part 1
part 2
part 3
part 4
part 5
part ६
सहा
रात्रीचे पावणेदहा वाजले होते. पोलीस ठाण्याच्या दारातून देशमुख बाहेर पडतच होता, तेवढ्यात समोरून मुकुल धावत आला आणि त्यानं एका दमात सगळं सांगितलं. नंदिनीला उचलून नेलं. रामूच्या डोक्याला जखम. राणेचा मेसेज.
देशमुखचा चेहरा बदलला. ‘साहेब, पवार अजून सापडलेला नाही,’ तो म्हणाला. ‘आणि केळकरसाहेबांचा फोन आत्ताच येऊन गेला. ही केस मी आजच्या आज दुसऱ्या अधिकाऱ्याकडे द्यायची. उद्या सकाळी बदलीचे ऑर्डर येतील, असं म्हणाले.’
‘म्हणजे आज रात्री तुमच्या हातात आहे.’
‘आज रात्रीच.’
‘तुम्हाला सर्च वॉरंट हवंय, इन्स्पेक्टर. किडनॅपिंग झालंय, जागा माहीत आहे. सुनील जाधवचा जबाब आहे, पिस्तुलावर ठसा आहे. मी देवधरसाहेबांना आत्ता उठवतो.’
साडेदहा वाजता देवधरांच्या घराची बेल वाजली. झोपेतून उठून दार उघडणाऱ्या त्या वयस्कर मॅजिस्ट्रेटनं मुकुलकडे आणि देशमुखकडे बघितलं, मग मुकुलनं पुढे केलेल्या कागदांकडे. जबाब, डॉक्टरचं सर्टिफिकेट, पिस्तुलाचा पंचनामा. ते पंधरा मिनिटं सगळं वाचत होते. मग त्यांनी चष्मा काढून पुसला आणि पेन उचललं.
‘बायको स्वतःच्या नवऱ्याच्या घरी असेल तर?’ त्यांनी विचारलं.
‘तर ती सुखरूप आहे हे बघण्याचा अधिकार पोलिसांना आहे, साहेब,’ मुकुल म्हणाला. ‘आणि तिला जबरदस्तीनं नेलं असेल, तर प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे.’
देवधरांनी सही केली.
रात्री बारा वाजता तीन पोलीस जीप आणि एक व्हॅन जुहूच्या त्या पांढऱ्या भिंतीसमोर येऊन थांबल्या. फाटकावर दोन सिक्युरिटी गार्ड होते. देशमुखनं स्वतः पुढे जाऊन वॉरंट त्यांच्या तोंडासमोर धरलं. त्यांनी फाटक उघडायला नकार दिला. देशमुखनं हवालदारांना खूण केली. फाटकाचं कुलूप तोडून जीप आत घुसल्या. एकामागून एक बंगल्याचे दिवे लागले.
विक्रांत राणे पायऱ्यांवर उभा होता. राखाडी सूट, कपाळावर एक सुरकुतीही नाही. त्याच्या शेजारी नंदिनी उभी होती. तिच्या खांद्यावर त्यानं हात ठेवला होता. ती हलली नव्हती. गवळे आणि आणखी दोन माणसं थोडी मागे उभी होती.
‘इन्स्पेक्टर,’ राणे हसून म्हणाला, ‘माझी बायको कालपासून घरी नव्हती, आणि मला काळजी वाटत होती. ती वकीलसाहेबांच्या घरी असल्याचं मला कळलं. हा आमचा घरगुती मामला आहे. यात पोलिसांनी...’
‘मिस्टर राणे,’ देशमुख म्हणाला, ‘सुनील जाधवच्या जबाबात तुमच्या माणसाचं, गवळेचं नाव आहे. हॉटेलच्या सिक्युरिटी हेडचं नाव आहे. आणि ज्या पिस्तुलातून गोळी झाडली गेली, ते तुमच्या कंपनीच्या लायसन्सवर नोंदलेलं आहे.’
राणेचं हसू क्षणभर थरथरलं, मग पुन्हा स्थिर झालं. ‘पिस्तूल चोरीला जाऊ शकतं. माझ्या कंपनीत दीड हजार माणसं काम करतात.’
‘नंदिनी,’ मुकुलनं पुढे येऊन विचारलं, ‘तुला इथं जबरदस्तीनं आणलं गेलं?’
नंदिनीनं नवऱ्याच्या हाताकडे पाहिलं. मग हळूच, अगदी शांतपणे, स्वतःच्या खांद्यावरून तो हात दूर केला. तिचा आवाज स्थिर होता.
‘हो. चार माणसं माझ्या घरात घुसली. त्यांनी मुकुलच्या रक्षकाला मारलं आणि मला गाडीत कोंबलं. त्यांच्यातला एक गवळे आहे. मी त्याला चांगलं ओळखते. तो माझ्या नवऱ्याच्या ऑफिसात गेली सहा वर्षं आहे.’
‘ती खोटं बोलतेय,’ राणे ओरडला. त्याच्या आवाजाला पहिल्यांदाच तडा गेला होता. ‘ती मानसिक रुग्ण आहे. मी तिच्या डॉक्टरचे कागद दाखवू शकतो.’
‘ते कोर्टात दाखवा,’ देशमुख थंडपणे म्हणाला. ‘हवालदार, गवळेला ताब्यात घ्या.’
गवळेनं पळायचा प्रयत्न केला. वरच्या पायऱ्यांवर झटापट झाली. दोन हवालदार जखमी झाले, पण दहा मिनिटांत गवळे हातकड्या घालून खाली आला. त्याच्या मागोमाग पोलिसांनी अभ्यासिकेतून तीन तिजोऱ्या आणि चौदा फाईली बाहेर काढल्या. त्यातल्या एका फाईलच्या पहिल्याच पानावर एक आद्याक्षर आणि महिन्याचा आकडा होता. केळकर.
देशमुखनं ते पान हातात धरलं. त्याचे ओठ घट्ट मिटले होते. तो काही बोलला नाही, फक्त ते पान मुकुलच्या हातात देऊन त्यानं मान खाली केली.
‘तुम्ही माझं काही बिघडवू शकत नाही,’ हवालदार त्याला गाडीकडे नेत असताना राणे मुकुलच्या अगदी जवळ येऊन म्हणाला. ‘माझ्यावर बरीच माणसं आहेत, वकीलसाहेब. तुमच्यासारखे वकील मी रोज विकत घेतो.’
‘वर माणसं असतात, मिस्टर राणे,’ मुकुल शांतपणे म्हणाला. ‘पण कागद कुणाच्या ओळखीचे नसतात.’
त्या रात्री बंगल्याबाहेर सावंत वाट बघत उभा होता. त्याच्या हातात नोटबुक होतं आणि खिशात पेन ड्राइव्हची एक कॉपी. सकाळी सहा वाजता शहरातल्या सगळ्या वर्तमानपत्रांच्या खास आवृत्त्यांत एकच बातमी छापून आली.
पुढचा आठवडा गाजला. असिस्टंट कमिशनर केळकरांनी ‘वैद्यकीय कारणास्तव’ अचानक रजेचा अर्ज दिला, आणि तीन दिवसांनी रिटायरमेंटचा. त्यांच्या घराच्या झडतीत सहा बँक खाती आणि अलिबागच्या एका फार्महाऊसची कागदपत्रं सापडली. पवारला दादर स्टेशनवर पकडलं. पोलीस कोठडीत पहिल्याच रात्री त्यानं सगळं सांगून टाकलं, कारण पिस्तुलावरचा अंगठ्याचा ठसा त्याच्याच अंगठ्याशी जुळल्याचा रिपोर्ट आला होता. भोसले सरकारी साक्षीदार झाला. राणेचा जामिनाचा अर्ज दोनदा फेटाळला गेला.
तीन आठवड्यांनी योगेश चव्हाणची सन्मानानं सुटका झाली. निवडणुकीच्या निकालात तो दहा हजार मतांनी जिंकला. जखमी सुनील जाधव बरा होत होता. त्याची म्हातारी आई रोज मुकुलच्या ऑफिसच्या दारात येऊन तास-दीड तास नुसती बसून जायची. काही न बोलता, आणि काही न मागता.
एका सकाळी, पावसानं धुतलेल्या खिडकीतून ऊन ऑफिसमध्ये आलं होतं. आर्यानं चहा आणून ठेवला आणि टेबलावर एक लिफाफा ठेवला.
‘सर, इन्स्पेक्टर देशमुखांनी स्वतः आणून दिलाय. फॉरेन्सिकनंतर पर्स आज परत करायची होती. आणि तुम्हाला सांगायला सांगितलं, “दुसरा कप्पा तपासलेला नाही.”’
‘ठीक आहे,’ मुकुल म्हणाला. त्याच्या ओठांच्या कोपऱ्यात क्षणभर हसू आलं. ‘पर्स तिच्या मालकिणीला द्या.’
‘त्या बाहेर थांबल्या आहेत.’
तो उठून बाहेर गेला. ऑफिसच्या दारात नंदिनी उभी होती. हलक्या पिवळ्या साडीत, केस मोकळे सोडलेले, कपाळावर छोटी टिकली. तिच्या हातात कोर्टाचा कागद होता, आणि चेहऱ्यावर तीन आठवड्यांपूर्वी नसलेला एक शांत, ठाम भाव.
‘घटस्फोटाचा अर्ज आज दाखल केला,’ ती म्हणाली. ‘आता मी कुणाचीही अशील नाही, मुकुल. फक्त नंदिनी आहे.’
‘आणि कायद्यानं?’
‘कायद्यानं अजून विवाहित. निकाल लागेपर्यंत वर्ष-दोन वर्षं लागतील.’ ती त्याच्याकडे थेट बघत म्हणाली. ‘तेवढं थांबायला तू तयार आहेस का?’
मुकुल क्षणभर काहीच बोलला नाही. आर्या त्याच्या मागे उभी राहून आलटून पालटून दोघांकडे बघत होती, चेहऱ्यावर काही कळलंच नाही असा आव आणत.
‘कायदा मला माहीत आहे, नंदिनी,’ मुकुल शेवटी म्हणाला. ‘निकाल लागेपर्यंत थांबावंच लागतं. मी थांबेन.’
ती हसली. कितीतरी दिवसांनी मुकुलनं तिला असं मोकळं हसताना पाहिलं. ‘मग वकीलसाहेब, माझा खटला तुम्ही घेतलाय ना?’
‘घेतलाय,’ मुकुल म्हणाला. ‘आणि या वेळी फी मी स्वतः ठरवणार आहे.’
ती गेल्यावर आर्या हळूच त्याच्याजवळ आली. ‘सर, मी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं, तिचं नाव खोटं वाटतंय.’
‘नाव खोटं होतं, आर्या,’ मुकुल खिडकीबाहेर रस्त्याकडे बघत म्हणाला. ‘बाई खरी होती.’
त्या रात्री तो ऑफिसमध्ये एकटाच थांबला. त्यानं तिजोरी उघडली. सगळ्या फाईलींच्या खाली वडिलांच्या निर्दोषत्वाचा तो जुना कागद होता, पिवळा पडलेला, घड्या पडलेला. त्यानं तो बराच वेळ हातात धरला. मग त्याची घडी घालून पुन्हा जागेवर ठेवला आणि तिजोरीचं दार बंद केलं. बाहेर रस्त्यावर पुन्हा पावसाची पहिली सर पडू लागली होती.
(समाप्त)
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा अन आधीचा भाग वेगवान झालाय…
हा अन आधीचा भाग वेगवान झालाय. भान ठेवून वाचावं लागतंय.
छान आहे कथा. दुसऱ्या भागात जुळलं तेव्हाच समजलं की हा केस जिंकणार.