मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थोडे डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर... प्रतिसाद आणि माझे मत

श्रावण मोडक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दोन भागांतील या लेखावर आलेल्या प्रतिसादांनंतर तो धागा बराच खालवर लांबत गेल्याने हा स्वतंत्र धागा केला आहे. मूळ लेख आणि २ व चर्चा लेखावर प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार. प्रतिसादांचे स्वरूप साधारणपणे मुद्देसूद लेखन येथून सुरू होणारे आहे. त्यात पुढे "अपुरे आकलन" किंवा "पुरेशा अभ्यासाचा अभाव", "पोकळ व बालीश" आणि काही मुद्यांवर "असहमती", तर काही मुद्यांवर "सहमती" अशी वाटचाल झालेली आहे. या प्रतिसादातील एकेका मुद्याच्या अनुषंगाने भूमिका स्पष्ट करेन. त्यात लेखक म्हणून माझ्या कुवतीच्या अनुषंगाने झालेल्या टीकेला उत्तर देणार नाही.
एखादे हिंसक/अहिंसक सामूहिक कृत्य करताना , त्याचा "पाया राजकीय" असतो , तेव्हा त्याचे उद्दिष्ट पोलिटीकल प्रोसेसशी मेळ खाणारे असते. जगभर चालणार्‍या इस्लामी दहशतवादाला अशी राजकीय चौकट आहे असे मला म्हणवत नाही. रशियन प्रजासत्ताकांपासून अमेरिकेपर्यंत , भारतापासून अफ्रिकेतील देशांपर्यंत , युरोपमधे लंडन, स्पेन मधे , ऑस्ट्रेलियन बेटांमधे जे घडले आहे , घडते आहे त्यात एक आणि एकच कॉमन धागा आहे : इस्लामाचे कडवे, जिहादी स्वरूप.
मुळातच माझ्या मते हा नुसता दहशतवाद नाही. दहशत पसरवणे हा एका मोठा युद्धाचा एक भाग आहे. हे युद्ध दोन असमान ताकदींमधील आहे. एका बाजूला आहे तो इस्लामचा मुखवटा पांघरून बसलेल्या पण वास्तवात आपल्या "मातृभूमी"च्या स्वातंत्र्यासाठी (ही धारणा रास्त किंवा वास्तव आहे किंवा नाही हा भाग वेगळा. ती धारणा अस्तित्त्वात आहे हे अमान्य करता येत नाही) संघटित झालेले काही समूह आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मते त्यांचे शत्रू आहेत. हे शत्रू म्हणजे कोण? तर स्वतः हे समूह सोडून उरलेला आंतरराष्ट्रीय समुदाय. तेव्हा यामगे इस्लाम हा कॉमन धागा असला तरी, प्रश्न तो नाही. प्रश्न त्याच्या पाठीमागे असलेल्या राजकीय उद्दिष्ट्यांचा आहे. मी लेखात म्हटल्याप्रमाणे इस्लामचा वापर येथे केवळ अनुयायी मिळवणे, कल्पिलेल्या संकटाचा आधार घेऊन मतपरिवर्तन घडवणे यासाठीच होतो आहे. कारण हे हल्ले करून इस्लाम सुरक्षीत होईल असे हे समूह म्हणत नाहीतच. त्या समुहाच्या वतीने हल्ले करणारे काय म्हणतात आणि त्या समुहांचे अधिकृत म्हणणे काय आहे यात तफावत का असते? त्या समुहांची भाषा राजकीय उद्दिष्ट्यांच्या समीप जाणारी असते. हल्ले करणारे अनुयायी त्या-त्या घडीला इस्लाम खतरेमेंचा नारा देत असतात. ही तफावतच स्पष्ट करते की येथे मुळातच डावपेच वेगळ्या स्वरूपाचा आहे. या समुहांचा एकही म्होरक्या (अगदी प्रभाकरन सकट) प्राणत्यागास सज्ज झालेला नाही. कधीच नाही. जे आहेत ते बिनचेहऱ्यांचे अनुयायी. हे काय आहे? आपण या समस्येची हाताळणी करताना या अनुयायांना लक्ष्य करणार आहोत, की त्यांच्यामागच्या मेदूंना असा माझा प्रश्न आहे. हे अनुयायी मिळू द्यावयाचे नसतील तर या प्रश्नाच्या मागे दडलेल्या राजकारणाला पुढे आणावे लागेल. अन्यथा 'इस्लाम', 'इस्लाम' करीत बसू आणि अधिकाधिक अनुयायी त्यांना मिळावेत अशी व्यवस्था करीत राहू. आयर्लंड किंवा सावरकरांदींबाबत अगदी स्वाभाविक आहे. पंजाबातील दहशतवाद्यांनीही जगभरात सरसकट हल्ले नव्हते केले. येथे ज्याला "इस्लामी दहशतवादी" म्हणतो त्या समूहाचा शत्रू मुळातच तो समूह सोडून उरलेला आंतरराष्ट्रीय समुदाय आहे. त्यामुळे त्यांनी युद्ध मांडले आहे ते त्या आंतरराष्ट्रीय समुदायाशी. या समुदायाचे जेथे-जेथे हितसंबंध असतील तेथे ते हल्ले चढवतात आणि युद्धाचाच तो एक भाग आहे. आपल्यापेक्षा शक्तिशाली अशा समुदायाला जेरीस आणण्यासाठी त्यांनी अंगीकारलेला हा गनिमी कावा आहे. सामान्यपणे युद्ध म्हटले की, सशस्त्रांवरच हल्ला करावा हे तत्त्व असते. ते येथे पाळले जात नाही, कारण युद्धातील वैरी मानला गेला आहे तो संपूर्ण समुदायच (अमेरिका नामक जीवनपद्धतीविषयीच ओसामा बिन लादेन, अयमन अल जवाहिरी ओरडत असतात). त्यामुळे त्या-त्या समुदायाच्या राज्य नामक संस्थेला नमवण्यासाठी त्या संस्थेचा पाया असणाऱ्या नागरी समुदायावर हे हल्ले होतात आणि होत राहतील. कारण त्यांची स्ट्रॅटेजी ती आहे. "इस्लाम खतरेमें है"चा नाराही दिला जातो तो अनुयायी मिळवण्यासाठी. त्यापलीकडे त्याला महत्त्व नाही, हे त्याच्या पोटात शिरल्यानंतर ध्यानी येते. या मुद्याचे उत्तर दोन स्वरूपांत आहे. तमिळ दहशतवादी खचितच केवळ मुस्लीम नाहीत (श्रीलंकेतील तमिळींमध्ये हिंदू आहेत, ख्रिश्चनही आहेत आणि ते एलटीटीईमध्ये आहेत. एलटीटीईच्या ब्लॅक टायगर्समधील बहुतेकांचे प्रोफाईल पाहिले तर ते हिंदू असल्याचे दिसून येईल). शीख दहशतवादी होतेच. उत्तराचा हा एक भाग झाला. सर्व दहशतवादी मुसलमान असतात असे जे म्हणतो त्यातील दहशतवादी या शब्दाला माझी मान्यताच नाही. ते दहशत पसरवतात, पण ती दहशत त्यांनी मांडलेल्या एका युद्धाचा भाग आहे. आणि युद्धातील त्यांचा समुदाय (किमान बहुसंख्य तरी) मुस्लिमच आहे. तेथे इतर धर्मीय अनुयायांची अपेक्षा कशी करता येईल? त्यांच्या या युद्धामागील राजकीय उद्दिष्ट्य ध्यानी घेतले नाही तर हाती राहतो तो इस्लामी दहशतवाद. मग त्याची उत्तरे त्याच पद्धतीने शोधून काढण्याचा प्रयत्न होतो आणि तो फसतोय हे आजवरच्या हल्ल्यांतून ध्यानी येतेच. जरूर. चर्चा पुढे नेण्यास, माझे काही चुकत असेल तर ते दुरूस्त होण्याची ती संधी असेल (या भूमिकेतूनच लिहितो, दुर्दैवी हा शब्द पटला नाही. असहमतीत दुर्दैव कसले?). अगदी बरोबर. पण राजकीय तोडग्याबरोबरच मी युद्ध म्हणूनही त्याकडे पहावे असे म्हणतो आहे. म्हणजेच ही समस्या हाताळण्यासाठीचा डावपेच दुपदरी असणे आवश्यक आहे. एकीकडे युद्ध म्हणून सशस्त्र सामना आणि त्याचवेळी त्या समुदायाच्या राजकीय उद्दिष्ट्याची परिपूर्ती किंवा त्यामागील कारणांचे निर्मूलन असा दुसरा भाग या डावपेचात असणे आवश्यक आहे. यापैकी पहिल्या भागाचा स्वीकारही आपण पुरेपूर केलेला नाही. इराक आणि अफगाणिस्तानात जे घडते आहे त्याचे इतर संदर्भही ध्यानी घेणे आवश्यक आहे. तेथे अंतर्गत स्वरूपात जो हिंसाचार, बंडाळी आहे ती सरळ-सरळ विदेशी शक्तींना हाकलून देणे या मुद्याशी जोडलेली आहे. तेथील त्या मुद्यांनाच पुढे करीत हा स्टेटलेस स्वरूपाचा समुदाय इतरत्रही युद्ध मांडून बसला आहे. दुसऱ्या भागाची मानसीक तयारीही यात दिसत नाही. दहशतवाद हा अद्यापही आपण 'लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम' अशा स्वरूपात पाहतो आहोत. म्हणूनच केवळ पोलीसी बळकटीकरणासारख्या आणि पुढे फेडरल एजन्सी वगैरेसारख्या उपायांचाच विचार होतोय. मुंबईच्या हल्ल्यात लष्कर, नौदल, हवाईदल यांची मदत घ्यावी लागली, नव्हे त्यांच्याकडूनच ऑपरेशन पार पाडावे लागले म्हणजे त्या हल्ल्याचा स्केल किती आहे हे ध्यानी येतेच. ही इतकी तयारी दहशतवाद्यांनी केली असे अप्रूप आपण वाटून घेत बसतो आणि विचार करतो, पण युद्धाला निघालेल्यांकडून ही तयारी प्राथमिकच म्हणावी लागते. माझा मुद्दा काहीसा असाच आहे.
हल्ल्यासाठी सखोल नियोजनाची गरज नाही, असा आपला दावा आहे. तो फारच पोकळ आणि बालीश वाटतो. कारण या दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे मुंबईत येण्याची गेल्याच वर्षी रंगीत तालिम केल्याचे वाचनात आले आहे. आणि गेली साठ सात त्यांनी सुरक्षा यंत्रणेला झुंजत ठेवले आहे. त्यामुळे ते सुचेल तसे खचितच वागले वागले नसतील. त्यामुळे नियोजनाची गरज नाही, असे म्हणणे अयोग्य ठरते...
माझे प्रतिपादन असे आहे - "अनेकांना असे वाटते की या हल्ल्यामागे सखोल नियोजन आहे. त्याची गरजच नाही." त्याची गरज नाही म्हणजे सखोल नियोजनाची गरज नाही, असा अर्थ निघतोय त्यातून हे खरे, पण माझे म्हणणे आहे की, तसे वाटण्याची गरज नाही. कारण "मुंबईच्या हल्ल्यानंतर जवळपास प्रत्येक जण या हल्ल्यामागे अगदी तपशीलवार तयारी कशी आहे याचे वर्णन करीत बसला आहे. ही तयारी असणे स्वाभाविक आहे हे ध्यानी घेतले जात नाही, कारण हे युद्ध आहे हेच मुळात मनात रुजलेले नाही." एकूण युद्ध करायला निघालेल्यांसाठी ही तयारी विशेष नाही. रंगीत तालीम हा तर एक भाग आहे. या "दहशतवाद्यां"चे प्रशिक्षण किती काळ झाले वगैरे तपशील समोर आले आहेत. ते प्रशिक्षण हीही एक तयारीच आहे. आणि अशी तयारी कुठल्याही फुटकळ संघटनेकडून शक्य नसते. म्हणजे येथे संघटन सखोल विचार करणारे, मिळेल ते हत्यार आपल्या लढ्यात उपयोगात आणणारे, नव्या हत्याराचा विचार करणारे आहे हे ध्यानी घ्यावे लागेल. हल्ला करण्यासाठी नियोजन आणि हल्ला प्रत्यक्ष कसा होईल याचे नियोजन असा हा भेद आहे. कराचीतून निघून मुंबईत जाऊन अमूक-अमूक लक्ष्य करावयाचे, त्यासाठी हेहे साधनस्रोत, हे अनुयायी अशा स्वरूपाचे नियोजन अपेक्षितच, कारण हे युद्ध आहे. एकाद-दुसरा हल्ला नाही. प्रत्येक हल्ला ही त्या संघटनांसाठीची एका व्यापक युद्धातील एकेक लढाई आहे. मुद्दे मांडले असते तर असे निष्कर्ष मी निश्चितच बदलले असते.

वाचन 5052 प्रतिक्रिया 13