न्यू इअर रेझोल्यूशन (अर्थात तेरड्याचा रंग तीन दिवस)!
४ जानेवारीला ऑफिसबरोबरच व्यायामाचीही सुट्टी संपली आणि काल संध्याकाळी ५ तारखेला नेहेमीप्रमाणेच व्यायामशाळेत (जिममधे) गेलो. माझ्या स्पिनिंग क्लासमधे वेळेआधी पाच मिनिटे प्रवेश केला.
बघतो तर ही गर्दी झालेली. बरेच अनोळखी चेहरे उत्साहात सायकल हापसत होते!
२२ सायकलींपैकी २१ भरलेल्या, एकच रिकामी म्हणून स्वतःला लक्की समजत उत्साहाने गेलो तर ती मोडली होती. स्वतःशीच चडफडत एखाद मिनिट उभा होतो.
जेफ, आमचा इन्स्ट्रक्टर, त्याची बाईक सोडून आला, मोडकी बाईक तपासून म्हणाला "कॅन्ट फिक्स इट नाऊ, लॉट ऑफ वर्क. आय ऍम सॉरी फॉर दॅट!"
मी "इट्स ऑलराइट!" (वेळच्या वेळी बाईक तपासून ठेवायला काय होतं चोच्या (हा शब्द टार्याकडून उधार!) असं मनात) म्हणून बाहेर पडलो.
मूड ऑफ झाल्यानं क्षणभर वाटलं जाऊदे सालं घरीच जाऊयात आज व्यायामच नको. अचानक समोरच्या आरश्यात दिसणार्या 'भारदस्त' व्यक्तिमत्त्वानं जाणीव करुन दिली की
बाबा रे व्यायाम हा तुला आवश्यकच आहे!
पुन्हा वळलो, मग ट्रेडमिल आणि इतर वजनी व्यायाम केले. घामाच्या धारात सचैल न्हाऊन निघाल्यावर तरतरी आली. एकीकडे मनात विचार चालूच होते की जिममधे आज अचानक एवढी गर्दी कशी? आजूबाजूलाही बरेच नवीन चेहरे दिसत होते (काही आकर्षक होते ते जरा नीट न्याहाळले ;) ). मग एकदम ट्यूब पेटली, अरेच्चा नवीन वर्ष २००९ सुरु झाल्याने बरचसं पब्लिक हे अचानक व्यायामाचा झटका आलेलं असणार! माझा व्यायाम होताहोताच स्पिनिंग क्लास सुटला.
जेफला गाठलं तर डोळे मिचकावून म्हणाला "पुढचे सहा आठवडे हे असंच चालेल, जरा लवकर येत जा. न्यू इयर रेझोल्यूशन वाल्यांची गर्दी साधारण ५ ते ६ आठवडे असते त्यानंतर सगळं नॉर्मलला येईल!"
ह्या संकल्पवाल्यांना हसलो खरा पण मी बर्याच वर्षांपूर्वी केलेले काही संकल्प माझ्या मनात तरळून गेले. "येत्या १ जानेवारीपासून मी रोज सकाळी लवकर उठणार" "रोज फिरायला जाणार" ""रोजनिशी/अनुदिनी लिहिणार" "रोज सकाळी १२ सूर्यनमस्कार घालणार" इथपासून ते 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे' हे समर्थवचन वाचल्यापासून "रोज एकतरी पान लिहिणार" असले सारे संकल्प सोडले कधी आणि सुटले कधी हे समजलंही नव्हतं, ते आठवलं आणि मलाच हसू आले. काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी माणसाला स्वस्थ बसू देत नाही. आपल्या रोजच्या आयुष्यात थोडा सकारात्मक बदल म्हणून ह्या संकल्पांचा उदय होत असावा असं मला वाटतं. कधी दुसर्या कोणी सुरु केला म्हणून आपणही करावा असा विचार मनात उचल घेतो आणि हे संकल्प मनात मूळ धरतात.
स्टीफन कवीनं "दि सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव पीपल" ह्या पुस्तकात म्हटलं आहे की तुमच्या सवयीतला कोणताही बदल हा एखादा उपग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासारखा असतो. बदल घडायला सुरुवात होते, एका विशिष्ठ मर्यादेपर्यंत बदल घडला असे वाटतानाच ती 'गुरुत्वीय खेच' पार करुन जायला आपण कमी पडतो आणि पुन्हा सगळे पूर्ववत होते! तुम्हाला खरोखरंच बदल घडायला हवा असेल तर ते तीव्र खेचणे मागे टाकून जाण्याइतकी शक्ती लावावी लागते तेव्हाच खरा बदल घडतो.
नेमकी तेवढी शक्ती कशी लावता येईल? संकल्प सिद्धीस जाण्यासाठी खरंच कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते?
एक म्हणजे तुमच्या मनात एखादी गोष्ट का करायची आहे हे नक्की हवे म्हणजे त्या गोष्टीचे ज्ञान, दुसरे तुमच्या मनात ती गोष्ट तुम्ही कशी करणार आहात ह्याचा पक्का विचार हवा म्हणजे तंत्र माहीत हवे आणि तिसरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेरणा, मोटिवेशन. ह्या तीनही गोष्टी एकत्र आल्या की बदल घडायला सुरुवात होते आणि सतत अभ्यासाने तो बदल सवयीमधे परिवर्तित होतो. ह्या तीन्हीपैकी एकजरी गोष्ट कमी पडली तरी तुमचा उपग्रह पुन्हा कक्षेत खेचला जाऊन कोसळणार हे नक्की!
अमेरिकन लोकांवरचा एक सर्व्हे असं दाखवून देतो की पहिल्या महिन्यात साधारण ३५% लोक संकल्प तोडतात आणि सहा महिन्यापर्यंत हाच आकडा ५४% वर पोचलेला असतो! जगात इतर ठिकाणचं प्रमाणही थोडंफार असंच असू शकेल. हे असं का होतं? मला वाटतं ह्याची दोन मह्त्त्वाची कारणं आहेत एक म्हणजे वर उल्लेखलेल्या तीन बाबी, ज्ञान, तंत्र आणि प्रेरणा ह्याबाबत कमी पडणे. आणि दुसरे म्हणजे आपले लक्ष्य (गोल) ठरवताना व्यवहारिक दृष्ट्या झेपेबल ठेवणे. म्हणजे उदा. "मी सहा महिन्यात सिक्स पॅक ऍब्ज करुन दाखवीन" वगैरे असला गोल ठेवला तर मला नोकरी सोडून दिवसभर जिममधेच पडीक रहावे लागेल जे मला शक्य नाही! तेव्हा आपला आवाका ओळखून लक्ष्य ठरवणे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुलना. अनावश्यक तुलना ही घातक ठरते. कोणीतरी रोज पन्नास पाने वाचते असे कळल्याने मीही सुरुवात केली तर जमेलच असे सांगता येत नाही. कारण तुमचा दिनक्रम कसा आहे, त्यात मोकळा वेळ कुठला आणि कसा आहे इ.इ. घटकांवर ते ठरते. थोडक्यात कॉमनसेन्स वापरावा!
लहान असताना काडेपेटीचे छाप गोळा करण्याचा नाद जडलेला म्हणजे हा संकल्प वगैरे नाही कारण तेवढे ते वयही नव्हते पण तो जवळ जवळ तीनेक वर्ष मी जोमाने जोपासला. अक्षरशः रस्त्यात, एस्.टी.त, रेल्वे स्टेशनवर, जिथे दिसेल तिथे, काहीवेळा तर पानवाल्याच्या दुकानात वेगळी काडेपेटी दिसल्यावर थांबून त्याच्याकडे रिकामी पेटी मागितलेली आठवते आहे. जवळजवळ सहाशे-साडेशहाशे छाप गोळा केलेले! आता मागे वळून पहाताना वाटते की किती मन लावून आपण त्या गोष्टी करायचो. कुठेही जाताना, वावरताना मनात कुठेतरी तो ध्यास जागा असायचा जाणीवपूर्वक नसेल, किंबहुना तसा तो नव्हताच पण तो असायचा आणि संधी मिळताच ती पकडायची एवढेच. आता मी कित्येकवेळा मन लावून गोष्टी करायला बघतो तेव्हा प्रयत्न करावे लागतात. वेळ मिळत नाही अशी सबब मी स्वतःपुढे करतो.
माझा मुलगा चित्रं रंगवायला बसला तर खडू घेऊन मीही त्याच्यासोबत बसतो केवढा आनंद मिळतो म्हणून सांगू! कोड्याची पुस्तकं तो आणि मी बरोबर सोडवतो. पुन्हा आनंदासाठीच.
मुलं त्यांच्या विश्वात रमताना संकल्प न करताही कार्य सिद्धीस नेतात जे त्यांच्या गावीही नसते कारण ते फक्त निखळ आनंदासाठी जगत असतात आणि आपण बर्याचवेळा फक्त संकल्प करतो कारण आपण रमत नाही, निर्भेळ आनंदासाठी जगत नाही!
तरीदेखील संकल्प सोडणे (म्हणजे धरणे ह्या अर्थी!) हे अजिबात गैर नाही. कारण निदान त्यामुळे आपल्याला काय काय करावेसे वाटते आहे त्याबद्दल विचार तरी चालू होतो! तेव्हा तुम्ही असा विचार चालू केला असेल तर तुम्हाला शुभेच्छा! केला नसेल तर जरुर करा त्यासाठी शुभेच्छा! लहान मूल होऊन काही काळ का होईना आपल्या आनंदासाठी जगा संकल्प तुमच्या नकळतच पूर्ण झालेला असेल.
चतुरंग
वाचने
5655
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
लेख आवडला.
In reply to लेख आवडला. by सहज
फक्त व्यायामाबद्दल लिहिणे एवढाच उद्देश नाही.
In reply to फक्त व्यायामाबद्दल लिहिणे एवढाच उद्देश नाही. by चतुरंग
बरोबर
मस्त विचार
ईच्चाशक्ती हवी
In reply to ईच्चाशक्ती हवी by सुनील
काय सांगताय काय! अभिनंदन!!
In reply to ईच्चाशक्ती हवी by सुनील
ईच्छाशक्तीच्या जोरावर
In reply to ईच्छाशक्तीच्या जोरावर by मुक्तसुनीत
वुई हेट
In reply to वुई हेट by आनंदयात्री
क्या बात है! टाळ्या!!
In reply to वुई हेट by आनंदयात्री
+१
लेख आवडला
छान
या वर्षी
लेख आवडला...
रेझोल्युशन
ज्ञान,
लेख मस्तच.
लेख आवडला ,पटला..
वा.. काय
छान लेख
व्यायाम करण्याचा
मस्त लेख.
लेख मस्तच आहे
आग्रहाचे सामर्थ्य हवेच हवे!
In reply to आग्रहाचे सामर्थ्य हवेच हवे! by एकलव्य
डॉ.लेले ह्यांचे विचार उधृत केल्याबद्दल धन्यवाद, एकलव्य.
लेख छान आहे..
मस्तच.
सर्व वाचकांचे आणि आवर्जून प्रतिक्रिया देणार्यांचे आभार!
संकल्पाचा लेख !
संकल्प आणि सिद्धि