मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छोटीसी बात, गोईंग डाऊन आणि येरूडकर..- किंडल बुक्स..

गवि · · जनातलं, मनातलं
तिसरं किंडल बुक आता आलं आहे. यातली शीर्षक कथा मौज प्रकाशनाच्या मौज दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. जी आता केवळ या पुस्तकातच वाचायला मिळेल. इतर अनेक कथा मिपावर आधी आलेल्या आहेत. पण तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही पुस्तक किंडलवर वाचावं, संग्रही ठेवावं किंवा किंडल अनलिमिटेडवर विनामूल्य वाचावं. माझी एक विनंती आहे.. की ज्यांना शक्य आहे त्यांनी या पुस्तकाला अमेझॉनवर रेटिंग देऊन (तारांकित करून) आणि रिव्ह्यू लिहून या पुस्तकाला जगभर पोचवण्यासाठी मदत करावी. रिव्ह्यू किंवा मत अगदी दोन चार ओळींत लिहीलंत तरी चालेल. त्यासाठी तुमचा फार वेळ घेण्याची माझी इच्छा नाही. एटीएम गार्ड, येरूडकर तुम्हाला भेटायला आलाय. लिंक: https://amzn.in/d/fln7d4w C अमेझॉन Book overview: हे पुस्तक तसं तर कथा सांगणारं आहे. पण त्याहूनही जास्त.. या पुस्तकात तुमच्या आमच्या गल्लीबोळातलं आयुष्य कागदावर तसंच, न लाजता, न लपता उतरलेलं आहे. हे सर्व वाचताना तुम्ही कधी मुसळधार पावसाचं पाणी भरत चाललेल्या एटीएम रूममध्ये नाईट शिफ्टवर असलेल्या येरुडकरला भेटाल.. तर कधी आईसक्रीमवाल्या "गंदे अंकल"च्या नजरेतून त्या निरागस पोरीच्या मनात शिराल. कधी "चिनू"च्या विंडोज ९८ च्या स्क्रीनवर चमकणारे याहू मेसेंजर, जिओसिटीज आणि देसीबाबा यांच्या आठवणी.. आणि ते किर्र वाजणारं १२८ केबीपीएस मोडेम तुम्हाला स्वतःच्याच त्या दिवसांत ओढून नेतील. कधी एमआरआय मशीनच्या बोगद्यात, धाड धाड वाजणाऱ्या आवाजात, आपल्याच मनातले शब्द ऐकू येतील. व्हिएतनामच्या "बा ना" हिल्समधे धुक्यात हरवलेला तो सोनेरी पूल.. आणि ती फॅमिली.. आणि.. असाच एक केळकर नावाचा पोरगा.. अर्धवट प्रेमात पडलेला.. शिवराळ पण मनातून मनाशी बोलणारा. वाचा आणि बघा काही जुळते का तार.. ________________________________________ ताजा कलम. खालील लेख लिहून एक दिवस व्हायच्या आतच विमान अपघातांच्या कहाण्या ऊर्फ एअर क्रॅशेस, या लेखांचं पुस्तक "गोईंग डाऊन" हेही किंडलवर आलं आहे. अनेक वाचक गेली काही वर्षे या लेखांचं काय झालं असं विचारत होते. आता ते पुन्हा सर्वांना वाचायला किंडलवर प्रकाशित झाले आहेत. लिंक https://amzn.in/d/fmxMFvV B ......... तुम्ही सर्वजण वेळोवेळी मी लिहीलेल्या कथा वाचत आला आहात. गोष्टी सांगणे ऊर्फ स्टोरी टेलिंग हा माझा आवडता छंद आणि त्याहूनही जास्त काहीतरी. मनुष्य कोणत्याही प्रकारचा का असेना, म्हणजे उत्साहाने नाचणारे कारंजे जणू.. इथपासून ते भलताच विक्षिप्त किंवा गप्प.. विहिरीतला काळोख जणू.. असा कोणीही असो. त्याला गोष्ट ऐकायला नक्कीच आवडते. तर माझ्या काही कथा, "छोटीसी बात" या किंडल बुकात एकत्र आल्या आहेत. त्यातल्या काही येथील अनेकांनी स्वतंत्रपणे वाचल्याही असतील. पण अनेकांसाठी त्यातल्या काही नवीन असतील. यापुढेही छापील पुस्तकाऐवजी हा नव्या युगाचा पुस्तक अवतार धारण करून माझ्या गोष्टी तुमच्याकडे येत राहतील. त्या वाचा. वाचताना तुम्हाला तुम्ही वाचत आहात याचा नक्की विसर पडेल आणि त्या ऐकू यायला लागतील. A लिंक: जागतिक लिंक: "अमेझॉन डॉट कॉम"वाली.. डॉलर मागत्यात..!! https://a.co/d/9r3IGk1 भारतीय लिंक: अमेझॉन डॉट इन.. भारतीय रुपयांत आणि स्वस्त.. !! https://amzn.in/d/64XpBRI ललित साहित्य, कथा वगैरे विकत घेऊन वाचणारे वाचक आजच्या काळात मिळणे म्हणजे अतिशय महान घटना. तसं कोणी केल्यास खूपच मोठी गोष्ट असेल माझ्यासाठी. म्हणजे सॉलिड कौतुकाची पावतीच.. पण पूर्ण खरेदी नको असेल त्यांना किंडल अनलिमिटेड ऑप्शनमधेही हे पुस्तक उपलब्ध आहे. म्हणजे ती सबस्क्रिप्शन ज्यांनी घेतले असेल त्यांना काहीही रक्कम न मोजताही हे पुस्तक किंडलवर वाचता येईल. सर्व वाचकांचा मी ऋणी आहेच. आता काही वाचक मला अल्पशा धनाचा धनी देखील करतील ही शक्यता नाकारता येत नाही. या किंडल बुकची माहिती मिपाकरांना व्हावी म्हणून हा छोटासा लेख. या पुस्तकांशी मिसळपाव वेबसाईट किंवा व्यवस्थापन यांचा काही संबंध नाही. अनेक कथा वाचकांनी विनामूल्य इथे वाचलेल्या असल्याने अर्थार्जन हा मूळ हेतूही नाही. तरीही एक डिस्क्लेमर लिहिणं माझं कर्तव्य आहे की या सर्वामध्ये मिसळपाव वेबसाईट किंवा व्यवस्थापन जबाबदार नाही. या पुस्तकाची छापील आवृत्ती नसल्याने तिचे बुकिंग किंवा विक्री असा कोणताही ऑप्शन किंवा उद्देश नाही. केवळ किंडल वापरकर्त्या मिपाकरांना आपलं पुस्तक आल्याचं कळावं म्हणून ही रिक्षा फिरवली झालं..

वाचने 4549 वाचनखूण प्रतिक्रिया 41

सोत्रि Wed, 12/03/2025 - 14:52
किंडल अनलिमिटेडवर लगेच डाउनलोड करून टाकले. संध्याकाळी हापिसच काम संपल की वाचून संपवणार आज!! छोटीसी बात... - (गवीपंखा) सोकाजी

कंजूस Wed, 12/03/2025 - 15:38
गगन विहारी सर, माझ्या नावाला स्मरून पुस्तकाचं सांपल वाचलं. गोष्ट एकदम फ्लाइट फास्ट आहे. नायकाचं सुंदरींवर बारिक लक्ष आहे. असू द्या. तरुणांना आवडतील कथा.

टर्मीनेटर Wed, 12/03/2025 - 15:53
मला UPI आणि credit card दोन्ही वरून पेमेंट करताना समस्या येत आहे त्यामूळे डाउनलोड करता येत नाहीये... ;( काय कारण असावे? मी सेव्ह कार्ड ऑप्शन सिलेक्ट करत नाही हे कारण असावे काय?

In reply to by टर्मीनेटर

गवि Wed, 12/03/2025 - 16:16
UPI मध्ये तर सरळच प्रक्रिया आहे. त्यात सेव्ह काही करावे लागत नाहीच. किंडल किंवा अमेझॉन मोबाईल ॲपमध्ये मात्र थेट कोणतेही किंडल संबंधित पेमेंट केले किंवा घेतले जात नाही. काहीतरी पॉलिसी आहे. वेब ब्राउझरवर किंडल किंवा अमेझॉन वेबसाईट ओपन करूनच ते करावं लागतं.

In reply to by गवि

टर्मीनेटर Wed, 12/03/2025 - 16:24
येस सर... मी तुम्ही दिलेल्या amazon च्या लिंक वरूनच प्रयत्न करत होतो... फक्त ज्या फोन वरून UPI पेमेंट करण्याचा प्रयत्न केला त्यात माझे UPI अकाउंट नाही पण मला ज्यावर ते आहे त्यावर पेमेंट रिक्वेस्ट आली नाही... म्हणून क्रेडिट कार्ड वरून पेमेंट करण्याचा प्रयत्न केला पण ते ही प्रोसेस होत नाहिये... आता थोड्या वेळानी घरी पोचल्यावर वेब ब्राउझर वरून प्रयत्न करतो...

In reply to by गवि

टर्मीनेटर Wed, 12/03/2025 - 17:08
"प्रयत्ने वाळूचे कण रगडीता" काय काय गळे... वगैरे म्हणतात ना... त्यावर विश्वास आहे 😀 त्यामुळे प्रयत्न करत रहाणे हे माझे इतिकर्तव्यच आहे हो...

In reply to by गवि

टर्मीनेटर Wed, 12/03/2025 - 17:24
माझ्यासारख्या अत्यंत सोज्वळ माणसाचा अतिशय "सात्विक' प्रतिसादही अश्लील वगैरे वाटत असेल तर पुढे काय बोलायचे? भलाई का जमानाच नहीं रहा सेठ 😀

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर Wed, 12/03/2025 - 19:44
वेब ब्राउझर वर पेमेंट झालं हो गवि शेठ... आता वाचतो.... (वाचतो कसला मजा घेतो... तुमचे लेखन वाचणे हा कायमच मजेदार अनुभव असतो 😍)

गविंचे पुस्तक खरेदी करतो. या वीकेंडला वाचून अभिप्राय देखिल कळवतो. - एक गविफॅन (गवि मिसळपाववर नसतील तर माझीही पावले इथे वळणार नाहीत. एवढे गवि आणि मिसळपाव यांचे माझ्या मनात साटेलोटे आहे. कोणत्याही प्रतिसादावरुन गवि एक मायाळू, केअरिंग, समंजस आणि ऐकुन घेणारे पण नेमकं, महत्वाचे, क्वचित तीक्ष्ण, शक्यतो आबदार पुढच्याला न दुखावता, बोलणारे, तरिही ऐसपैस आणि रिलॅक्स्ड व्यक्ती वाटतात. अशी माणसे क्रियेटिव्ह असतील तर मला अशा माणसांचा स्नेह खूप भावतो हवाहवासा वाटतो. त्यांचा जर कुणी पॅट्रोनस प्राणी असेल तर तो हत्ती असे वाटते. (त्याच्या शांत समंजस पवित्र वृत्तीमुळे) ) आणि गवि चा लाँग फॉर्म गगन विहारी आहे हे मला पहिल्यांदा कळले. गविजी, वाचेन, सांगेन. खूप धन्यवाद.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

धर्मराजमुटके Wed, 12/03/2025 - 18:33
त्यांचा जर कुणी पॅट्रोनस प्राणी असेल तर तो हत्ती असे वाटते.
चुक. डॉगेश भाई त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

In reply to by धर्मराजमुटके

पॅट्रोनस हे वृत्ती आणि प्रकृतिवर ठरत असतो त्यांना चॉइस नाही तो आपोआप निवडला जातो. मला तरी ते डॉगेश भाऊ नाही वाटत.

गवि Wed, 12/03/2025 - 18:34
ताजा कलम. खालील लेख लिहून एक दिवस व्हायच्या आतच विमान अपघातांच्या कहाण्या ऊर्फ एअर क्रॅशेस, या लेखांचं पुस्तक "गोईंग डाऊन" हेही किंडलवर आलं आहे. अनेक वाचक गेली काही वर्षे या लेखांचं काय झालं असं विचारत होते. आता ते पुन्हा सर्वांना वाचायला किंडलवर प्रकाशित झाले आहेत. लिंक https://amzn.in/d/fmxMFvV B

In reply to by गवि

गविजी हे पुस्तक छापायला कुणीही तयार झाले असते. तुम्ही प्रयत्न केले का तसे? (अजून एक म्हणजे चॅटजीपीटी आणि इतर मंडळी यांचा चित्रांचा सेन्स पूर्ण गंडला आहे, वरील मुखपृष्ट अजून आकर्षक करता आले असते. तुम्ही इथे एक स्पर्धा घ्यायला हवी होती, अभ्याभाऊ, मी, चित्रगुप्त इत्यादींनी हात/ प्रॉम्प्ट आजमावून पाहिला असता)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि Wed, 12/03/2025 - 21:06
धन्यवाद अण्णा..
वरील मुखपृष्ट अजून आकर्षक करता आले असते. तुम्ही इथे एक स्पर्धा घ्यायला हवी होती, अभ्याभाऊ, मी, चित्रगुप्त इत्यादींनी हात/ प्रॉम्प्ट आजमावून पाहिला असता
खरं आहे. आता यापुढील भाग येईलच. तेव्हा इथून आयडियाज घेईन. डन..

गामा पैलवान गुरुवार, 12/04/2025 - 04:37
गवि, तुमची लेखणी सिद्धहस्त आहे याचा अनुभव इथे घेतलाय. आता परत एकता पुस्तक वाचून घेईन. आ.न., -गा.पै.

गवि गुरुवार, 12/04/2025 - 05:36
@ राजेंद्र मेहेंदळे @ कंकाका @ डॉ कुमारेक काका @ धर्मराजमुटके @ कर्नल तपस्वी @ प्रा डॉ सर @ आन गा पै प्रत्येकाला खूप खूप धन्यवाद.. स्वतंत्र प्रतिसाद देऊन धागा पुन्हा पुन्हा वर आणणे होऊ नये म्हणून एकत्रच.. _/\_

अकिलिज Fri, 12/05/2025 - 21:36
एका सिद्धहस्त लेखकाने आपले पुस्तक प्रकाशित करावे ही खरंतर आमच्यासारख्या वाचनकर्त्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण त्यांचा नम्रपणा पहा. छोटीसी बात म्हणून सोडून दिली. गवि गवि, किती शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून. हणमंतअण्णा शंकरांच्या मताशी बाडीस.

श्रीरंग_जोशी Fri, 12/05/2025 - 22:45
दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन, गवि. अ‍ॅमेझॉनवरुन दोन्ही विकत घेतली आहेत. पुनर्वाचनाचा आनंद घेतो.

In reply to by गवि

श्रीरंग_जोशी Sat, 12/06/2025 - 05:15
प्रथम मला वाटले की माझा अ‍ॅमेझॉनचा नो-रश रिवॉर्डमुळे मला शुन्य डॉलरला मिळाले आहे. परंतु नो रश रिवॉर्डचे मूल्य पूर्वीइतकेच आहे. दोन्ही पुस्तकं विनामुल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!!

गवि Fri, 12/05/2025 - 23:39
आज आणि उद्या हे पुस्तक पूर्ण मोफत, शून्य किंमतीत घेता येईल असे केले आहे. पुस्तक आवडलं तर इतरांना शिफारस करणे, परीक्षण करणे, रेटिंग देणे वगैरे मार्गांनी पुस्तकाच्या प्रसारात मदत करावी अशी मिपाकरांना विनंती.

In reply to by गवि

कंजूस Sat, 12/06/2025 - 05:24
दोन्ही पुस्तकं किंडलवर घेतली, ॲपच्या लायब्रीत आली. वाचून प्रतिसाद लिहितो तिकडे. विमान, बोट किंवा रेल्वेमध्ये कामानिमित्त संबंध आलेले मराठी लोक बरेच असतील परंतू ते आवर्जून मराठीमध्ये तांत्रिक माहिती लिहीत नाहीत. तुम्ही इकडे मिसळपाव साईटवर लिहीत होतात ते मिसळपावचे वाचक वाचत होते. परंतू आता तुम्ही ही पुस्तके किंडलवर आणल्याने जगात सर्व ठिकाणी पोहोचतील. आभार.

कंजूस Sat, 12/06/2025 - 15:02
छोटीसी बात वाचले. पहिल्या दोन कथा मानसिक आघात आणि विरहावर आहेत. एरपोर्टचे वातावरण बरोबर पकडले आहे. पण विरह धक्का आहे. दुसऱ्या कथेत दारूच्या नशेत विरहदु:ख विसरू पाहणारा तरूण आहे. तिसरी 'आज' ही कथा चॅटिंग करण्याच्या व्यसनात अडकलेल्या मुलांची आहे. आभासी जग खरे वाटणारी पिढी आहे. चौथी कथा ही कौटुंबिक प्रेम आणि सुखदुःखाची आहे. पाचवी कथा 'तुलपा' ही एक गूढ गोष्टीत रमलेल्या नायकाची आहे. शेवटची बी.पी.ओ. ही याच प्रकारच्या सॉफ्टवेअर सर्विस देणाऱ्या उद्योगातील वातावरण, त्रास मांडते. त्यातील कर्मचाऱ्यांचे स्वभाव , आवडनिवड आणि अपेक्षा उलगडत जातात. एअरपोर्ट असो वा बी.पी.ओ. गविंनी निरीक्षणांचा कथांमध्ये चांगला उपयोग करून घेतला आहे. शिवाय कथा चटपटीत ठेवून कोणताही संदेश न देता करमणूक केली आहे.

In reply to by कंजूस

गवि Sun, 12/07/2025 - 11:42
कंकाका, "गोईंग डाऊन" या पुस्तकाला तुम्ही अमेझॉन पेजवर दिलेला सुंदर अभिप्राय वाचून मनापासून आनंद झाला. विमान अपघातांच्या मीमांसेत सर्व क्षेत्रातल्या वाचकांनी रस दाखवावा, समजून घ्यावं, आणि तांत्रिक गोष्टी सोप्या भाषेत पोचाव्या यासाठीच हे पुस्तक लिहीलं.. खूप आभारी आहे !

गवि Sun, 12/07/2025 - 11:29
धन्यवाद वाचकहो ! अमेझॉन डॉट इन, संपूर्ण किंडल कलेक्शनमध्ये: गोईंग डाऊन – Travel Writing मध्ये #2 रँक गोईंग डाऊन – Hot New Releases मध्ये #1 स्थान छोटीसी बात – Fiction (Suburban Literature) मध्ये #7 रँक विक्री किंवा मानधन यांच्यावर ही रँक अवलंबून नाही. वाचकांच्या प्रतिसादावर आहे. त्यामुळे वाचकांचे ऋण पुन्हा एकदा मानतो.

पूर्ण वाचले आणि अर्थातच आवडले. लगे रहो!! काही कथा (पॅन अ‍ॅम/के एल एम ची) एअर क्रॅश इन्वेस्टिगेशनमध्ये मालिकेत बघितल्या होत्या ते आठवले. मधेच "सली" या नितांतसुंदर चित्रपटाची आठवणही झाली. अवांतर-टॉम हॅन्क्स तसाही फॉरेस्ट गंप मुळे आवडतोच. त्यावर एकदा लिहायचे आहे. बघुया.

गवि Wed, 12/10/2025 - 08:27
तिसरं किंडल बुक आता आलं आहे. यातली शीर्षक कथा मौज प्रकाशनाच्या मौज दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. जी आता केवळ या पुस्तकातच वाचायला मिळेल. इतर अनेक कथा मिपावर आधी आलेल्या आहेत. पण तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही पुस्तक किंडलवर वाचावं, संग्रही ठेवावं किंवा किंडल अनलिमिटेडवर विनामूल्य वाचावं. माझी एक विनंती आहे.. की ज्यांना शक्य आहे त्यांनी या पुस्तकाला अमेझॉनवर रेटिंग देऊन (तारांकित करून) आणि रिव्ह्यू लिहून या पुस्तकाला जगभर पोचवण्यासाठी मदत करावी. एटीएम गार्ड, येरूडकर तुम्हाला भेटायला आलाय. लिंक: https://amzn.in/d/fln7d4w C अमेझॉन Book overview: हे पुस्तक तसं तर कथा सांगणारं आहे. पण त्याहूनही जास्त.. या पुस्तकात तुमच्या आमच्या गल्लीबोळातलं आयुष्य कागदावर तसंच, न लाजता, न लपता उतरलेलं आहे. हे सर्व वाचताना तुम्ही कधी मुसळधार पावसाचं पाणी भरत चाललेल्या एटीएम रूममध्ये नाईट शिफ्टवर असलेल्या येरुडकरला भेटाल.. तर कधी आईसक्रीमवाल्या "गंदे अंकल"च्या नजरेतून त्या निरागस पोरीच्या मनात शिराल. कधी "चिनू"च्या विंडोज ९८ च्या स्क्रीनवर चमकणारे याहू मेसेंजर, जिओसिटीज आणि देसीबाबा यांच्या आठवणी.. आणि ते किर्र वाजणारं १२८ केबीपीएस मोडेम तुम्हाला स्वतःच्याच त्या दिवसांत ओढून नेतील. कधी एमआरआय मशीनच्या बोगद्यात, धाड धाड वाजणाऱ्या आवाजात, आपल्याच मनातले शब्द ऐकू येतील. व्हिएतनामच्या "बा ना" हिल्समधे धुक्यात हरवलेला तो सोनेरी पूल.. आणि ती फॅमिली.. आणि.. असाच एक केळकर नावाचा पोरगा.. अर्धवट प्रेमात पडलेला.. शिवराळ पण मनातून मनाशी बोलणारा. वाचा आणि बघा काही जुळते का तार..

गवि गुरुवार, 12/18/2025 - 12:06
एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या पंधरा दिवसांत एकूण २७३४ किंडल पेजेस वाचन या तीन पुस्तकांचे मिळून झाले. यापैकी छोटीसी बात : १६०० पाने, छोटीसी बात: ८९० पाने आणि येरूडकर: २४१ पाने असे साधारणपणे आकडे आहेत. वाचकांचे सहस्र आभार. गेले दोन दिवस मात्र अचानक वाचने शून्यावर आली आहे. त्यामुळे हिरमोड झाला. प्रत्येक पुस्तक बेस्टसेलर रँकमधे वर होते पण ते काळानुसार अजून काही काळ तरी वाचनात रहावे आणि लाखो पुस्तकांच्या गठ्ठ्यात कायमचे गाडले जाऊ नये यासाठी सर्वांना विनंती अशी, की ज्यांनी हे पुस्तक अद्याप वाचले नसेल त्यांनी अवश्य वाचण्याचा प्रयत्न करावा. काही वाचकांनी कौतुक करणारे रिव्ह्यू आणि रेटिंग दिली आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही करावे. पुन्हा एकदा सर्व वाचक आणि प्रतिसादकर्ते आणि अभिप्राय, तारांकन देणारे यांच्याबद्दल कृतज्ञता..