श्रावस्तीतील एका धनिकाचा एकुलता एक तरुण मुलगा अकाली मरण पावला. पित्याला हा आघात सहन झाला नाही. मुलाच्या विरहाने व्याकुळ होऊन तो रोज स्मशानभूमीत जाई, मुलाच्या चितेच्या राखेजवळ बसे आणि आक्रोश करत राही.
एके दिवशी एक बौद्ध भिक्खू तिथून जात होते. धनिकाचे दुःख पाहून ते त्याच्याजवळ बसले आणि अचानक लहान मुलासारखे रडू लागले.
धनिकाने आश्चर्याने विचारले,“भंते, तुम्ही का रडत आहात?”
भिक्खू म्हणाले,“मला एक सुंदर रथ हवा आहे. पण त्याला चाकेच नाहीत. म्हणून मी विचार करतोयएक चाक सूर्याचं आणि दुसरं चंद्राचं केलं तर किती छान होईल! मला जे एक चाक सूर्याचे आणि दुसरे चाक चंद्राचे हवंय ते हाताशी येत नाह्यीये आणि ते कसं मिळेल ह्या चिंतेने मला रडू अनावर होतंय.”
धनिकाला त्याच्या आक्रोशाचे क्षनभर विस्मरण होऊन, त्यांच्या बोलण्याचे हसू आले. तो म्हणाला,“भंते, पण हे कसं शक्य आहे? सूर्य आणि चंद्र रथाची चाकं कशी होतील? अशा गोष्टीसाठी रडून काय मिळणार?”
भिक्खू हळूच म्हणाले,“बरोबर आहे. जे मिळणं शक्य नाही, त्यासाठी रडण्यात अर्थ नाही.”
थोडा वेळ शांत राहून त्यांनी विचारले,“मग तू इथे रोज कशासाठी येतोस?”
धनिक काहीच बोलला नाही.
भिक्खू पुढे म्हणाले,“तुला तुझा मुलगा पुन्हा हवा आहे, नाही का? पण तो आता परत येणार नाही. सूर्य आणि चंद्र माझ्या हातात येऊ शकत नाहीत, तसंच गेलेला जीवही परत आणता येत नाही.”
“जे जन्माला येतं त्याचा अंत होतो. जे आपल्याला मिळतं, त्याच्यापासून एक दिवस दूर व्हावंच लागतं. हा जीवनाचा नियम आहे.”
धनिकाने समोरची राख पाहिली. वाऱ्याची एक झुळूक आली आणि राख हवेत मिसळून गेली.
त्या क्षणी त्याला उमगले की मृत्यू हा मुलावर झालेला अन्याय नव्हता; तो जीवनाचा अटळ नियम होता.मुलावरचे प्रेम त्याने सोडले नाही; पण त्याला धरून ठेवण्याचा हट्ट मात्र सोडला.
जे आले आहे ते जाणारच; जे भेटले आहे ते विभक्त होणारच; अनित्याला नित्य समजून धरून ठेवले की दुःख निर्माण होते, हा अनित्यबोध त्या धनिकाला झाला.
डिस्क्लेमर: हे मत्तकुंडल जातक (अनित्यता आणि दुःखाचे मूळ) ह्या जातककथेच स्वैर रुपांतर आहे
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान बोधकथा. मिपा आता…
छान बोधकथा.
मिपा आता अल्लडतेकडून गंभीरपणाकडे झुकले आहे.