Skip to main content

मंतरलेले बेट (ऐसी अक्षरे -३९)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 27/01/2026 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
1 "मंतरलेले बेट" हे व्यंकटेश माडगूळकरांनी अनुवादित केलेले एक अतिशय सुंदर आणि वेगळे पुस्तक आहे. मूळ इंग्रजी नाव "Big City, Little Boy" आणि लेखक Manuel Komroff. हे पुस्तक १९५३ मध्ये प्रकाशित झाले असून, ते लेखकाच्या स्वतःच्या बालपणावर आधारित आहे .१८९८ ते १९०० च्या आसपासच्या न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन बेटावरचे जीवन. पुस्तकाची सुरुवातच खूप जादुई आहे. नायक असलेला लहान मुलगा म्हणतो, "जन्माला यावे ते एखाद्या रम्य बेटावर. हे भाग्य मला लाभले. न्यूयॉर्कमधल्या मॅनहॅटन या रम्य बेटावर माझा जन्म झाला. मॅनहॅटन म्हणजे एक लहानसे जगच होते." त्याला हे बेट "मंतरलेले" वाटते ,कारण ते त्याच्यासाठी जादुई, छोटे, स्वतंत्र आणि भरपूर आश्चर्यांनी भरलेले आहे. पहिल्या चार-पाच वर्षांच्या आयुष्यात तो शहरात मोकळेपणाने भटकतो, रस्ते, इमारती, लोक, दुकाने, पार्क हे सर्व त्याच्या बालक नजरेतून जिवंत होतात. तेव्हा अमेरिका आणि क्युबा यांच्यात तणाव होता, स्पॅनिश-अमेरिकन युद्धाची धमकी होती. लहान मुलगा सैनिक होण्याची स्वप्ने पाहतो, तशी इटुकली पिटुकली मित्रांबरोबर तयारी करतो .हे सगळे त्याच्या बालसुलभ उत्सुकतेने आणि गमतीने वर्णन केले आहे. शहरात अनेक इमिग्रंट्स राहतात .वेगवेगळ्या देशांतील लोक, त्यांच्या संस्कृती, भाषा, खाद्यपदार्थ, व्यवसाय, एकमेकांशी तालमेल हे सगळे मुलाच्या डोळ्यातून खूप रोचक दिसते. ते "मेल्टिंग पॉट" सारखे आहे, जिथे सगळे एकत्र येऊन नवीन अमेरिकन जीवन बनवतात. १९०० साल सुरू झाल्यावर विज्ञान आणि वैद्यकीय प्रगतीमुळे जीव वाचवले जाण्याचे अनुभव येतात. मुलाला हे आश्चर्य वाटते. नंतर तो न्यूयॉर्क जवळच्या खेड्यात -Countryside जातो (मला लहानपणापासून Countryside शब्द फार आवडतो.) तिथे पहिल्यांदा दूध काढणे पाहतो, कुत्र्याशी मैत्री होते, निसर्ग आणि ग्रामीण जीवन त्याला नवीन जग दाखवते. शहर आणि खेडे यांच्यातील फरक त्याच्या मनात रुजतो. मोठा होताना तो विचार करतो .जीवनात काय करावे? धावपटू व्हावे की नाटकात काम करावे, की दुसरे काही? अनेक वाटा धुंडाळतो. शेवटी अब्राहम लिंकनवर एक लेख लिहितो, तो न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध होतो आणि पदक मिळते. तेव्हा त्याला खात्री होते , "आपण लेखक व्हायचे!" आणि तिथूनच त्याचे लेखनकार्य सुरू होते. हे पुस्तक लहान मुलांसाठी तर नक्कीच वाचण्यासारखे आहे .भाषा सोपी, उत्सुकता कायम ठेवणारी, आणि शहर,देश,संस्कृती यांची ओळख करून देणारी. पण मोठ्यांनाही आवडते, कारण २०व्या शतकाच्या सुरुवातीचे न्यूयॉर्कचे जिवंत चित्रण आहे. व्यंकटेश माडगूळकरांच्या मराठी अनुवादामुळे ते मराठी वाचकांना खूप जवळचे वाटते .जणू आपल्याच भाषेत न्यूयॉर्क फिरत आहोत! न्यूयॉर्क करून आठवले, असाच न्यूयॉर्क जवळच्या 'स्टेटन आयलंडचा' 'नानास' सिनेमा मी पाहिला होता.तेव्हापासून इथल्या मंतरलेल्या बेटांच्या मोहात आहे...आता ब्रूकलिन, क्वीन्स या बेटांवर आधारित खुसखुशीत पुस्तक किंवा सिनेमा पाहायचा ,शोधायचा आहे. --भक्ती
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 899
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

नितांतसुंदर. लहानपणी कितीतरी पारायणं झाली या पुस्तकाची. आजोबांचं दुकान, त्यात येणारी गिऱ्हाईकं, वेगवेगळ्या पुस्तकांमुळे झालेले राजकीय परिणाम, नवं शतक येण्यापूर्वीची गंमतीशीर परिस्थिती... हा अप्रतिम अनुवाद त्या मानाने उपेक्षितच राहिला असं वाटतं, भा. रा. भागवतांच्या 'एक होते सरोवर'सारखा.

In reply to by रामचंद्र

नवं शतक येण्यापूर्वीची गंमतीशीर परिस्थिती...
हो, जगबुडी होणार :) अगदी २००० साल सुरू होणार तेव्हाही अशाच अफवा उठल्या होत्या!

या नावाचे एक नाटक आहे ना? याचं पुस्तकावर आहे का? परिचय आवडला. पण मी वाचलेच नाही अजून आणि ऐकलेही नाही.