टिचला बिलोरी आयना - भाग १
लेखनप्रकार
उन उतरत आले तेव्हा बाप्पा भट घरी आला.
पायर्यांच्या जवळ गराडा घालून वडारांची गर्दी.
दिवसभर बसून आसपास थुंकून सडा घातला होता. नागडी पोरं इकडे तिकडे नाचत होती.बाया कलकलाट करत होत्या.
बाप्प्पा भट आला म्हटल्यावर एकदम गलका एकदम बंद.
बाप्पानी नजर फिरवल्यावर दोघा तिघांनी तंबाखू गिळलीच. मग तात्या वडार पुढे झाला.
आता वडाराची जात. त्याला आब ती नाहीच.
"बाप्पा ,रायके नाही भेटले."
आतापर्यंत बाप्पा भटाची नजर थूकलेल्या सड्याकडे गेली.
झालं . त्यानी गड्याला हाक मारली.
गडी येईपर्यंत शिव्यांचा सडा.
बाप्पा भट म्हणजे शिवीगाळ करण्यात वडारांच्या वरताण.
"मादरचोदांनो. भटाच्या उंबर्यावर थुकता ?तुमच्या आय..."
पण आज वडारंही गप्प बसायला तयार नव्हती.
सारखा एकच ठेका
"रायके ...रायके.."गलबला परत चालू.
बाप्पानी तात्या वडाराला बाजूला घेतलं .
"भडव्या ,तुला पैशे कोन देणार सांगीतलं होतं ?"
"पण आड्याचा भट पैशे नाय देत "
"नाय देत..म्हणजे काय ?"
"किती रुमाल खोदाई झाली ?"
"अटरा."
"झरा लागला ?"
"लागन पन दाकवणार नाय."
"का ?"
"झरा लागल्यावर वडाराला पैशे कोन देनार ?"
बोटावर मोजून तात्या वडारानी सात दिवसाचे पैसे बाकी असल्याचं सांगीतलं .
बाप्पा भटाच्या कपाळावरची शिर उडायला लागली.
"म्हणून मादर..माझ्या उंबर्यावर थुंकत बसता काय ?"
गडी बाजूला उभा होता.
"जा रे आड्याच्या भटाकडे .घेऊन ये हिशोब."
गडी घुटमळत उभा राहील्यावर बाप्पाच्या अंगाचा तिळपापड.
"जाउन आलो बाप्पाजी."गडी तोंडातल्या तोंडात बोलला.
"मग ..?'
आड्याचा भट आजारी हाय .
"मेला नाही ना ? जा ..जा मरण्याच्या आधी घेऊन ये.."
गडी जागचा हलेना पण बोलेना पण.
आता बाप्पाच्या लक्षात आलं .
कोटाच्या खिशातून नोटा चिल्लर काढून वडाराच्या हातात दिली.
"चल आत्ता चल मादरचोद काढ झरा."
वडारी पुढे झाली पण आज अमावस्येला काढणार नाही म्हटल्यावर बाप्पाच्या संतापाचा कळस झाला.
आज अवस म्हटल्यावर बाप्पाची पंचाईत झाली.
वडारांनी आपल्याला कैचीत पकडलं म्हटल्यावर रागानी कापायला लागला
पण करतो काय .?
वडाराच्या जातीला सोडायचं असं?
मग आठवलं .
"जा आता जा. उंबरा साफ करा ."
असं म्हटल्यावर कुरकुरत वडारी कामाला लागले.
धाकट्या बावीतून पाणी काढून अंगण साफ झालं .
वडार्यांची पाठ फिरली आणि बाप्पा भट घरात शिरला.
********
बाप्पा भट आतल्या आत रात्रभर धुमसत राहीला. सकाळी आगीत तेल पडलं.
वडारी रात्रीच गाव सोडून पळाले.सकाळी गावातून आलेल्या गड्यानी बातमी दिल्यावर आणखी भडका उडला.
बाप्पा भटाला गुंडाळून वडारी गावाच्या बाहेर गेले ही गोष्ट गावात चर्चेचा विषय झाली होती. बाप्पानी एक गावात फेरी मारली .बाजार ओलांडून पुढे येता येता पिंपुटकरांचा म्हातार भेटला.बोळकं हलवत थेरडा हसत म्हणाला
बाप्पा दुसरीपण बाव कोरडी म्हण की..
या जागी दुसरा कुणी असता तर बाप्पानी त्याला मातीत घोळसला असता पण ...
गावातली सगळी थेरडी पंचा तोंडावर धरून हसत असणार हे बाप्पाला डोळ्यासमोर दिसत होतं.
म्हणजे दुसरी बावडी पण कोरडी.
आधीच्या बावेचं पाणी फक्त मार्गशिर्षापर्यंत पुरायचं .
आता सगळा राग आड्याच्या भटावर.आड्याच्या भटानी पैसे दिले नाहीत म्हणून बावडीचं काम खोळंबलं.
आड्याचा भट तसा भिकारच होता.बाप्पानी बाहेरगावाचा भट आणला म्हणून आधीच गाव रागावलं होतं.
बाप्पानी त्याला सरळगावातून सोडवून आणलं होतं .आड्याचा भट होता दशग्रंथी ब्राह्मण पण दिवसभर देवळाची घंटा बडवण्यात आणि चंदन उगाळण्यात त्याला रस नव्हता.
अधून मधून देवळाच्या दानपेटीत त्याचा हात जायचा.
काही वर्षांपूर्वी हात पेटीत अडकला आणि देवळाच्या विश्वस्तांनी भटाला चावडीवर बांधून ठेवलं होतं.रदबदली करून बाप्पानी त्याला सोडवून आणलं होतं.
बाप्पाला आणि भटाला एकच षौक.वडवलीच्या एकाच विधवेच्या मिठीत दोघंही जण आळीपाळीनी असायचे.भट गरीब आनि भामटा म्हणून त्याचा बोभाटा.बाप्पाच्या तोंडावर बोलण्याची पंचक्रोशीत तरी कुणाचीच हिंमत नव्हती.बाप्पाचं सुपीक डोकं चाललं आणि भट आड्याला येऊन राहीला.
बाप्पा भट उपकाराचं मोल पैन् पै वाजवून घेणारा.आड्याचा भट संसारानी गांजून गेला होता.
एक तर विधूर त्यात गळ्यात दोन पोरी.एक पायानी लंगडी आणि काळीविद्री.दुसरी गोरी नाजूक पण जरा खुळचटच.
बाप्पा भटानी वसूलीत काळ्यालंगड्या पोरीशी दुसरंपणी लग्न करून घेतलं.
बायको मरून अजून चार महीने व्हायचे होते पण बाप्पाला काही फरक पडत नव्हता.
घरच्या देवाला माध्यान्हीपूर्वी प्रसाद दाखवायला आणि अडीअडचणीला त्याची भूक भागवायला घरात कुणीतरी हवं होतं .
पहील्या बायकोच्या तेराव्यानंतर गावातलं कुणीही फिरकलं नव्हतं.
संपूर्णं गाव बाप्पा भटाला शिव्या घालायचं.पण सकाळी ताकाला बायकोला लोटी घेऊन वाड्यावर पाठवायचंच.
पण बायको गेल्यावर वाड्यावर बाया येईनाशा झाल्या.
बाप्पाच्या मनात एकच सल. मंदीराच्या विश्वस्ताला पूजेचा मान मिळायचा नाही.
मंदीर कोकणस्थांचं.बाप्पा देशस्थ. बाप्पानी डोकं लढवून पाहीलं .मंदीराच्या प्रसादाचे ब्राह्मण देवरुखे.बाप्पानी त्यांना फोडलं. वाड्यावर भाडं न घेता बिर्हाडांना जागा दिली.पण बाप्पाची बायको गेल्यावर एकेक करून त्यांनीही जागा सोडल्या.
बाप्पा भटाची सावली पडली तरी बाईला दिवस जातात अशी ख्याती. अर्ध्या वाटेतून बाप्पा मागे फिरला.
बाव कोरडी निघाली तर पोरीला परत पाठवायची बोली बाप्पा भटानी आड्याच्या भटाकडून करून घेतली होती.
शिव्यांची लाखोली वाहत बाप्पा आड्याला निघाला.
(क्रमश :)
भाग २
वाचन
17568
प्रतिक्रिया
0