाजता आहे, पण मी तुला विचारायला फोन करत होतो की, तू सहा वाजेपर्यंत येऊ शकशील का? त्या दुर्घटनेला आज पाच आठवडे झाले, तरी ऑफिसमध्ये पाय ठेवायची अजून हिंमत होत नाही. ‘शुक हयाम’मध्ये आपले आवडते सबिख खात, कॉफी पीत आपण काही वेळ बसलो, तर माझ्या मनाची थोडी तयारी होईल.”

“खरं आहे. आज ना उद्या आपल्याला पुन्हा ऑफिसला जावं लागणार आहे, असा नुसता विचार जरी मनात आला तरी माझ्या अंगावर सर्रकन काटा येतो. पण आज ती वेळ आलीच असल्याने मला तुझी कल्पना आवडली आहे. मी लवकर निघतो, सहाला भेटू आपण ‘शुक हयाम’मध्ये... चल, बाय.”

सहा वाजता तामीरला भेटायचे, म्हणजे हातात अवघा दीड तास होता. आईशी बोलण्यात खूप वेळ गेल्यामुळे संध्याकाळच्या मीटिंगचे प्रेझेंटेशन पूर्ण करायला अजून पाऊण तास तरी लागणार होता. आदित्यने तामीरशी बोलणे आवरते घेत फोन कट केला आणि पुन्हा कामाला लागला.

अपेक्षेपेक्षा काही मिनिटे आधीच काम संपल्यावर आदित्यने लॅपटॉप बंद केला. त्याच्या अपार्टमेंटपासून यिगल अलोन स्ट्रीटवरच्या ‘ओरियन टॉवर’पर्यंत, म्हणजे त्याच्या ऑफिसच्याच इमारतीच्या तळमजल्यावरच्या ‘शुक हयाम’ रेस्टॉरंटपर्यंत कारने पोहोचायला फारतर पंचवीस मिनिटे लागणार होती. तयार होऊन निघायला वीसेक मिनिटे पुरेशी होती. हाताशी वेळ बेताचा, पण पुरण्याएवढा असल्याने मन शांत करण्यासाठी त्याने पुन्हा एकदा अंघोळ करण्याचा निर्णय घेतला.

अंघोळ आटोपल्यावर तो पुढच्या तयारीला लागणार एवढ्यात त्याला मोबाइलचा मेसेज टोन ऐकू आला.

“न्यूयॉर्कहून येणाऱ्या बँकेच्या सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांचे विमान उशिरा पोहोचणार आहे. त्यामुळे आजची मीटिंग सातऐवजी रात्री साडेआठला होईल. सविस्तर ईमेल पाठवला आहे. - डेव्हिड फ्रीडमन”

ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडून आलेला संदेश वाचल्यावर तो तामीरला फोन लावणार तेवढ्यात तामीरचाच फोन आला.

“डेव्हिडचा संदेश वाचलास का, आदित्य?”

“हो वाचला. पण सहा वाजता भेटण्याच्या दृष्टीने माझी निघण्याची तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. आता आधी ठरल्याप्रमाणे आपण शुक हयाममध्ये भेटायचे की नाही?”

“मला वाटतं आपल्या कार्यक्रमात बदल न करता सहा वाजता शुक हयाममध्ये भेटूया. आता मीटिंगला जाण्यापूर्वी बऱ्यापैकी वेळ मिळणार असल्याने शब्बातनिमित्त मेणबत्ती लावून झाल्यावर नोआ आणि सारा सुद्धा आपल्याला जॉइन होतील. आठच्या सुमारास आपण ऑफिसला जाऊ आणि त्या दोघी घरी जातील. तुझं काय मत आहे?”

“तुझी कल्पना उत्तम आहे. जवळपास महिन्याभरात माझीही त्या दोघींशी भेट झाली नाहीये. मी निघतो इथून दहा मिनिटांत. भेटू आपण ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी.”

तामीरशी बोलणे संपवून आदित्यने फोन ठेवला. दहा मिनिटांत तयार होऊन, लॅपटॉपची सॅक पाठीवर अडकवून तो अपार्टमेंटबाहेर पडला आणि काहीशा तणावग्रस्त मनःस्थितीत कार चालवत ओरियन टॉवरच्या दिशेने निघाला. डावीकडचे पहिले वळण घेऊन मुख्य रस्त्याला लागला, तशी स्टीअरिंगवरची त्याची पकड नकळतपणे घट्ट झाली, आणि मन आपोआप मागे सरकत गेले... थेट चार वर्षांपूर्वीच्या... ऑफिसमधल्या त्या पहिल्या दिवसापर्यंत...

◆ ◆ ◆

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या कासेगावात, ऊस बागायतदार असलेल्या एका संपन्न एकत्र कुटुंबात जन्मलेला आदित्य मोहिते पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. तिथे एम.बी.ए. (फायनान्स) उत्तम गुणांनी पूर्ण केल्यावर न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय असलेल्या ‘स्टर्लिंग क्रेस्ट बँके’त त्याला नोकरी मिळाली. पुढे बँकेने त्याची बदली दुबईच्या कार्यालयात केली. तिथे दोन-अडीच वर्षे काढल्यानंतर ‘इन्व्हेस्टमेंट बँकर’ म्हणून बढती मिळवत चार वर्षांपूर्वी इस्रायलच्या तेल अवीव शहरात दाखल झालेला आदित्य, वर्षभरापूर्वी बँकेच्या ‘व्हाइस प्रेसिडेंट’ पदापर्यंत पोहोचला. लौकिकार्थाने त्याची कारकीर्द देदीप्यमान म्हणता येण्यासारखी होती.

तेल अवीवमध्ये पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता तो ‘ओरियन टॉवर’च्या चोविसाव्या मजल्यावर आला. त्या उत्तुंग इमारतीचे वरचे वीस ते चोवीस, असे तब्बल पाच मजले स्टर्लिंग क्रेस्ट बँकेच्या भल्यामोठ्या कार्यालयाने व्यापलेले होते. त्या ठिकाणी, गेल्या दोन-तीन दिवसांत ईमेलवर जुजबी परिचय झालेल्या इवा कोवाचेविच ह्या समवयस्क एच.आर. मॅनेजरशी आदित्यची पहिली भेट झाली.

सुमारे बारा वर्षांपूर्वी स्टॉकहोमहून इस्रायलला आलेली बाल्कन वंशाची इवा, स्वीडनमध्ये जन्मलेली आणि वाढलेली स्वीडिश नागरिक होती. आदित्य इथे येण्याच्या वर्षभर आधी ती स्टर्लिंग क्रेस्टमध्ये रुजू झाली होती.

जॉइनिंगचे सर्व सोपस्कार पार पडल्यावर इवाने शिरस्त्याप्रमाणे आदित्यला बँकेच्या वेगवेगळ्या विभागांतील अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये नेऊन त्यांच्याशी ओळख करून दिली. विसाव्या मजल्यावरची त्याची केबिन दाखवण्याआधी तिने त्याला त्याच मजल्यावर दुसऱ्या टोकाला असलेल्या आय.टी. डिपार्टमेंटचा प्रमुख तामीर कोहेन ह्याच्या केबिनमध्ये नेले.

इवाने परिचय करून देताच काही क्षणांतच व्यावसायिक औपचारिकता गळून पडली आणि तिघांमध्ये मनमोकळा, अनौपचारिक संवाद सुरू झाला. सुमारे दहा मिनिटे दिलखुलास गप्पा रंगल्यावर इवाची कर्तव्यबुद्धी जागी झाली. आदित्यला त्याच्या केबिनमध्ये नेऊन सोडण्याची जबाबदारी तिने तामीरवर टाकली. “आज आपण तिघे लंचसाठी एकत्र जाणार आहोत. एक वाजता लंचब्रेकमध्ये पुन्हा भेटू,” अशी आदेशवजा सूचना देऊन ती चोविसाव्या मजल्यावरच्या आपल्या केबिनकडे निघून गेली.

इवा गेल्यानंतर पाच-सात मिनिटे गप्पा मारून तामीरने आदित्यला त्याच्या केबिनमध्ये आणून सोडले. नव्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊन, लंचब्रेकमध्ये भेटण्याची आठवण करून देत तो आपल्या कामाला निघून गेला.

आदित्य खूश होता. आतापर्यंत भेटलेली सगळीच माणसे त्याला चांगली वाटली होती, पण इवा आणि तामीर विशेष आवडले होते. ही त्यांची पहिलीच प्रत्यक्ष भेट असली, तरी तिघांमध्ये एक प्रकारची भावनिक जवळीक निर्माण झाली होती.

पहिलाच दिवस असल्यामुळे क्लायंट मीटिंग्स ठरलेल्या नव्हत्या, पण रिकामे बसून राहणे आदित्यच्या स्वभावातच नव्हते. त्याचा सहाय्यक म्हणून नेमलेल्या बेंजामिनशी जुन्या आणि संभाव्य नव्या क्लायंट्सबद्दल चर्चा करण्यात, आणि इथली कार्यसंस्कृती समजून घेण्यात तो इतका मग्न झाला की घड्याळाकडे त्याचे लक्षच नव्हते. केबिनच्या काचेच्या दरवाजावर टकटक झाली. इवा आणि तामीर बाहेर उभे राहून त्याला लंचसाठी चलण्याची खूण करत होते. खुर्चीतून उठता उठता तो म्हणाला, “बेंजामिन, लंचनंतर आपण ही चर्चा पुढे सुरू ठेवूया.”

लिफ्टने खाली येऊन ते तिघे तळमजल्यावरच्या ‘शुक हयाम’ ह्या पारंपरिक इस्रायली रेस्टॉरंटमध्ये शिरले. “तूच ऑर्डर दे,” असे म्हणत त्याच्यासमोर बसलेल्या इवाने मेनू कार्ड आदित्यच्या हातात दिले. त्याने त्यावर नजर फिरवली, पण एक-दोन पदार्थ वगळता बाकीच्या पदार्थांची नावेही त्याने कधी ऐकली नव्हती. त्याने कार्ड आपल्या शेजारी बसलेल्या तामीरकडे सरकवले.

“तुम्ही दोघे इथले जुने जाणकार आहात. तुम्हीच ऑर्डर द्या... मी खाण्याचे काम करतो!”

तामीर हसला. “इथले सगळेच पदार्थ चांगले असतात. पण सबिख आणि शावर्मा इथे उत्कृष्ट मिळतात, आणि आम्हा दोघांचे ते विशेष आवडते आहेत. तेच मागवूया. आशा आहे, तुलाही आवडतील,” असे म्हणत त्याने ऑर्डर दिली.

तासाभराच्या त्या लंचब्रेकमधली पन्नास मिनिटे जेवण आणि गप्पांत गेली. त्या गप्पांतून आदित्यला इवा आणि तामीरच्या स्वभावाची आणि विचारसरणीची, तर त्या दोघांना आदित्यच्या स्वभावाची आणि विचारसरणीची बऱ्यापैकी कल्पना आली. पुढे रोजच्या भेटीगाठींतून त्यांचा परिचय दिवसागणिक वृद्धिंगत होत गेला. तिघांची व्यक्तिमत्त्वे, जीवनशैली, कौटुंबिक आणि धार्मिक पार्श्वभूमी वेगवेगळी असली, तरी त्यांच्या वेव्हलेंथ तंतोतंत जुळत होत्या, आणि त्यामुळे त्यांचे मैत्र अधिकाधिक घट्ट होत गेले.

एके दिवशी शुक हयाममध्ये जेवत असताना इवा पहिल्यांदाच आदित्यशी स्वतःबद्दल बोलू लागली. तिचा भूतकाळ हृदयद्रावक होता. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर तिथे वांशिक संघर्ष आणि यादवीने उग्र रूप धारण केले. जीव वाचवण्यासाठी स्वीडनमध्ये आश्रय घेतलेल्या निर्वासितांमध्ये एका दांपत्याचाही समावेश होता. त्यांच्याच पोटी इवा कोवाचेविचचा जन्म झाला. तिच्या जन्माने पित्याच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आणला खरा, पण तोच तिच्या आईच्या आयुष्याचा अखेरचा क्षण ठरला. प्रसूतीदरम्यान उद्भवलेल्या गुंतागुंतीवर मात करण्यात डॉक्टरांना अपयश आल्याने बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच तिची प्राणज्योत मालवली.

इवाच्या आयुष्यातील संकटांची मालिका तिथेच थांबली नाही. ती जेमतेम साडेपाच वर्षांची असताना वडील काम करत असलेल्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला आणि त्या भीषण अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या इवाची रवानगी स्टॉकहोममधील एका सरकारी बालगृहात झाली. अशा प्रतिकूल परिस्थितीतही तिच्या आयुष्याला एक आशादायी दिशा मिळाली. स्वीडनची दर्जेदार शिक्षणव्यवस्था आणि विद्यार्थ्यांसाठीच्या सरकारी सुविधांचा तिने लाभ घेतला. पार्टटाइम नोकऱ्या करून शिक्षणाचा खर्च भागवत आणि विद्यार्थी साहाय्य योजनेतील अनुदान व कर्जाच्या मदतीने इवाने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. परिस्थितीने तिच्याकडून बालपण हिरावून घेतले होते, पण तिला आपल्या स्वप्नांवर पाणी सोडावे लागले नाही.

संघर्षांनी इवाला व्यावहारिक, शिस्तप्रिय आणि महत्त्वाकांक्षी बनवले होते. तारुण्याच्या उंबरठ्यावरच स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द तिच्या मनात रुजली. लग्न, संसार आणि भावनिक गुंतागुंतींपेक्षा करिअर, प्रगती आणि स्वतंत्र ओळख निर्माण करून ती जपणे तिला अधिक महत्त्वाचे वाटत असे. कुणावर अवलंबून न राहता स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहणे, हाच तिच्या जगण्याचा मूलमंत्र बनला होता.

तिची ही जीवनगाथा तिच्याच तोंडून ऐकल्यावर आदित्यच्या मनातला इवाविषयीचा आदर कितीतरी पटींनी वाढला. भावनांमध्ये गुंतून ध्येयापासून विचलित होऊ नये म्हणून तिने स्वतःभोवती स्वनिर्मित कवचकुंडले उभारली होती. मात्र त्या कठोर कवचाआड दडलेल्या हळव्या मनाची तिला स्वतःलाही पूर्ण जाणीव नव्हती. तिची ही भावनिक बाजू मोजक्याच जवळच्या व्यक्तींना ठाऊक होती: आदित्यला, तामीरला आणि तामीरची पत्नी नोआला.

तामीर कोहेन हा परंपरा जपणारा, पण कर्मठ नसलेला यहुदी माणूस होता. कामात शिस्तप्रिय आणि जबाबदार असलेला तामीर स्वभावाने मनमिळाऊ, कुटुंबवत्सल आणि संवेदनशील होता. जवळच्या माणसांशी त्याचे नाते केवळ औपचारिकतेपुरते नसे. त्यांच्या सुख-दुःखांत सहभागी होणे आणि गरजेच्या वेळी पाठीशी उभे राहणे, हा त्याच्या वृत्तीचाच भाग होता.

दुःखाची पहिली मोठी झळ तामीरला बालपणातच बसली. इस्रायली लष्करात सेवा बजावणारे त्याचे वडील दुसऱ्या इंतिफादाच्या काळात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मारले गेले, तेव्हा तामीर जेमतेम दहा-अकरा वर्षांचा होता. वडिलांचे हसणे, त्यांचा आवाज, त्यांच्या खांद्यावर बसून पाहिलेली आतषबाजी, ह्या आठवणी आजही त्याच्या मनात स्पष्ट होत्या आणि त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली होती.

वडिलांच्या निधनानंतर आईनेच त्याला वाढवले. स्वतःचे दुःख बाजूला सारून तिने प्रेमाने आणि जिद्दीने मुलाला मोठे केले. झोपताना त्याला यहुदी लोककथा आणि दंतकथा सांगणे, हा तिचा रोजचा नेम होता. पण नियतीने त्याची आणखी एक कठोर परीक्षा घेतली. कोविडच्या साथीने जगभर थैमान घातले असताना, २०२० मध्ये संसर्गामुळे त्याच्या आईचेही निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर तीच त्याचा एकमेव आधार होती, त्यामुळे तिच्या जाण्याने त्याच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. ह्या दोन्ही आघातांनी त्याला नात्यांचे मूल्य खोलवर समजावले होते. जीवन किती अनिश्चित असू शकते, ह्याची जाणीव असल्याने आपल्या माणसांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याच्यासाठी अनमोल होता.

तेल अवीवमधल्या त्याच्या घरी तामीर, त्याची पत्नी नोआ आणि मुलगी सारा असे त्याचे छोटेसे कुटुंब होते. नोआ ही त्याची जीवनसाथी आणि जवळची मैत्रीणही होती. लहानग्या साराच्या निरागस हसण्यात त्याला अनेक दुःखांवर फुंकर घालणारे सुख मिळे. तिच्याबरोबर खेळणे, तिच्या छोट्या-मोठ्या गोष्टी ऐकणे आणि तिच्या वाढत्या वयाच्या प्रत्येक टप्प्याचा साक्षीदार होणे, यांत तो मनापासून रमून जाई. लहानपणी वडिलांचे आणि पुढे आईचेही छत्र हरपल्यामुळे असेल कदाचित, पण नोआ आणि साराला जपण्याबाबत तो विशेष सजग होता. कामाचा कितीही व्याप असला, तरी कुटुंबासाठी वेळ काढण्याचा तो प्रयत्न करी.

नोआ मूळची जेरुसलेमची. जेरुसलेमच्या हिब्रू युनिव्हर्सिटीत मानव्यविद्या शाखेत शिकत असताना विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत तिला स्टॉकहोम युनिव्हर्सिटीत काही काळ शिकण्याची संधी मिळाली. परदेशातला तो अनुभव तिच्यासाठी नवा आणि समृद्ध करणारा होता. तिथेच तिची इवाशी ओळख झाली. विद्यार्थी वसतिगृहात दोघींच्या खोल्या शेजारी-शेजारी होत्या. सामायिक स्वयंपाकघरातील गप्पा, रोजच्या छोट्या-मोठ्या अनुभवांची आणि भविष्यातील स्वप्नांची देवाणघेवाण, यांतून त्यांची मैत्री हळूहळू घट्ट होत गेली. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न असला, तरी एकमेकींना समजून घेण्याची तयारी हा त्यांच्या मैत्रीचा भक्कम पाया ठरला. शिक्षणाबरोबर इवा पार्टटाइम नोकरीही करीत असे. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी चाललेली तिची धडपड नोआने जवळून पाहिली होती आणि इवाची जिद्द, शिस्त आणि स्वावलंबी वृत्ती यांबद्दल तिच्या मनात विशेष आदर निर्माण झाला होता.

शिक्षण पूर्ण झाल्यावर नोआ जेरुसलेमला परतली, पण अंतरामुळे त्यांची मैत्री कमी झाली नाही. काही काळाने जेरुसलेममध्ये इवासाठी बँकिंग क्षेत्रातील नोकरीची संधी चालून आली, तेव्हा नोआनेच तिला इस्रायलला येण्याचा आग्रह केला. नोकरीत स्थिरावेपर्यंत इवा नोआच्याच घरी राहिली. स्टॉकहोमनंतर पुन्हा एकाच शहरात राहण्याची संधी त्यांना मिळाली होती आणि निवाऱ्याबरोबरच एका जवळच्या मैत्रिणीचा आधारही इवाला लाभला. पुढे इवाला तेल अवीवमध्ये, जे इस्रायलचे आर्थिक केंद्र मानले जाते, ‘ॲशफोर्ड कॅपिटल बँके’त एच.आर. मॅनेजरची आणखी चांगली संधी मिळाली. व्यावसायिक प्रगतीचा विचार करून तिने जेरुसलेम सोडले. त्यामुळे दोघींच्या भेटीगाठी काहीशा कमी झाल्या, तरी जिव्हाळा कायम राहिला. कालांतराने नोआचे तामीरशी लग्न झाले आणि तीही तेल अवीवमध्ये स्थायिक झाली. त्यानंतर दोघींना पुन्हा नियमितपणे भेटणे शक्य झाले. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर एकमेकींसोबत राहिल्यामुळे त्यांची मैत्री केवळ जुन्या आठवणींवर टिकलेले नाते न राहता त्यांच्या वर्तमानाचाही महत्त्वाचा भाग बनली होती.

स्टर्लिंग क्रेस्ट बँकेत एच.आर. मॅनेजरचे पद रिक्त होणार असल्याचे कळताच तामीरला पहिली आठवण झाली ती इवाची. तिच्या अनुभवाची आणि कामातील कौशल्याची त्याला जाणीव होती. पद दोन्ही ठिकाणी समान स्तराचे असले, तरी इवाच्या क्षमतेच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या तुलनेत स्टर्लिंग क्रेस्टमध्ये भविष्यातील प्रगतीचा मार्ग अधिक व्यापक आहे, हे त्याने तिच्या लक्षात आणून दिले आणि स्वतः तिचे नावही सुचवले. तामीरच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करून इवाने ॲशफोर्ड कॅपिटलमधील नोकरी सोडली आणि स्टर्लिंग क्रेस्ट बँकेत रुजू झाली. नोआ आणि सारा हे त्याच्या विश्वाचे केंद्र असले, तरी मित्रांच्या आयुष्यातही शक्य तिथे सकारात्मक बदल घडवून आणणे, हे त्याचे वैशिष्ट्य होते.

आदित्यच्या कासेगावच्या घरात त्याचे आई-वडील, सख्खा मोठा भाऊ, दोन काका-काकू, तीन चुलत भावंडे आणि आजी-आजोबा असा मोठा परिवार होता. अशा एकत्र कुटुंबात वाढलेल्या आदित्यला अमेरिकेतील आणि दुबईतील त्याच्या वास्तव्यकाळात एकटेपणाची भावना अनेकदा सतावत असे. परंतु तेल अवीवमध्ये आल्यानंतर तो स्वतः, इवा, तामीर, नोआ आणि सारा असा त्याचा एक नवीन परिवार तयार झाल्याने ती त्रासदायक भावना नाहीशी झाली होती.

प्रत्येक वीकएंडला तेल अवीव शहराच्या अवतीभोवती असलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाला किंवा संग्रहालयाला भेट देणे हा त्यांचा नित्यक्रम बनला होता. अधूनमधून एखाद्या शनिवारी कधी पश्चिमेकडील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील, तर कधी पूर्वेकडील मृत समुद्रकिनाऱ्यावरील एखाद्या रिसॉर्टमध्ये त्यांचा मुक्काम होत असे. यांपैकी काहीच शक्य नसेल तेव्हा कधी तामीरच्या घरी, तर कधी इवाच्या अपार्टमेंटमध्ये लंच किंवा डिनरच्या निमित्ताने ही सर्व मंडळी एकत्र येऊन खूप धमाल करत.

एकंदरीत त्यांचे सर्व काही उत्तम चालले होते, पण नियतीच्या मनात मात्र काही दुसरेच होते...

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया