नीम करोली बाबा ज्यांना आपण प्रेमाने 'महाराज जी' म्हणतो हे विसाव्या शतकातील भारतातील एक महान आणि चमत्कारी संत होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य उत्तर भारतात फिरून घालवले आणि उत्तराखंडमधील कैंची धाम येथे आपला प्रसिद्ध आश्रम स्थापन केला. बाबांची प्रभू हनुमानावर अथांग भक्ती होती. त्यांची निस्सीम भक्ती, नम्रता आणि सेवाभाव पाहून लाखो भक्त त्यांना 'हनुमान अंश' म्हणजेच हनुमानाचे रूप मानतात.
मला वाटते त्यांच्या बाबतीत ज्युलिया रॉबर्ट्स यांचा किस्सा खरोखर चमत्कारिक आहे. ज्युलियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती हिंदू धर्माकडे कशी आकर्षित झाली. तिने नीम करोली बाबांचा एक फोटो पाहिला होता आणि तो फोटो पाहताच तिच्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण झाली. बाबांना कधीही प्रत्यक्ष न भेटताही, केवळ त्यांचा फोटो पाहून तिने हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आज ज्युलिया रॉबर्ट्स पूर्णपणे हिंदू संस्कृतीचे पालन करते. ती आपल्या कुटुंबासह मंदिरात जाते. इतकेच नाही तर तिने तिच्या प्रोडक्शन कंपनीचे नाव देखील 'रेड ओम फिल्म्स' असे ठेवले आहे. हा एकचह नाही असे अनेक किस्से त्यांचे आहेत. रिचर्ड अल्बर्ट (राम दास) यांच्या 'बी हिअर नाऊ' या पुस्तकामुळे प्रभावित होऊन स्टीव्ह जॉब्स नीम करोली बाबांना भेटण्यासाठी भारतात आले होते. जॉब्स बाबांना प्रत्यक्ष भेटू शकले नाहीत, तरी त्यांनी आश्रमात बराच वेळ घालवला. तेथील शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि अध्यात्माचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. तेथे त्यांना त्यांच्या जीवनाची दिशा मिळाली.
असे म्हणतात की फेसबुकच्या सुरुवातीच्या काळात, जेव्हा कंपनी अत्यंत कठीण प्रसंगातून जात होती, तेव्हा स्टीव्ह जॉब्स यांनीच मार्क झकरबर्गला मदतीचा हात दिला होता. फेसबुक विकत घेण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्या मागे लागल्या होत्या आणि झकरबर्ग गोंधळात पडले होते. तेव्हा त्यांचे मार्गदर्शक असलेल्या स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांना सल्ला दिला, "तू भारतात जा आणि मी ज्या मंदिरात आश्रमात गेलो होतो तिथे काही दिवस घालव. तिथे तुला तुझ्या कंपनीच्या भविष्याची खरी दिशा मिळेल." जॉब्स यांच्या सल्ल्यानुसार, मार्क झकरबर्ग कैंची धाम आश्रमात आले आणि त्यांनी तिथे काही दिवस घालवले. २०१५ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा फेसबुकच्या मुख्यालयात गेले होते, तेव्हा झकरबर्ग यांनी स्वतः या भेटीचा जाहीर उल्लेख केला होता. त्यांनी सांगितले की, कैंची धाम येथील शांततेमुळे त्यांना हे समजले की फेसबुकचे मूळ उद्दिष्ट केवळ पैसे कमावणे नसून 'जगातील लोकांना एकमेकांशी जोडणे' हे आहे. या भेटीनंतर त्यांना फेसबुकला पुढे नेण्याची एक नवी दृष्टी आणि ऊर्जा मिळाली.
नीम करोली बाबांचा संदेश अतिशय साधा होता "प्रत्येकावर प्रेम करा, प्रत्येकाला अन्न द्या, सर्वांची सेवा करा आणि देवाचे स्मरण करा." १९७३ मध्ये त्यांचे महानिर्वाण झाले, तरीही त्यांची आध्यात्मिक ऊर्जा आजही जगभरातील कोट्यवधी लोकांना आकर्षित करते आहे. 'हनुमान अंश' हा चित्रपट नीम करोली बाबा यांच्या जीवन प्रवासावर आधारित एक अतिशय जबरदस्त बायोपिक आहे. डॉ. विशाल चतुर्वेदी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
अवघ्या १३ वर्षांच्या एका बालकाचा लक्ष्मण दासचा जगातील सर्वात प्रभावशाली संत बनण्यापर्यंतचा प्रवास दिग्दर्शकाने खूप सुंदर रीतीने मांडला आहे. कथेचा पूर्वार्ध भावनिक आहे, तर उत्तरार्ध अतिशय वेगवान आणि थक्क करणारा आहे.
या चित्रपटात बाबांचा बालपणापासूनचा प्रवास दाखवला आहे. अवघ्या १३ व्या वर्षी आईच्या निधनानंतर, गृहत्याग करून त्यांनी आध्यात्मिक मार्ग कसा निवडला आणि ते एका सामान्य मुलापासून जगातील सर्वात प्रभावशाली संतांपैकी एक कसे बनले, याचे सुंदर चित्रण यात आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या शोभिनवने बाबांची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे साकारली आहे. त्याच्या डोळ्यांमधील साधेपणा प्रेक्षकांचे मन जिंकून घेतो. बाबांच्या बालपणीची भूमिका करणाऱ्या या बालकलाकाराने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
'हनुमान अंश' या चित्रपटाचे संगीत हे या चित्रपटाच्या यशाचा सर्वात मोठा कणा आहे. चित्रपटातील भक्तीगीते आणि पार्श्वसंगीत प्रेक्षकांना थेट आध्यात्मिक जगात घेऊन जातात. चित्रपटातील संगीताचा मुख्य वाटा साधू तिवारी यांनी उचलला आहे. त्यांनी केवळ गाणी संगीतबद्ध केली नाहीत, तर अनेक गाण्यांचे लेखन आणि गायनही केले आहे. चित्रपटाच्या अल्बममध्ये एकूण ११ गाणी आहेत. या गाण्यांची खासियत म्हणजे ती ब्रज, अवधी आणि बुंदेली या प्रादेशिक बोलीभाषांमध्ये तयार करण्यात आली आहेत. गाणी अस्सल भारतीय आहेत आणि काना फार गोड वाटतात यात शंका नाही.
यातले 'पार्वती' हे बुंदेली भजन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे. माता पार्वती आणि भगवान शंकर यांच्या पौराणिक प्रसंगावर आधारित हे गाणे साधू तिवारी यांनी लिहिले, संगीतबद्ध केले आणि गायले आहे. अवघ्या २ कोटी रुपयांच्या मर्यादित बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने लोकांच्या उत्कृष्ट प्रतिसादाच्या जोरावर ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे आणि तो एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. भडक व्हिज्युअल इफेक्ट्सऐवजी सशक्त अभिनय आणि पारंपरिक लोकसंगीतावर आधारलेला असलेला एक अत्यंत प्रामाणिक चरित्रपट असे म्हणता येईल.
हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासोबत मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखा आहे. नक्की पाहा!
रेटिंग: ५ पैकी ४.५
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>>>> २०१५ मध्ये भारताचे…
>>>>>> २०१५ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा फेसबुकच्या मुख्यालयात गेले होते, तेव्हा झकरबर्ग यांनी स्वतः या भेटीचा जाहीर उल्लेख केला होता. त्यांनी सांगितले की, कैंची धाम येथील शांततेमुळे त्यांना हे समजले की फेसबुकचे मूळ उद्दिष्ट केवळ पैसे कमावणे नसून 'जगातील लोकांना एकमेकांशी जोडणे' हे आहे. या भेटीनंतर त्यांना फेसबुकला पुढे नेण्याची एक नवी दृष्टी आणि ऊर्जा मिळाली.
हे मात्र उदाहरणार्थ अतिशय विनोदी आहे की दोन फेकाडे एकमेकांना भेटले. एक म्हणाला की आमच्याकडे इतकी थंडी असते की नाकात काड्या टाकल्या की कुल्फी होते.
दुसरा फेकाड्या म्हणाला की आमच्याकडे इतकी थंडी असते की मी बात बोलली की शब्द गोठून जातात.
ब्बाकी बाबांच्या आयुष्यावर चित्रपट आला आहे हे माहिती नव्हते.
छान असेल.
नीमकरोली बाबा आणि सिलिकॉन…
नीमकरोली बाबा आणि सिलिकॉन व्हॅली मधील लोकांवर त्यांचा असलेला प्रभाव ह्या गोष्टीला मी अतिशोयोक्ती मानत होते. पण एक दिवस निव्वळ योगायोगाने लॅरी ब्रिलिअंट नावाच्या व्यक्तीच्या एका व्याख्यानात पोचले. डॉक्टर ब्रिलिअंत हे गुगल फौंडेशन चे प्रेसिदेन्त आहेत. आपल्या आयुष्याची ते कथा सांगत होते. मी आता इथे लिहून फायदा नाही. सादर व्याख्यान खाजगी होते आणि हिंदू किंवा भारतीय लोकांशी संबंध नव्हता. लॅरी ह्यांनी सहज म्हटले कि ते योगायोगाने करोली बाबांच्या आश्रमांत पोचले आणि इतके तिथेच त्यांनी सुब्रमण्यम हे नाव धारण केले आणि बाबांच्या आश्रमांत आयुष्य घालविण्याचा निर्णय घेतला.
एक दिवस अचानक बाबानी त्यांना बोलावले आणि म्हटले कि तुझे येथील काम संपले. आता तुला नवीन प्रकल्प देतो. भारतातुतन smallpox चा नायनाट कर ! लॅरी डॉक्टर असले तरी एवढ्या मोठ्या प्रकल्पाची सुरुवात सुद्धा कशी करावी हे त्यांना ठाऊक नव्हते. त्यांनी बाबांचा आदेश मानून इकडे तिकडे विचारयाला सुरवात केली आणि त्यांचे ध्येय ऐकून लोक अक्षरशः हसत.
पण निम करोली बाबांचे नाव घेताच अनेक बाबू मंडळींनी त्यांना सहानुभूती दाखवली. त्या प्रकल्पाच्या यशाचे श्रेय ते स्वतः बाबाना देतात.
चित्रपट परिचय चांगला करून…
चित्रपट परिचय चांगला करून दिलात. पार्वती भजन शोधून ते पाहिले, आवडले.
छान ओळख आहे
सिनेमा बघेन की नाही ते माहिती नाही कारण मुळात बाबांवर माझी निस्सिम भक्ती आहे, त्यांना एक विशिष्ट मूर्त स्वरूपात बघण्याची सवय पण लागली आहे त्यामुळे एखाद्या अभिनेत्याला (त्याने कितीही समरसून उत्तम काम केले असेल तरी) बघणे जमेल का नाही माहिती नाही.
पण कैंची धाम बद्दल मिसळपाव वर वाचायला मिळणे एक सुखद धक्का होता.
(राम राम राम श्री राम राम राम) खोंडे
कैंची धाम बद्दल कोणीतरी आधी…
In reply to छान ओळख आहे by वृषभ खोंडे
कैंची धाम बद्दल कोणीतरी आधी सविस्तर लिहिल्याचे वाचलेले आठवत आहे. त्यांचा आश्रमात राहण्याचा अनुभव होता.
असेल
In reply to कैंची धाम बद्दल कोणीतरी आधी… by श्वेता व्यास
माझ्या वाचण्यात नाही.
नीम करोली बाबांवर आधीही…
नीम करोली बाबांवर आधीही सिनेमा आलेला असून नीम करोली बाबांची भुमिका सुबोध भावेनी केली आहे ज्या बद्द्ल अप्रिसियेशन मिळाले आहे.
https://www.youtube.com/watch?v=ewgAKF9j__o
https://www.youtube.com/watch?v=HPjTKX9uJJc