Skip to main content

मला भेटलेले रुग्ण - २४

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 01/05/2026 23:12 या दिवशी प्रकाशित केले.

https://www.misalpav.com/story/49885

18 वर्षांचा पोरगा आणि त्याची आई असं दोघं आले , हातात जाडजुड फाईल चा गठ्ठा ! बघताक्षणी निदान झालं की कंटाळून , फिरून , कोणीतरी पाठवलं आहे असा पेशंट…


 

सविस्तर बोलणं आणि लक्षणं समजून घेऊन तपासणी करायला पाठवलं. तासाभरात रिपोर्ट आले , अपेक्षेप्रमाणे सौम्य स्वरूपाचा दमा पण दमा वाढण्याचं कारण म्हणजे निदान न झालेला मानसिक आजार ( clinical depression) !!


 

दम्याबद्दल थोडक्यात समजावून सांगितलं आणि जमेल तेवढं मानसिक आजाराबद्दलही बोललो. त्याला आणि त्याच्या आईला फारसं कळलं नसणार हे जाणवलं पण माझ्या परिनी बोललो.


 

दोन महिन्यांनी follow up ला आल्यावर जरा बरं वाटतंय म्हटला पण depression मुळे वारंवार दमा वाढतोय असं सांगत होता. जवळच्या Psychiatrist कडे पाठवलं आणि दोन्ही आजारांची treatment सुरू केली. पेशंट आणि त्याची आई दोघेही कामावर जायचे त्यांना नाशिकहून माझ्या क्लिनिक ला यायचं आणि परत जायचं म्हणजे जवळपास 500 किमी प्रवासाचा खर्च असणार म्हणून 4-5 महीन्यांनंतर यायला सांगितलं.


 

दर आठवड्यात एकदा तरी फोन करतो आणि तेच ते बोलत असतो, रिसेप्शनवरचा स्टाफही कंटाळून जातात आणि मला फोन आणून देतात. मी शांतपणे ऐकून घेणं आणि कंटाळा ,चिडचिड न करता बोलतो. असं का करतो माहिती नाही, कदाचित बाकी कोणी डॉक्टर करणार नाही हे माहीत आहे म्हणून की त्याला फक्त समजून घ्यायची गरज आहे म्हणून… का कोण जाणे ?


 

असे काही पेशंट तुमचा परिक्षा घेत असतात आणि त्यात तुम्ही पास होता का नाही कधीच कळणार नसतं.


 


 

(आजही लेख लिहीतांना ह्या मुलाचा फोन आला होता आणि मी पुन्हा पुन्हा तेच समजावून सांगतोय.)


 


 


 

———————————————————————


 


 


 


 

तुकतुकीत काळा रंग , कडक इस्त्री चा खादिचा शर्ट त्यावर काळी पॅन्ट, गळ्यात आणि हातात साधारण दोनेक लाखाच्या चेन व ब्रेसलेट असलेले काका साधारण 68-70 वर्षांचे असावेत !! सोबत बायको , मुलगा, दोन लहान भाऊ असा गोतावळा आलेला. खोकला आणि दमा ही मुख्य लक्षणं होती शिवाय बिपीची treatment 20+ वर्षांपासून मुंबईत एका प्रतिथयश डॉक्टरकडे सुरू होती.


 

श्वासाच्या तपासण्या आणि Xray रिपोर्ट आल्यानंतर निदान झालं. दमा काय असतो , तपासणीमधे काय दिसलं आणि inhaler वगैरे वापरायचे आहेत असं सांगून पुढची तारीख दिली. त्यानंतर सोबत आलेल्या प्रत्येकाने एकच तक्रार केली की पेशंट रोज दारू पितात त्यांना तुम्ही समजावून सांगा की दारू बंद करायला हवी !


 

मी पण सगळ्यांचं ऐकून घेऊन त्यांना दारू वाईट असते आणि बरेच आजार होऊ शकतात हे प्रवचन दिलं आणि महिनाभरानी follow up साठी बोलावलं. हि सगळी घटना मी विसरलो आणि खरी गंमत तर पुढल्या भेटीत होणार होती!


 

ह्या वेळेस काका जरा घाईतच केबिन मधे शिरले आणि दमा कसा बरा आहे व औषधांनी चांगला फरक पडलाय हे सांगून पटकन म्हटले “ डॉक्टरसाहेब हे बघा मी गेल्या चाळीस वर्षापासून रोज संध्याकाळी दुकान बंद झालं की एक क्वार्टर व्हिस्की पितो , घरी शांतपणे जेवण करून झोपतो. दारू पिऊन कधीच काही राडा केला नाही, गाडी चालवता येत नसल्याने accident झालेला नाही. मी दारू पिणं बंद करणार नाही!” एका श्वासात त्यांनी सांगितलं. मला एकच जाणवलं की ह्या व्यक्तीचे रक्ताचे सगळे रिपोर्ट normal आले असल्याने 40 वर्ष दारू पिऊन शरीर व्यवस्थित आहेच की !!


 

आमचं बोलणं संपलं आणि नातेवाईक केबिन मधे आले. ह्यावेळेस मुलगा आणि बायको ही दोघंच आले होते. त्यांच्याशी बोललो आणि चांगला फरक पडलाय म्हणून औषधं कमी करून 3 महिन्यांनंतरची पुढची तारीख दिली. त्यांनी पुन्हा दारूचा विषय काढला त्यावर मी म्हटलो “ काका दारू पिऊन कोणाला काही त्रास देतात ? रस्त्यावर accident किंवा भांडणं करून घरी येतात, घरी आल्यावर जेवण करतात की नाही? “ सगळ्याचं उत्तर काकांनी सांगितल्याप्रमाणे आलं. मी त्या दोघांना बोललो “ दारू पिण्याचं मी समर्थन करत नाही पण कदाचित त्यांच्या आयुष्यात दारू ही एकमेव गोष्ट असावी जी करतांना त्यांना आनंद मिळत असावा , तुम्ही लोकं त्यांना गेली अनेक वर्षं दारूवरून बोलले असालच ना ? मी बोलून फरक पडेल असं मला वाटत नाही. त्यांना आनंदी राहू द्या बाकी औषधं सुरू ठेवा.”


 

त्या भेटीनंतर काका नेहमीच एकटे आलेले मी पाहिलेत. पण त्यांना बघून मला आणि मला बघून त्यांना आनंद होतो.


 


 


 

———————————————————————


 


 


 

बायको आणि मुलगी ह्या पेशंट ला घेऊन आलेले. 35-40 वर्षं रोज 1-2 बंडल बिड्या पिऊन COPD ( गंभीर दमा) झालेला होता.


 

नेहमीप्रमाणे tests नंतर आजाराची माहिती आणि औषधं देऊन पुढच्या महिन्याची follow up ची तारीख दिली. पुढच्या भेटीत काका एकटेच आले आणि त्या नंतरच्या प्रत्येक भेटीतही एकटेच येत असत ( पेशंट बरे व्हायला लागले की सोबत येणाऱ्या नातेवाईकांची संख्या कमी होत जाते हे माझं वैयक्तिक निरीक्षण आहे :)).


 

काका येतात काही बोलत नाहीत, अगदी पहिल्या भेटीपासून बघतोय. सगळं बोलणं मलाच करावं लागतं!!

“ चचा कैसे हो ? चलनेपर , सिढी चढनेपर दम कम लगता है ना ? पेशाब ठिक होती है या रुकरुक कर होती है ? Acidity तो नही ना ? निंद कैसी है? “ मान हलवून हो किंवा नाही म्हणतील क्वचित एक दोन शब्दात काही सांगतील. Prescription दिलं की तडक उठून निघूनही जातील. कधी म्हणजे कधीच भेटीचा वेळ चुकवणार नाहीत आणि आले तर दोन दिवस लवकरच येतील.


 

आपल्या treatment नी फरक पडलाय हे फक्त वारंवार येणारा पेशंट दाखवून देत असतो , असे काहीजण बोलून नाही पण कृतीतून दाखवतात!!


 


 


 


 

  • पेशंटशी गप्पा मारणारा डॉक्टर

वाचने 142
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया