part 1
part 2
part 3
part 4
part 5
part ६
पाच
सिटी हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये फिनेल आणि औषधांचा वास भरून राहिला होता. सातव्या वॉर्डच्या कोपऱ्यातल्या बेडशेजारी एक हवालदार स्टुलावर बसून पेंगत होता. दारात उभ्या असलेल्या माणसाला बघताच त्याची झोप उडाली. तो हॉटेल दरबार-ए-हिंदचा मॅनेजर अविनाश भोसले होता. पंचेचाळीस वर्षांचा, गोल चेहरा, पोटावर ताणलेलं जाकीट. हातातल्या फळांच्या टोपलीवर किमतीचं लेबल तसंच चिकटलेलं होतं. त्याच्या मागे काळे शर्ट घातलेली, जाड मानेची दोन माणसं उभी होती.
‘नमस्कार हवालदारसाहेब,’ भोसले म्हणाला. ‘आमच्याच हॉटेलमध्ये जखमी झालेला माणूस इथं आहे ना? मालकांनी खुशाली विचारायला पाठवलंय.’
हवालदार गोंधळला. वरून त्याला एवढंच सांगितलं होतं की पेशंटशी कुणालाही बोलू द्यायचं नाही. पण ‘हॉटेलचे मालक’ ऐकून तो जरा नरम झाला. तो काही बोलणार एवढ्यात मागून आवाज आला.
‘मालकांनी खुशाली विचारायला पाठवलंय, की खुशाली विचारणाऱ्याचं तोंड बंद करायला?’
मुकुल आणि आर्या जिना चढून धापा टाकत आले होते. मुकुलनं भोसल्याकडे सरळ बघितलं. ‘काल रात्री आठ बावन्नला तुमच्या हॉटेलच्या लँडलाइनवरून पोलीस कंट्रोल रूमला फोन गेला होता, भोसले. दरोडेखोर आत यायच्या अठरा मिनिटं आधी. आणि आज सकाळच्या पेपरात तुम्हीच सांगितलंय की दरोडा अचानक पडला.’
भोसल्याच्या कपाळावर घामाचे बारीक थेंब आले. त्यानं ओठ चाटले. त्याच्या मागच्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, आणि त्यातल्या एकाचा हात हळूच कमरेकडे गेला. तेवढ्यात जिन्यावर जड बुटांचा आवाज घुमला.
इन्स्पेक्टर देशमुख दोन हवालदारांना घेऊन वॉर्डात आला. जिन्यावरून येतानाच आर्यानं त्याला फोन लावला होता. ‘नाहीतर हीच नोंद उद्या कोर्टात दाखवावी लागेल,’ एवढंच ती शांतपणे म्हणाली होती, आणि पाच मिनिटांचा रस्ता देशमुखनं तीन मिनिटांत गाठला. भोसले आणि त्याची माणसं हळूच सटकायच्या बेतात होती, पण हवालदारांनी दारातच त्यांना अडवलं.
‘मुकुलसाहेब,’ देशमुख इकडेतिकडे बघत म्हणाला, ‘मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं, वरून दबाव आहे. असिस्टंट कमिशनर केळकरसाहेबांचे काल रात्रीपासून तीन फोन येऊन गेले. ही केस दुसऱ्याकडे द्यायची, असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझं रिटायरमेंट दोन वर्षांवर आलंय. पोरीच्या लग्नाचं कर्ज अजून फिटायचंय. मला नोकरी जायला परवडणार नाही.’
तो क्षणभर थांबला. त्यानं बेडकडे बघितलं. तिथं सुनील जाधवची म्हातारी आई मुलाचा हात धरून बसली होती.
‘पण वर्दी घातलीय मी,’ तो पुढे म्हणाला. ‘आणि वर्दीवर जे लिहिलंय, ते मला विसरता येत नाही.’
मुकुलनं फक्त मान हलवली आणि तो बेडजवळ गेला. बेडवर सुनील जाधव झोपला होता. अठ्ठावीस-एकोणतीस वर्षांचा, दाढी वाढलेली, अंगावर पट्ट्या, एका हाताला सलाइनची नळी. बाजूला बसलेल्या म्हातारीनं पदरानं डोळे पुसले आणि मुकुलचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरले.
‘साहेब, माझ्या पोरानं चूक केली, पण तो जीव घेणारा नाही. त्याला सांगितलं होतं, फक्त घाबरवायचं आहे. दागिन्यांना हात लावायचा नाही. बंदूक रिकामी होती. त्याला पाच लाख देणार होते. आम्ही चाळीत राहतो, साहेब. यांच्या औषधांचा खर्च...’ तिचा आवाज फुटला.
डॉ. पाटकर वॉर्डात आले. त्यांनी नाडी बघितली, सलाइनचा वेग तपासला. ‘पंधरा मिनिटं. त्याहून जास्त नाही. तो बोलू शकतो, पण दमेल.’
सुनीलनं डोळे उघडले. त्याचा आवाज ऐकू येणार नाही इतका बारीक होता. मुकुलला त्याच्या तोंडाजवळ कान न्यावा लागला.
‘मला गवळेनं पाठवलं,’ तो कसाबसा म्हणाला. ‘विक्रांत राणेसाहेबांचा माणूस. गवळे आमच्या बांधकामावर मुकादम होता, तिथूनच ओळख. त्यानं सांगितलं होतं, आठ पंचावन्नला हॉटेलबाहेर गाडीत बसायचं, नऊ दहाला आत जायचं, कुणाला हात लावायचा नाही, फक्त गोंधळ करायचा. बंदूक रिकामी होती साहेब, मला माहीत होतं. मी खोटं बोलणार नाही.’
‘आणि गोळी?’
‘मागून आली. किचनच्या दाराकडून. मी वळलो तेव्हा एक माणूस दिसला. पांढरा शर्ट, गळ्यात हॉटेलचं आयकार्ड. सिक्युरिटी हेड, पवार. त्यानंच माझ्यावर गोळी झाडली. मग तो गर्दीत घुसला. त्याच्या हातातली बंदूक एका बाईच्या पर्सजवळ गेली, आणि पुढचं मला काही दिसलं नाही.’
वॉर्डात शांतता पसरली. देशमुखच्या हातातली वही थरथरत होती. मुकुलनं पुढे वाकून सुनीलला विचारलं, ‘हे तू जजसमोर सांगशील?’
‘सांगेन,’ सुनील म्हणाला. ‘माझ्या आईसाठी.’
‘हा जबाब आजच्या आज मॅजिस्ट्रेटसमोर नोंदवायला हवा, इन्स्पेक्टर,’ मुकुल देशमुखकडे वळून म्हणाला. ‘पोलिसांसमोर दिलेला जबाब उद्या कोर्टात टिकत नाही. आणि तो फिरवायलाही वेळ लागत नाही.’
देशमुखनं एक लांब श्वास घेतला. त्यानं एका हवालदाराला मॅजिस्ट्रेट देवधर यांच्या घरी पाठवलं, आणि दुसऱ्याला भोसल्याला ताब्यात घ्यायला सांगितलं. ‘आणि पवारचा शोध घ्या,’ तो म्हणाला. ‘आत्ताच. हॉटेलवर, घरी, जिथे असेल तिथे.’
संध्याकाळी चार वाजता डॉ. पाटकरांनी पेशंट जबाब देण्याच्या स्थितीत आहे, असं सर्टिफिकेट दिलं. पंचांसमोर मॅजिस्ट्रेट देवधर यांनी सुनील जाधवचा जबाब नोंदवला. पाच पानांचा तो जबाब सुनीलनं स्वतः वाचला आणि खाली अंगठा उमटवला.
* * *
जुहूच्या त्या उंच पांढऱ्या भिंतींच्या बंगल्यात तळमजल्यावरच्या अभ्यासिकेचे पडदे ओढलेले होते. दिवसा सुद्धा आतला दिवा चालू होता. खोलीच्या मध्यभागी सागवानी टेबलामागे विक्रांत राणे बसला होता. हातात ग्लास नव्हता, सिगारेट नव्हती. फक्त बोटांत एक सोन्याचा पेन तो सारखा फिरवत होता.
वीस वर्षांपूर्वी बांधकामाच्या धंद्यात विक्रांत राणे हे नाव कुणाला माहीत नव्हतं. गिरणगावातल्या एका चाळीत तो जन्मला. गिरणी बंद पडली तेव्हा वडिलांबरोबर रस्त्यावर आला, आणि पुढच्या बारा वर्षांत एका साध्या मुकादमाचा शहरातला सगळ्यात मोठा ठेकेदार झाला. त्यानं स्वतःच्या हातानं कधी कुणाला मारलं नव्हतं, धमकावलंही नव्हतं. त्याची पद्धत वेगळी होती. तो माणसं विकत घ्यायचा. नगरसेवक, इंजिनिअर, पोलीस अधिकारी, पत्रकार, आणि गरज पडली तर वकीलसुद्धा. ज्या वस्त्यांच्या जमिनी त्याला हव्या होत्या, तिथं आधी आग लागायची, मग लोकांना हलवलं जायचं, आणि मग तिथं चकचकीत इमारती उभ्या राहायच्या. प्रत्येक इमारतीचे दोन हिशेब असायचे. एक सरकारला दाखवायचा, आणि दुसरा फक्त त्याच्यासाठी.
तो दुसरा हिशेब आपली बायको चोरून कॉपी करतेय, हे त्याला तीन आठवड्यांपूर्वी कळलं होतं.
सांगणारा गवळे होता. गवळे आणि राणे एकाच चाळीत वाढलेले, आणि गवळेच्या नजरेतून काही सुटायचं नाही. ऑफिसमधली तिजोरी उघडताना नंदिनी त्याला दिसली होती. तिच्या हातात छोटा पेन ड्राइव्ह होता. तेव्हा राणेनं काहीच केलं नाही. बायकोला विचारलं नाही, तिच्याकडे रागानं बघितलंसुद्धा नाही. त्यानं फक्त वाट पाहिली. कारण ती कुणाकडे जाते हे त्याला बघायचं होतं.
चार दिवसांपूर्वी त्याला ते कळलं. योगेश चव्हाण. पोटनिवडणुकीतला तो तरुण उमेदवार, ज्याच्या प्रत्येक सभेत राणेच्या बांधकामांचं नाव घेतलं जायचं. नंदिनी त्याला भेटणार होती, गुरुवारी रात्री, दरबार-ए-हिंद हॉटेलमध्ये.
प्लॅन त्याच क्षणी ठरला. हॉटेलचा मालक राणेचा जुना भागीदार होता, आणि मॅनेजर भोसल्याचं कर्ज राणेनं दोन वर्षं सांभाळलं होतं. सिक्युरिटी हेड पवारला लष्करातून काढलं गेलं तेव्हा त्याला नोकरी राणेनंच दिली होती. एक भाड्याचा दरोडेखोर, एक रिकामी बंदूक आणि एक खरं पिस्तूल. आठ बावन्नला भोसले पोलिसांना फोन करणार. नऊ दहाला सुनील आत घुसणार. गोंधळ उडाला की पवार किचनच्या दारातून एक गोळी झाडणार. मरणार तो दरोडेखोर, म्हणजे बोलणारा एकही साक्षीदार उरणार नाही. मग त्याच गर्दीत पवार नंदिनीच्या पर्सजवळ जाणार, पिस्तूल तिथंच सरकवणार, आणि पोलीस सगळ्या पाहुण्यांची झडती घेतील तेव्हा पर्समधून खुनाचं हत्यार निघणार, आणि तिच्याकडून तो पेन ड्राइव्ह. निवडणुकीला उभा असलेला उमेदवार खुनाच्या कटात अडकलेला, त्याच्याबरोबर एका विवाहित बाईचे संबंध, आणि तिच्या हातात ‘चोरलेली कागदपत्रं’. कुणीही विश्वास ठेवला असता.
फक्त एक गोष्ट चुकली होती. झडती सुरू व्हायच्या आधीच नंदिनी किचनच्या मागच्या दारानं निसटली होती. पर्स आणि त्यातलं पिस्तूल घेऊन.
‘साहेब, गवळे तिच्या मागावर होता,’ राणेसमोर उभा असलेला गवळे सांगत होता. त्याची मान खाली होती. ‘रात्री ती घरी आली नाही. सकाळी प्रभात रोडवरच्या एका वकिलाच्या ऑफिसात गेली. मुकुल. क्रिमिनल लॉयर. तो फक्त निर्दोष माणसांचेच केसेस घेतो, असं ऐकलंय.’
राणेच्या ओठांच्या कोपऱ्यात हसू आलं, पण ते डोळ्यांपर्यंत पोचलं नाही. ‘निर्दोष माणसांचे. म्हणजे तो विकला जात नाही.’ त्यानं पेन टेबलावर ठेवला. ‘असे वकील सगळ्यात डेंजर असतात, गवळे. पैसे घेणारे गप्प बसतात. जे घेत नाहीत, ते शेवटपर्यंत खोदत राहतात.’
‘आणि सुनीलचं काय? तो जिवंत आहे. पवारचा नेम चुकला.’
‘तो मरेल किंवा बोलणार नाही, ते आज रात्रीपर्यंत मी बघतो. केळकरशी मी बोललोय. आणि बाईला घरी आणायचंय. आज रात्रीच. पेन ड्राइव्हसकट.’
गवळेनं मान हलवली आणि तो निघून गेला. विक्रांत राणे उठून खिडकीजवळ गेला. बाहेर बागेत माळी गुलाबांच्या कुंड्यांना पाणी घालत होता. त्यानं आजवर बायकोवर कधी हात उचलला नव्हता. आताही त्याचा तसा विचार नव्हता. त्याला फक्त आपला कारभार वाचवायचा होता, आणि तो वाचवण्यासाठी वाटेत येणाऱ्या कुणालाही बाजूला करायची त्याला सवय होती.
* * *
मुकुल आणि नंदिनी फ्लॅटवर परत आले तेव्हा दुपारचे तीन वाजून गेले होते. जिन्याच्या पायरीवर रामू खुर्ची टाकून बसला होता. आर्याच्या वडिलांच्या ओळखीचा, माजी सैनिक, पन्नाशीचा. मुकुलनं त्याला सकाळीच सांगून ठेवलं होतं की कुणीही अनोळखी माणूस वर गेला, तर त्याची हाडं मोजायची.
आत गेल्यावर मुकुलनं दार लावून घेतलं. ‘नंदिनी, तो पेन ड्राइव्ह कुठे आहे?’
ती क्षणभर थांबली. मग तिनं गळ्यातली सोन्याची बारीक साखळी बोटात धरली. साखळीच्या टोकाला एक साधं छोटं पेंडंट लटकत होतं. तिनं त्याचं वरचं झाकण काढलं. आत नखाएवढा पेन ड्राइव्ह होता.
‘दोन वर्षं मी हे अंगावर घेऊन फिरतेय,’ ती म्हणाली. ‘झोपताना, आंघोळ करताना. माझ्या नवऱ्याला कधी संशयसुद्धा आला नाही की ते कुठं आहे.’
मुकुलनं तो हातात घेतला आणि लॅपटॉप उघडला. पुढचे दोन तास दोघं शेजारी बसून फाईली उघडत होते. गरीब वस्त्यांच्या जमिनींची बनावट खरेदीखतं. महापालिकेच्या इंजिनिअरांना दिलेल्या रकमांची यादी. तीन नगरसेवकांच्या नावापुढे महिन्याचे आकडे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या नावापुढे फक्त एक आद्याक्षर आणि चाळीस हजार रुपये. केळकर.
‘हे सगळं तू एकटीनं केलंस?’ मुकुलनं तिच्याकडे वळून विचारलं. तो ‘तुम्ही’वरून ‘तू’वर आला होता, हे दोघांच्याही लक्षात आलं नाही.
‘एकटीनंच. त्या बंगल्यात बोलायला कुणी नव्हतं, मुकुल. एकच काम होतं, लक्ष ठेवणं. आणि ज्यांनी माझ्या डोळ्यांसमोर आग लावली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, एवढंच वाटत होतं.’
तिच्या आवाजात थकवा होता. मुकुलनं तिचा हात आपल्या हातात घेतला. काही वेळ दोघं बोलले नाहीत. खिडकीबाहेरून रस्त्यावरच्या गाड्यांचा आवाज येत होता. तिनं त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं.
‘मला तुझ्याबरोबर इतकं सुरक्षित का वाटतं, मुकुल?’
‘कारण मी वकील आहे,’ तो म्हणाला. ‘आणि वकील पुरावे जपतात.’ त्यानं तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले. त्या क्षणी दोघांनाही पुढचा विचार करायचा नव्हता. थोडा वेळ कुणीतरी आपल्या जवळ आहे, एवढंच त्यांना हवं होतं.
मग तो उठला. त्यानं पेन ड्राइव्हच्या दोन कॉपी केल्या. एक सावंतला आणि दुसरी योगेश चव्हाणचे वकील ॲड. प्रधान यांना. मूळ पेन ड्राइव्ह त्यानं ऑफिसच्या तिजोरीत ठेवला, वडिलांच्या निर्दोषत्वाच्या त्या जुन्या कागदाशेजारी, आणि चावी खिशात घातली.
संध्याकाळी सात वाजता देशमुखचा फोन आला. ‘मुकुलसाहेब, लिफाफा आत्ताच उघडायचाय. तुम्ही हजर हवेत.’
‘नंदिनी, मी तासाभरात येतो. दार आतून लावून घे. रामू जिन्यावरच आहे.’
पोलीस ठाण्यातल्या त्या लहानशा खोलीत दोन पंच आणि दोन हवालदारांच्या समोर देशमुखनं लिफाफ्यावरच्या सह्या आणि वेळ तपासली. हातमोजे चढवून त्यानं पर्सचा पहिला कप्पा उघडला. आतून काळ्या कापडात गुंडाळलेलं पिस्तूल बाहेर आलं. एक्सपर्टनं भिंगातून ते निरखलं. नंबर खरवडून पुसलेला होता, पण खाली दाबल्या गेलेल्या खुणा रसायनानं उजळल्या. ते पिस्तूल राणे कन्स्ट्रक्शनच्या सिक्युरिटी लायसन्सवर नोंदलेलं होतं. मॅगझिनवर एक अर्धवट अंगठ्याचा ठसा होता. पवारचा.
दुसऱ्या कप्प्याला देशमुखनं हात लावला नाही. ‘हा भाग पुराव्याचा नाही,’ तो मुकुलकडे न बघता कोरड्या आवाजात म्हणाला. ‘पर्स परत मिळेल.’
मुकुल बाहेर पडला तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजले होते. तो आपल्या इमारतीच्या जिन्यावर पोचला आणि थबकला. वरच्या मजल्यावरचं दार सताड उघडं होतं. आतले दिवे चालू होते. जिन्याच्या पायरीवर रामू भिंतीला टेकून बसला होता, डोकं धरून. कपाळावरून रक्त ओघळत होतं.
‘साहेब... चार माणसं आली. त्यांनी माझ्या डोक्यावर...’ तो कण्हला. ‘ते बाईंना घेऊन गेले.’
फ्लॅटच्या आत टेबलावर नंदिनीचा मोबाइल पडला होता. स्क्रीनवर नवा मेसेज होता.
‘तुझी अशील माझ्याकडे आहे. उद्या सकाळपर्यंत पेन ड्राइव्ह आणून दे. – वि. रा.’
मुकुलनं फोन खिशात घातला आणि जिना धावत उतरला.
मिसळपाव
प्रतिक्रिया
कप्पे के अंदर क्या है?कप्पे…
कप्पे के अंदर क्या है?
कप्पे के अंदर?