मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारांच्या जगात... १

अजिंक्य विश्वास · · जनातलं, मनातलं
सूर्यावर स्वारी? - भा रा भागवत. . माझा प्रिय मित्र सागर ह्याने माझ्या डोक्यात काही वर्षांपूर्वी भागवतांच्या संक्षेपाचे मूळ रूप शोधायचे खूळ डोक्यात घातले, त्याबद्दल त्याचे मानावे तेवढे आभार आणि उपकार कमीच आहेत! त्याने हे खूळ दिले नसते आणि मीदेखील वाहवत जाऊन भारांचा संग्रह जमा करू शकलो नसतो. ज्यूल्स व्हर्नच्या ' ऑफ ऑन अ कॉमेट' (Off on a comet) या कादंबरीचा हा पहिला भाग. कादंबरीची सुरुवात होती ते फ्रान्सचे कॅप्टन हेक्तर सर्वादाक आणि रशियाचे काऊंट तिमाशेफ यांच्या खुमासदार संवादाने! एका 'नाजूक' प्रकरणापाई हे दोन सद्गृहस्थ एका द्वंद्वाच्या तयारीची वेळ ठरवतात आणि आपापल्या मार्गाने जातात. हेक्तरचा इमानी नोकर बेन झूफ हा त्यांच्या बरोबर असताना एक मोठा धमाका होतो आणि अचानक द्वंद्व आणि 'नाजूक' प्रकरण सगळे एका बाजूला राहते आणि एक आगळावेगळा प्रवास चालू होतो. वातावरणात एकाएकी झालेला बदल, बदलते गुरुत्वाकर्षण, २४ तासांच्या दिवसारात्री ऐवजी ६ तास दिवस -६ तास रात्र, झपाट्याने जवळ येत असलेला सूर्य, एकंदर पृथ्वीची बदललेली रचना आणि पृष्ठभाग ह्या लोकांना आश्चर्यात टाकतात. ह्या बदलाच्या शोधात कॅप्टन साहेब निघतात आणि त्यांच्या सोबत येऊन मिळतात ते दर्यावर्दी असलेले काऊंट तिमाशेफ. बोटीचा कप्तान प्रकोपिअस हा ह्या दुकलीचा तिसरा कोन बनतो आणि हे काऊंटसाहेबांच्या बोटीत जमीन आणि काही ओळखीचे प्रदेश दिसतात का ह्या शोधात निघतात. शोधात त्यांना बऱ्याच अचंब्यात टाकणाऱ्या गोष्टी कळतात. जसे त्यांच्या भूभागाने मागे टाकलेला शुक्र, कधीही न ढळणाऱ्या ध्रुवताऱ्याने सोडलेले आपले अढळपद, त्या जागेवर विराजमान झालेला एक नवाच ध्रुवतारा! सारखे बदलणारे तापमान आणि ह्यात भरीला भर म्हणूनच की काय की तर पाण्यावर तरंगत मिळणाऱ्या बंद गोष्टीतील काही कागदावर लिहिलेले 'अनाकलनीय मजकूर'! 'गालिया??? फेब्रुवारी १५. सूर्यापासूनचे अंतर ५९,०००,००० लीग. जानेवारीपासून फेब्रुवारीपर्यंत अंतर तोडले; ८२,०००,००० लीग. ठीक चालले आहे! छान! उत्तम !!!' ह्या मजकुराने ते हैराण होतात. हे नक्की कसले अंतर आहे? आणि को एवढ्या वेगाने ते पार पाडत आहेत? ह्या सर्वांची उत्तरे शोधता शोधता त्यांना अजून मंडळी सामील होतात . काही स्पॅनिश लोक, एक डच ज्यू, आणि एक लहानगी निरागस इटालियन निना आणि तिचे लहान कोकरू मार्झी! ह्या प्रवासात खूप गंमती-जमती आहेत. पूर्ण जग एकीकडे आणि आपले मॉन्तमार्त्र एका ठिकाणी समजणारा बेन झूफ...भूगोलाचे उत्तम ज्ञान बागळणारा प्रकोपिअस, आणि त्याच्या उलट असणारे कॅप्टन साहेब... एकदम चिंगू असणारा डच ज्यू इसाक आणि त्याचे स्पॅनिश कामगार... आणि पाहुणचार आणि वेडाचार करणारे इंग्लिशमन तर धमालच! हा पूर्ण प्रवास एका रोमांचक वळणापाशी येऊन थांबतो. पुढे काय होणार ह्याची उत्सुकता मनाला लागून राहते आणि पुस्तक संपते ते पुढच्या प्रवासाच्या सुरुवातीकडे बोट दाखवून- 'मुक्काम शेंडेनक्षत्र'! . मुक्काम शेंडेनक्षत्र ह्या पुस्तकांची खासियत म्हणजे त्यांची आतील चित्रे. त्या चित्रांबद्दल बोलताना त्यांनी एक खास खुलासा केला आहे. पूर्वी जेव्हा प्रिंटींगचे तंत्रज्ञान प्रगत नव्हते, तेव्हा ब्लॉक किंवा मुद्रा ना बनवता लाकूड कोरून त्यावरून ती छापून घ्यावी लागत . (आपल्याकडचे शिळा प्रेसचे टेक्निक काहीसे असेच आहे). तर ही जुन्या आवृत्तीमधली चित्रे महद्प्रयासाने मिळवून त्याबरहुकूम ब्लॉक बनवायचा निष्फळ प्रयत्न करून नंतर चित्रकार परब यांच्याकडून जशाच्या तशी चित्रे बनवली . (नंतर आलेल्या इंग्रजी प्रतींमध्ये चित्रे नव्हती). ज्याला आपण इलुस्ट्रॅटेड कॉपी म्हणतो हा प्रकार त्यावेळेस ते वापरत होते , जेणेकरून वाचकांना काय चालले याची दृश्य कल्पना देखील यावी. . . ह्याचा पुढचा भाग वाचावा की चुकून हातात पडलेले 'उडती छबकडी' वाचावी, हा गोंधळ सध्या डोक्यात चालू आहे. छबकडी जशीच्या तशी नीट अवस्थेत लवकर परत करण्याच्या वॉर्निंगमुळे काहीच कळत नाही. उडती छबकडी तुम्हीच सांगा आणि कुठल्या पुस्तकाचा परिचय तुम्हाला वाचायला आवडेल हे देखील तुम्हीच सांगा. ही जबाबदारी तुमच्यावर सोडून मी सध्या तुमची रजा घेतो. लवकर आणि नक्की कळवा. धन्यवाद! ता.क.- मी भागवतांची खालील पुस्तके खूप आशेने आणि मेहनतीने शोधत आहे. मिळाल्यास कृपया मला देऊ शकत असाल तर नक्की संपर्क साधा. पुस्तकाचा योग्य तो मोबदला अथवा बदल्यात कुठले पुस्तक हवे असल्यास नक्की कळवा, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. (संपर्क- +९१ ८९५६८ ६८३३२) १. मायापूरचे रंगेल राक्षस- लाखाणी बुक डेपो २. मुक्काम शेंडेनक्षत्र- लाखाणी बुक डेपो ३. काळा बाण-लाखाणी बुक डेपो ४. चंद्रावर स्वारी-लाखाणी बुक डेपो ५. झपाटलेला प्रवासी-लाखाणी बुक डेपो ६. किल्ल्यातील कारस्थान-लाखाणी बुक डेपो ७. उडती छबकडी- भारतीय ग्रंथ भवन ८. माझा विक्रम ९. वैतागवनातील वाफारे १०. चिन्याचा चिन्याचा जमालगोटा ११. भटकबहाद्दर १२. हिंमतवान जासूद- (लाखाणी बुक डेपो-बहुतेक) १३. सगळं सगळं ठीक होतं- मॅजेस्टिक बुक डेपो १४. अक्रुघान ते पिक्रुघान १५. तोरणा कुणी जिंकला १६. खरा खजिना १७. काश्याची काशियात्रा १८. लाख मांजरी १९. अलकनंदा आणि जादूगार जिम २०. समुद्र सैतान- लाखाणी बुक डेपो २१. सफरचंद-लाखाणी बुक डेपो २२. शाळेतली भुताटकी- मॅजेस्टिक बुक डेपो २३. वनस्पतींचा जादूगार- मॅजेस्टिक बुक डेपो २४. पबुताईच्या गोष्टी- ढवळे प्रकाशन (केशव भिकाजी ढवळे) २५. पबुताईची फ कशी झाली- ढवळे प्रकाशन (केशव भिकाजी ढवळे) २६.निळा मासा- नाग विदर्भ प्रकाशन २७. एक चमत्कारिक रात्र- नाग विदर्भ प्रकाशन २८. अंतराळात अग्निबाण- मॅजेस्टिक बुक डेपो

वाचन 13998 प्रतिक्रिया 0