शिकार - भाग १
लेखनप्रकार
(कथा पुर्ण काल्पनिक. घटना, पात्रं ह्यांचा कोणाही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी नामसाधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.)
रात्रभराच्या रिपरिपीनंतरची एक ओलीचिंब मरगळलेली कुंद सकाळ. नाल्यातलं वाहतं पाणी अडवणार्या अस्ताव्यस्त पसरलेल्या झोपड्यांच्या भिंतींचे कोपरे इंच इंचभर भिजलेले, साठलेल्या पाण्यात खेळणारी उघडी नागडी मळकट मुलं आपल्या विश्वात दंग होऊन वरच्या पट्टीत एकमेकांना शिव्या देत आलेला दिवस सुरु करत होती. त्यांच्या आयांचा मधूनच आपल्या पोराला हाक मारण्यातून होणारा गलका, शेजारच्या रुळांवरुन धडधडत जाणार्या लोकल ट्रेन, रहीमचाचाच्या लेदरच्या वर्कशॉपमध्ये चाललेल्या मशिनची घरघर नविन सकाळ उजाडल्याचं बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होती.
रात्रभराच्या पावसानं साठलेल्या पाण्याची ओल झोपडीच्या भिंतींपासुन झिरपत येऊन जमिनीत शिरली होती. येणारे सगळे आवाज बंद करुन परत झोपण्याच्या प्रयत्नात त्यानं कुस बदलली आणि जमिनीत झिरपलेलं पाणी त्याच्या उघड्या पाठीला झोंबलं. खाडकन त्यानं डोळे उघडून पाहिलं..झोंबणारी ओल तशीच पाठीशी घेऊन पोपडे उडालेल्या छपराकडं भकास नजरेनं पहात तो पडून राहिला. काही मिनीटं तशीच गेली. रात्रभर पावसामुळं पसरलेला गारवा अन् रिकाम्या पोटात भुकेचा आगडोंब ह्यामुळे झोप तशी लागलेली नव्हतीच. पहाटे पहाटे कसाबसा डोळा लागला होता इतकंच. असं पडून राहणं आपल्याला परवडणार नाही ह्याची त्याला अचानक जाणीव झाली. कसंबसं उठून तोंडावर पाणी मारुन तरतरी आणण्याचा एक फोल प्रयत्न करत अंगावर कपडे चढवले. झोपडीतून बाहेर पडताना पहिली जाणीव झाली ती पोटातल्या आगीची. खिशात चाचपून पाहिलं, दहाची एक नोट, पाचची एक आणि सात रुपयांची चिल्लर...शिट्ट! काल मंग्यासाठी गोल्डफ्लेक आणायला नको होती. आता आज पायीच जावं लागणार!
गल्लीतून बाहेर पडल्यावर पावलं आपसूक हमीदभाईच्या इराणी हॉटेलकडं व़ळली. नेहमीप्रमाणे कोपर्यातलं टेबल धरुन बसला.
ग्लासभर पाणी पितापिता हिशेब मांडला आणि ऑर्डर दिली 'दो डबल..कडक, एक बन, दो बैदा'! बारक्याच्या चमकलेल्या नजरेची जाणीव नाही झाली पण जाताजाता त्यानं मारलेला टोमणा मात्र ऐकू आला.."मंज्यादादा इश्टेट नाम पे करके गयेला दिखताय."
टचकन पाणी आलं डोळ्यात. साला डोळ्यात पाणी? भें**, काय होतंय काय हे? आजवर पोलिसांनी इतक्यांदा पकडून नेलं, नागडं करुन ढुंगणावर पट्ट्यानं सालं निघेपर्यंत मारलं पण एक थेंब नाय काढला डोळ्यातून...हो! मंज्यादादाला आजिबात नाही आवडायचं रडलेलं. रडलं की लाथेनं तुडवायचा. म्हणायचा, "भड्व्या, रडतो काय गांडूसारखा? मर्द आहेस, मर्दासारखा लढ!"....
मंज्यादादा! नात्याचा ना गोत्याचा. नेहमीप्रमाणे स्टेशनवर दुनियादारी करताना मंज्यादादाला एक तीन साडेतीन वर्षांचा पोरगा मुतारीपाशी सापडला. एखादी गावभवानी आई पोराला सोडून गेलेली असणार हे न कळण्याइतका मंज्या खुळा नव्हता. सरळ पोराला उचललं आणि धारावीत आणलं. त्यादिवसापासून मंज्यादादा त्या पोराचा बापच झाला. सडाफटिंग मंज्या कधी गजाबाहेर कधी गजामागे! पोराकडं कोण बघणार? मंज्याची रखेल अमिनाबीनं पोराची जिम्मेदारी घेतली. मोठ्या प्रेमानं नाव ठेवलं उस्मान. आता पोर हिंदू होतं की मुसलमान की ख्रिश्चन की आणखी कोण, कोणालाच प्रश्न पडला नाही. अमिनाबीसाठी उस्मान, मंज्यादादासाठी भड्व्या आणि उरलेल्या दुनियेसाठी उस्म्या! बस्स इतकीच ओळख! आणखी लागते तरी किती?
मंज्यादादानं, अमिनाबीनं, ह्या धारावीनं बरंच काही शिकवलं. मंज्याच्या हाताखाली शिकून पाकिटं मारत, कधी गांजा विकत, उरलेला खर्च मंज्यादादाकडून घेत ग्रॅज्युएशन केलं. आख्खी गल्ली त्यादिवशी उस्म्या बी.कॉम.म्हणुन हाका मारत राहिली. पण दुनियेनं लायकी दाखवून दिली. धारावीतल्या झोपडपट्टीसाठी उस्म्या बी.कॉम झाला ही मोठी गोष्ट होती, 'कॉर्पोरेट्स'साठी नाही. नोकरी मिळणार नव्हतीच, नाहीच मिळाली. मंज्यादादासोबत छोट्या मोठ्या झोलमध्ये कामं करुन काहीबाही कमवणं इतकाच उस्मानचा 'इन्कमसोर्स'. रडतखडत का होईना, पण बरं चाललं होतं.
त्यादिवशी मंज्यादादाला एका लॉटमध्ये चुकुन आलेलं युरोप क्वालिटीचं चरस सापडलं. ती पुडी स्वतःकडं ठेऊन बाकीचा माल पोरांबरोबर डिस्पॅच करुन टाकला. सकाळी दहापासुन संध्याकाळी सातपर्यंत दादा त्या चरसच्याच तारेत होता. संध्याकाळी अपोझ्झिशनच्या लोकांचा आवाज बंद करायची सुपारी द्यायला कॉर्पोरेटर ठाकूर आला तर मंज्यादादानं नशेत त्याच्या सगळ्या दोन नंबरी धंद्यांचा पाढाच गल्लीपुढं वाचला. वर, "अपुनकी ये झोपडपट्टी सुधारनेका तूने प्रॉमिस किया था, वो पैला दे, बाद में तेरे अपोझिशनवाले को टपकाउंगा" अशी बोंब मारली. बस्स! दादा असला तरी फक्त धारावीतल्या झोपडपट्टीतल्या गल्लीतला..पायरी विसरला मंज्या! त्याच रात्री मंज्यादादा क्रॉसिंगब्रिजवरुन रेल्वे ट्रॅकवर पडून गेला....
मंज्याच्या आठवणींनी बनचा मोठ्ठा तुकडा उस्मानच्या घशात अडकला. परवाच मंज्यादादाचा तेरावा घातला. फुल्टू हिंदूपध्द्तीनं. विधी उरकल्यावर मंज्यादादाकडं काम करणारी सगळी पोरं आपापला हिस्सा घेऊन निघून गेली. उस्मान दादाची गँग चालवू शकत नव्हताच. कोणी ऐकलंच नसतं त्याचं. तेराव्यालाच उस्मानचं दिवाळं निघालं. इतके दिवस मंज्याचा आधारतरी होता. आता पैसा कुठुन आणि कसा आणायचा, जगायचं कसं, अमिनाबीचा कँन्सरचा इलाज करायचा कसा ह्या विचारांनी त्याची कवटी ढवळून निघाली होती. भणंगगिरीपुढं आपलं माणूस गेल्याचं दु:ख कुरवाळत बसण्याइतकी ऐपत अजुनतरी नव्हती. उस्मान तोंडातला बन चघळत, समोरच्या ग्लासातल्या चहाकडं सुन्नपणे बघत बसला. इतक्यात समोरची खुर्ची सरकली. साधारण पन्नाशीचा एकजण येऊन बसला.
उस्माननं नजर उचलुन पाहिलं. एकदम पिक्चरमधल्या एखाद्या चर्चच्या प्रेमळ फादरसारखा दिसत होता समोरचा माणूस. चमकणारी भुरकट नजर, कपाळातून निघालेलं सरळ्सोट नाक, उंच गालफाडं, उन्हात रापलेला मुळचा गोरा-गुलाबी रंग आणि चेहर्यावर आश्वासक स्मित. "क्या हुआ भाई? भोत टाईम से देख रहा हुं, कुछ परेशानी है क्या?" म्हातारा बोलला.
जिथे सख्या नात्यातले एकमेकांना विचारत नाहीत तिथे ह्या परक्यानं दाखवलेल्या आपुलकीनं उस्मान भारावला. "वही मगजमारी चच्चा, पैसा मंगताय, पर काम नही मिलता"
"नाम क्या है तेरा?" म्हातार्यानं विचारलं.
"उस्मान"...
"कुछ पढेला है क्या?" म्हातार्यानं बसल्या जागीच इंटरव्ह्यू मांडला.
शिक्षणावर येऊन गाडी थांबल्याबरोबर उस्मान परत ढेपाळला. चहाच्या ग्लासात नजर बुडवत कुजबुजला, "बी.कॉम....सेकंड क्लास"
"क्या काम करेगा? अकाउंटंट बननेका क्या तेरेको?" म्हातारा.
"क्या साब, डान्सबारमें कॅशियर का भी काम करुंगा, कुछ है क्या बोलो! खालीपिली काय को दिमाग चाट रहेले सुब्बा सुब्बा?" उस्मान आता तडकला. इसके मां की....सकाळसकाळी टाईमपासला घेतय म्हातारं...
"देने को तो बहोत काम है मेरेपास| लेकीन पहले तेरी औकात तो जान लुं|" म्हातारा चेहर्यावर हसु खेळवत बोलला.
"देख मामू, आपुन बी.कॉम.भी है, कॉलेजमें अॅक्टिंग भी कियेलाय, जेबकतरेकी लाईनमें भी था, चरस-गांजा भी बेचेलाय, थोडाबहुत खर्चापानी भी दियेलाय| इतकी औकात काफी है क्या तुम्हारे काम के वास्ते?" उस्मानचा ताबा सुटत चालला होता. त्याच्या चढलेल्या आवाजामुळे तीनचार टेबलांवरची डोकी ह्या कोपर्याकडं वळून पुढच्या तमाशाची वाट बघायला लागली होती. हमीदभाई काउंटर सोडून आणि पक्या माल मोजायचा सोडून होणारा राडा निस्तरण्याच्या तयारीनं टेबलाकडं निघाले.
म्हातारा अजुनही शांतच होता. चेहर्यावरचं हसु तसंच. उस्मानच्या खांद्यावर थोपटत म्हणाला, "उस्मान बेटा, मै तेरेको परख रहा था| हिरा है तू हिरा! बहुत दिनोंसे तलाशमें था मै ऐसेही एक असली मर्द के| चल बेटे, कही और बैठ के इत्मिनान सें बात करते है| मेरे तरफ से काम का ऑफर पक्का!"
उस्मान भंजाळला! सकाळी गल्लीतल्या सुलभ शौचालयाच्या रांगेत उभं रहावं अन् पलिकडच्या लायनीत हातात टमरेल घेऊन बिपाशा बसु उभी असलेली दिसावी असं तोंड करुन म्हातार्याकडं पहातच राहिला.
"भाईजान, उस्मानका बील भी मेरे बीलमें डाल देना| कित्ता हुआ?" उस्मानकडं पुर्ण दुर्लक्ष करुन पन्नासची नोट काउंटरवर फेकत म्हातारा मागे वळूनही न पाहता बाहेर पडला. उस्मान धडपडत टेबल सोडून स्पेलबाउंड झाल्यासारखा त्याच्यामागोमाग चालत निघाला.
(क्रमशः)
वाचन
18785
प्रतिक्रिया
0