आणि मा़झी जात सुटली
लेखनप्रकार
खुलासा: ही कथा आहे; जितकी असायची तितकी खरी आहे आणि तितकीच काल्पनिक.
"नमस्ते सदा वत्सले मातृभूमे... " ह्या संघाच्या प्रार्थनेने मला जाग येई. घराशेजाराच्या पटांगणातली कवायत एव्हाना संपलेली असे. आत्या, आजी, आई कामात गर्क असत. उठल्या उठल्या मी आमच्या तगरीच्या झाडाजवळ जाउन बसे. झाडाच्या कुण्डाजवळ मुंग्यांची रांग, मातीतली अधून-मधून दिसणारी पिवळी पानं ह्याच्याकडे मी भान हरपून पाहत असे. पटांगणातून आता प्रतिज्ञा ऐकू येई. 'जय हिंद'. मग खाड-खाड-खडाड.
ब्राम्हणवस्तीमधे आमचं ऐसपैस घर होतं आणि प्रीती गोरे नावाच्या ज़रा आगाऊ, बडबड्या मुलीचं जसं असतं तसच माझं बालपण होतं. आर्थिक परिस्थिति बेताची, गरजा बेताच्या, घरी उठ-बस खूप. कामं करता करता बायकांचा जीव जायचा, पण लहान पोरांची मजाच मजा. उन्हाळा म्हणजे आत्ते-मामे-मावस-चुलत भावंड आणि पत्ते-कैरम-आंबे-क्रिकेट. ह्ळूहळु पोरं मोठी व्हायला लागली आणि त्यांच्या दहावी-बारावीचे धसके मोठ्यांना लागायला लागले.
माझी मावस बहीण माझी 'हीरो' होती. उगाच जास्त कुणाचं ऐकून घ्यायची नाही. आणि माझा चुलत भाऊ पण. एके दिवशी आम्ही जांभळं खात बसलो होतो. त्या दोघांची अगम्य चर्चा सुरु झाली.
"पाकड्यांना परत पाकिस्तानात पाठवले पाहिजे. किती पण बायका करतात." भाऊ म्हणाला.
" नायतर काय", काहीही माहिती नसताना मी बिनधास्त कडमडले. पण मी पाचवीत असल्यामुळे त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं.
" पण आधी पाकिस्तान-श्री लंकेवर हल्ला करून आपला भाग परत मिळवला पाहिजे". मावसबहीण
माझा भूगोल-इतिहास एकतर ज़रा कच्चा होता आणि आम्हाला फक्त महाराष्ट्राचा भूगोल होता तेव्हा. त्यामुळे ह्या दोघांचा वाद वाढला पण मी जांभळाच्या बियांचे वेगवेगळे आकार करत बसले--आकाशकंदील, पतंग, माळ, संघाच्या शाखेतली कवायतीची ओळ...पुढे काही वर्षांनी भाऊ मित्रांबरोबर अडवानींच्या सभेला गेला. पण ते सगळं काही त्याला आवडलं नाही. बहिणीला इन्जिनियरिंगच्या सबमिशन पुढे काही दुसरे सुचेना.
फास्ट फोरवर्ड: माझी बारावीची परीक्षा संपली. सुट्टीत काय करायचं? "कराटे क्लास!" बहिणीन सांगितलं. "काय?!" मला टी.वी वर म्याच बघताना झोप यायची, मग ह्या असल्या गोष्टीचा उत्साह असणे शक्यच नव्हते.
" नवीन सुरु होतायत, पहिला महीना फुकट आहे."
" कराटे, ना? चांगली आयडिया आहे, पुढं कामाला येइल" काकांनी हा विनोद पुढे अनेकदा केला.
तर असा आमचा कराटे क्लास सुरु झाला. ह्या क्लास मधे मस्त ग्रुप जमला. मजेची गोष्ट म्हणजे माझ्या अतिउत्साही बहिणीने एक महिन्याच्या (फुकट!) ट्रेनिंग नंतर क्लास सोडला, पण मी तसाच चालु ठेवला. आम्ही सगळे बाहेर कुठे जेवायला वगेरे गेल्यावर मात्र तिला बोलावायाचो. वाढदिवस, सिनेमे ह्या सर्व टोळक्यांनी करण्याच्या गोष्टी सुरुच होत्या. उन्हाळे-पावसाळे-हिवाळे येत होते, जात होते. ह्याच ग्रुप मधे मला शफी भेटला. दोन वर्षांच्या मैत्रीत शफी चा शफ्या झाला. प्रेमात पडल्याचं लक्षात यायला ज़रा वेळ लागला. पण मग काही सुचेना. छ्या! आपण पण काय बावळट. सरकारी ट्यूब. शफी ला सांगितल्यावर त्याला हसू आवरेना. " अग शहाणे, ग्रैजुएट हो आधी, मग करुया लग्न. आणि स्त्री-मुक्ति झिंदाबाद! मला हे सांगायला अजुन दोन वर्ष लागली असती. तोंड बघ कसं झालय तुझं "
घरी सांगायचा मात्र धीर होईना. बहीणीलाही ज़रा धक्काच बसला आणि तिनं चार कठोर शब्द ऐकवले. मग आमचं प्रचंड मोठं भांडण झालं. घालून-पाडून बोलणं झालं. बोलणं तुटलं. मला ताण सहन होईना. घराच्याना 'बाहेरून' कळेल अशी सारखी भीती. च्यायला, ह्याचं नाव शफी बेग च असायला पाहिजे होतं? आई-आजी ला सांगितलं. आजी म्हणाली "मुसलमानांच्यात पण मंगळसूत्र घालतात. हे घे." बाकी दोन्ही घरांमधून जाहीर संमती असण्याचा प्रश्नच नव्हता.
लग्नाच्या दिवशी नोंदणी कार्यालयात जात असताना अकस्मातपणे ओळखीचे लोक दिसत होते आणि मला घाम फुटत होता. "तासाभरात या.", क्लार्क नि सांगितलं. मग आम्ही आणि आमचे काही मित्र बाहेरच्या गाडयावर चहा समोसे घेत बसलो. तितक्यात माझी बहीण आणि भाऊ आले. एका पिशवीतून बहिणीनं अनेक छोट्या-मोठ्या पुरचुंड्या काढल्या. आई-आजी-आत्या-काकू सगळ्यांनी काय-काय बांधून दिले होते. आम्हा भावंडांचं डोळे पुसणं संपेना.
वाचने
6382
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
प्रेमाला ऊपमा नाही आणी जात ही नाही........
पुढे काय ???
सू हा स...
सुरूवात इंटरेस्टिंग झाली. पण नंतर फसल्यासारखी वाटते आहे कथा. थोडक्यात गुंडाळल्यासारखी वाटते आहे म्हणून फसल्यासारखी वाटते. नीट सविस्तर लिहिले तर वाचायला इंटरेस्ट आहे.
एका विशिष्ट विचारसरणीवर थोडा स्टिरिओटिपिकल असा दृष्टिकोन ठेवून लिहिलंय की काय असे वाटले सुरूवातीला.
बिपिन कार्यकर्ते
In reply to हम्म्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
सुरूवात इंटरेस्टिंग झाली. पण थोडक्यात गुंडाळल्यासारखी वाटते आहे
बिपिनसारखेच म्हणते,
स्वाती
In reply to हम्म्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
शेवटच्या तीन्-चार ओळित आलेल्या गोष्टि आधिच्या पेक्षा जास्त महत्वाच्या वाटाल्या.
त्या अधिक आल्या तर बरं होइल.
बाकी, किस्सा आवडला.
आपलाच,
मनोबा
क्रमशा टाकायला विसर्लात काय?
लेख नीट समजला नाही. पुरचुंडीत काय होते? लाल तिखट(जे उडाल्यामुळे डोळे पुसावे लागले)?
(ह. घ्या)
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
लिखाण आवडले.
(क्रमशः आहे का?)
"Great Power Comes With Great Responsibilities"
थोडे डिटेलींग पाहिजे होते तै...
(दिपोटी)विंजिनेर
कालिन्दी,
आवडणारी व्यक्ती सर्वार्थाने चांगली असली की झालं.. घरच्यांची संमती घेऊन पावलं उचलली गेली हे पाहून आनंद झाला. पुलेशु.
छान कथा!
शफीभावजींना नमस्कार सांगा! :)
आपला,
तात्या इनामदार.
लेखनशैली ओघवती आणि मिश्कील आहे.
पण कथा पूर्ण फुलु न देताच मध्येच संपविल्यासारखी वाटत्ये.
अवांतरः इथे कथानायिकेची (तुमची ?) जातच काय धर्मपण सुटला की हो तै..!
सगळ्यांसारखीच मलाही उत्सुकता आहे... पुढे काय घडलं? बाकी लेख छानच!
कालिंदीताई, प्रतिक्रीया चुकून प्रकाशीत केलित बहुतेक.
-चंबा
शीर्षकावरून काहीतरी गंभीर, वैचारिक वाचावयास मिळेल असे वाटले होते. निराशा झाली. कारण नायिकेची जात सुटण्याला काही विचारमंथन, किमानपक्षी जातीपातीच्या रीतिरिवाजांचा जीवघेणा अनुभव आला, असे काही नाही. जात सुटली का, तर धर्म बदलला म्हणून! तो का बदलला, तर ज्याच्यावर जीव जडला तो परधर्मिय होता म्हणून.
पण ह्यापुढे काय झाले? भारतीय मुसलमानांत जातीपाती नसतात का? (त्या तशा पूर्वीच्या प्रथेनुसार पाळल्या जातात असे ऐकिवात आहे, हे चूकही असण्याची शक्यता आहे).
तुमची जात कदाचीत सुटली असेल पण..
असो, पुढील वाटचालीस शुभेच्छा...
खूप सहज पणे लिहिले आहे, शेवट्च्या ओळी तर फारच भावल्या.
सुमीत
तैसाहेब,
लेख मस्त, ओघवती शैली आणि प्रवाही !
अवांतर : जात कुठे सुटलीय, अजुनही ती तुमच्या मनात आहेच की? तिथुन जोपर्यंत ती हद्दपार होत नाही तोपर्यंत सुटत नाही. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार. कथा अजून विस्त्रुत आणि सकस करण्याचे मुद्दे पटले.
In reply to प्रतिक्रि by कालिन्दि मुधोळ्कर
हे फरक केलेल्या पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
:| :-C खुलासा: ही कथा आहे; जितकी असायची तितकी खरी आहे आणि तितकीच काल्पनिक.
नाव मात्र मुधोळकर..
कथा एकमद उरकली. एखाद्या पिच्चरला फायनान्स कमी पडल्यावर उरका उरकी करावी. तसलाच हा प्रकार.
बडीशोप खाताना मेथीचा दाणा दाताखाली आल्यासारखं वाटलं.
प्रेमाला