मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"एक्स्पोर्ट सरप्लस"

सुधीर काळे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"एक्स्पोर्ट सरप्लस" दहा-पंधरा वर्षांपूर्वी भारतात एकादा माल "एक्स्पोर्ट सरप्लस आहे" असे सांगणे म्हणजे अप्रत्य़क्षपणे त्या मालाच्या प्रतीबद्दल (qualityबद्दल) ग्वाही देण्याचाच एक भाग होता. कदाचित अशा नावाने आजही माल विकला जात असेल, पण परदेशी रहात असल्यामुळे मला बरोबर कल्पना नाहीं. मला समजलेली एक्स्पोर्ट सरप्लसची व्याख्या म्हणजे एक्स्पोर्टची ऑर्डर १०० ची असतांना २०० नग बनविणे व एक्स्पोर्ट केल्यानंतर जे शंभर उरतील ते एक्स्पोर्ट सरप्लस म्हणून स्वदेशातील बाजारात उपलब्ध करून देणे! पण पाकिस्तानने या शब्दांची व्याख्याच बदलली आहे असे वाटते. पाकिस्तानने "केवळ निर्याती"साठी दहशतवादी बनविण्याचे कारखाने उभारले व तेही खास एक्स्पोर्ट झोन्समध्ये! (आपल्याकडे मुंबईला जशी सीप्झ विभाग आहे अगदी तशातलाच प्रकार!) त्यासाठी पाकव्याप्त काश्मीरचा डोंगराळ विभाग त्यांनी निवडला. या कारखान्यात अतिरेक्यांसाठी शस्त्रास्त्रेही बानायची व ते वापरणारे अतिरेकीही. दोन्ही गोष्टींचे उत्पादन एकाद्या कारखान्यात mass production च्या तत्वावर जसे उत्पादन केले जाते त्या तत्वावर केले गेले. पाक-व्याप्त काश्मीरच्या डोंगराळ भागात असे अनेक कारखाने उभारले गेले. समोरासमोर केलेल्या युद्धात आपली ताकत कमी पडून युद्ध जिंकता येत नाहीं असे ल़क्षात आल्यावर असे छुपे युद्ध करण्याचे तंत्र प्रथम जनरल झियाच्या कारकीर्दीत सुरू झाले. या "mass scale" वर फक्त निर्यातीसाठी केलेल्या संपूर्ण उत्पादनाची निर्यात मुख्यत: भारतात व्हायची. "नेमेचि येतो मग पावसाळा"सारख्या एकाद्या चक्रीय घटनेप्रमाणे ठराविक काळानंतर भारतात स्फोट व्हायचे, निष्पाप लोक मरायचे, आपले सरकार निषेध-खलिते पाठवायचे व गप्प बसायचे. पण झियाच्या काळात ही निर्यात आपल्या काश्मीर राज्यापुरतीच मर्यादित होती. पण.....? झियाला त्याच्या अशा कारखान्यात निर्मिलेल्या अतिरेक्यांनीच यमसदनाला पाठविले असावे. अलीकडे बेनझीरबाईंनाही अशाच अतिरेक्यांनी मारले. झियाला उडवल्यानंतर राज्यावर आलेल्या बेनझीरबाई त्यांच्या पहिल्या ’खेळी’त (term) लिंब-लोणचंच होत्या! राष्ट्राध्यक्ष गुलाम इशाक खान, लष्करप्रमुख ज. बेग व गुप्तहेर संघटनेचे (ISI चे) प्रमुख ज. हमीद गुल या तिघांनी बेनझीरला कांहींही अधिकारच दिले नाहीत व कांहींही करूही दिले नाहीं. त्यामुळे बेनझीरबाईंना या अतिरेक्यांच्याबाबतीत काहीच करता आले नाही. त्यांचे मंत्रीमंडळ बरखास्त केल्यावर नवाज शरीफ गादीवर आले. हे तर आधीपासूनच लष्कराच्या आशिर्वादाने व लष्करशहांनी बेनझीरला शह देण्यासाठी उभारलेल्या "IJI" या पक्षातर्फे निवडून आले होते. अर्थातच लष्कराच्या ताटाखालचे मांजरच. त्यांनीही दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या काळातही हे "केवळ निर्यातीसाठी" असलेले हे कारखाने जोरात चालूच ठेवले गेले व तिथल्या प्रशिक्षित अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये येऊन खूप धुमाकूळ घातला. त्यानंतर बेनझीरबाई पुन्हा निवडून आल्या, पण या वेळी तिला सर्व अधिकार मिळाले. ’शहाण्या’ झालेल्या बेनझीरबाईंनी लष्कराशी कांहींशी हातमिळवणी केली व मिळालेल्या अधिकारांचा दुरुपयोग करून हे अतिरेकी बनविण्याचे कारखाने चालूच ठेवले. फक्त पाकव्याप्त काश्मीरातच नव्हे तर अनेक नवे कारखाने खुद्द पाकभूमीवर इस्लामाबादच्या आसपासही उभारण्यात आले. दोन-तीन वर्षें राज्य करून त्या पुन्हा पदच्युत झाल्या व नवाज़ शरीफ पुन्हा आले. पण तेही फार दिवस टिकले नाहींत. त्यांची ही छोटी कारकीर्द कारगिल युद्धामुळे व पाकिस्तानी अण्वस्त्रांचा स्फोट घडवून आणल्यामुळे संस्मरणीय झाली. पण मुशर्रफने नवाज़ शरीफांची 'निर्यात' सौदी अरेबियाला करून स्वत: आधी CEO व नंतर राष्ट्राध्यक्ष झाले. मुशर्रफ़-मियॉंने तर उच्छादच मांडला! त्याच्या काळात ही अतिरेक्यांची निर्यात फक्त काश्मीरपुरती मर्यादित न रहाता हे अतिरेकी सार्‍या भारतात निर्यात होऊ लागले. त्यात पार्लमेंटहाऊसवरील हल्ला, अनेक मंदिरांवरचे हल्ले, बंगळूरमधले हल्ले, वाराणसीवरील हल्ला, जयपूरवरील हल्ला वगैरे हल्ले मोडतात! या मुशर्रफ़च्या काळात एक मोठे (व भारताच्या दृष्टीने सकारत्मक) परिवर्तन घडून आले. प्रथमच "केवळ निर्याती"साठी बनविलेल्या या मालाला पाकिस्तानच्या स्वदेशी बाजारपेठेतही चांगली मागणी येऊ लागली. खुद्द मुशर्रफ़ यांच्या गाडीखाली बाँब उडवून त्यांना मारण्याचा दोनदा प्रयत्न झाला. दुर्दैवाने तो अयशस्वी ठरला. काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करणार्‍यांना "स्वातंत्र्य-सैनिक" म्हणायचे पण त्याच्या स्वतःच्या गाडीखाली बाँब लावणार्‍यांना मात्र खुनी, गुन्हेगार म्हणायचे अशा निरनिराळ्या व सोयीस्कर व्याख्या मुशर्रफने बनविल्या. आधी केवळ निर्यातीसाठी असलेले हे उत्पादन ५० टक्के निर्यातीसाठी तर उरलेले ५० टक्के "स्वगृही" वापरण्यात येऊ लागले. या दहशतवाद्यांनीच लाल मस्जिद येथे दारूगोळ्याचा मोठा साठा केला, वापरला, दोनेक दिवस सैन्यालाही थोपवून धरले व शेवटी प्रचंड प्रमाणावर रक्तपात होऊन तो वेढा उठविण्यात आला. त्यात "गड आला पण सिंह (उंदीर) गेला"ची पुनरावृत्ती झाली! लाल मस्जिद मुक्त झाली, पण मुशर्रफ़ या "चुह्या"चा पत्ता कटला! त्याच्या शेवटच्या दिवसांत बेनझीरबाईही अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडल्या. अगदी स्वनिर्मित (home-made) अतिरेक्यांकडून. आता तिचे पती राज्य करताहेत. पाकिस्तान राष्ट्र पाकिस्तानी सरकार चालवितंय् कीं हे अतिरेकी व इतर कर्मठ व धर्मांध मुल्ला-मौलवी चालवत आहेत की ISI चे बेलगाम अधिकारी चालवताहेत असा प्रश्न साहजिकच मनात येतो! आज तरी या अतिरेक्यासमोर पाकिस्तानी सरकार शरण आलेलं दिसतंय्. मधेच कधी तरी झटका आल्यासारखे तालीबानवर हल्ले होतात, मग जरा रग उतरली कीं 'स्वात'सारख्या कुठल्याशा भागात शारिया कायदाही लागू होतो, जरा अमेरिकेने डोळे वटारले कीं पुन्हा वजीरिस्तानवर कांहीं दिवस संक्रांत येते. मग पुन्हा तह होतो. असेच चालू रहाते. गेल्या वर्षी २६ नव्हेंबरला पाकिस्तानने मुंबईला एक मोठी "निर्यात" केली. तीन-चार ठिकाणे हेरून अतिरेक्यांनी हैदोस घातला, २०० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले व एक अतिरेकी जिवंत सापडला. पण या मोठ्या निर्यातीनंतर पुन्हा पाकिस्तानची स्वदेशी बाजारपेठ तेजीत आहे. गेल्या दहा दिवसात दहापेक्षा जास्त ठिकाणी स्फोट झाले आहेत, तेही बर्‍याचदा पोलिसांवर किंवा लष्करी ठाण्यांवर! वजीरिस्तान, पेशावर, लाहोर अशा वेगवेगळ्या शहरांत!! सध्या जोम धरून चालू असलेली तालीबानविरुद्धची वजीरिस्तानमधील मोहीम किती दिवस चालेल कुणास ठाऊक? कारण हे असे जोरदार बाँब हल्ले वेगवेगळ्या शहरात घडवून आणून तालीबान जणू पाकिस्तानला जणू एक तर्‍हेचे आव्हानच देतंय! त्याचा उपयोगही होतोय असं वाटतंय. एकदम "तूभी ठंडा हो जा, हमभी ठंडे होते हैं" असे म्हणून पुन्हा कुठेतरी शारिया लागू होईल. पुन्हा अमेरिकेची मदत आटतेय असं वाटल्यावर लुटपुटीची ही लढाई पुन्हा सुरू होईल. कधीही या मोहिमेचे रंग बदलून व कसली तरी तत्वशून्य तडजोड करून पाकिस्तानी लष्कर पुन्हा अतिरेक्यांचेच हात बळकट करते हे बर्‍याचदा आपण पाहिले आहेच. अवैध मार्गाने पैसे कमावण्यात मग्न झालेल्या व आराम व चैन करायला सोकावलेल्या लष्करी अधिकार्‍यांना कष्ट करायचे नाहींतच! शिपुरडे लढताहेत, मरताहेत व हे लष्करी अधिकारी पैसे खा-खाऊन मजा करताहेत व लठ्ठ होताहेत असे विचित्र आणि अन्याय्य चित्रच सध्या दिसतंय्. पण असे किती दिवस चालणार? एवढे मात्र खरे की या ना त्या कारणाने पाकिस्तानच्या स्वदेशी मार्केटमध्ये एक्स्पोर्ट सरप्लसला खूप मागणी आहे व तिथे हा माल हातोहात खपतोय्! गेल्या दहा दिवसात १०-१५ स्फोट झाले व कालच्या पेशावरच्या स्फोटात तर १०० हून अधीक नागरीक बळी पडले! अशी आहे एक्स्पोर्ट सरप्लसची सुरस व चमत्कारिक कहाणी.

वाचन 6293 प्रतिक्रिया 0