मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सैरभैर डायरी - २.१

कपिलमुनी · · जनातलं, मनातलं
आयुष्यात काय काय गंमती जमती झाल्यात चाळीशी नंतर याच्या आठवणी लिहाव्यात आता असा विचार केला. यात सलगता काही नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य घटना ! पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्यांचे आभार . पण लै अपेक्षा ठेउ नका २.१ उन्हाळ्यात दुपारचे जेवून खाउन कॉलनी सुस्तावली होती.कुत्री मांजरी सावल्या बघून डुलक्या काढत होती.उन्हाच्या तडाख्याने रस्त्यावर चिट्पाखरू नव्हते. नाईटशिफ्ट्ला मर मर करून रात्रभर जागून मी आज दुपारी झोपेचा कोटा भरून काढायच्या इराद्याने फॅन फुल्ल करून झोपलो होतो. तेवढ्यात बाहेर कलकलाट ऐकू यायला लागला.फेरी वाल्यांची काहीतरी झंझंट असते म्हणून मी दुर्लक्ष करून उशीत डोके खुपसले ,तर आवाज वाढतच गेला .. कोण भेंचो दुपारी कडमडला अशा शिव्या घालत गेटवर गेलो ,तर सोसायटीत टोकाला काम चालू असलेल्या अपार्ट्मेंटचा काँट्रक्टर उस्मान आणि दोन भंगार वाल्या पोरींचा वाद चालला होता. या साल्या उस्मानचे काम दुपारीपण मोठ्या आवाजात असते त्यामुळे याच्यावर आधीच माझा राग होता. "काय रे उस्मान ?काय मचमच लावली दुपारी ?" "देखो भाई ,रोज स्टील-सलई ढापतात. साला लाख रुपयाचा माल गेलाय एका हप्त्यात ! आता नाय सोडणार." त्या पोरींनी जमा केलेले सळ्या प्लेट इतस्ततः पसरले होते.एवढा मार खाउन पन पोरी हातातले स्टील सोडत नव्हती . "तुज्या बापाचा नाव हे का त्येचावर ! म्या गोळा केलाय" पोरी किंचाळत होत्या.उस्मानचे कामगार पोती ओढत असूनही पोरी रस्त्यावर लोळून चिवटपणे पोत्याचे तोंड सोडत नव्हत्या. हळूहळू गँलरी , कंपाउंडमधून पांढरपेशी डोकी बाहेर कानोसा घ्यायला लागली होती.उस्मान आणि कामगार आता पोरी पोते सोडत नाहीत बघून पोरींना मागे ओढायला लागले, आंगाला झोंबले तशा दोघी पोरींनी "अगो माय SSSS " अशी जोरात बोंब ठोकली. दुपारच्या झोपेचे खोबरे झालेले होते. त्यात अशी लफडी ! माझा डोके गरम झाले. खर्जातला आवाज लावत , "ए उस्मान ..पोरीला झटायचे नाय ! हात काढ" असा दम दिला, तसा उस्मान नरमला "चल निघ इथून ..माझ्या घरासमोर राडे नाय करायचे ! बाहेर मिटव " छोटा हत्ती मध्ये पोरी , सामान टाकून उस्मान गेला . कंपाऊंड, खिडकीमधली मशरूम्स दिसेनाशी झाली. लाइफ सायकल पुन्हा रीपीट मोड्वर चालू झला रात्री पुन्हा नाईट मारली आणि सकाळी आलो. दुपारच्या जागरणाचा हँगओव्हर होताच. आज फुल्ल ताणून द्यायची असे ठरवून अंधार केला आणि फॅन फुल्ल ! तेव्ढ्यात बेल वाजली.. आता कोण कडमडले अशा विचारात दार उघडले तर दारात पोलीस .. "साहेबांनी चौकीत बोलावले आहे !" "चौकीत ? काय मॅटर ? आलोच आवरून" "ते माहिती नाय ! रेप केस आहे. लगेच या." रेप केस ऐकल्यावर कानात शिट्या वाजल्या.. हे काय नवीन लफड ? आम्ही सिंगलाळू संघटनेचे अध्यक्ष . त्यामुळे आमिष देऊन बलात्कार ही भानगड नाही.सुदैवाने घरी कोणी नव्हते. कपडे घालून आई एका डब्यात इमर्जन्सीला पैसे ठेवायची ते खिशात टाकून निघालो. कंपाऊंडमागून डोकावणारे मशरूम्स सूचक डोके हलवत होते . "बघा, मी म्हणाले नव्हते, याची लक्षणे बरी नाहीत..आले की नई पोलिस दारात!" पोलिसाला बोललो, पुढे चला मी माझी गाडी घेऊन येतो, पण ऐकेना . त्यांच्या गाडीतून वरात काढायची इच्छा नव्हती. दुसरा बाण काढला, "जोशी साहेबाना घेऊन येतो". जोशी म्हणजे निष्णात वकील आणि पाव्हणा, त्याचे नाव ऐकल्यावर पोलिसाने आढेवेढे न घेता ऐकले. वरात तरी टाळली. वडीलांना फोन करून सांगायची हिंमत नव्हती. पण स्टेशनला गेले आणि आत टाकले की काही करता येत नाही याची पूर्वकल्पना होती. यातून बाहेर पडायचे कसे ? विचार करत होंडाला किक मारली , सुगंधी कट्ट्यावर गाडी घेतली. इथे सर्व समस्यावर हमखास उपाय ! जग कोळून प्यालेल्या पोरांना पोलिस , केसेस , लफडी यांचा सर्वोच्च अनुभव होता. चहा घेउन पहिली लाईट शिलगावली तेव्हा डोक चालायला लागले. समोरून आमदार बंधू जाताना दिसले. कट्टयाकडे बघून हात केला तसे त्यांना थांबवले.परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी तिथल्या पंटरला फोन लावून माहिती घेतली. मला खालपासूनन वर पर्यंत न्याहाळत बोलले, " जा स्टेटमेंट रेकॉर्ड करायचा आहे.केस असेल कच्ची घालायला सांग. मी येतोच! " ह्या राजकारण्यांचा "येतोच" कधी येत नाही .. चहा मारला तोवर बाल्या आला.. याने २-४ ट्रिप येरवड्याच्या केल्या होत्या. हाच आपला दिशादर्शक म्हणून डबलसीट टाकला आणि स्टेशन ला निघालो. पोचेपर्यंत बाल्याने रेपवाल्याना कैदी किती मारतात, संडास साफ करायला लावतात अशा सुरस कहाण्या सांगितल्या. जसे काय मी उद्याच तिथे जाणार होतो. स्टेशनचे वातावरण एकदम वेगळे असते.नवीन माणसाला दडपण येते. इथे कोणी हसताना, आनंदी नसते.कोणाला भेटायचे कल्पना नसते. काहीतरी लफडे असल्याशिवाय स्टेशनची पायरी चढत नाहीत यामुळे पोलिसांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन तसाच असतो.. बाल्याने इकडे तिकडे सलाम करत माहिती काढली,तर गँग रेप केस आहे. पोरी नाबालीग आहेत,इथवर कळले. माझ्या डोक्यात अजूनही ट्यूब पेटेना.. कुलकर्णी आत या, साहेबांचा भारदस्त आवाज आला..मी आणि बाल्या आत गेलो. बाल्यामे सलाम घातला तसा "तू चहा पिऊन ये जा" साहेबानी बाल्याला हाकलला.. " काय म्हणताय कार्यकर्ते ?" कशी चालू आहे समाजसेवा" "साहेब, काही समजले नाही.. का बोलावले आहे.. मी काही केले नाही" "अहो, मी म्हणालो का तुम्ही काय केलेत ? तुम्हीच सांगत आहात या बसा " नाव गाव पत्ता वगैरे जुजबी ओळख सांगितली.. जोशीसाहेबांचा मावसभाऊ अशी मुद्दाम सांगितली.. "आधीच वकील बघून ठेवलय काय ?" अशी गडगडाटी हसण्यासोबत विचारणा झाली.. काय बोलावे.किती सांगावे याचे गणित जमत नव्हते. तेव्हड्यात साहेब बोलले. आज सकाळ पासून तुम्हाला कोणाचे फोन आले कुठे गेला.कोणाला भेटला सांगा. काही सोडायचे नाही..सकाळपासूनची जंत्री सांगून झाली.. मग काल काय केलेत,सकाळपासून ते सांगा, काल सकाळचे लफडे. ऑफिस वगैरे सगळे सांगून झाले. तेव्हा माझी ट्यूब पेटायला सुरुवात झाली.. त्या पोरींचा काहीतरी लफडे झाले असावे. मॅडम, त्या पोरींना घेऊन या. पोरी लंगडत आल्या.. थोड्या जखमा दिसत होत्या.. "हाच होता का तो?" पोरींनी मान डोलावली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. आई, बाप ,नोकरी ते जेलमधला संडास सगळ गरगर फिरायला लागले

वाचने 1217 वाचनखूण प्रतिक्रिया 6

गवि Mon, 01/05/2026 - 18:44
ऑ? उत्सुकता वाढवणारी कथा. ...पण असं कसं? "हाच होता का तो?" याला "हो" ? गैरसमज की दुभंग व्यक्तिमत्व?!! उस्मान कॉलिंग उस्मान ? आधीचे भाग असतील तर वाचनातून सुटले. आता शोधणे आले. पुढच्या भागाची प्रतीक्षा..