संवाद
लेखनप्रकार
संवाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन जणांचं एकमेकांशी चालणारं संभाषण येतं. पण खरं तर आपला सर्वाधिक संवाद हा आपल्या स्वतःशीच सुरू असतो. आपल्या मनात येणारे विचार हाही या संवादाचाच एक भाग झाला. कधी हा संवाद विचारांच्या रूपात असतो, कधी भावनेच्या, पण तो बहुतेक सारा वेळ सुरूच असतो खरा!
काळे ढग आणि बरसणारा पाऊस पाहून कोणाला त्या पावसात चिंब भिजण्याची इच्छा होते, कोणी छत्री शोधू लागतो, कोणी भज्यांची फर्माईश करतो आणि कोणाला कालिदासाचा मेघदूत आठवतो. तोच पाऊस ह्या वेगवेगळ्या गोष्टी कसा साधतो? कारण त्याने वेगवेगळ्या मनांची वेगवेगळी तार छेडलेली असते. मनाच्या तारा जेव्हा सुरांत झंकारल्या जातात तेव्हा सुरेख सुरावट उमटते. पण जेव्हा वरचेवर त्यांचे सूर बिनसतात तेव्हा? आपले विचार आपल्यालाच नकोसे वाटतात तेव्हा? त्यांचा त्रास कधी आपल्याला स्वतःला, कधी इतरांना होतो तेव्हा? "तुला नाही जमणार, तोंडघशी पडशील गेल्या वेळसारखं" असं म्हणून कधी आपलंच मन आपल्याला संधी नाकारतं, तर कधी रागावर ताबा ठेवायचं शेकडो वेळा ठरवूनही आपल्याला कळायच्या आत जळजळीत काटेरी शब्द आपल्या तोंडून निघतात. नाती तोडण्याची आपली इच्छा नसते खरं तर, पण नात्यांमधले पूल अश्या शब्दांनी पार कोलमडतात. कधी निराशेचा काळा अंधार इतका घेरतो की प्रयत्नाचं पाऊल पुढे टाकायला समोर उजेडच दिसत नाही. कधी नोकरी, कधी लग्न, कधी तब्बेत, कधी पूर्ण आयुष्यावर निराशेचे हे काळे ढग येतात. "हे असंच राहणार, काहीच, कधीच नाही बदलणार" असं सतत आत ऐकू येत राहतं. "मला काही झालं तर? माझ्या मुलांचं कसं होईल…." "छे छे असं काही नाही होणार!" "पण झालं तर! माझ्या मित्राच्या भावाचं नाही का अगदी अचानक असं झालं!" असे उलटसुलट विचार जाता जात नाहीत. आणि अजून जवळही न आलेल्या संकटाच्या भीतीने, दुःखाने आधीच हातपाय गळतात. आपल्या अंतर्मनात होणाऱ्या या संवादाचा त्रास तर आपल्याला होत असतो. पण या विसंवादाचा सुसंवाद कसा करायचा?
आपल्याला सार्यांना ही उपजत बुद्धी असते. पण कधी सवयीने, कधी चुकीच्या उदाहरणांमुळे, कधी आयुष्यातील तणावांमुळे त्यावर पुटं चढतात. हे सदर ही पुटं हटवून ह्या आपल्या विसंवादाचा सुसंवाद करण्यासाठी आहे. सध्याच्या काळात कोणाच्या मनात व्हायरसची भीती आहे, कोणाला नोकरी धंद्याची काळजी आहे, काही नाती विस्कटली आहेत आणि कधी सगळं ठीकठाक असूनही आत काहीतरी खुपतंय. माझ्या मानसोपचाराच्या अनुभवांतून आणि अभ्यासातून मी काही साचे (ज्याला आम्ही ट्रीटमेंट प्रोटोकॉल म्हणतो) तयार केले आहेत. मनातील गुंता स्वतःचा स्वतः सोडवायला हे साचे आपल्याला उपयोगी पडतील अशी आशा आहे.
मनाच्या विसंवादामध्ये एक मोठा भाग असतो भीतीचा. असं झालं तर? तसं होईल का? अश्या प्रकारचे विचार मनाला घेरतातं आणि भीतीचा अंमल वाढत जातो. भीती, भय याला आपण सहसा नकारात्मक दृष्टीने पाहतो पण खरं तर काही प्रमाणात भीती ही आवश्यकच आहे. वानराचा नर होण्याच्या उत्क्रांतीमध्ये मानव तग धरू शकला कारण वेगवेगळे आणि मोठे अधिक बलवान प्राणी, नैसर्गिक संकटं यांपासून असलेला धोका मानवाने ओळखला. त्या धोक्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने निरनिराळ्या शकला लढवल्या, योजना आखल्या आणि त्या अंमलात आणल्या. योग्य प्रमाणात असलेल्या भीतीमुळे माणूस सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतो, पण भीती जर प्रमाणाबाहेर वाढली तर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. भीतीने ग्रस्त लोकांमध्ये छातीत धडधडणं, घसा कोरडा पडणं, पोटात मळमळणं, उलट्या, जुलाब होणं, वारंवार टॉयलेटला जायची गरज आहे असं वाटणं, डोकं दुखणं, झोप उडणं, सतत अस्वस्थ वाटत राहणं यापैकी एक किंवा अधिक लक्षणं दिसून येतात. यावर उपाय कसा करायचा हे आपल्याला पाहायचं आहे.
वैद्यकीय शिक्षणाचं पहिलं दीड वर्ष, आठवड्यातले बहुतेक दिवस आम्ही शवविच्छेदन करून शरीर आत कसं असतं, शरीराचे सारे व्यापार कसे चालतात ही शिकत असू. कारण उपचार करण्या आधी गोष्टी सामान्यतः कश्या चालतात हे समजून घेणं फार आवश्यक आहे. अगदी हेच मनोविकारांनाही लागू आहे. म्हणूनच या सदरांमध्ये आपण भय, नैराश्य, तणाव इत्यादी विकारांकडे पाहताना आधी ते समजून घेऊन मग उपचार कसा करायचा हे पाहणार आहोत. समस्येला आधी नीट समजून घेणं, त्याविषयीची माहिती मिळवणं ही उपचाराची पहिली पायरीच म्हणता येईल.
अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीने ग्रासलेल्या असतात. भीतीचे मुख्य प्रकार समजून घेऊया.
• फोबिया (विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती)
• Generalised Anxiety Disorder (जी ए डी किंवा प्रत्येक गोष्टीची धास्ती)
• हेल्थ anxiety (आरोग्याबद्दलची, आजारांची भीती)
• सोशल anxiety (समूहामध्ये वावरण्याची भीती)
• पॅनिक डिसऑर्डर (भीतीचा तीव्र झटका)
सर्वपरिचित असणारा भीतीचा प्रकार म्हणजे फोबिया – एखाद्या विशिष्ट वस्तू/ प्राणी किंवा परिस्थितीशी निगडीत असलेलं भय. उदाहरणार्थ पाण्याची, उंचीची, कीटकांची, सापांची, बंदिस्त जागांची वाटणारी तीव्र भीती. सापांचा फोबिया असणारी व्यक्ती माळरानात, गवतात तर चालायला जात नाहीच, पण प्राणी संग्रहालयातील बंदिस्त पेट्यांमधील साप पाहणंही अश्या व्यक्तीला अशक्य असतं.
भीतीचा दुसरा प्रकार म्हणजे जीएडी (GAD) किंवा प्रत्येक गोष्टीची – प्रत्येक गोष्ट विपरीत झाली तर अशी सतत वाटणारी धास्ती. या प्रकारात मोडणाऱ्या बहुतेक व्यक्ती या सदैव काहीना काही कारणाने चिंताग्रस्त असतात. आणि अशी काळजी करणं आवश्यकच आहे असं यातल्या बहुतेकांचं मत असतं. हा मनोविकारांचा एक प्रकार आहे यांची कल्पनाच नसल्यामुळे त्यावर उपाय योजना करणं लांबच राहतं.
सध्याच्या व्हायरस मुळे पुढच्या काही वर्षांत ज्या एका प्रकारच्या भीतीचं प्रमाण वाढणार आहे तो प्रकार म्हणजे हेल्थ anxiety. या रोगाला पूर्वी हायपोकोंड्रिया म्हटलं जात असे. हेल्थ anxiety च्या व्यक्तींना स्वतःच्या आरोग्याविषयी खूपच चिंता वाटत असते. आपल्याला हा रोग तर नाही ना तो रोग तर नाही ना अश्या अवाजवी काळजीने त्यांचं मन सतत ग्रासलेलं असतं.
सर्वत्र भरपूर दिसून येणारा आणि तरीही कमी परिचित असणारा भीतीचा प्रकार आहे सोशल anxiety किंवा समूहामध्ये वावरण्याची भीती. अनोळखी लोकांशी बोलणं अश्या व्यक्तीना नकोसं वाटतं, बरेचदा या व्यक्तीना ओळखीच्या अनेक लोकांशी एकत्र भेटण्याची, बोलण्याची, उठण्या-बसण्याची वेळ आली (उदाहरणार्थ पार्टी / मीटिंग / पिकनिक) की त्यांना त्याचं अतिशय दडपण येतं. मग ते सहसा असे कार्यक्रम टाळतात किंवा कोणाचीतरी सोबत घट्ट पकडून ठेवतात. लाजरा स्वभाव या लेबलखाली दडून गेल्यामुळे कित्येक व्यक्तींच्या या रोगाचं निदानच होत नाही.
भीतीचा थोडा कमी परिचित असणारा प्रकार म्हणजे पॅनिक डिसऑर्डर. या व्यक्तींना भीतीचा तीव्र झटका हा अचानक कधीही येऊ शकतो. या झटक्यांच्या वेळी त्यांना वाटणारी भीती, जसं “मी आत्ताच्या आत्ता मरेन/ माझ्या शरीराचे तुकडे होतील / मला फिट येईल" इतरांना तर्कहीन, बिनबुडाची वाटते पण त्या व्यक्तींसाठी मात्र ती अतिशय तीव्र असते.
भीती किंवा चिंता (Anxiety) या मनोविकाराचे हे काही प्रमुख प्रकार आहेत. एकाच व्यक्तीला एकाहून अधिक प्रकारची भीती असणं किंवा भीती आणि नैराश्य असणं हेसुद्धा बरेचदा दिसून येतं. पुढच्या भागांमध्ये पाहूया की या भीतीशी टप्प्याटप्प्याने मुकाबला कसा करायचा ...
डॉ. माधुरी ठाकूर
https://drmadhurithakur.blogspot.com/2020/08/1.html?m=1
वाचने
37505
वाचनखूण
प्रतिक्रिया
104
तर कधी रागावर ताबा ठेवायचं शेकडो वेळा ठरवूनही आपल्याला कळायच्या आत जळजळीत काटेरी शब्द आपल्या तोंडून निघतात. नाती तोडण्याची आपली इच्छा नसते खरं तर, पण नात्यांमधले पूल अश्या शब्दांनी पार कोलमडतात.अगदी सहमत आहे. नंतर मग बुंदसे गयी वो हौद से नही आती अस होत. वाचताना मला पूल बांधा रे मैत्रीचे हा डॉ उल्हास लुकतुके यांचा लेख आठवला. मानवी नातेसंबंध हे फार अबस्ट्रॅक्ट असतात.
In reply to तर कधी रागावर ताबा ठेवायचं by प्रकाश घाटपांडे
धाग्याला योग्य त्या मार्गावर आणल्याबद्दल धन्यवाद घाटपांडे साहेब. :)
मन असतं की नसतं यावर वेगळा धागा काढून, तिथे जर या संबंधातले सगळे प्रतिसाद हलवले तर किती बरे होईल?
छानच !न भीता मस्त मतं मांडली आहेत.:) उत्तम
संजय क्षीरसागर,
तुमचा इथला संदेश वाचला. माझं अखेरचं भाष्य करेन म्हणतो.
१.
जाणिवेच्या आधारे वैचारिक आकलन होतं.जाणीव ही एक सरसकट संज्ञा आहे. भुकेची जाणीव आणि संजय क्षीरसागर यांना उद्देशून भाष्य करायची जाणीव या दोहोंत गुणात्मक फरक आहे. हा भेद जाणण्याची ( म्हणजे फरक प्रोसेस करायची ) यंत्रणा म्हणजे मन. २.
आपल्या बेसावधपणाला आपण मन म्हणू शकत नाही कारण आपण सावध झालो की विचार उमटू शकत नाहीत.तुम्ही सावध आहात ते तुमची तशी इच्छा आहे म्हणून. निदान सुरुवातीला तरी माणूस कटाक्षाने सावध असतो. अशा वेळेस विचार उमटला तर तो पकडून नष्ट करावा लागतो. हा विचार पकडतं ते मन. कालांतराने सावधपणा तुमच्या अंगवळणी पडतो. हे अंगचं वळण म्हणजे नेमकं काय? ते अव्यक्त मनाचंच वळण आहे. असं माझं मत आहे. असो. एकंदरीत 'मन अस्तित्वात नसतं' हे विधान सत्य धरल्यास जाणीवेचा अविष्कार दर्शवण्यासाठी मूळ जाणीवेस इतर यंत्रणांची ( = एजन्सींची ) मदत घ्यावी लागते. अशा यंत्रणांच्या समुच्चयास मन म्हणायला हरकत नसावी. अर्थात हे झालं माझं तर्काधारित ( ≠ अनुभवाधारित ) मत. तुम्हाला मन हा शब्द आवडंत नसल्यास तुम्ही त्याला तार्किक अनिवार्यता ( = logical compulsion ) म्हणू शकता. पारंपरिक शास्त्रात मनाचे पाच भाग मानले आहेत : मेधा, स्मृती, बुद्धी, प्रज्ञा आणि प्रतिभा. यावरून माझा तर्क पारंपरिक भूमिकेशी सुसंगत आहे. मात्र प्रत्येकाचं मत परंपरेशी सुसंगत असायलाच हवं, अशी सक्ती नाही. कारण की अनुभवाधारित मत ( जे तुमचं आहे) स्वत:ची स्वतंत्र वैधता बाळगू शकतं. वर शाम भागवतांनी म्हटलंय की, ही चर्चा दुसरीकडे नेता येईल का. त्यांची विनंती योग्य वाटल्याने मी इथे थांबतो. तुमच्याशी चर्चा करून बरेच मुद्दे स्पष्ट झाले. त्याबद्दल आभार! :-) आ.न., -गा.पै.
In reply to मनाची तार्किक अनिवार्यता by गामा पैलवान
इट्स ऑल सायकोलॉजी :)
In reply to मनाची तार्किक अनिवार्यता by गामा पैलवान
त्याबद्दल आभार!धन्यवाद ! पण मूळ मुद्दा तसाच आहे : मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही ! १. माझं मन या शब्दाला ऑब्जेक्शन नाही कारण प्रत्येक शब्द हा केवळ निर्देश आहे. आणि मुद्दा हा आहे की मन या शब्दानं निर्देश केली जाणारी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. विचार प्रवाह आहे आणि त्याला आपण (माझ्या पूर्वीच्या प्रतिसादाप्रमाणे) मन म्हणू शकतो; पण एकेक विचार सुटा झाला तर तिथे काहीही उरत नाही. तुम्ही काही तरी करुन कुठे तरी मन हा शब्द फिट करण्याचा प्रयत्न करतायं त्यामुळे तुम्हाला नक्की उलगडा होत नाही. २.
जाणीव ही एक सरसकट संज्ञा आहे. भुकेची जाणीव आणि संजय क्षीरसागर यांना उद्देशून भाष्य करायची जाणीव या दोहोंत गुणात्मक फरक आहे. हा भेद जाणण्याची ( म्हणजे फरक प्रोसेस करायची ) यंत्रणा म्हणजे मन.जाणीव एक आहे. जाणीवेनं जाणल्या जाणार्या गोष्टी अनेक आहेत. विचार प्रवाह ज्यानं जाणला जातो तिला जाणीव म्हणतात. आपल्याला जाणीव होते आणि मग काय करायचं ते आपण ठरवतो. भूकेची आणि प्रतिसाद देण्याची जाणीव झाल्यावर आपण आग्रक्रम ठरवतो. ३.
तुम्ही सावध आहात ते तुमची तशी इच्छा आहे म्हणून. निदान सुरुवातीला तरी माणूस कटाक्षाने सावध असतो. अशा वेळेस विचार उमटला तर तो पकडून नष्ट करावा लागतो. हा विचार पकडतं ते मन.कालांतराने सावधपणा तुमच्या अंगवळणी पडतो. हे अंगचं वळण म्हणजे नेमकं काय? ते अव्यक्त मनाचंच वळण आहे. असं माझं मत आहे.जागरुकता हा आपला स्वभाव आहे, तो कुणाच्या इच्छे किंवा अनिच्छेवर अवलंबून नाही. आपण नाही असं आयुष्यात कुणीही आणि कधीही म्हणू शकत नाही. झोपेत सुद्धा स्वप्न पडतंय हे आपल्याला कळतं आणि गाढ झोप लागली होती हे (झोपेत जागरुकता हरवली ) असली तरी उठल्यावर आपल्यालाच कळतं. जागरुकतेची ही दिपशिखा आपल्याला तेवत ठेवावी लागते कारण विचारप्रवाह तीचं तंद्रा आणि निद्रेत रुपांतर घडवण्याचं काम करतो. या विचारप्रवाहाला मन म्हणण्याचा प्रघात पडला आहे. ४.
जाणीवेचा अविष्कार दर्शवण्यासाठी मूळ जाणीवेस इतर यंत्रणांची ( = एजन्सींची ) मदत घ्यावी लागते. अशा यंत्रणांच्या समुच्चयास मन म्हणायला हरकत नसावीजाणीवेच्या आविष्कारासाठी ज्या वेगवेगळ्या फॅकल्टीजची मदत होते त्यात स्मृतीचा भाग अनिवार्य आहे पण स्मृती हा बाइट-बाय-बाइट मेंदूत स्टोअर केलेला डेटा आहे. त्याला आपण मन म्हणू शकत नाही. गायक गाणं सादर करतो त्यावेळी जाणीव , गायन कौशल्य आणि स्मृती यांचा एकसमयाव्यवच्छेद होतो. विचारप्रवाह शून्य झाला तरंच उत्तम गाणं प्रकट होतं. जगातल्या कोणाही गायकाला हे विचारुन खात्री करुन घ्या. ५.
पारंपरिक शास्त्रात मनाचे पाच भाग मानले आहेत : मेधा, स्मृती, बुद्धी, प्रज्ञा आणि प्रतिभा. यावरून माझा तर्क पारंपरिक भूमिकेशी सुसंगत आहेस्मृती हे मेंदूत स्टोअर झालेलं रेकॉर्ड आहे; त्याचा रोजच्या जगण्यासाठी उपयोग आहे. मेधा, बुद्धी आणि प्रज्ञा ही तुमची स्वतःला जाणू शकण्याची संभावना आहे. प्रतिभा हा तुमच्या कौशल्याचा किंवा स्वतःला जाणल्यावर अभिव्यक्त होण्याचा मुक्तछंद आहे. यातल्या एकाही गोष्टीचा मनाशी सुतराम संबंध नाही कारण मन अशी काहीही चीजच नाही.
संजय क्षीरसागर,
तुम्ही काही तरी करुन कुठे तरी मन हा शब्द फिट करण्याचा प्रयत्न करतायं त्यामुळे तुम्हाला नक्की उलगडा होत नाही.नेमक्या जागी मन हा शब्द फिट करणे हेच माझं उद्दिष्ट आहे. सुरुवातीस कुठेतरी फिट करावा लागेल, पण कालांतराने नेमकं स्थान दिसून येईल असा आत्मविश्वास आहे. जो काही मर्यादित अथवा अमर्यादित उलगडा होईल तेव्हढा मला पुरेसा आहे. कारण की तो मी पारंपरिक मताशी जुळवू शकतो. पण अर्थात तुमचा मार्ग वेगळा असू शकतो. इतकं निरीक्षण नोंदवून थांबतो. आ.न., -गा.पै.
In reply to फिटिंग करणे by गामा पैलवान
हेच माझं उद्दिष्ट आहे. पण कालांतराने नेमकं स्थान दिसून येईल असा आत्मविश्वास आहे. जो काही मर्यादित अथवा अमर्यादित उलगडा होईल तेव्हढा मला पुरेसा आहे. कारण की तो मी पारंपरिक मताशी जुळवू शकतो.काय साधणार त्यातून ? कारण कशाला मन म्हणतात हा निरर्थक सवाल आहे. भय काय आहे आणि त्यातून सुटका कशी हा मुद्दा आहे. १. भय हा प्रक्षेपणाला दिलेला रिस्पाँन्स आहे. आणि माझं म्हणणंय की प्रक्षेपण हा आपल्याच तंद्री आणि निद्रेचा परिणाम आहे. आपण जागृत झालो की प्रक्षेपण संपलं मग भयाचा प्रश्णच नाही ! तेंव्हा ही जागृकता कशी साधेल ते पाहा. २.
अर्थात तुमचा मार्ग वेगळा असू शकतो. इतकं निरीक्षण नोंदवून थांबतो.माझ्या मार्गाचा सवालच नाही. माझा अनुभव आणि वस्तुस्थिती तुमच्या समोर ठेवली आहे. लेखिकेला वाटतंय रिस्पाँन्स बदलून भय संपेल, ते असंभव आहे. या लेखमालेतल्या दुसर्या पोस्टवरचे त्यांचे प्रतिसाद बघून तुम्हाला एकूण परिस्थिती लक्षात आलीच असेल. थोडक्यात, माझा मुद्दा खुद्द लेखिकेनंच सिद्ध केलायं आणि तो ही एक स्टेप पुढे जाऊन : देव किंवा गुरु शरणांगती हा पारंपारिक उपाय भयमुक्तीला उपयोगी नाही.
In reply to @ गामा पैलवान : नेमक्या जागी मन हा शब्द फिट करणे by संजय क्षीरसागर
संजय क्षीरसागर,
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे :
भय काय आहे आणि त्यातून सुटका कशी हा मुद्दा आहे.मात्र मला सध्यातरी कसलंही भय वाटंत नाही. त्यामुळे माझा पास. आ.न., -गा.पै.
आत्मा ,मन,चेतना ह्या विषयी शास्त्रीय पद्धतीने शोध घेवून सुद्धा ठाम असे काहीच आज पर्यंत संशोधक च्या हाताला लागले नाही.
Work in progress.
ही स्थिती आहे.
उगाच च काही तरी युक्ती वाद करून सत्य गवस्ल्याचा आनंद घेवू नका.
आनंदिनी आपण संवाद थांबवू नका. चालू ठेवा. पुढचा भाग येउ द्यात.
In reply to आनंदिनी आपण संवाद थांबवू नका. by प्रकाश घाटपांडे
+१
आजुबाजुची परिस्थिती आणि आपली किंमत आपल्यामागे किती केली जाते हे न कळल्याने मानसिक रोग निर्माण होतात.
तर कधी रागावर ताबा ठेवायचं