बागेतले आवाज

जेडी जनातलं, मनातलं
रोज सकाळी बागेत फिरायला जायचे म्हणून पाचचा कर्कश गजर लावते पण गजर ऐकून परत बंद करून एखादी डुलकी काढावी वाटतेच मग सकाळी सकाळी जाता येत नाहीच . मग सव्वा सातला बागेत पाऊल पडते . गेट समोरच एक कारंज्या आहे . त्याचा सरसर आवाज येत असतो . पण काही केल्या हा आवाज मला शब्दात पकडता येतच नाही म्हणून "सरसर" हा शब्द शोधला मी . तिथून पुढे गेले कि बऱ्याचशे लोक गोलाकार उभे असतात . आणि त्यांचा हे हे हु हु हो हो चाललेले असते . त्यांची हि ह ची बाराखडी किती किती वळणे घेते . तिथे उभे असणारे हसण्याचे नाटक करत असतात पण बाहेर चालणाऱ्याना त्यांच्या कडून पाहून खूप हसू येते त्यांचे ते कृत्रिम हसे पाहून बाकीचे बाहेरचे खूप हसत असतात . त्यांच्या हसण्याचा आवाज येत राहतो . परवा एक छोटी आपल्या आजोबांबरोबर आलेली होती . आजोबा तिला थोड्या पुढे असणाऱ्या मुलांच्या खेळाच्या जागेकडे नेवु पाहत होती तर ती हट्टुण पुढे पाय उचलत नव्हती . आजोबा म्हणत होते , "झोपाळ्यावर नाही बसायचे तुला बाळ ?" ती," मला हसायला जायचे आहे". मज्जाच वाटली तिचे हे उत्तर ऐकून . आजोबांचे वय लहान होवू पाहत होते आणि तिला मोठे होण्याची घाई लागली होती इथून पुढे खऱ्या अर्थाने चालणाऱ्याच्या पायाचे "झपझप " आवाज ऐकू येवू लागतो कारण हा रस्ता उताराचा आहे . . शूज घालून चालणाऱ्या पेक्षा धावणाऱ्या माणसांच्या शूज चा खूप आवाज येत असतो . आता बाग वळण घेते . त्या कोपऱ्यावर बच्चे कंपनीची जागा आहे . तिथे सी सा , घसरगुंडी , झोपाळे आणि बरीच खेळणी आहेत . मग झोके फिरतानाचा "करकर "आवाज येत असतो आणि त्या बरोबर कोणी मजेने हसत असतो तर कोणी घाबरून "स्सस " असा आवाज काढत असतो . कोणी आनंदाने ओरडत असतो . कोणी छोटी मुलं जबरदस्तीने झुल्यावर बसवली कि हे "भोकाड " पसरून, शिरा ताणून रडत असतात . सी सा वर मुलं खेळत असली कि जोरात एक बाजू टायर वर आपटून "फट फट " असा आवाज येत असतो . घसरगुंड्या -त्यावर पण एक "सुस्स्स " असा आवाज येतो अ. आणि त्या नळयासारख्या घसरगुंडीवरून कोणी आले की त्या नळ्या वाजतात त्याचाही एक आवाज येतो . तो हि आवाज मला शब्दात पकडता आला नाही . पण तो गडगड आवाज म्हणता येयील . तिथून पुढे बागेच्या रस्त्याला चढ लागतो , आणि बागेत हिरवळीवर टाळ्या वाजवत बसलेले बरेच असतात . कोणी प्राणायाम करत असतो . त्यांचा नाकाने जोरजोरात श्वास सोडणे चालू असते . फूस फूस असा आवाज त्याचा येत असतो . तिथून पुढे काही जणांनी ओमकारचा नाद लावलेला असतो . रस्त्यावर चालणारे आता चढाला चालत असतात . मग दमून ते सॉय सॉय आवाज काढत असतात . मधून त्यांचा चपलांचा घासाल्याचा आवाज येत असतो . काहींचा वेग मंदावतो मग संन्त आवाज येत राहतो . तिथून पुढे एक ओहळ आहे . तिथे एक बाकडे आहे . तिथे त्यावर एखादे जोडपे बसलेले असते . इतक्या हळू आवाजात ते कुजबुजत असतात आणि आपल्याच धुंदीत मग्न असतात . घरात काही बोलायला मिळत नसेल म्हणून इथे येवून त्यांची लाडिक गुफ्तगू चालत असेल . पुढे पुढे एक धबधबा येतो . त्याचा धबधब आवाज येत असतो . त्यात बरेच कावळे भिजून पंख फडफडवत असतात , त्यांच्या पंखाचा फडफडण्याचा आवाज येत असतो . मधेच काव काव करत असतात . धबधब्याशेजारी बच्चे कंपनी खूप असतात . त्यांचा त्यात उतरण्याचा प्रयत्न असतो . मग मजेत भिजत खळाळणारे पाणी अडवतात आणि फुर्र करून सोडून देतात . तेच पाणी पुढे छोट्या तलावात साठवलेय , तिथेही ही बच्चे कंपनी पण थोडी मोठी (१२ -१३ वर्षाची ) छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यात हे पाणी भरून पुन्हा खाली सोडतात . त्याचा टप टप आवाज येत राहतो आणि पाण्यावर तरंग उमटतात . मध्येच बाहेरून जाणाऱ्या एखाद्या बसचा आवाज येतो , एखद्या स्कूटरचा . धबधब्याच्या थोडे पुढे म्हाताऱ्या बायकांचा एक अड्डा बसलेला असतो ,अगदी कासटा घातलेल्या ह्या आज्ज्या यायाम , सुना , नातवंडे , पोरं , दुखणी भानी ,डाकदर ह्यावर मनसोक्त गप्पा मारत असतात . जवळच खेळणाऱ्या नातवंडावर लक्ष ठेवून असतात . तिथेच जवळ काही दोरीवर उड्या मारणारे असतात . त्याचाही एक वेगळाच आवाज येत असतो . काही सुगावत्या सूर्याकडे पाहून मंत्र पुटपुटत असतात . मधेच चिमणी चिवचिवत असते . अगदी छोटी चिमणीसारखी दिसणारी चीरचीरत असते . मधुनच कोकीळ कुहूकुहू करत असते . मधेच बसायला असणाऱ्या छपराखाली काही हास्य क्लब वाले हाहू हेहे करत उड्या मारत असतात . अजून खूप सारे पक्षांचे आवाज येतात पण ते मला शब्दात बसवताच येत नाहीत . आता बागेचा राउंड संपतो . बाहेर आल्यावर नारळ वाला खापखाप नारळ फोडून पाणी देत असतो , त्यांचे रेट सांगत असतो. मध्येच एखाद्या लहान मुलाने नारळ मागितलेला असतो. आई बाबा नको म्हणत असतात . मग त्याचे भोकाड पसरलेले असते . पुढे कसले कसले रस विकणारा असतो. तो बाटल्यातून रस ग्लासात ओतत असतो . तो ओतन्याचाही एक आवाज असतोच.
वर्गीकरण

7 टिप्पण्या 3,503 दृश्ये

Comments

Ranapratap नवीन

पु. ल. च्या आवाज आवाज या लेखाची आठवण जाली