ये रे ये रे पावसा! भाग - १
पूर्वसूत्र -आदल्या दिवशीच्या माळीकामामुळे इतके दिवस सुखेनैव नांदत असलेले हे सगळे बेघर होउन इतक्या एकोप्याने खिडकीच्या काचेवर बसलेत असं वाटलं. पण असा एखादा साप पाहून बरेच लोक ओरडतील यावर विश्वास बसत नव्हता.
---------------------------------------------------------------------
चतुरंगानं आता बाहेर काय चाललय हे बघायचं ठरवलं आणि हॉलकडे जाताजाता एकदम म्हणाला "अगं ऊठ पाणी आलंय, रात्री चुकून नळ चालूच राहिल्यानं सगळ्या घरभर पाणीच पाणी झालंय." मी ताड्कन उठून पाणी भरण्यासाठी नळाकडे पळाले.
"कुठंय पाणी?" मी गोंधळलेली.
" आणि हे काय? नळाला पाणी अजून आलंच नाहीये तरी....." मी.
हॉलमध्ये घाईघाईने जाऊन बघितले तर जमिनीवरचे सगळे सामान पाण्याने गच्च भिजलेले. आणि त्या नव्या गाद्या......भिजून आणखी जड झालेल्या. अस्ताव्यस्त पडलेले पॅकिंग मटेरियल पाण्यावर तरंगत होते. अजून एखाद्या मिनिटात टि. व्ही. ठेवलेल्या
टेबलाच्या पायावर पाणी चढले. चतुरंगाने खिडकी उघडली तर बाहेर पार्क केलेली स्कूटर पडायच्या बेताला आलेली. "अरे! चाललंय तरी काय?" दोघेही आश्चर्याने थक्क!
स्वयंपाकघरात जाऊन मागचे दार उघडल्यावर दिसलेले दृश्य हादरवून टाकणारे होते. सहा फूटी, मजबूत वाटणारी भिंत रात्री कधीतरी पाण्याच्या लोंढ्याने चक्क वाहून गेली होती! परसदारातल्या चार पायर्यांपैकी अगदी वरच्या पायरीपासून ते नजर पोहोचेल
तिकडे फक्त पाणीच होते .......चहाच्या रंगाचे गढूळ पाणी! लांबवर दिसणार्या एका बिल्डिंगचा पहिला मजला पाण्याखाली गेल्याने तिथले लोक गच्चीवर जाऊन बसले होते. वीज रात्री कधी तरी गेलेली. आमच्याकडे साधा फोन व सेलफोनही नव्हता.
नक्की काय चालले आहे याचा पत्ताच लागत नव्हता. पाण्याला जोर तर एवढा की मोठी झाडे, घरांना छप्पर म्हणून वापरलेले पत्रे, लोकांचे सामान सगळे वाहून चाललेले. मी एका जागी फक्त खिळून उभी! घराचा उंबरठा ओलांडून पाणी आत शिरले आणि मग
भानावर आले. काय करावे ते सुचेना. त्यातल्यात्यात ओळख असलेला आधार म्हणजे पाशाकाकू! चार वेळा हाका मारल्यावर लक्षात आले की सगळेजण रात्री लग्नाला जाणार ते चार दिवसांनीच येणार होते.
तेवढ्यात चतुरंगाने परसदार लावून घेतले व काही सूचना दिल्या. पिण्याच्या पाण्याची एक बाटली, समोर दिसले ते बिस्किटांचे पुडे, रेनकोट्स एवढे एका पिशवीत कोंबून, छत्री हातात देऊन मला त्याने गच्चीवर जाण्यास सांगितले. एकीकडे आमची स्कूटर
जमेल तशी व्हरांड्याच्या कठड्याला बांधून टाकली. सुदैवाने रात्री सगळी महत्वाची कागदपत्रे, पासपोर्टस व जरा जास्तीचे 'असलेले बरे' या विचाराने घेतलेले पैसे एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवले होते ते सगळे पुडके काखोटीला मारून हा दारापाशी
आला तर मी तशीच उभी! दोन चार मिनिटांत पाणी घरात शिरायला सुरुवात झाली होती. बाथरूममधूनही पाणी उलटे घरात आले होते. "अगं बाई जा की!" नवरा ओरडला. माझा काही धीर होत नव्हता. पाय टाकताना जरा जरी अंदाज चुकला तर सरळ
नाल्यातल्या मुख्य प्रवाहाला जाऊन मिळणार, कारण मला अडवायला ती मजबूत भिंत होतीच कुठे? आणि पोहायला यथातथाच येत असल्याने थरथर कापत, रडत तशीच उभी होते. वेळ घालवण्यात अर्थ नव्हता म्हणून नवर्याने मला बाहेर काढून घराचे मुख्य
दार बंद केले. एकमेकांच्या आधाराने बेताने अंदाज घेत घेत पावले टाकायला सुरुवात केली. चारच पावलांचे अंतर खूप वाटले त्यावेळेस!
गच्चीवर पोहोचेपर्यंत पाऊस सुरु झाला होता. आता आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घ्यायला व जरा विचार करायला वेळ मिळणार होता. पाशाकाकूंच्या घराची अवस्था आमच्या घरापेक्षा फार वेगळी नव्हती. त्यांचीही कंपाऊंड वॉल पडल्याने बागेत ठेवलेल्या
सगळ्या वस्तू, बागकामाची हात्यारे, मुलांची खेळणी, सायकली सगळे आमच्या डोळ्यादेखत वाहून गेले होते. पहाटे येणारा ओरडण्याचा आवाज हा उजवीकडच्या घरातून येत होता कारण त्यांचे सगळे घरच वाहून गेले होते. सुदैवाने कुटुंबातील माणसे जवळच्या
बिल्डिंगमध्ये सुखरूप होती. इतके दिवसात समोरच्या घरी फारशी ओळख झाली नव्हती. ते सगळे त्यांची नवी क्वालीस गाडी कशी वाचवावी या विचारात होते. घरातल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या दिसणार्या मुलाने एकदाची ती गाडी बंगल्याच्या आवारात घेतली
व सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता आम्ही त्यांच्याशी संवाद साधणे भाग होते. आतेभावाला, वहिनीला व मामेसासर्यांना 'आम्ही ठीक आहोत' हे कळवावेसे वाटत होते व त्यांच्याबद्दलही विचारपूस करायची होती. आत्ता जो पूर आलाय तो
नक्की कशामुळे हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता. दोनेक दिवसात मिळून चार शिंतोड्यांपेक्षा जास्त पाऊस झाला नव्हता, मग असे कशामुळे झाले असावे? मनात बरेच प्रश्न होते पण हाय रे दैवा! समोरच्या कुटुंबाला तेलुगु व थोडेसे इंग्लीश शब्द याशिवाय बाकी
कुठल्याही भाषेचे ज्ञान नव्हते. त्यांच्या क्वालीसवर तिरूपती बालाजीचे स्टीकर व 'रामीनेनी' असे लिहिले होते. ते त्यांचे नाव आहे की आणखी कुठला शब्द? की बालाजीच्या अनेक नावांपैकी एखादे? कशाचाही पत्ता लागत नव्हता.
कशाबशा बोटांनी खुणा करून फोन नंबर सांगितला व "वुइ आर फाइन" असे सांगितले. क्वालीस चालवणार्या उत्साही मुलाने तिथेच मोठा घोळ करून ठेवला. त्यानं आतेभावाकडे फोन करुन "टँक ब्रोकन, वाल वाश्ड आफ अँड वाटर येवरीवेअर!" असा निरोप दिला.
त्यासरशी ते कार घेऊन निघाले कारण त्यांना असे वाटले की घराच्या वरची पाण्याची टाकी फुटून अपघात झालाय व त्यामुळे कंपाऊंड वॉल वाहून गेली आहे. त्यांच्या घरापासून जेमतेम पाव किलोमीटर अंतर आल्यावर त्यांना पाण्याचा लोंढा दिसला. आता ते पूर्णच
गोंधळून गेले की घराचा टँक फुटला असेल तर एवढे पाणी कसे? पुन्हा घरी जाऊन कार ठेवून ते चालत आले तर आमच्या घरापासून २००-३०० मीटर परिघात त्यांना चार फूटांपर्यंत पाणी दिसले. आता परत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. समोरचे 'रामीनेनी' (हे त्यांचे
आडनाव होते ते नंतर समजले) घराबाहेर बसून पाण्याच्या लोंढ्याकडे हताशपणे बघत होते. मधूनच 'ब्रदर कमींग' असे म्हणत होते. त्यांचा ब्रदर थोड्याच वेळात येताना दिसला. दिडेकशे फुटांचे अंतर पार करण्यासाठी त्याला पंधरा मिनिटे लागली. हातातली जड बॅग
डोक्यावर घेऊन तो चालायचा प्रयत्न करत होता. नंतर समजले की त्यात बरीच रोख रक्कम होती.
आम्ही व आमच्या सारखी शेकडो कुटुंबे पाणी कमी होण्याची वाट बघत होतो. सकाळी दहाच्या सुमारास आमच्या घराची पायरी दिसू लागली. पाणी ओसरते आहे हे पाहून अतिशय आनंद झाला. मधेच चतुरंगाने घरात जाऊन फोल्डिंगच्या दोन खुर्च्या गच्चीवर आणल्या.
अजून किती तास असे काढायचे हे माहित नसल्याने त्यावेळी खुर्ची असणे ही चैन वाटत होती. त्यानंतर विचार सुरू झाले ते आमच्या भिजलेल्या सामानाचे, घराच्या झालेल्या नुकसानाचे. सगळ्या परिसरात भरपूर चिखल व घाण झाली होती. घराघरातल्या सामानाचे ढीग
रस्त्यावर आले होते. साधारण बारा वाजता पाणी बरेचसे कमी झाले व जवळजवळ आठ दहा तास अडकून पडलेले लोक बाहेर आले. पुढचे अनेक दिवस, अनेक महिने पुरेल इतके काम समोर दिसत असतानाही सगळ्यांना जगल्यावाचल्याचा आनंद झाला होता.
आम्हीही टेलीफोन बूथ शोधायला बाहेर पडलो.
खरंतर मुसळधार पाऊस झाल्याने हा पूर आला नव्हता. सिकंदराबादच्या उत्तरेला असलेल्या जीडीमेटला तलावाची भिंत खचल्याने आमच्या घरामागचा नाला व त्याच्या आसपासचा बराच मोठा भाग मुख्यत्वे पुरग्रस्त झाला होता. हवाई दल व नौदलाच्यामदतीने बर्याच
लोकांना वाचवण्यात यश आले असले तरी गेलेल्या लोकांचा आकडा मनाला त्रास देणारा होता. नंतर आठवडाभर पुराच्या बातम्यांनी हैद्राबादचे वर्तमानपत्र चर्चेत होते. हळूहळू सगळ्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेऊन घरे, बागा साफ केल्या. पडलेल्या भिंती उभ्या राहिल्या.
पाशाकाकूंचे कुटुंबही प्रथमदर्शनी बसलेल्या धक्क्यातून सावरले. पूर येऊन गेलेला असला तरी नेहेमीच्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी 'ये रे ये रे पावसा!' अशी मनधरणी करण्यावाचून हैद्राबादकरांना गत्यंतर नव्हतेच. माझ्या मनात अजूनही कधीतरी आठवणींची
ढगफुटी होते. विचारांचे लोंढे वाहून गेले की पुन्हा नेहमीचे आयुष्य चालू होते.
(समाप्त)
रेवती
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
13207
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापरे!
पाउस
In reply to बापरे! by यशोधरा
हुश्श
बाप रे
२६ जुलै २००५
मी त्या
In reply to २६ जुलै २००५ by बिपिन कार्यकर्ते
च्यामारी
हादरवुन
चित्रदर्शी
बापरे...
अगाबाब्बो!!
बापरे....कसल
मस्त लिहिले
चित्रदर्शी लेखनशैली
दोन्ही भाग
+१
In reply to दोन्ही भाग by अवलिया
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
बापरे! काय
सहमत आहे.
In reply to बापरे! काय by शाल्मली
नविन
नविन जागेत
अनुभव
गंभीर
प्रतिक्रि
चित्रदर्शी शैली .
लेख
+१
In reply to लेख by मुक्तसुनीत
फारच भयानक
भयानक!
जबरा
जब्बरा अनुभव
सर्वांचे
एकदम भयावह अनुभव, अतिशय