Skip to main content

संवाद

लेखक aanandinee यांनी शुक्रवार, 07/08/2020 04:37 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन जणांचं एकमेकांशी चालणारं संभाषण येतं. पण खरं तर आपला सर्वाधिक संवाद हा आपल्या स्वतःशीच सुरू असतो. आपल्या मनात येणारे विचार हाही या संवादाचाच एक भाग झाला. कधी हा संवाद विचारांच्या रूपात असतो, कधी भावनेच्या, पण तो बहुतेक सारा वेळ सुरूच असतो खरा! काळे ढग आणि बरसणारा पाऊस पाहून कोणाला त्या पावसात चिंब भिजण्याची इच्छा होते, कोणी छत्री शोधू लागतो, कोणी भज्यांची फर्माईश करतो आणि कोणाला कालिदासाचा मेघदूत आठवतो. तोच पाऊस ह्या वेगवेगळ्या गोष्टी कसा साधतो? कारण त्याने वेगवेगळ्या मनांची वेगवेगळी तार छेडलेली असते. मनाच्या तारा जेव्हा सुरांत झंकारल्या जातात तेव्हा सुरेख सुरावट उमटते. पण जेव्हा वरचेवर त्यांचे सूर बिनसतात तेव्हा? आपले विचार आपल्यालाच नकोसे वाटतात तेव्हा? त्यांचा त्रास कधी आपल्याला स्वतःला, कधी इतरांना होतो तेव्हा? "तुला नाही जमणार, तोंडघशी पडशील गेल्या वेळसारखं" असं म्हणून कधी आपलंच मन आपल्याला संधी नाकारतं, तर कधी रागावर ताबा ठेवायचं शेकडो वेळा ठरवूनही आपल्याला कळायच्या आत जळजळीत काटेरी शब्द आपल्या तोंडून निघतात. नाती तोडण्याची आपली इच्छा नसते खरं तर, पण नात्यांमधले पूल अश्या शब्दांनी पार कोलमडतात. कधी निराशेचा काळा अंधार इतका घेरतो की प्रयत्नाचं पाऊल पुढे टाकायला समोर उजेडच दिसत नाही. कधी नोकरी, कधी लग्न, कधी तब्बेत, कधी पूर्ण आयुष्यावर निराशेचे हे काळे ढग येतात. "हे असंच राहणार, काहीच, कधीच नाही बदलणार" असं सतत आत ऐकू येत राहतं. "मला काही झालं तर? माझ्या मुलांचं कसं होईल…." "छे छे असं काही नाही होणार!" "पण झालं तर! माझ्या मित्राच्या भावाचं नाही का अगदी अचानक असं झालं!" असे उलटसुलट विचार जाता जात नाहीत. आणि अजून जवळही न आलेल्या संकटाच्या भीतीने, दुःखाने आधीच हातपाय गळतात. आपल्या अंतर्मनात होणाऱ्या या संवादाचा त्रास तर आपल्याला होत असतो. पण या विसंवादाचा सुसंवाद कसा करायचा? आपल्याला सार्यांना ही उपजत बुद्धी असते. पण कधी सवयीने, कधी चुकीच्या उदाहरणांमुळे, कधी आयुष्यातील तणावांमुळे त्यावर पुटं चढतात. हे सदर ही पुटं हटवून ह्या आपल्या विसंवादाचा सुसंवाद करण्यासाठी आहे. सध्याच्या काळात कोणाच्या मनात व्हायरसची भीती आहे, कोणाला नोकरी धंद्याची काळजी आहे, काही नाती विस्कटली आहेत आणि कधी सगळं ठीकठाक असूनही आत काहीतरी खुपतंय. माझ्या मानसोपचाराच्या अनुभवांतून आणि अभ्यासातून मी काही साचे (ज्याला आम्ही ट्रीटमेंट प्रोटोकॉल म्हणतो) तयार केले आहेत. मनातील गुंता स्वतःचा स्वतः सोडवायला हे साचे आपल्याला उपयोगी पडतील अशी आशा आहे. मनाच्या विसंवादामध्ये एक मोठा भाग असतो भीतीचा. असं झालं तर? तसं होईल का? अश्या प्रकारचे विचार मनाला घेरतातं आणि भीतीचा अंमल वाढत जातो. भीती, भय याला आपण सहसा नकारात्मक दृष्टीने पाहतो पण खरं तर काही प्रमाणात भीती ही आवश्यकच आहे. वानराचा नर होण्याच्या उत्क्रांतीमध्ये मानव तग धरू शकला कारण वेगवेगळे आणि मोठे अधिक बलवान प्राणी, नैसर्गिक संकटं यांपासून असलेला धोका मानवाने ओळखला. त्या धोक्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने निरनिराळ्या शकला लढवल्या, योजना आखल्या आणि त्या अंमलात आणल्या. योग्य प्रमाणात असलेल्या भीतीमुळे माणूस सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतो, पण भीती जर प्रमाणाबाहेर वाढली तर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. भीतीने ग्रस्त लोकांमध्ये छातीत धडधडणं, घसा कोरडा पडणं, पोटात मळमळणं, उलट्या, जुलाब होणं, वारंवार टॉयलेटला जायची गरज आहे असं वाटणं, डोकं दुखणं, झोप उडणं, सतत अस्वस्थ वाटत राहणं यापैकी एक किंवा अधिक लक्षणं दिसून येतात. यावर उपाय कसा करायचा हे आपल्याला पाहायचं आहे. वैद्यकीय शिक्षणाचं पहिलं दीड वर्ष, आठवड्यातले बहुतेक दिवस आम्ही शवविच्छेदन करून शरीर आत कसं असतं, शरीराचे सारे व्यापार कसे चालतात ही शिकत असू. कारण उपचार करण्या आधी गोष्टी सामान्यतः कश्या चालतात हे समजून घेणं फार आवश्यक आहे. अगदी हेच मनोविकारांनाही लागू आहे. म्हणूनच या सदरांमध्ये आपण भय, नैराश्य, तणाव इत्यादी विकारांकडे पाहताना आधी ते समजून घेऊन मग उपचार कसा करायचा हे पाहणार आहोत. समस्येला आधी नीट समजून घेणं, त्याविषयीची माहिती मिळवणं ही उपचाराची पहिली पायरीच म्हणता येईल. अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीने ग्रासलेल्या असतात. भीतीचे मुख्य प्रकार समजून घेऊया. • फोबिया (विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती) • Generalised Anxiety Disorder (जी ए डी किंवा प्रत्येक गोष्टीची धास्ती) • हेल्थ anxiety (आरोग्याबद्दलची, आजारांची भीती) • सोशल anxiety (समूहामध्ये वावरण्याची भीती) • पॅनिक डिसऑर्डर (भीतीचा तीव्र झटका) सर्वपरिचित असणारा भीतीचा प्रकार म्हणजे फोबिया – एखाद्या विशिष्ट वस्तू/ प्राणी किंवा परिस्थितीशी निगडीत असलेलं भय. उदाहरणार्थ पाण्याची, उंचीची, कीटकांची, सापांची, बंदिस्त जागांची वाटणारी तीव्र भीती. सापांचा फोबिया असणारी व्यक्ती माळरानात, गवतात तर चालायला जात नाहीच, पण प्राणी संग्रहालयातील बंदिस्त पेट्यांमधील साप पाहणंही अश्या व्यक्तीला अशक्य असतं. भीतीचा दुसरा प्रकार म्हणजे जीएडी (GAD) किंवा प्रत्येक गोष्टीची – प्रत्येक गोष्ट विपरीत झाली तर अशी सतत वाटणारी धास्ती. या प्रकारात मोडणाऱ्या बहुतेक व्यक्ती या सदैव काहीना काही कारणाने चिंताग्रस्त असतात. आणि अशी काळजी करणं आवश्यकच आहे असं यातल्या बहुतेकांचं मत असतं. हा मनोविकारांचा एक प्रकार आहे यांची कल्पनाच नसल्यामुळे त्यावर उपाय योजना करणं लांबच राहतं. सध्याच्या व्हायरस मुळे पुढच्या काही वर्षांत ज्या एका प्रकारच्या भीतीचं प्रमाण वाढणार आहे तो प्रकार म्हणजे हेल्थ anxiety. या रोगाला पूर्वी हायपोकोंड्रिया म्हटलं जात असे. हेल्थ anxiety च्या व्यक्तींना स्वतःच्या आरोग्याविषयी खूपच चिंता वाटत असते. आपल्याला हा रोग तर नाही ना तो रोग तर नाही ना अश्या अवाजवी काळजीने त्यांचं मन सतत ग्रासलेलं असतं. सर्वत्र भरपूर दिसून येणारा आणि तरीही कमी परिचित असणारा भीतीचा प्रकार आहे सोशल anxiety किंवा समूहामध्ये वावरण्याची भीती. अनोळखी लोकांशी बोलणं अश्या व्यक्तीना नकोसं वाटतं, बरेचदा या व्यक्तीना ओळखीच्या अनेक लोकांशी एकत्र भेटण्याची, बोलण्याची, उठण्या-बसण्याची वेळ आली (उदाहरणार्थ पार्टी / मीटिंग / पिकनिक) की त्यांना त्याचं अतिशय दडपण येतं. मग ते सहसा असे कार्यक्रम टाळतात किंवा कोणाचीतरी सोबत घट्ट पकडून ठेवतात. लाजरा स्वभाव या लेबलखाली दडून गेल्यामुळे कित्येक व्यक्तींच्या या रोगाचं निदानच होत नाही. भीतीचा थोडा कमी परिचित असणारा प्रकार म्हणजे पॅनिक डिसऑर्डर. या व्यक्तींना भीतीचा तीव्र झटका हा अचानक कधीही येऊ शकतो. या झटक्यांच्या वेळी त्यांना वाटणारी भीती, जसं “मी आत्ताच्या आत्ता मरेन/ माझ्या शरीराचे तुकडे होतील / मला फिट येईल" इतरांना तर्कहीन, बिनबुडाची वाटते पण त्या व्यक्तींसाठी मात्र ती अतिशय तीव्र असते. भीती किंवा चिंता (Anxiety) या मनोविकाराचे हे काही प्रमुख प्रकार आहेत. एकाच व्यक्तीला एकाहून अधिक प्रकारची भीती असणं किंवा भीती आणि नैराश्य असणं हेसुद्धा बरेचदा दिसून येतं. पुढच्या भागांमध्ये पाहूया की या भीतीशी टप्प्याटप्प्याने मुकाबला कसा करायचा ... डॉ. माधुरी ठाकूर https://drmadhurithakur.blogspot.com/2020/08/1.html?m=1
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 37575
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

श्री सर्वज्ञ संक्षी कुठे असतं हे मन ? ते मला माहिती आहे. परंतु आपल्या सारख्या विद्वान माणसाला समजावून देण्यात मला वेळ घालवायचा नाही. एखादी गोष्ट आपल्याला दिसत नसली म्हणजे ती अस्तित्वात नाहीच असा जावई शोध लावून तुम्ही स्वतःचीच टिमकी वाजवता आहात. ऑक्सिजनचा शोध लागण्यापूर्वी तो अस्तित्वात नव्हताच का? किंवा ऑक्सिजन आपल्याला दिसत नाही म्हणून तो नसतोच असे म्हणत आहात. आपल्यालाच सर्व काही कळतं हा दंभ झाला असल्यामुळे असा होतंय. फंक्शनल एम आर आय नावाची काही गोष्ट असते ज्याने आपल्या मेंदूचा आणि मनाचा व्यापार कसा चालतो याचे गूढ आता उलगडायला लागले आहे. >फंक्शनल एम आर आय हा मी ज्या शास्त्राचा ( क्ष किरण शास्त्र) अभ्यास आणि व्यवसाय करतो आहे त्याचाच एक भाग आहे. यामुळे याबद्दल मला थोडी फार माहिती आहे. काही वर्षात मन म्हणजे काय? याचे स्पष्ट उत्तर मिळेलच. तोवर तुम्ही आपला पूर्व ग्रह कुरवाळत रहा. जाता जाता -- फंक्शनल एम आर आय आणि मन आणि मेंदू याबद्दल एक शोधनिबंध पाठवत आहे. Studying mind and brain with fMRI https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2555441/ पहा आपल्याला झेपतोय का?

In reply to by सुबोध खरे

Can fMRI Read your Mind ? https://www.imagilys.com/fmri-mind-reading/ A selective review of dharana and dhyana /fmri https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0975947616302406 जिज्ञासूंनी f mri गुगलून पाहावे. बाकी हा धाग्याचा विषय नव्हे म्हणून मी यावर अधिक टिप्पणी करत नाही.

In reply to by सुबोध खरे

किमान मुद्दा धरुन आहे; चला एवढी तरी प्रगती झाली ! १.
कुठे असतं हे मन ? ते मला माहिती आहे . परंतु आपल्या सारख्या विद्वान माणसाला समजावून देण्यात मला वेळ घालवायचा नाही.
तुम्हाला ते माहिती नाही ! मला समजावून सांगण्याचा प्रश्ण कुठे येतो ? तुम्ही नक्की जागा सांगा विषय संपला. पण जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिचा पत्ता तुम्ही काय सांगणार ? २.
एखादी गोष्ट आपल्याला दिसत नसली म्हणजे ती अस्तित्वात नाहीच असा जावई शोध लावून तुम्ही स्वतःचीच टिमकी वाजवता आहात.
तुम्ही विज्ञान शिकला आहात, एखादी गोष्ट सिद्धच होत नसेल तरीही ती आहे असं मानता का ? प्रथम रोगनिदान आणि नंतर उपचार अशी पद्धत आहे. तुम्ही रोग गृहित धरुन उपचार करता का ? शिवाय तुमचा हा युक्तीवाद तुमच्याच पहिल्या दाव्याला (ते मला माहिती आहे) धोबीपछाड मारतो. इतकी साधी गोष्ट लक्षात आली नाही का ? ३.
काही वर्षात मन म्हणजे काय? याचे स्पष्ट उत्तर मिळेलच
बघा सगळं ओमफस्स करुन ठेवलंत ! थोडक्यात, तुमच्याकडे उत्तर नाही. ४.
फंक्शनल एम आर आय आणि मन आणि मेंदू याबद्दल एक शोधनिबंध पाठवत आहे. पहा आपल्याला झेपतोय का?
इतके अंतर्बाह्य पोकळ प्रतिसाद असल्यावर तुमच्या विधानांचा काय पाड लागणार ? तस्मात, झेपण्याच्या गोष्टी सोडा. तुमच्या लिंक्स बोगस असतात त्या वाचायला मला वेळ नाही. त्यापेक्षा त्या निबंधाचं तुमचं आकलन लिहा. (अर्थात, ते सुद्धा लिहायची गरज नाही कारण तुमचा प्रतिसादच पुरेसा बोलका आहे)

In reply to by सुबोध खरे

तुमच्या लिंक्स बोगस असतात त्या वाचायला मला वेळ नाही. झेपत नाही असे सरळ प्रामाणिकपणे म्हणा कि कशाला मला सगळंच समजतं म्हणून आव आणत आहात

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, प्रश्नाच्या प्रशंसेबद्दल आभार. अभ्यासाबद्दल म्हणाल तर ते माझं नसून गुग्गुळाचार्यांचं कर्तृत्व आहे. असो. एकेक विचार सुटासुटा झाला तर मन अशी काही चीज अस्तित्वात नाही, असं तुमचं मत आहे. पण हा एकेक विचार सुट्टा करायचा तो कशाच्या पार्श्वभूमीवर? त्याचप्रमाणे तो सुट्टा न बघता सलग बघायचा झाला तरी पार्श्वभूमी हवीच ना? मग तिलाच मन का म्हणू नये? तुम्ही म्हणता तो दृक-श्राव्य चलतपट मेंदूच्या आधारे चालतो. तो दाखवणारा आणि पाहणारा एकंच आहे. तो म्हणजे जाणीवस्वरूपी आत्मा. पण तो चलतपट कशावर व्यक्त होतो? त्यासाठी मनाचा आधार लागणारच ना? चित्रपटाचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रक्षेपकाच्या भिंगामागे चित्रफीत फिरंत असते, तिच्यावर चित्रपट चित्रमुद्रित असतो. पण प्रक्षेपकाच्या भिंगाला डोळा लावून चित्रपट दिसंत नसतो. त्यासाठी पांढरा पडदा लागतो. हा पांढरा पडदा म्हणजे मन. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संकेतस्थळाचा दर्जा उंचावयचं मनावरच घेतलंय ! १. प्रथम तुमच्या आकलनातली एक चूक दुरुस्त करतो :
तो दाखवणारा आणि पाहणारा एकच आहे
असं नाही >माझा प्रतिसाद बघा : आपण त्याचे एकमेव प्रेक्षक आणि श्रोते असतो. २. हा चित्रपट कशावर चालतो हा तुमचा प्रष्ण नंतर घेऊ. प्रथम हे बघू की हा दृक-श्राव्य चलतपट प्रक्षेपित कोण करतं ? कारण असा प्रक्षेपण करणारा जो कुणी आहे त्यालाच तर मन समजलं गेलंय ! आणि माझं म्हणणंय की असा प्रक्षेपण करणारा कुणीही नाही. काय सोडवणूक आहे याची ? कारण प्रक्षेपक मूळ आहे, प्रक्षेपण दुय्यम आहे. प्रक्षेपक सोडवला की प्रक्षेपण सुटलं ! मौज अशी की लेखिका `टप्याटप्यानं प्रष्ण सोडवू' म्हणते ! ते अशक्य आहे. कारण भय मूळ आहे, एक कारण सोडवलं तर भय दुसरं कारण शोधेल. हा प्रष्ण सायकिअ‍ॅट्री बापाजन्मात सोडवू शकणार नाही कारण तो हा सगळा पोस्ट अ‍ॅनॅलिसिस आहे. प्रोजेक्शन झाल्यावर (म्हणजे चित्रपट चालू झाल्यावर) त्याला दिलेल्या रिस्पाँन्सचा तो अभ्यास आहे. त्यामुळे लेखिका सोयिस्करपणे चर्चेतून अंग काढून घेऊन नव्या पोस्ट टाकतेयं. आणि हा प्रक्षेपकच सगळ्या संत-महंतांनी, मानसशास्त्रज्ञांनी, कवि-लेखकांनी, तुम्ही-आम्ही (ज्याम) गृहित धरला आहे या अनुषंगानं आता एकदम अपूर्व उलगडा करतो ! प्रक्षेपण किंवा मेंदूत अविरत चाललेला हा दृक-श्राव्य चलतपट म्हणजे आपलंच रुपांतरण आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे बेसावधपणा ! सकाळच्या बेसावधपणाला तंद्रा म्हणतात आणि रात्रीच्या बेसावधपणाला निद्रा. रात्री हा चलतपट स्पष्ट दिसतो त्याला आपण स्वप्न म्हणतो; दिवसा उजेडामुळे तो अस्प्ष्ट दिसतो; त्याला आपण विचार म्हणतो; इतकाच काय तो फरक ! त्यामुळे प्रक्षेपण बंद करण्याचा एकमेव उपाय सजगता आहे (अवेअरनेस) . म्हणून सिद्धाला जागृत पुरुष म्हटलंय. ही जागृतीची प्रोसेस म्हणजे ध्यान ! ३. आता तुमचा प्रश्ण : तो चलतपट कशावर व्यक्त होतो? त्यासाठी मनाचा आधार लागणारच ना? तो चलतपट मेंदूत प्रक्षेपित होतो. मेंदूपलिकडे विचाराचं सामर्थ्य शून्य आहे. जसा वेदनेचा दायरा शरीर आहे तशी मनाची* अ‍ॅक्टीविटी फक्त मेंदूत आहे. __________________________________ * प्रतिसाद देतांना जरी मन हा शब्द वापरत असलो तरी त्याचा अर्थ विचारांचा प्रवाह किंवा एकूण मानसिक अ‍ॅक्टीविटी असाच आहे. मन अशी काही चीज या दुनियेत नाही. तरी सदस्यांनी (काहीही न जमल्यानं) उगीच शब्दच्छल करण्याचा प्रयत्न करु नये.

In reply to by संजय क्षीरसागर

मौज अशी की लेखिका `टप्याटप्यानं प्रष्ण सोडवू' म्हणते ! ते अशक्य आहे. कारण भय मूळ आहे, एक कारण सोडवलं तर भय दुसरं कारण शोधेल. हा प्रष्ण सायकिअ‍ॅट्री बापाजन्मात सोडवू शकणार नाही कारण तो हा सगळा पोस्ट अ‍ॅनॅलिसिस आहे. है शाबास

In reply to by सुबोध खरे

एकदा वाचून कळालेलं दिसत नाही. प्रतिसादाची घाई करु नका. पुन्हा दोनदा वाचा नक्की कळेल. उघड गोष्टी आहेत. एकदा कळलं की स्वतःलाच शाबासकी घ्याल !

गा पै साहेब काही लोकांचं लेखन हे नेपाळी भाषेतील वृत्तपत्र वाचल्यासारखं असतं. वाचता तर सगळं येतं पण समजत मात्र काहीही नाही. ))=((

In reply to by सुबोध खरे

तुम्हाला नेपाळी वाचता येतं ही नवी माहिती कळली ! फावल्या वेळात गुरख्याबरोबर ड्युटी केली का क्लास लावला होता ? पण वाचता येतं आणि समजत नसेल तर तिथेही घोळ झालेला दिसतोयं

In reply to by संजय क्षीरसागर

त्यामुळे तो अभ्यास घरच्या घरी सुद्धा केला असेल पण अर्थ समजत नसेल तर वाचायचं कशाला ?

पण वाचता येतं आणि समजत नसेल तर तिथेही घोळ झालेला दिसतोयं १२.४१ नेपाळी देवनागरी स्क्रीप्टमधे लिहितात१.०९ हि पश्चात बुद्धी कशी काय आली.? जाता जाता -- लष्करात असताना गुरखा सैनिकांबरोबर बराच वेळ घालवला आहे. आणि त्या शूर पण भोळ्या आणि सरळ मनाच्या माणसांबद्दल अत्यंत आदर आहे.

स्वतःच्या अस्तित्वाची भीती हे सर्व. भीती चे मूळ आहे हे संजय क्षीरसागर ह्यांचे मत योग्य च आहे. पण भीती चे खूप. वेगवेगळे प्रकार आहेत त्या वर चर्चा करून त्याचा अभ्यास करून त्या वर उपाय शोधणे गरजेचे पण आहे. अस्तित्वात नसलेल्या संकटाची भीती वाटणे हा मानसिक रोग आहे त्या भीती शी अस्तित्वाची भीती शी काही संबंध नाही

In reply to by Rajesh188

बर्‍याचदा काहितरी गमावण्याची भिती हि अस्तित्व संपण्याच्या भितीपेक्षा वरचढ ठरते. जीवंत असल्याचं समाधान आणि आनंदप्रापती/दु:खमुक्ती करता आवषयक वाटणार्‍या (आवश्यक असायलाच हवे असे नाहि..) रिसोर्सेसची हमी असल्याचं समाधान, यात अनेक जण रिसोर्सेसला प्राधान्य देतील. कोणि कितीही म्हटलं कि तुमचं अस्तित्व कुठल्याही बाह्य बाबींपासुन अबाधीत आहे, तरी ते दु:खमुक्त आणि/किंवा सुखासीन असण्याला जास्त महत्व दिलं जाणं, हे देखील भितेचं एक कारण आहे. हि लेखमाला बहुतेक या बाबींना स्पर्ष करेलच.

संजय क्षीरसागर, तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं मांडेन म्हणतो. १.
आपण त्याचे एकमेव प्रेक्षक आणि श्रोते असतो.
काही हरकत नाही. तसंही पाहता माझ्याकडून तो मूळ मुद्दा नव्हता. २.
प्रक्षेपक सोडवला की प्रक्षेपण सुटलं !
पण ग्राहक अस्तित्वात आहे. तो कशाच्या आधारे विचार ग्रहण करतोय हा प्रश्न उरतोच. ३.
मौज अशी की लेखिका `टप्याटप्यानं प्रष्ण सोडवू' म्हणते ! ते अशक्य आहे. कारण भय मूळ आहे, एक कारण सोडवलं तर भय दुसरं कारण शोधेल.
मी लेखिकेच्या या विधानाबद्दल काहीच भाष्य करू इच्छित नाही. सध्या तरी मी 'मन अस्तित्वात आहे' या युक्तिवादावर लक्ष केंद्रित करीत आहे. ४.
सकाळच्या बेसावधपणाला तंद्रा म्हणतात आणि रात्रीच्या बेसावधपणाला निद्रा.
मान्य. मात्र यातनं एक प्रश्न उद्भवतो. जागृतावस्थेतून निद्रावस्थेत ढकलणारी कोणती तरी एजन्सी अस्तित्वात असली पाहिजे. त्याचप्रमाणे निद्रावस्थेतून जागृतावस्थेत आणणारी एखादी एजन्सी अस्तित्वात असली पाहिजे. या दोन एजन्सी कदाचित एकंच असू शकतात. त्यांना मन म्हणायला काय हरकत आहे? निद्रा व तंद्रा ज्याच्या आधारे व्यक्त होतात, ते मन. ५.
त्यामुळे प्रक्षेपण बंद करण्याचा एकमेव उपाय सजगता आहे (अवेअरनेस) . म्हणून सिद्धाला जागृत पुरुष म्हटलंय. ही जागृतीची प्रोसेस म्हणजे ध्यान !
सिद्धावस्थेत मन शांत होऊन नाहीसं होतं, हे मान्य. माऊलींनी असंच काहीसं कुठेतरी म्हटलंय. ६.
तो चलतपट मेंदूत प्रक्षेपित होतो. मेंदूपलिकडे विचाराचं सामर्थ्य शून्य आहे. जसा वेदनेचा दायरा शरीर आहे तशी मनाची* अ‍ॅक्टीविटी फक्त मेंदूत आहे.
तसं पाहायला गेलं तर मेंदू एक चरबीचा लिबलिबीत गोळा आहे. विशिष्ट स्थिती प्राप्त झाल्याशिवाय तो विचार ग्रहण करू शकंत नाही. उदा. : मृत मेंदूत विचार उमटंत नसतात. ती जिवंत स्थिती म्हणजे मन. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१.
सध्या तरी मी 'मन अस्तित्वात आहे' या युक्तिवादावर लक्ष केंद्रित करीत आहे.
शाब्बास ! तोच एकमेव मुद्दा आहे. २.
पण ग्राहक अस्तित्वात आहे. तो कशाच्या आधारे विचार ग्रहण करतोय हा प्रश्न उरतोच.
जाणिवेच्या आधारे वैचारिक आकलन होतं. ३.
निद्रा व तंद्रा ज्याच्या आधारे व्यक्त होतात, ते मन.
आपल्या बेसावधपणाला आपण मन म्हणू शकत नाही कारण आपण सावध झालो की विचार उमटू शकत नाहीत. ४.
सिद्धावस्थेत मन शांत होऊन नाहीसं होतं, हे मान्य
मन नाहीचे. अविरत चाललेला विचार प्रवाह शून्य होतो. शांतता प्रस्थापित होते. आपण आपल्यात स्थित होतो. ५.
मृत मेंदूत विचार उमटंत नसतात. ती जिवंत स्थिती म्हणजे मन.
मृत मेंदू म्हणजे मनाचं नाहिसं होणं नाही. मेंदू फुल्ली फंक्शनल असतांना (आणि आपण जीवंत असतांना) विचार प्रवाह थांबणं ही जागृत अवस्था आहे. त्याचा मनाशी काहीएक संबंध नाही.

जागृतावस्थेतून निद्रावस्थेत ढकलणारी कोणती तरी एजन्सी अस्तित्वात असली पाहिजे. त्याला ARAS (ascending reticular activating system) म्हणतात. https://en.wikipedia.org/wiki/Reticular_formation#:~:text=The%20ascendi….

तर कधी रागावर ताबा ठेवायचं शेकडो वेळा ठरवूनही आपल्याला कळायच्या आत जळजळीत काटेरी शब्द आपल्या तोंडून निघतात. नाती तोडण्याची आपली इच्छा नसते खरं तर, पण नात्यांमधले पूल अश्या शब्दांनी पार कोलमडतात.
अगदी सहमत आहे. नंतर मग बुंदसे गयी वो हौद से नही आती अस होत. वाचताना मला पूल बांधा रे मैत्रीचे हा डॉ उल्हास लुकतुके यांचा लेख आठवला. मानवी नातेसंबंध हे फार अबस्ट्रॅक्ट असतात.

मन असतं की नसतं यावर वेगळा धागा काढून, तिथे जर या संबंधातले सगळे प्रतिसाद हलवले तर किती बरे होईल?

संजय क्षीरसागर, तुमचा इथला संदेश वाचला. माझं अखेरचं भाष्य करेन म्हणतो. १.
जाणिवेच्या आधारे वैचारिक आकलन होतं.
जाणीव ही एक सरसकट संज्ञा आहे. भुकेची जाणीव आणि संजय क्षीरसागर यांना उद्देशून भाष्य करायची जाणीव या दोहोंत गुणात्मक फरक आहे. हा भेद जाणण्याची ( म्हणजे फरक प्रोसेस करायची ) यंत्रणा म्हणजे मन. २.
आपल्या बेसावधपणाला आपण मन म्हणू शकत नाही कारण आपण सावध झालो की विचार उमटू शकत नाहीत.
तुम्ही सावध आहात ते तुमची तशी इच्छा आहे म्हणून. निदान सुरुवातीला तरी माणूस कटाक्षाने सावध असतो. अशा वेळेस विचार उमटला तर तो पकडून नष्ट करावा लागतो. हा विचार पकडतं ते मन. कालांतराने सावधपणा तुमच्या अंगवळणी पडतो. हे अंगचं वळण म्हणजे नेमकं काय? ते अव्यक्त मनाचंच वळण आहे. असं माझं मत आहे. असो. एकंदरीत 'मन अस्तित्वात नसतं' हे विधान सत्य धरल्यास जाणीवेचा अविष्कार दर्शवण्यासाठी मूळ जाणीवेस इतर यंत्रणांची ( = एजन्सींची ) मदत घ्यावी लागते. अशा यंत्रणांच्या समुच्चयास मन म्हणायला हरकत नसावी. अर्थात हे झालं माझं तर्काधारित ( ≠ अनुभवाधारित ) मत. तुम्हाला मन हा शब्द आवडंत नसल्यास तुम्ही त्याला तार्किक अनिवार्यता ( = logical compulsion ) म्हणू शकता. पारंपरिक शास्त्रात मनाचे पाच भाग मानले आहेत : मेधा, स्मृती, बुद्धी, प्रज्ञा आणि प्रतिभा. यावरून माझा तर्क पारंपरिक भूमिकेशी सुसंगत आहे. मात्र प्रत्येकाचं मत परंपरेशी सुसंगत असायलाच हवं, अशी सक्ती नाही. कारण की अनुभवाधारित मत ( जे तुमचं आहे) स्वत:ची स्वतंत्र वैधता बाळगू शकतं. वर शाम भागवतांनी म्हटलंय की, ही चर्चा दुसरीकडे नेता येईल का. त्यांची विनंती योग्य वाटल्याने मी इथे थांबतो. तुमच्याशी चर्चा करून बरेच मुद्दे स्पष्ट झाले. त्याबद्दल आभार! :-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

त्याबद्दल आभार!
धन्यवाद ! पण मूळ मुद्दा तसाच आहे : मन अशी काहीही चीज या दुनियेत नाही ! १. माझं मन या शब्दाला ऑब्जेक्शन नाही कारण प्रत्येक शब्द हा केवळ निर्देश आहे. आणि मुद्दा हा आहे की मन या शब्दानं निर्देश केली जाणारी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. विचार प्रवाह आहे आणि त्याला आपण (माझ्या पूर्वीच्या प्रतिसादाप्रमाणे) मन म्हणू शकतो; पण एकेक विचार सुटा झाला तर तिथे काहीही उरत नाही. तुम्ही काही तरी करुन कुठे तरी मन हा शब्द फिट करण्याचा प्रयत्न करतायं त्यामुळे तुम्हाला नक्की उलगडा होत नाही. २.
जाणीव ही एक सरसकट संज्ञा आहे. भुकेची जाणीव आणि संजय क्षीरसागर यांना उद्देशून भाष्य करायची जाणीव या दोहोंत गुणात्मक फरक आहे. हा भेद जाणण्याची ( म्हणजे फरक प्रोसेस करायची ) यंत्रणा म्हणजे मन.
जाणीव एक आहे. जाणीवेनं जाणल्या जाणार्‍या गोष्टी अनेक आहेत. विचार प्रवाह ज्यानं जाणला जातो तिला जाणीव म्हणतात. आपल्याला जाणीव होते आणि मग काय करायचं ते आपण ठरवतो. भूकेची आणि प्रतिसाद देण्याची जाणीव झाल्यावर आपण आग्रक्रम ठरवतो. ३.
तुम्ही सावध आहात ते तुमची तशी इच्छा आहे म्हणून. निदान सुरुवातीला तरी माणूस कटाक्षाने सावध असतो. अशा वेळेस विचार उमटला तर तो पकडून नष्ट करावा लागतो. हा विचार पकडतं ते मन.कालांतराने सावधपणा तुमच्या अंगवळणी पडतो. हे अंगचं वळण म्हणजे नेमकं काय? ते अव्यक्त मनाचंच वळण आहे. असं माझं मत आहे.
जागरुकता हा आपला स्वभाव आहे, तो कुणाच्या इच्छे किंवा अनिच्छेवर अवलंबून नाही. आपण नाही असं आयुष्यात कुणीही आणि कधीही म्हणू शकत नाही. झोपेत सुद्धा स्वप्न पडतंय हे आपल्याला कळतं आणि गाढ झोप लागली होती हे (झोपेत जागरुकता हरवली ) असली तरी उठल्यावर आपल्यालाच कळतं. जागरुकतेची ही दिपशिखा आपल्याला तेवत ठेवावी लागते कारण विचारप्रवाह तीचं तंद्रा आणि निद्रेत रुपांतर घडवण्याचं काम करतो. या विचारप्रवाहाला मन म्हणण्याचा प्रघात पडला आहे. ४.
जाणीवेचा अविष्कार दर्शवण्यासाठी मूळ जाणीवेस इतर यंत्रणांची ( = एजन्सींची ) मदत घ्यावी लागते. अशा यंत्रणांच्या समुच्चयास मन म्हणायला हरकत नसावी
जाणीवेच्या आविष्कारासाठी ज्या वेगवेगळ्या फॅकल्टीजची मदत होते त्यात स्मृतीचा भाग अनिवार्य आहे पण स्मृती हा बाइट-बाय-बाइट मेंदूत स्टोअर केलेला डेटा आहे. त्याला आपण मन म्हणू शकत नाही. गायक गाणं सादर करतो त्यावेळी जाणीव , गायन कौशल्य आणि स्मृती यांचा एकसमयाव्यवच्छेद होतो. विचारप्रवाह शून्य झाला तरंच उत्तम गाणं प्रकट होतं. जगातल्या कोणाही गायकाला हे विचारुन खात्री करुन घ्या. ५.
पारंपरिक शास्त्रात मनाचे पाच भाग मानले आहेत : मेधा, स्मृती, बुद्धी, प्रज्ञा आणि प्रतिभा. यावरून माझा तर्क पारंपरिक भूमिकेशी सुसंगत आहे
स्मृती हे मेंदूत स्टोअर झालेलं रेकॉर्ड आहे; त्याचा रोजच्या जगण्यासाठी उपयोग आहे. मेधा, बुद्धी आणि प्रज्ञा ही तुमची स्वतःला जाणू शकण्याची संभावना आहे. प्रतिभा हा तुमच्या कौशल्याचा किंवा स्वतःला जाणल्यावर अभिव्यक्त होण्याचा मुक्तछंद आहे. यातल्या एकाही गोष्टीचा मनाशी सुतराम संबंध नाही कारण मन अशी काहीही चीजच नाही.

संजय क्षीरसागर,
तुम्ही काही तरी करुन कुठे तरी मन हा शब्द फिट करण्याचा प्रयत्न करतायं त्यामुळे तुम्हाला नक्की उलगडा होत नाही.
नेमक्या जागी मन हा शब्द फिट करणे हेच माझं उद्दिष्ट आहे. सुरुवातीस कुठेतरी फिट करावा लागेल, पण कालांतराने नेमकं स्थान दिसून येईल असा आत्मविश्वास आहे. जो काही मर्यादित अथवा अमर्यादित उलगडा होईल तेव्हढा मला पुरेसा आहे. कारण की तो मी पारंपरिक मताशी जुळवू शकतो. पण अर्थात तुमचा मार्ग वेगळा असू शकतो. इतकं निरीक्षण नोंदवून थांबतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हेच माझं उद्दिष्ट आहे. पण कालांतराने नेमकं स्थान दिसून येईल असा आत्मविश्वास आहे. जो काही मर्यादित अथवा अमर्यादित उलगडा होईल तेव्हढा मला पुरेसा आहे. कारण की तो मी पारंपरिक मताशी जुळवू शकतो.
काय साधणार त्यातून ? कारण कशाला मन म्हणतात हा निरर्थक सवाल आहे. भय काय आहे आणि त्यातून सुटका कशी हा मुद्दा आहे. १. भय हा प्रक्षेपणाला दिलेला रिस्पाँन्स आहे. आणि माझं म्हणणंय की प्रक्षेपण हा आपल्याच तंद्री आणि निद्रेचा परिणाम आहे. आपण जागृत झालो की प्रक्षेपण संपलं मग भयाचा प्रश्णच नाही ! तेंव्हा ही जागृकता कशी साधेल ते पाहा. २.
अर्थात तुमचा मार्ग वेगळा असू शकतो. इतकं निरीक्षण नोंदवून थांबतो.
माझ्या मार्गाचा सवालच नाही. माझा अनुभव आणि वस्तुस्थिती तुमच्या समोर ठेवली आहे. लेखिकेला वाटतंय रिस्पाँन्स बदलून भय संपेल, ते असंभव आहे. या लेखमालेतल्या दुसर्‍या पोस्टवरचे त्यांचे प्रतिसाद बघून तुम्हाला एकूण परिस्थिती लक्षात आलीच असेल. थोडक्यात, माझा मुद्दा खुद्द लेखिकेनंच सिद्ध केलायं आणि तो ही एक स्टेप पुढे जाऊन : देव किंवा गुरु शरणांगती हा पारंपारिक उपाय भयमुक्तीला उपयोगी नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे :
भय काय आहे आणि त्यातून सुटका कशी हा मुद्दा आहे.
मात्र मला सध्यातरी कसलंही भय वाटंत नाही. त्यामुळे माझा पास. आ.न., -गा.पै.

आत्मा ,मन,चेतना ह्या विषयी शास्त्रीय पद्धतीने शोध घेवून सुद्धा ठाम असे काहीच आज पर्यंत संशोधक च्या हाताला लागले नाही. Work in progress. ही स्थिती आहे. उगाच च काही तरी युक्ती वाद करून सत्य गवस्ल्याचा आनंद घेवू नका.