खुलासा: ही कथा आहे; जितकी असायची तितकी खरी आहे आणि तितकीच काल्पनिक.
"नमस्ते सदा वत्सले मातृभूमे... " ह्या संघाच्या प्रार्थनेने मला जाग येई. घराशेजाराच्या पटांगणातली कवायत एव्हाना संपलेली असे. आत्या, आजी, आई कामात गर्क असत. उठल्या उठल्या मी आमच्या तगरीच्या झाडाजवळ जाउन बसे. झाडाच्या कुण्डाजवळ मुंग्यांची रांग, मातीतली अधून-मधून दिसणारी पिवळी पानं ह्याच्याकडे मी भान हरपून पाहत असे. पटांगणातून आता प्रतिज्ञा ऐकू येई. 'जय हिंद'. मग खाड-खाड-खडाड.
ब्राम्हणवस्तीमधे आमचं ऐसपैस घर होतं आणि प्रीती गोरे नावाच्या ज़रा आगाऊ, बडबड्या मुलीचं जसं असतं तसच माझं बालपण होतं. आर्थिक परिस्थिति बेताची, गरजा बेताच्या, घरी उठ-बस खूप. कामं करता करता बायकांचा जीव जायचा, पण लहान पोरांची मजाच मजा. उन्हाळा म्हणजे आत्ते-मामे-मावस-चुलत भावंड आणि पत्ते-कैरम-आंबे-क्रिकेट. ह्ळूहळु पोरं मोठी व्हायला लागली आणि त्यांच्या दहावी-बारावीचे धसके मोठ्यांना लागायला लागले.
माझी मावस बहीण माझी 'हीरो' होती. उगाच जास्त कुणाचं ऐकून घ्यायची नाही. आणि माझा चुलत भाऊ पण. एके दिवशी आम्ही जांभळं खात बसलो होतो. त्या दोघांची अगम्य चर्चा सुरु झाली.
"पाकड्यांना परत पाकिस्तानात पाठवले पाहिजे. किती पण बायका करतात." भाऊ म्हणाला.
" नायतर काय", काहीही माहिती नसताना मी बिनधास्त कडमडले. पण मी पाचवीत असल्यामुळे त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं.
" पण आधी पाकिस्तान-श्री लंकेवर हल्ला करून आपला भाग परत मिळवला पाहिजे". मावसबहीण
माझा भूगोल-इतिहास एकतर ज़रा कच्चा होता आणि आम्हाला फक्त महाराष्ट्राचा भूगोल होता तेव्हा. त्यामुळे ह्या दोघांचा वाद वाढला पण मी जांभळाच्या बियांचे वेगवेगळे आकार करत बसले--आकाशकंदील, पतंग, माळ, संघाच्या शाखेतली कवायतीची ओळ...पुढे काही वर्षांनी भाऊ मित्रांबरोबर अडवानींच्या सभेला गेला. पण ते सगळं काही त्याला आवडलं नाही. बहिणीला इन्जिनियरिंगच्या सबमिशन पुढे काही दुसरे सुचेना.
फास्ट फोरवर्ड: माझी बारावीची परीक्षा संपली. सुट्टीत काय करायचं? "कराटे क्लास!" बहिणीन सांगितलं. "काय?!" मला टी.वी वर म्याच बघताना झोप यायची, मग ह्या असल्या गोष्टीचा उत्साह असणे शक्यच नव्हते.
" नवीन सुरु होतायत, पहिला महीना फुकट आहे."
" कराटे, ना? चांगली आयडिया आहे, पुढं कामाला येइल" काकांनी हा विनोद पुढे अनेकदा केला.
तर असा आमचा कराटे क्लास सुरु झाला. ह्या क्लास मधे मस्त ग्रुप जमला. मजेची गोष्ट म्हणजे माझ्या अतिउत्साही बहिणीने एक महिन्याच्या (फुकट!) ट्रेनिंग नंतर क्लास सोडला, पण मी तसाच चालु ठेवला. आम्ही सगळे बाहेर कुठे जेवायला वगेरे गेल्यावर मात्र तिला बोलावायाचो. वाढदिवस, सिनेमे ह्या सर्व टोळक्यांनी करण्याच्या गोष्टी सुरुच होत्या. उन्हाळे-पावसाळे-हिवाळे येत होते, जात होते. ह्याच ग्रुप मधे मला शफी भेटला. दोन वर्षांच्या मैत्रीत शफी चा शफ्या झाला. प्रेमात पडल्याचं लक्षात यायला ज़रा वेळ लागला. पण मग काही सुचेना. छ्या! आपण पण काय बावळट. सरकारी ट्यूब. शफी ला सांगितल्यावर त्याला हसू आवरेना. " अग शहाणे, ग्रैजुएट हो आधी, मग करुया लग्न. आणि स्त्री-मुक्ति झिंदाबाद! मला हे सांगायला अजुन दोन वर्ष लागली असती. तोंड बघ कसं झालय तुझं "
घरी सांगायचा मात्र धीर होईना. बहीणीलाही ज़रा धक्काच बसला आणि तिनं चार कठोर शब्द ऐकवले. मग आमचं प्रचंड मोठं भांडण झालं. घालून-पाडून बोलणं झालं. बोलणं तुटलं. मला ताण सहन होईना. घराच्याना 'बाहेरून' कळेल अशी सारखी भीती. च्यायला, ह्याचं नाव शफी बेग च असायला पाहिजे होतं? आई-आजी ला सांगितलं. आजी म्हणाली "मुसलमानांच्यात पण मंगळसूत्र घालतात. हे घे." बाकी दोन्ही घरांमधून जाहीर संमती असण्याचा प्रश्नच नव्हता.
लग्नाच्या दिवशी नोंदणी कार्यालयात जात असताना अकस्मातपणे ओळखीचे लोक दिसत होते आणि मला घाम फुटत होता. "तासाभरात या.", क्लार्क नि सांगितलं. मग आम्ही आणि आमचे काही मित्र बाहेरच्या गाडयावर चहा समोसे घेत बसलो. तितक्यात माझी बहीण आणि भाऊ आले. एका पिशवीतून बहिणीनं अनेक छोट्या-मोठ्या पुरचुंड्या काढल्या. आई-आजी-आत्या-काकू सगळ्यांनी काय-काय बांधून दिले होते. आम्हा भावंडांचं डोळे पुसणं संपेना.
वाचने
6385
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रेमाला
हम्म्म्म!!!
असेच
In reply to हम्म्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
असेच ,म्हणतो
In reply to हम्म्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
क्रमशा
लेख
सुंदर आहे.
ह्म्म्म..
छान
छान
लेखनशैली
पुढे?
कालिंदीताई
अचानक संपल्यासारखा
निराशा
तुमची जात
खूप सहज
तैसाहेब, ले
प्रतिक्रि
वा
In reply to प्रतिक्रि by कालिन्दि मुधोळ्कर
सान्गाल ते
मेथीचा दाणा दाताखाली