एकंदरीत त्यांचे सर्व काही उत्तम चालले होते, पण नियतीच्या मनात मात्र काही दुसरेच होते...
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध संयुक्त लष्करी मोहीम सुरू केली. पहिल्याच हल्ल्यांत इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते, अनेक उच्चपदस्थ लष्करी अधिकारी आणि सल्लागारही मारले गेले. प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायलवर, तसेच आखाती देशांतील अमेरिकी तळांवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि हजारो ड्रोन डागण्यास सुरुवात केली.
अचानक उद्भवलेल्या ह्या युद्धसदृश परिस्थितीमुळे इस्रायलमधील जनजीवनाने आपली नियमित लयच गमावली होती. शाळा आणि महाविद्यालयांचे दरवाजे बंद झाले होते. जेरुसलेम, हैफा आणि इतर प्रमुख शहरांतील रस्त्यांवर नेहमीची गजबज राहिली नव्हती. परंतु देशाची आर्थिक राजधानी असलेल्या तेल अवीव शहरात सुरुवातीच्या चार-पाच दिवसांच्या शुकशुकाटानंतर कार्यालये हळूहळू पुन्हा सुरू झाली होती.
इराणकडून क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ल्याची शक्यता निर्माण होताच होम फ्रंट कमांडकडून नागरिकांच्या मोबाइलवर इशारे येत आणि शहरभर सायरनचे भेदक आवाज घुमत. हातातले काम आणि दुकानांतले व्यवहार अर्धवट सोडून लोक जीवाच्या भीतीने जवळच्या भूमिगत निवाऱ्यांकडे, इमारतींमधील संरक्षित खोल्यांकडे किंवा भूमिगत रेल्वे स्थानकांकडे धाव घेत. अशा गोष्टींमुळे जनजीवन काहीसे संथ झाले असले, तरी ठप्प झाले नव्हते.
कधी दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर होणारे हल्ले वाढत तर कधी कमी होत. अशाच अनिश्चित वातावरणात १३ मार्च २०२६ हा दिवस उजाडला.
दिवसभर आदित्य, तामीर आणि इवा आपापल्या कामात व्यस्त होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास ऑफिसपासून चालत सहा-सात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या आपल्या घरी जाण्यासाठी निघालेला तामीर आदित्यच्या केबिनमध्ये डोकावला. केबिनचा दरवाजा अर्धवट उघडून धरत त्याने बाहेरूनच विचारले, “इवाला फोन केलाय, ती पाच मिनिटांत खाली येते म्हणाली. लिमोनना प्यायला जाण्याचा आमचा विचार आहे. काम संपले असेल तर तू पण येतोस का?”
“हे काय विचारणं झालं? लिमोनना प्यायला मी नकार देऊच शकत नाही. येतो मी तुमच्याबरोबर. फक्त एक मिनिट दे मला हा जामानिमा गुंडाळण्यासाठी,” असे म्हणत आदित्यने पुढ्यातला लॅपटॉप बंद करून चार्जरसह तो सॅकमध्ये भरला. केबिनमधले लाइट्स बंद करून तो तामीरबरोबर लिफ्ट लॉबीत आला, तेवढ्यात इवाही तिथे आली. तिघे एकत्र खाली येऊन शेजारच्या इमारतीतील ‘होली लँड सिप्स’ ह्या ज्यूस सेंटरमध्ये शिरले.
तीन लिमोननाची ऑर्डर दिल्यावर तामीरने विचारले, “उद्या तुम्ही आमच्या घरी किती वाजता येणार आहात पार्टीसाठी? शक्यतो लवकर या. इवा तू तर लवकर येच, बर्थडे गर्लसाठी तिच्या आवडीचा बबका केक तयार करण्यात नोआला तुझी मदत लागणार आहे.”
“तामीर, मला वॉरटाइम एम्प्लॉई सेफ्टी रिपोर्ट आणि लेबर कम्प्लायन्स रिपोर्ट तयार करून आजच न्यूयॉर्क मुख्यालयाला पाठवायचे आहेत. डोकं भंजाळून टाकणाऱ्या ह्या कामात अजून तीन-चार तास तरी सहज जातील. घरून करण्यासारखे हे काम नसल्यामुळे ऑफिसमध्ये थांबणे भाग आहे. आज मला घरी पोहोचायला सुपर लेट होईल. पण मी सकाळी अकरा वाजेपर्यंत येण्याचा प्रयत्न करते,” इवा उत्तरली.
तिचे म्हणणे पटल्यासारखी मान डोलवत आदित्य म्हणाला, “खरं आहे. न्यूयॉर्क मुख्यालयाशी आपल्या इथल्या वेळा जुळवत काम करणे अनेकदा खूप थकवणारे असते.”
मंद स्मित करत इवा म्हणाली, “हो रे... पण इस्रायलमध्ये कामाचा आठवडा रविवारी सुरू होऊन गुरुवारी संपतो, शुक्रवार-शनिवार सुट्टी. आपली बहुराष्ट्रीय बँक असल्याने जगभरातील वित्तीय बाजारांशी ताळमेळ राखण्यासाठी इथे सोमवार ते शुक्रवार असा कामाचा आठवडा असतो, आणि शनिवार-रविवार हे आपल्या हक्काच्या सुट्टीचे दिवस असतात. माझ्यासाठी ही गोष्ट खूप समाधानकारक असल्याने अधूनमधून असे उशिरापर्यंत काम करावे लागले, तरी माझी त्याबद्दल तक्रार नसते.”
“इवाचं ठीक आहे. पण तुझं काय रे आदित्य? तू किती वाजता येणार आहेस?” प्रश्नार्थक मुद्रेने आदित्यकडे पाहत तामीरने विचारले.
“मी लवकर येऊन काय करणार? उद्या साराचा आठवा वाढदिवस आहे ना... मग येतो मी रात्री आठ वाजता,” असे मस्करीच्या स्वरात आदित्य बोलल्यावर हसत हसत त्याच्या पाठीत हळूच एक गुद्दा मारत तामीर म्हणाला, “ते काही नाही, सकाळी दहापर्यंत झोपा काढ हवंतर, पण तू सुद्धा इवाप्रमाणे अकरा वाजेपर्यंत ये. खूप धमाल करू आपण दिवसभर.”
“हो. येतो मी पण शक्य तितक्या लवकर,” असे म्हणत आदित्यने समोर आलेला लिमोननाचा ग्लास उचलून तोंडाला लावला.
“चला. शब्बात सुरू झालेला आहे, नोआ माझी वाट बघत असेल. मला आता निघावं लागेल,” असे म्हणत दोघांचा निरोप घेऊन तामीर त्याच्या घराच्या दिशेने निघून गेला.
बिल भरून झाल्यावर इवा आणि आदित्य सारासाठी त्यांनी ऑनलाइन ऑर्डर केलेल्या गिफ्ट्सची चर्चा करत लिफ्ट लॉबीत आले. एका लिफ्टने इवा पुन्हा ऑफिसमध्ये वर जायला आणि दुसऱ्या लिफ्टने आदित्य त्याची कार घ्यायला बी-२ ह्या बेसमेंट पार्किंगमध्ये खाली जायला निघाले.
इवाच्या लिफ्टचे दरवाजे आधी उघडले. आत शिरून तिने वळून आदित्यकडे पाहिले आणि तिच्या ओठांवर तेच नेहमीचे किंचित हसू उमटले. “उद्या अकरा वाजता,” असे म्हणत मध्यभागी सरकत जुळणाऱ्या दरवाजांमागे ती गुडुप झाली, पण तिच्या परफ्यूमचा मंद-धुंद सुगंध मात्र लॉबीत रेंगाळला.
◆ ◆ ◆
सव्वाआठच्या सुमारास पहिला रिपोर्ट न्यूयॉर्क मुख्यालयाला पाठवून झाल्यावर शिणलेल्या मेंदूला थोडी विश्रांती देण्यासाठी ती ब्रेकरूममध्ये गेली. व्हेंडिंग मशीनमधून घेतलेली कॉफी दहा मिनिटे सोफ्यावर शांतपणे बसून प्यायल्यावर पुन्हा केबिनमध्ये परतून तिने दुसरा रिपोर्ट तयार करायला घेतला.
पावणेदहा वाजता तयार झालेल्या दुसरा रिपोर्ट पुन्हा तपासून ती तो ईमेलला अटॅचमेंट म्हणून जोडत असतानाच होम फ्रंट कमांडकडून क्षेपणास्त्र हल्ल्याची शक्यता वर्तवणारा संदेश तिच्या मोबाइलवर आला. ती तो वाचत होती, तोच बाहेर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचा इशारा देणाऱ्या सायरनचा कर्कश आवाज घुमू लागला.
अटॅचमेंटसह तयार झालेला तो ईमेल मुख्यालयाला पाठवण्यासाठी तिने त्वरित सेंड बटणावर क्लिक केले. “युअर मेसेज वॉज सेंट सक्सेसफुली” असे नोटिफिकेशन दिसल्यावर मात्र क्षणाचाही विलंब न करता तिने लॅपटॉप बंद करून बॅगमध्ये भरला. खालच्या मजल्यावरच्या संरक्षित खोलीत जायला निघालेली इवा घाईघाईने जेमतेम केबिनच्या दरवाजापर्यंत पोहोचली, आणि...
इराणने डागलेली क्लस्टर-वॉरहेड असलेली काही क्षेपणास्त्रे इस्रायलची हवाई सुरक्षा यंत्रणा भेदून तेल अवीवसह अनेक शहरांत कोसळली. त्यांपैकी एकातून सुटलेले तीन बॉम्बलेट ओरियन टॉवरच्या छतावर पडले. एकापाठोपाठ झालेल्या त्यांच्या भीषण स्फोटांमुळे इमारतीच्या सर्वात वरच्या चोविसाव्या मजल्याची अतोनात हानी झाली.
त्या वेळी चोविसाव्या मजल्यावर उपस्थित असलेल्या आठ जणांपैकी सात जण किरकोळ ते गंभीर जखमी झाले, दुर्दैवाने इवावर छताचा मोठा भाग कोसळल्याने तिचा जागच्या जागीच मृत्यू झाला.
ह्या घटनेनंतर आठवड्याभराने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. छताचे आणि चोविसाव्या मजल्याच्या अंतर्गत दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत, सुरक्षेच्या कारणास्तव तेविसावा आणि चोविसावा असे दोन मजले सील करण्यात आले. त्या खालचे सर्व मजले वापरास सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र संबंधित यंत्रणेकडून मिळाल्यावर स्टर्लिंग क्रेस्ट बँके’ने आपल्या कार्यालयाच्या पाच पैकी वरचे दोन मजले सोडून विस, एकविस आणि बाविस असे तीन मजले आवश्यकतेपुरते पुन्हा वापरात आणले होते.
युद्ध आता सीमेवर लढण्यापुरते आणि एकमेकांच्या सैन्य ठिकाणांवर होणाऱ्या हल्ल्यांपुरते मर्यादित राहिले नव्हते. इराण कडून अमेरिकन वित्तसंस्थांवर सायबर हल्ले होण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. तसेच मधल्या काळात बँकेच्या तेल अवीव शाखेला झालेले मोठे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी नवीन धोरण आखणे गरजेचे झाले होते.
स्टर्लिंग क्रेस्ट बँकेवरही होऊ शकणाऱ्या संभाव्य सायबर हल्ल्यांचा सामना करण्यासाठीच्या काही उपाययोजना राबवण्यासाठी आणि नवे आर्थिक धोरण ठरवण्यासाठी न्यूयॉर्क मुख्यालयाशी वेळ जुळवत आज दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी उच्च्पदस्थ अधिकाऱ्यांची एक तातडीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. ह्या मीटिंगसाठी बरोबर पाच आठवड्यांनी पहिल्यांदाच आदित्य आणि तामीर पुन्हा ओरियन टॉवरमधल्या ऑफिसमध्ये येणार होते.
क्रमशः
आधिचा भाग: कथा - वेव्हलेंथ (भाग - १)
मिसळपाव
प्रतिक्रिया