Skip to main content

कथा आणि व्यथा बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....

लेखक परशु सोंडगे यांनी शुक्रवार, 17/03/2017 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....!! चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची . "सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा. थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? " धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ." रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला. गावातल्या पुढा-यांनी फोन केला . आरं बापा कडं पहा जरा .तू तू मी मी नका करू . सारं विसरून जा" पण छया...छया...!! काही फरक पडला नाही .म्हतारं बेशुध्द झालं . शेवटी दोघ आले . थोरला: "दादा मी आलो .उठ बर.मी केळ आणलीत चिक्कू आणलेत .खा बर थोडं " धाकटा: "दादा बघ बदाम आणलेत .बिस्किट आणलीत बघ कपडे आणलीत" थोरला: "पाणी चांगल शुध्द प्यायला पाहिजे.बघ दादा फिल्टर आणलं ." धाकटा: ."लय घाण दारात .आजार होणारच.मी पैस देतो. शौचालयच बांधून देतो. " म्हतारी सारं ऐकत व्हती .ती जरा सटकली म्हणाली , "आरं शाहण्यावं, म्हता-याला दवाखान्यात न्यायचं सोडून हे काय लावलं ?फिल्टारच काय आणताय? संडास काय बांधता ?सारी नाटकचं का ? दवाखान्यात न्या नाहीतर म्हया राजाच्या मातीला सुद्दीक येऊ नका ." कथेतल्या पोरांसारखंच सरकार निष्ठूर झालं आहे. शेतक-यांच्या रोज आत्महत्या होत आहेत आणि हे धोरण आखताहेत शेतक-याची कर्ज माफी ,कर्ज मुक्तीची मागणी असतानी मुख्यमंञ्याला कशा सुंदर कल्पना सुचतात ? कसे भयकर उपाय सुचतात ? या पेक्षा निष्ठूर कोणं असू शकेल बरं ? काय शेतक-याची व्यथा आहे आणि काय कथा झाली आहे. . . . . . . . . . परशुराम सोंडगे, पाटोदा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 45265
प्रतिक्रिया 244

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

>> इतक्या वाईट परिस्थितीत सुद्धा त्यांनी आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. हे थोडे धाडसी विधान आहे म्हणजे त्यातले कदाचित अधोरेखित शब्दच खरे असू शकतील. आत्महत्या घडल्याच नसतील असे नाही. पण माझ्याजवळ काही माहिती नाही.

In reply to by नितिन थत्ते

शेतकरी आत्महत्या करण्याचे अनेक कारणे आहेत. पण महत्वाचं कारण म्हणजे कर्ज फेडू शकत याची अपरिहारता, समाजात लोप पावत चाललेली पत आणि त्याच्यातून आलेलं नैराश्य. वरती अप्पा नी भिकाऱ्यांची उपमा दिलीच आहे शेतकऱ्यांना. तसं ही कर्ज फेडले नाही म्हणून बँक काही त्याचे वाकडी करू शकत नाही याची पूर्ण खात्री असताना सुद्धा शेतकरी आत्महत्या करण्याचा शेवटचे टोक गाठतो. जे निगरगट्ट आहेत ते रुपया ही नाही भरत कर्जाचे. अशांची संख्या बोटावर मोजण्या इतकी असावी. अगदी आताचे लेटेस्ट उदाहरण माझ्या घर जवळील शेजाऱ्याचे आहे. बरेच कथित तज्ज्ञ शेतीविषयक सल्ले देतात त्यानुसार त्या शेजाऱ्याने शेती बरोबर स्वतः टोमॅटो विक्रीची कंमिशन एजन्ट गिरी चालू केली. माझ्या शकत वाडीतील इतरांनी सुद्धा त्याला पाठिंबा देत टोमॅटो विक्रीसाठी दिले. सुरवातीच्या काही दिवस व्यवस्थित चालू होते. पण हंगामाच्या शेवटी एका कन्नडी व्यापाऱ्याने त्याला १.५ लाखाला फसवले. त्याची पत चांगली होती त्याने आम्हाला विनंती केली पुढच्या हंगामात पैसे देण्याचे कबूल केले. काही लोकांनी मान्य केले काहींची कुरबुर चालू झाली. लोकांचे पैसे द्याचे हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. मागच्या ३ आठवड्यापूर्वी त्याने सोसायटीचे कर्ज काढून ४० हजाराची एक गाई घेतली जेणे करून त्याचा घर प्रपंच चालेल आणि उरलेले पैश्यात छोट्या देणेकऱ्यांची कर्जे भागवता येतील. नशिबाने त्याला २०-२२ लिटर दूध देणारी चांगली गाई मिळाली. १० दिवसच झाले होते. गाईने अचानक खाणे पिणे बंद केले आणि तिने २ दिवसातच प्राण सोडला. आता तो म्हणतोय मी आत्महत्याच करतो. मी तर म्हंटले माझे पैसे नाही दिले तरी चालतील पण तू अशी टोकाची भूमिका घेऊ नकोस. इतरांनी पण त्याला पाठिंबा दिला. पण त्याची मनाची घालमेल कोण कंट्रोल करणार.

In reply to by नितिन थत्ते

अगदी भरपूर आहेत उदाहरणे. बिल्डर्स, हॉटेलवाल्यांपासून पार रोजंदारी कामगारापर्यंत, अगदी माझ्या प्रिंटिंंग प्रेस लाईनमध्ये काम जमत नाही, पैशाचे गणित जुळले नाही, कर्जबाजारीपणा, संसाराची जबाबदारी पेलेना अशा विविध कारणांनी आत्महत्या केलेली उदाहरणे आहेत.

मुळात अन्नासाठी लागणारा माल इतर उत्पादित वस्तूंप्रमाणे नाही . मूलभूत फरक असा आहे की त्याची टिकून रहाण्याची क्षमता प्लास्टिक, धातू ई च्या मानाने कमी आहे. सबब त्याच्या पुरवठा फार काल दाबून ठेवता येत नाही. त्यातील अत्यंत नाशवंत मालाचा तर नाहीच नाही. उत्पादन करण्याचे कारखानदारांचे धोरण बाजारातील मागणी यानुसार खूप लवचिक असते. महिन्या महिन्याला मागणीचा अभ्यास करून कारखान्यात धोरण बदलता येते तसे शेतकर्‍याचे होत नाही त्याला धोरण बदलण्याची संधी वर्षातून फारतर तीनदा येते. त्यावेळी नेमके अतिरिक्त उत्पादन झाले तर भाव उत्पादन खर्चा पेक्षाही कमी ठरू शकतात. अशासाठी मग परदेशी मालाची निर्यात करण्याची मुक्तता त्याला हवी असते. परदेशातून मागणी नसेल तर इथेच त्याला हमीभाव हवा असतो. काही करून स्वाभाविकपणे त्याला कारखानदाराप्रमाणेच नफा कमवायचा आहे. म्हणूनच थेट ग्राहकापर्यंत माल पोचवतानाही शेतकरी साखळी वितरणात येणार्‍या भावपेक्षा एकही पै कमी करायला तयार नसतो हा अनुभव आहे. यात कारखानदार व शेतकरी यांच्यात फरक असा पडतो तो की प्रतिस्पर्धी कारखानदार कोण्ते उत्पादन किती करत आहे याची अद्ययावत माहिती त्याच्याकडे येत असतेच शिवाय चुकून त्याचे उत्पादन अतिरिक्त झाले तरी ते तुलनात्मक रित्या टिकाउ असल्याने त्याला फारसा फरक पडत नाही. बदलत्या कालात शेतकर्यालाही आपण सुखासीन जिणे जगावे असे वाटणे काही गैर नाही पण त्यानी त्यासाठी मागणी . मालाचा टिकाउपणा ई संदर्भात व्यापक विचार केला पाहिजे व सरकारी हस्तेक्षेप नाकारला पाहिजे. पण मुक्त व्यापारातील तोट्यांच्या अभ्यास करताना शेतीमाल म्हणजे इतर वस्तू नव्हेत याचे भान ठेवून.

बहुतेक वेळेचा अशा धाग्यांचा अनुभव असा आहे की शेती*बाहेरचे लोक काही तरी बोलतात/सुचवतात. जे शेतीत काम करत असतात ते बहुतांश वेळा "या बाहेरच्यांना शेतीतलं काही कळत नाही" असे म्हणून त्यांच्या सूचना उडवून लावतात. बाहेरच्या लोकांना शेतीतलं कळत नसणार हे तर उघडच आहे. मग त्यांनी सूचना करू नये असे म्हटले तर मग अशा धाग्यांवर चर्चाच संभवत नाही. हा तिढा कसा सोडवावा बरे? * हे कुठल्याही व्यव्सायाबद्दल लागू आहे.

In reply to by नितिन थत्ते

हा तिढा कसा सोडवावा बरे?
तुम्हीच उत्तर दिले आले. जे शेतीत काम करत असतात ते बहुतांश वेळा "या बाहेरच्यांना शेतीतलं काही कळत नाही" असे म्हणून त्यांच्या सूचना उडवून लावतात. शेतकर्‍यांच्या अराजकीय संघटनांमधले राजकारण, शेतकर्‍यांचे जाणते राजे, शेतकर्‍यांचे राजकारण-हेवेदावे यात भरडला जातो तो लहान शेतकरीच. हे सुजाण शेतकर्‍यांना कळेल तेंव्हा कोंडी फुटायला सुरूवात होईल. तसेच "शेती करा मग बोलुन दाखवा" वगैरे गोष्टी मुद्दे मांडताना ठीक आहेत पण त्याने चर्चा पुढे जात नाही.

In reply to by मोदक

जे शेतीत काम करत असतात ते बहुतांश वेळा "या बाहेरच्यांना शेतीतलं काही कळत नाही" असे म्हणून त्यांच्या सूचना उडवून लावतात.>>> -- शेतकरी कोणत्या सूचना धुडकावून लावतो माहिती का. अव्यवहार्य सेंद्रिय शेती, पंचगाव्या आणि झीरो बजेट शेती, सोसायट्यामध्ये येऊन माल विक्री करण्याचे सल्ले वगैरे वगैरे. त्याच बरोबर त्याला भिकाऱ्यांची उपमा दिली जाते त्यावेळेस त्याच्या कडून आरती ओवाळून घायची अपेक्षा का बरं ठेवत असतील लोक. शेतकऱ्याला कोणते सल्ले भावले माहिती का- ठिबक सिंचन जेव्हा त्याचा खर्च आवाक्यात आला, मल्चिंग पेपरचा वापर, उसाचे पाचट पेटवून न देता आधुनिक अवजाराने त्याची भुकटी करून जमिनीत गाडणे, टोमॉटोच्या झाडांना तारा लावणे भरगोस उत्पादन काढणे, गहू-सोयाबीन-बाजरीची सुधारित पद्धतीने पेरणी करणे, कोरड वाहू शेतीत एखादं एकर फळ बाग लावणे, कृषी विज्ञान केंद्रातून जमेल तेवढी माहिती घेणे, कारखान्याच्या वार्षिक सभेत संचालकांना जाब विचारणे शेती सहलीं मध्ये वेग वेगळ्या देशांना भेट देणे आसपासच्या ३-४ राज्याच्या प्रमुख बाजार पेठांच्या व्यापाऱ्यांना प्रत्येक्ष भेटून येऊन लागवडीची माहिती देऊन आपल्या क्षेत्रात आमंत्रित करणे ('टोमॅटो' ला आम्ही करतो हे. जेवणावळी पण घालतो) या वरील सगळ्या गोष्टी माझ्या सारखा सुशिक्षित शेतकरीच करतो असे नाही, अडाण्यात ला अडाणी शेतकरी सर्व माहिती घेऊन ही कामे करतो. त्यामुळे शेतकऱ्याला काहीच कळत नाही, याचा भ्रम जे शेती करत नाहीत अशा लोकांनी डोक्यातून काढून टाकावा.

In reply to by मोदक

शेतकर्‍यांच्या अराजकीय संघटनांमधले राजकारण, शेतकर्‍यांचे जाणते राजे, शेतकर्‍यांचे राजकारण-हेवेदावे यात भरडला जातो तो लहान शेतकरीच.>>> -- यांच्यामुळे भरडला वगैरे काही नाही. बहुतांशी वेळा शेतकरी संघटना मुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. दूध आणि उसाच्या बाबतीत बऱ्याच वेळा फायदा झाला आहे. जाणते राजे मुळे शेतकऱ्यांचा काय आणि कसा फायदा झाला आहे ह्या खालील ऍग्रोवन मधील लेख आकडेवारी शकत देत आहे. आकडे वारी खटकत असतील तर त्या मोडून दाखवा. आनंदच होईल. (जाणत्या राजा बाबत आपल्या मनामध्ये पूर्व गृहीत अडी असल्या कारणाने आपले दोघांचे एकमत होणार नाही, हे सोडून द्या) http://www.agrowon.com/Agrowon/20170131/4998508586890975862.htm शेतकर्‍यांचे राजकारण-हेवेदावे आताचे सरकार नाकारणारच कारण आता रामू अण्णा काही उपयोगाचा उरला नाही. त्यांना हक्काचा मतदार मिळाला आहे. रामू अन्नाच्या म्हातारीला आणि गाव पुढाऱ्यांना काही काम नाही. (विनंती आहे- हा धागा राजकारणात बरबटू नये)

In reply to by विशुमित

तुमच्या विनंतीला मान देऊन एक सुचवतो. आपण एक काम करूया, तुम्ही या धाग्यावर शेतीसंबंधी इतर मुद्द्यांवर चांगले सकारात्मक प्रतिसाद देत आहात म्हणून माझा वरचा मुद्दा थोडा बाजुला ठेवूया. आत्ता शेतीतील राजकारण या चर्चेला पूर्णविराम देऊ आणि नंतर आपली बाकीची चर्चा झाली की पुन्हा आवश्यकता असेल तर हा मुद्दा पुन्हा चर्चेला घेऊ.. चालेल का..?

In reply to by विशुमित

ऍग्रोवन मधील लेख आकडेवारीहि बाकी कोणत्याच आकडेवारीही जुळत नाही. एक कुतूहल ऍग्रोवन चे मालक चालक आणि सर्वेसर्वा कोण आहेत? नाही म्हणजे या दहा वर्षात इतकी नेत्रदीपक कामगिरी झाल्याचे ऍग्रोवन प्रमाणे दिसते पण महाराष्ट्र "सुजलाम, सुफलाम" झाला असे काही कुठे "मला तरी" दिसले नाही पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र काही कमी झालेल्या दिसत नाहीत (स्रोत विकी) म्हणजे जसे news १८ मध्ये अंबानींचे कौतुकच लिहून येते तसे तर नाही ना? हो म्हणजे मी कागदोपत्री शेतकरी आहे परंतु स्वतः शेती कसत नाही. (पुरुष स्त्रीरोग तज्ञासारखा) अगोदरच सांगतो आहे.

एकूण बातम्या पाहता असे दिसते की "जास्त उत्पन्न हीच शेतकर्‍याची डोकेदुखी आहे". ज्याप्रमाणे क्रूड तेलाचे भाव पडू नयेत म्हणून आखाती देश प्रॉडक्शन कंट्रोल वापरतात तसं काही शेतीत गरजेचं आहे.

फेसबुकवर अविनाश कुलकर्णी यांच्या एका पोस्टवर दिलेले प्रतिसाद इथे देत आहे शेतीमाल नाशवंत असतो हे एक कारण सांगितले जाते. पण तो माल शेतकर्‍यासाठी नाशिवंत आणि दलालासाठी टिकाऊ असे नसते. माल ग्राहकाकडे नेणे हाच पर्याय आहे. कारण ग्राहकाला माल ना विकणाऱ्या मोठ्या कंपन्यांना सुद्धा एम आर पी च्या 50 टक्के किंमतीला माल विकावा लागतो. दलाल / दलालांची साखळी जे काम करतात - शेतकऱ्याचा माल साठवणे आणि ग्राहकापर्यंत पोचवणे- ते काम शेतकरी करीत नाहीत तोवर असेच चालणार. मधली साखळी शेतकर्‍यांनी काबीज करणे हा उपाय आहे त्यासाठी शेतकर्‍यांना कसे एम्पॉवर करता येईल ते पहायला हवे. ते केल्यावरही दलाल केवळ मलिदा खातात ही कन्सेप्ट सोडायला हवी. अमूलचे उदाहरण येथे योग्य ठरेल. गायीपासून बाजारापर्यंत जवळजवळ संपूर्ण साखळी अमूलच्या करवी शेतकर्‍यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यांना सरकारी मदत खूप मिळते असे म्हटले तरी "लास्ट माइल"- डिस्ट्रिब्युटर-रिटेलर सोडले तर सगळी साखळी अमूलच्या ताब्यात आहे. शिवाय व्हॅल्यू अ‍ॅडेड उत्पादने बनवणे हा त्यातला मेजर भाग आहे. चीज, बटर आइसक्रीम यातून मिळणारा नफा अमुलच्या शेतकर्‍यांनाच मिळतो. मूलभूत पिकांना हे फार लागू होणार नाही हे खरे पण टोमॅटो, केळी, संत्री वगैरे साठी व्हॅल्यू अ‍ॅडेड उत्पादने बनवणे शक्य आहे. ग्राहक म्हणजे त्या उत्पादनाचा प्रत्यक्ष उपभोग घेणारा ग्राहक. अन्यथा दलाल हा शेतकर्‍याचा ग्राहकच असतो. वाहनाचा एखादा सुटा भाग बाजारात ज्या किंमतीला मिळतो त्यापेक्षा खूपच कमी किंमतीला (अर्ध्याहून कमी) वाहन उत्पादक कंपनी विकत घेते. कारण कंपनी ही त्या आयटमची एंड कन्झ्यूमर नसते. मला शेतीतील काहीच कळत नाही हे मान्यच आहे. मी मार्केट कसे चालते हे सांगायचा प्रयत्न केला.

In reply to by नितिन थत्ते

नितीन जी, तुमचा वरील प्रतिसाद खूप आवडला. अतिरिक्त शेती मालच शेतकऱ्याची डोके दुखी ठरते बहुतेक वेळा. त्यामुळे डिमांड सप्लाय चा लोचा तयार होतो. त्याच बरोबर त्याच्या अनुषंगाने चल परिव्यय (variable कॉस्ट) सुध्या त्याच पटीने वाढतो. शेवटी एवढे कष्ट उपसून, उत्पादन काढून हातामध्ये काहीच उरत नाही. व्हॅल्यू अ‍ॅडेड उत्पादने बनवणे हा खरंच खूप सुरेख पर्याय आहे पण इथे भाग भांडवल, तंत्रज्ञाची माहिती, जागा, वितरण अशा अनेक कंगोरे आहेत. ह्यामध्ये देखील बरीच प्रगती येत्या काळामध्ये पाहायला मिळेल. व्हॅल्यू अ‍ॅडेड उत्पादने बनवणे बद्दल कोणी मार्गदर्शन केले तर नक्कीच पुढच्या वाटचालीला मदत होईल.

In reply to by विशुमित

धन्यवाद !! मिटकॉन नावाची महाराष्ट्र शासनाची एक संस्था काही कोर्सेस चालवते. त्यात काही मार्गदर्शन मिळू शकेल. इथे मी स्पष्ट करू इच्छितो की या कोर्सचा उद्देश व्हॅल्यू अ‍ॅडेड प्रॉडक्ट कशी बनवायची हे शिकवण्याचा नसून उद्योजकता विकसित करणे हा आहे. त्यामुळे त्यात त्या व्यवसायाची जुजबी माहिती. थोडेपार प्रात्यक्षिक असा एकूण प्रकार असतो. मुख्य भर उद्योजकता विकसित करणे हा असतो त्यामुळे कोर्सचा बराच भाग हा उद्योजकता म्हणजे काय, उद्योजक होण्यास आवश्यक गुण कोणते, प्रोजेक्ट तयार करणे, अर्थसहाय्य कोठे मिळते वगैरे बाबींंचा मोठा भाग असतो. म्हणजे तुम्ही तंत्रज्ञान शिकण्याचा विचार घेऊन तेथे गेलात तर निराशा होऊ शकते. मी स्वतः डिहायड्रेशन ऑफ फ्रूट्स अ‍ॅण्ड व्हेजिटेबल्स हा कोर्स अ‍ॅटेण्ड केला आहे. २००५ मध्ये त्या कोर्सची फी केवळ ३५०० (साडेतीन हजार रुपये) होती. सुमारे पंधरा दिवस रोज सायंकाळी दोन तास असा कोर्स होता. मला डिहायड्रेशनचा व्यवसाय करायचा नव्हता पण माझ्या ओळखीच्या एका संस्थेसाठी मी हा कोर्स घेतला. इतरहि काही संस्था असू शकतील. http://www.mitconindia.com/about-us/about-mitcon.html

In reply to by नितिन थत्ते

मिटकॉनचा एक कोर्स मीही केलाय, जबरदस्त अनुभव होता. मिटकॉनचे कोर्सेस मी नक्कीच रेकमेन्ड करेन कोणालाही.

माझ्या विवेचनात एक उदाहरण असणे जरूर होते. मी ज्या स्कूटर कंपनीत कामाला होतो त्या कंपनीचे एका विशिष्ट स्कूटरचे उत्पादनाचा आडाखा एकदा इतका चुकला होता की कारखान्यात फुटपाथवर तयार वहानांची गर्दी झाली होती. वितरक मालाची मागणीच नोंदविनासे झाले. पण मालकाला ( शेअर होल्डर्सना ) फारसा फरक पडला नाही. यथावकाश सर्व वहाने विकली गेली. ती निराश होऊन वा रागाने कारखान्याच्या परिसरात उकिरड्यावर फेकून द्यावी लागली नाहीत कारण माल नाशवंत नव्हता. काही वेळेस आपण सर्वानीच ७० रूपये किलोने कांदे व ६० रूपये किलोने टमाटो घेतलेले सर्वानाचा आठवत असेल. तसे स्कूटरचे होत नाही. दिवाळी आली वा पाडवा आला तर अशा मालाचे भाव वाढविले जात नाहीत. उलट कमी व्याजात कर्ज घ्या अशी लालूच दाखवून मालाचा उठाव वाढविला जातो.

In reply to by चौकटराजा

>> ती निराश होऊन वा रागाने कारखान्याच्या परिसरात उकिरड्यावर फेकून द्यावी लागली नाहीत कारण माल नाशवंत नव्हता. इथे प्रश्न हा आहे की २० पैसे किलो (जो काय पडेल भाव असेल त्या) भावाने दलाल टोमॅटो खरेदी करतो ते दलालासाठी सुद्धा नाशिवंतच असतो ना? ते नाशिवंत टोमॅटो घेऊन तो ते फेकणार नसतो.

In reply to by नितिन थत्ते

मूलभूत फरक आहे दोहोंत. रिटर्न्स अगेन्स्ट इन्वेस्टमेन्ट चे ऑड्स शेतकर्‍यांपेक्षा व्यापार्‍याला सोपे आहेत. २० पैसे किलोने घेतलेला कांदा-टोमॅटो-भाजी काही झाले तरी तो ४० पैशाच्या खाली विकत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्याकडून घेणार्‍यांना दुसरा सोर्स नसतो. (ग्राहक, किंवा भाजीविक्रेते यांना थेट शेतकर्‍यांकडून घेणे शक्य नाही) एका व्यापार्‍याकडे २० रुपये आणी दुसर्‍याकडे १८ रुपये असे नसते. तेवढे शोधत बसायला ग्राहकाला वेळ नसतो, उपयोगही नसतो, घेणार नाही असा त्याच्याकडे चॉइसही नसतो. नाशवंत माल वेळेत विकला गेला नाही तर होणारे पैशातले नुकसान हे अंतिम ग्राहकाला विकणार्‍या विक्रेत्याचे होते. पण तेही १० रुपयाची गोष्ट ३० रुपयाला लावून संभाव्य नुकसान सुरक्षित करुन घेतो. एक उदा/: उपभोक्ता ग्राहक आठवड्याची भाजी दारावर विकत घेतो, ती त्याला २०० रुपयाला पडते, तीच भाजी त्याला मंडईत गेल्यावर कदाचित १५०-१४० लाही मिळेल. किंबहुना मिळते. तीच भाजी त्याला थेट शेतकर्‍याकडे गेल्यावर कदाचित २० रुपयाला ही मिळेल. पण असे होत नसते. उपभोक्ता ग्राहकाला दारावर भाजी घेण्याशिवाय पर्याय नसतो. (सदर उदाहरण आताची ढोबळ व्यव्स्था दाखवणारे आहे, कृपया कोणी ह्यात फाटे फोडु नये, स्पष्टीकरणं शक्य होणार नाहीत.)

In reply to by संदीप डांगे

ओके. मग हा जो काही नियम आहे.. त्या नियमाला बायपास करून शेतकरी डायरेक्ट ग्राहकाला भाजी विकूच शकणार नाही का..? का आठवड्याची भाजी हे खूप कमी स्केलवरचे उदाहरण आहे आणि त्या प्रमाणात यशस्वी झाले तरी त्याचा मोठ्या प्रमाणातील पिकाला उपयोग होणार नाही..?

In reply to by मोदक

शेतकरी थेट विकू शकतोच की ग्राहकाला, पण ते कसे करणार? शेतीव्यवसायाची रचना बघता शक्य नाही. याबद्दल मागे बराच खल झालाय. मध्यस्थाची भूमिका नष्ट करणे शेतीव्यवसायात शक्य नाही. अगदी थोड्या लोकांना त्याचा फायदा होईल (होतोही आहे) पण प्रत्येक जण (शेतकरी किंवा अंतिम ग्राहक) ते करु शकत नाही. शेतकरी व अंतिम ग्राहक यांच्यामध्ये जो कोणी येईल त्याला अमर्याद (निरंकुश) अधिकार मिळतात हे मागे एका धाग्यात बोललो होतोच. हे मध्यस्थ खुद्द शेतकरीच असले काय किवा ग्राहक झाले काय शेतकर्‍यांचे नुकसान टळणार नाहीच. आठवड्याची भाजी हे छोट्या स्केलवरचे नाही तर मोठ्या स्केलचेच उदाहरण आहे. ते फक्त एका छोट्या युनिटमध्ये बघितले आहे. मुंबईत ४० लाख घरांमध्ये दर आठवड्याला ४ किलो भाजीपाला येत असेल, म्हणजे साधारण १६० लाख टन. तर हा एवढा माल एकाच शेतकर्‍याकडून येत नाही. हजारो शेतकरी मिळून हे उत्पादन करतात, त्यात दूधव्यवसायासारखी सुसूत्रताही नाही (दूधाच्या धंद्याला एक नैसर्गिक शिस्त आहे), शेतमालाला तशी शिस्त नाही याचे कारण ग्राहकांच्या जीवनशैलीचा मोठा भाग हा अनिश्चिततेत आहे. आपल्याला दिवसाला अमुक एक लिटर दूध लागतंच तसं भाजीपाल्यात नसतं. सोळापेक्षा जास्त प्रकारचा रोजचा भाजीपाला मूडनुसार आलटून पालटून वापरत असल्यने कोणत्या भाजीची कधी व किती गरज पडेल हे भाकित कोणीच करु शकत नाही. त्याला सपोर्टीव असे कांदा, लसूण, डाळी, मसाले हे (नॉन-पेरिशेबल) पदार्थ प्रमाणानुसार व चवीनुसार बदलतात. त्यामुळे बाजारात उद्या नक्की किती व कोणता माल लागणार याचा काहीच अंदाज नसतो. आता हे तुमच्या माझ्या घरातले उदाहरण बिग-स्केलवरही तसेच राहिल. त्यात होतं काय की दुसर्‍याबाजूची अनिश्चितताही त्यात भर घालते. कोणती गाय साधारण किती दूध रोज देते ते माहित असतं. तेव्हा दुधाची मागणी एका शहरात चार लाख लिटर आहे व दोन वर्षाने ती पाच लाख लिटर (लोकसंख्यावाढीनुसार) असणार हा अंदाज आल्याने पुढच्या वर्षी आता किती गायी/म्हशी वाढवाव्या हे ठरवता येते. दोन एकर शेतात चाळीस टन टोमॅटो येतील की साठ हे आधीच माहित नसते. बाजारात चाळीसची गरज आहे म्हणून आज चाळीस काढून बाकीचे उद्यापरवा काढू असे चालत नसते. अशा सर्व टोमॅटोउत्पादकांचे चांगल्या वातावरणामुळे ६०च्या ऐवजी ६२-६४ टन उत्पादन झाले तर साहजिक बाजारात भाव तुफान पडतात. (सध्या 'स्पेसिफिकली' टोमॅटोचे भाव पडण्यामागे हेच कारण आहे, लोक उगाच नोटबंदीला बदनाम करत आहेत, ते एक असो.) मागणीचा अंदाज नाही व पुरवठ्याची खात्री नाही अशा दुहेरी कात्रीत शेतीचा धंदा आहे. त्यात कोणी काही करु शकत नाही. स्वामिनाथन आयोगानुसार उत्पादनखर्चाधारित किमान आधारभूत किंमत दिली तर अंतिम ग्राहकांमध्ये हल्लकल्लोळ माजेल भारतभर. माझ्या आजपर्यंतच्या निरिक्षण व अभ्यासानुसार (जे ह्या सर्व पसार्‍याच्या मानाने अतिशय तोकडे आहे) असे वाटते की वरवर दिसते तशी मध्यस्थ ही समस्याच नाही. खरी समस्या ही संपूर्ण व्यवस्थाच आहे. साधारण शहरी ग्राहकांना दिसते ते असे की व्यापारी शेतकर्‍यांना लुटतात, शेतकर्‍यांना कमी पैसे मिळतात, तर तसे काही नाही. शेतकर्‍यांकडे पर्याय नाही. व्यापारी हे व्हिलन नाहीत, त्यांनाही नुकसानीची संभावना असतेच, तेही जोखिम घेऊनच व्यवसाय करत आहेत, दारावर फिरणारे भाजीविक्रेतेही जोखिम घेऊन व्यवसाय करत आहेत, ही सगळी जोखिम ते शेतकरी व ग्राहक यांच्याकडून वसूल करत आहेत. शेतकर्‍यांच्या समस्या संपवणे व ग्राहकांचे हित अबाधित राखणे ह्यासाठी माझ्यामते चीनच्या पद्धतीने शेती करणे फायदेशीर राहिल. सर्व शेतजमीन सरकारजमा करुन ज्या शेतकर्‍याला (किंवा कोणत्याही नागरिकाला) शेतीत रस असेल त्याने सरकारचे नोकर (किंवा विश्वस्त) म्हणून काम करावे. सरकारने सुनियोजित पद्धतीने मोठ्या स्केलवर उत्पादन करावे. मोठ्या स्केलने उत्पादन खर्च कमी होतोच. ऑटोमेशन शक्य होते, दर्जा मिळतो, प्रयोग करणे सोपे पडते. ज्या शेतकर्‍यांना कर्जबाजारीपणामुळे शेतीचा त्रास होतो आहे, त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरे कोणतेच कौशल्य नाही, त्यांना शेतीसंबंधित इतर कौशल्ये शिकवणे, त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करणे ह्याच सरकारप्रणित शेतीतून शक्य आहे. जर पोटापाण्यापुरते कमवणे शक्य नसेल तर किमान कौशल्याधारित कामावर एक तुट्पुंजी का होईना पण खात्रीची रक्कम मिळाली तर चांगले. आत्महत्या करण्याची अनेक कारणे आहेत व त्याचे मूळ शेतीविषयक धोरणांत आहे. ज्याकडे आजवरच्या सर्व सरकारांनी कायमस्वरुपी असे अक्षम्य, अघोरी दुर्लक्ष केले आहे. आताही ज्या काही योजना किंवा कार्यक्रम सुरु आहेत ते वरवर मलमपट्टी प्रकार आहे. शेतकरी जगवायचा असेल तर निव्वळ शेती नव्हे तर शिक्षण, दळणवळण, मूलभूत सोयीसुविधा, सक्षम व जबाबदार सरकारी यंत्रणा ह्यांची तातडीची व्यवस्था लावणे आवश्यक आहे. ज्या वेगाने भारतात हे होत आहे तो वेग अतिशय कमी आहे. जेवढे मी फिरलोय व बघितले आहे त्यानुसार आपल्याकडे प्रचंड पोटेन्शियल आहे, पण केवळ इच्छाशक्ती नसल्याने सगळे कचरा होत जात आहे. त्याबद्दल एक भारतीय नागरिक म्हणून फार वाईट वाटते. हे सुधरायला एका व्यक्तीची, एका संस्थेची, एखाद्या गावाची, शहराची, गटाची वा पक्षाची इच्छाशक्ती व प्रयत्न पुरेसे नाहीत, राष्ट्रपतीपासून ते रस्त्यावरच्या भिकार्‍यापर्यंत प्रत्येकाने ह्यात जाणीवपूर्वक सहभाग घेतला तरच बदल शक्य आहे. तो आवश्यक आहे आजच्या घडीला, अन्यथा येत्या वीस वर्षात फार कठिण होईल. (निसर्ग बेभरवशाचा झालाय, जमीनीची सुपिकता हरवत जात आहे, त्यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे, दरवर्षी धनधान्याचे आकडे वाढलेले दिसत असतील पण कस व गुणवत्ता प्रचंड कमी झाली आहे. सस्टेनेबिलिटीची कोणतीच खात्री मला तरी दिसत नाही.) (इतर देशात कशा तर्‍हेने हा व्यवसाय होतो हे मला माहित नाही, जाणून घ्यायची इच्छा आहे. परदेशातल्या प्रत्यक्षदर्शींनी कळवलेत तर बरे होईल.)

In reply to by संदीप डांगे

एकूण प्रतिसादाशी सहमत आहे. कोणता ग्राहक कोणती भाजी किती विकत घेईल हे अनिश्चित असले तरी एकूण विक्रीच्या अनिश्चिततेविषयी असहमती आहे. म्हणजे असे तर सर्वच उत्पादनांबाबत म्हणता येईल. एका मंडई लेव्हलला तरी याचे अ‍ॅव्हरेजिंग होत असेल असे वाटते. म्हणजे एका मंडईतून रोज किती टोमॅटो विकले जातात हे बहुतांश स्थिर रहात असेल. काही सीझनल फरक होत असतील पण पाठोपाठच्या दिवसांत ड्रास्टिक बदल होत नसतील.

वरच्या प्रतिसादात केवळ भाजीपाला व तत्सम उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्यातल्या विनिमयाबद्दल लिहिले आहे. मूळ धागा आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांबद्दल आहे. हे शेतकरी संपूर्ण भारतात विदर्भात प्रचंड प्रमाणात आहेत. ह्याला संपूर्ण जबाबदार ही आतापर्यंतच्या सर्व सरकारांची दुर्लक्ष करण्याची वृत्ती आहे. इतक्या प्रमाणात आत्महत्या होत असतील तर त्याची जबाबदारी सरकारवर येतेच. दुसर्‍या कोण्या व्यवसायात अशा आत्महत्या होत नाहीत, इथेच का असले कुत्सित प्रश्न विचारणे सोपे आहे. पण त्या प्रश्नांच्या मूळाशी जाऊन ते तप्तलोखंडासारखे हात भाजणारे उत्तर शोधणे व घशाखाली उतरवणे अजिबात सोपे नाही. उद्या रिलायन्स बुडाली, आणि सर्व २४००० नोकरांवर गदा आली, निवेशकांचे अब्जो रुपये बुडाले तर सरकार काय 'तुमचे तुम्ही बघा बॉ' म्हणत हात झटकणार नाही. किंबहुना असे नसते होत. शेवटी सर्व नागरिकांची सुरक्षा, उपजिविकेच्या संधीची उपलब्धता ह्याची व्यवस्था करणे सरकारचे कामच आहे. सहाराश्रीला आत डांबून ठेवले ते त्यासाठीच.आणि हे सरकार सर्वांचे आहे, केवळ कोणी टॅक्स भरतोय म्हणुन त्याने सरकारला विकत घेतलेले नाही हे लक्षात असू द्यावे. (कोनीतरी गृहस्थ मागे सैनिकाला तुझे बूट-बंदूक माझ्या करातून येतात असे काही बोलल्याचे लिहिले होते.तसेच आता हेही) त्यामुळे सरकारने कर्जमाफी करुन आम्ही भरलेले कराचे पैसे ह्यांच्यावर उधळु नये असे म्हणणे निव्वळ अज्ञान व फुकाचा अहंकार आहे. कर्जमाफीला अनेक कारणे असतात, त्यांची पूर्तता होणे आवश्यक आहे. त्यात काही अनियमितता आल्या असतील व त्यातून गरजूला फायदा न होता इतरच डल्ला मारत अस्तील तर त्याविरूद्ध आवाज करणे आवश्यक. पण ते डल्ला मारतात म्हणून कर्जमाफीच करु नये अशी मागणी चुकीची. कर्जमाफी केली म्हणून शेतकर्‍यावर उपकार केलेत, भीक दिली असेही वाटत असेल तर मनातून काढून टाकणे योग्य.भारतात शेती अशी आहे की हा ढोबळमानाने धड धंधा ही नाही, समाजसेवाही आहे, वेठबिगारी आहे. शेतकर्‍यांच्या समस्यांना खुद्द शेतकरी जेवढे जबाबदार आहेत त्यापेक्षा अनेक पटीने राज्यकर्ते कारणीभूत आहेत. त्यांची जबाबदारी ते टाळू शकत नाहीत. विदर्भासाठी सर्वंकष योजनेची व त्याच्या तातडीच्या अंमलबजावणीची नितांत आवश्यकता आहे. विदर्भातून इतर ठिकाणी होणारे स्थलांतर प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. हे वैदर्भिय बिहारी-भैय्यांसारखे दिसत नाहीत, वागत नाहीत म्हणून लक्षात येत नाही पण एकूण परिस्थिती त्यांच्याइतकीच कठिण आहे.

In reply to by संदीप डांगे

वाह क्या बात है? तुमच्या प्रतिसादात विदर्भाचा संदर्भ आला आणि वर कोणी तरी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आत्महत्या नाहींच्या बरोबर होतात. माझा निरीक्षण सांगतो, कदाचित ते चूक ही असेल. पश्चिम महाराष्ट्रातील शहरात नोकरीला लागलेला शेतकऱ्याचा मुलगा, आपल्या पगारातील काही हिस्सा गावातील शेतीसाठी वापरतो, गावाकडे डेलोपमेंट करण्याचा कल असतो, अडल्या नडलेल्या शेतकरी मित्रांना आर्थिक मदत करतो पण त्या उलट विदर्भ मराठवाड्यातील मुलं पुण्य मुंबई मध्ये स्थायिक होतात आणि गावाचे पुन्हा नाव ही नाही घेत.

In reply to by विशुमित

विशुमित भाऊ.. तुमचं निरीक्षण चुकीचं आहे असं म्हणणार नाही पण त्यात थोडा बदल सुचवतो.. "एकदा शिक्षण आटोपून पुण्य-मुंबईत स्थायिक झाल्यावर गावच्या शेतीकडे जातीने लक्ष देण्याचे प्रमाण विदर्भातल्या मुलांपेक्षा पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक प्रांतातल्या मुलांमध्ये जास्त आहे" यामागचं मला वाटणारं कारण, विदर्भात घेण्यात येणारी पिकं आणि नाशिक,पश्चिम महाराष्ट्रात घेण्यात येणारी पिकं आणि त्यावरचा ROI ह्यात भरपूर तफावत आहे. शिकल्यासवरल्यावर ही गोष्टी प्रकर्षाने लक्षात येते. त्यामुळे गावाकडे पैसे पाठवून,बापाला वर्षभर मेहनत करायला लावून जर मोजून चार-पाच टक्के ROI मिळणार असेल तर त्यात फार काही अर्थ नाही असं विचार ही मुलं करत असावीत. पुणे-मुंबई ते पश्चिम महाराष्ट्र, नाशिक अंतर आणि पुणे-मुंबई ते विदर्भ अंतर हा सुद्धा एक मुद्दा आहे. पण तो किती परिणामकारक आहे ह्यावर भाष्य करणं अवघड आहे.

In reply to by चिनार

पुणे-मुंबई ते पश्चिम महाराष्ट्र, नाशिक अंतर आणि पुणे-मुंबई ते विदर्भ अंतर हा सुद्धा एक मुद्दा आहे.
हाच मुख्य मुद्दा आहे असे वाटते.

In reply to by संदीप डांगे

हेच म्हणतो...शेतीवर लक्ष ठेवण्यासाठी नोकरी सांभाळून महिन्यातून एकदाही जाणेयेणे तेव्हढे सोपे नाही. एका ट्रिपचा खर्च २००० च्या आसपास येतो. फक्त वडील आणि मजुरांच्या भरवश्यावर शेती सोडून आपण पुण्या-मुंबईत राहणं योग्य नाही. त्यामुळे जाणं येणं करावंच लागतं. आता २-३ एकर शेतीतून वर्षाकाठी पन्नास हजार प्रॉफिट मिळणार असेल तर त्यासाठी एवढे टोले घेणं वर्थ आहे का ?

In reply to by चिनार

ROI आणि अंतर या बाबत सहमत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे मुंबईच नाही पण सैन्यामध्ये असणारी मुले सुद्धा गावात डेव्हलोपमेंट करण्यासाठी झटत असतात. जसे की पाण्याचे लिफ्ट करून काही किलोमीटर पाईप लाईन करणे, गावाकडे घर बांधणे, गुरांचे गोठे चालवणे, प्रवासी वाहने घेऊन बेरोजगार मित्राला चालवायला देणे, दुकानी गाळे घेणे, सहकारी कारखान्यात शर्स घेणे, गावकुसातील मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, पतसंस्था स्थापन करणे वगैरे. आता यात रिस्क आहे एक वेळ मानू पण थोडा तरी विश्वास ठेवलाच पाहिजे राव आपल्या आप्तइष्ट-मित्रांवर. त्याच्या उलट विदर्भातील नोकरदार लाखो रुपयांचे फ्लॅट्स घेऊन शहरातच घट्ट राहतात. रावेत (पिं.ची) मध्ये मध्यंतरी फ्लॅट्स ची चौकशी करायला गेलो होतो, तर जवळ जवळ ७०% फ्लॅट धारक नागपूर-परभणी- जळगाव-नांदेड. फ्लॅट्स च्या किमती ६०-८० लाख. बायकोला म्हणालो ६०-७० लाखात गावाकडे बाकीची ४-५ एकर जिरायत शेती साठी लिफ्ट करू. पैसा त्यांचा आहे त्यांनी काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. पण प्रगतीचा विभागीय समतोल ढासळण्याची हे सुद्धा एक कारण आहे. हा धागा मुळात शेतकरी आत्महत्या किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न हा नाही, असे मला वाटते. रामू अण्णाच्या शहरात नोकरी करणाऱ्या २ मुलांची रामू अण्णा विषयी असणारी उदासीनता ही मुख्यतत्वे धागा लेखाने मांडली आहे.

In reply to by विशुमित

असे करणारे नाहीतच असे नाही, माझ्या बहुसंख्य मित्रांमध्ये असे करणारे आहेत तर... अनेकांनी मुंबै-पुण्यात कमावून गावाकडे घरं बांधली आहेत, चारचाकी घेऊन भावा-बंदांना कामाला लावले आहे, दुकानं काढून दिली आहेत, जमीनीमध्ये, शेतीमध्ये इन्वेस्टमेन्ट करत असतात. नाही असे नाही. विदर्भातल्या मुलांना गावाकडे आस्था नाही, मुंबै-पुण्यात खुंटा रोवून बसलेत असे काही चित्र मनात असेल तर तसे नाही. फक्त त्यांचे प्रयत्न हे वाळवंटात हंड्याने पाणी घालण्यासारखे आहेत. इट्स ऑफ नो युज फॉर होलिस्टीक अ‍ॅन्ड सस्टेनेबल डेवलपमेन्ट. पाण्यासाठी नदी पाहिजे, धरणं पाहिजेत, पाइपलाइन टाकू पण पाणी कुठून आणायचे? विहिरी खोदून, बोअर मारुन उपयोग नाही, ज्यांच्याकडे पाणी नैसर्गिकरित्या आहे ते करतातच बागायती. विदर्भात पाऊस कमी आहे. नद्या कमी आहेत, एकूण पाणीच कमी आहे. खारपड जमीन आहे. कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त आहे. शाश्वत व मोठ्या स्केलवर दिसुन येणार्‍या विकासासाठी सरकारचे प्रचंड प्रयत्न लागतात, तशी कोणती खास तयारी सरकारी पातळीवर नाही,राजकारणाची गत तर वेगळीच, विदर्भाचा बॅकलॉग ऐकून ऐकुन आता आमची पिढी संपायला आली आहे... सर्व दोष जनतेवर टाकून उपयोग नाही, जनता आपला मार्ग काढत विदर्भातून स्थलांतर करत आहेच. साधं दळणवळणाचं घेतलं तर आता कुठे थोडीफार हालचाल सुरु झाली आहे. विदर्भात रेल्वेचे जाळे कमी, उद्योगधंदे कमी, कारखाने-उद्योगसमूह नाही, त्यांना सोयीसुविधा नाहीत. विदर्भाचा प्रश्न खरंतर एकच एक कारणामुळे नाही, राजकारण, समाजकारण, मुंबैपुणे सारख्या हॅपनिंग ठिकाणांपासूनचे अंतर, व्यापारउदिमामध्ये असलेला वावर, जीवनशैली, मानसिकता अशा अनेक गोष्टींचा 'जांगळबुत्ता' आहे.

In reply to by संदीप डांगे

धाग्याचा मतीत अर्थ साध्य होतोय. रामू अण्णा ला दवाखान्यात नेवून काही ही उपयोग नाही हे पोरांनी १००% जाणलं आहे. त्यामुळे ते फिल्टरच पाणी, अस्वच्छता, वगैरे मखलाशी करत आहेत.

In reply to by संदीप डांगे

धागाकर्त्याच्या मते मतितार्थ वेगळा आहे, तुमचा वेगळा वाटत आहे. ==आलं लक्ष्यात..

In reply to by विशुमित

विशुमित भाऊ.. मी विदर्भातले मुलं शेतीकडे का लक्ष देत नसतील ह्याची संभावित कारणं सांगितलीत. ह्याचा अर्थ ते बाकी कशातच लक्ष देत नाहीत असा निष्कर्ष कसा निघतो?
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे मुंबईच नाही पण सैन्यामध्ये असणारी मुले सुद्धा गावात डेव्हलोपमेंट करण्यासाठी झटत असतात. जसे की पाण्याचे लिफ्ट करून काही किलोमीटर पाईप लाईन करणे, गावाकडे घर बांधणे, गुरांचे गोठे चालवणे, प्रवासी वाहने घेऊन बेरोजगार मित्राला चालवायला देणे, दुकानी गाळे घेणे, सहकारी कारखान्यात शर्स घेणे, गावकुसातील मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, पतसंस्था स्थापन करणे वगैरे. आता यात रिस्क आहे एक वेळ मानू पण थोडा तरी विश्वास ठेवलाच पाहिजे राव आपल्या आप्तइष्ट-मित्रांवर.
माझ्या मित्रांमधले बरेच जण गावाच्या विकासासाठी बराच काही करत आहेत. रच्याकने परभणी,जळगाव,नांदेड हे विदर्भात येत नाहीत.

In reply to by चिनार

चिनार भाऊ, ह्याचा अर्थ ते बाकी कशातच लक्ष देत नाहीत असा निष्कर्ष कसा निघतो?>> -- मी निष्कर्ष काढलाच नाही आहे. हे माझे फक्त निरीक्षण होते. चुकीचे असू शकेल. गावाकडे लक्ष देत असतील अतिउत्तम. माझ्या मित्रांमधले बरेच जण गावाच्या विकासासाठी बराच काही करत आहेत.>>> -- ते अजून मूर्त स्वरूपामध्ये दिसत नाही. त्यांच्या प्रयत्नाला यश लाभो. रच्याकने परभणी,जळगाव,नांदेड हे विदर्भात येत नाहीत.>> -- भूगोलाची उजळणी दिल्या बद्दल धन्यवाद. फ्लॅट पाहायला गेलो होतो त्यावेळेस नागपूर व्यतरिक याच भागातील लोक भेटले होते. सामान्यतः पश्चिम महाराष्ट्र-कोकण येथील आत्महत्यांची तुलना इतर भागांशी केली जाते. मला फक्त विदर्भच अपेक्षित नव्हता.

In reply to by संदीप डांगे

मूळ धागा आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांबद्दल आहे. हे शेतकरी संपूर्ण भारतात विदर्भात प्रचंड प्रमाणात आहेत. ह्याला संपूर्ण जबाबदार ही आतापर्यंतच्या सर्व सरकारांची दुर्लक्ष करण्याची वृत्ती आहे. इतक्या प्रमाणात आत्महत्या होत असतील तर त्याची जबाबदारी सरकारवर येतेच. दुसर्‍या कोण्या व्यवसायात अशा आत्महत्या होत नाहीत, इथेच का असले कुत्सित प्रश्न विचारणे सोपे आहे. सरकारने काय करायचे अजून? सरकारने १९७८ पासून अनेकवेळा कर्जमाफी दिली आहे. आयकर तर पहिल्यापासूनच माफ आहे. सरकारी बँकेकडून इतर व्यवसायांच्या तुलनेत शेतीला कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. वीजेसाठी मीटर न लावता पंपाच्या हॉर्सपावरवर आधारीत बिल आहे. ८५ पैसे प्रति युनिट इतक्या किरकोळ किंमतीत वीज दिली जात आहे. इतक्या अल्प दरात वीज मिळत असूनसुद्धा ९०% शेतकरी वीज बिल भरत नसल्याने महाराष्ट्रात शेतकर्‍यांकडून येणार्‍या वीजबिलाची थकबाकी जवळपास १८००० कोटी रूपयांवर गेली आहे. तरीसुद्धा वीज तोडल्याची किती उदाहरणे आहेत? वीज तोडायला गेलेल्या वीज मंडळाच्या अधिकार्‍यांना गावकर्‍यांनी मारहाण करून पळवून लावल्याच्या किंवा एखाद्या खोलीत कोंडून ठेवल्याच्या बातम्या येतच असतात. शेती वगळता दुसर्‍या कोणत्या क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारकडून प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष मदत मिळते? शेतीसारखे इतर अनेक व्यवसाय व व्यावसायिक वेळोवेळी संकटात सापडतात. सरकारी मदत अजिबात नसताना ते व्यावसायिक आत्महत्या का करीत नाहीत या प्रश्नात कुत्सित काय आहे? सरकारने कर्जमाफी करुन आम्ही भरलेले कराचे पैसे ह्यांच्यावर उधळु नये असे म्हणणे यात अज्ञान व फुकाचा अहंकार कोठून दिसला? शेतकर्‍यांच्या समस्यांना अजून किती दिवस राज्यकर्त्यांना जबाबदार धरणार? शेतकर्‍यांच्या आत्महत्येसाठी शेती हा एकमेव घटक जबाबदार आहे का? आत्म्हत्या करणार्‍यांमध्ये बहुतांशी पुरूषच आहेत. शेतकरी कुटुंबातील महिला क्वचितच आत्महत्या केल्याची बातमी असते. विशेषत: कर्जाचा बोजा मागे सोडून आत्महत्या केलेल्या नवर्‍याच्या मागे महिला जिद्दीने काम करून मुलांना वाढवितात असे अनेकवेळा वाचनात येते.

In reply to by संदीप डांगे

दूध व भाजीपाला यांच्या मधील मूल फरक तसेच दूधापासून पर्यायी पदार्थ तयार करण्याची शक्यता ई महत्वाचेच आहे. बाकी रिलायन्स बुडाली तर सरकार तुमचे तुम्हीच पहा असेच सांगेल. रूपी बॅम्केचे काय चालू आहे ? एच ए पिम्परीचे काय चालू आहे? सरकार ही विमा कंपनी नव्हे ! कर गोळा करून सर्वजनिक सुविधा देणे व काय॑दा सुव्यवस्था देणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.

In reply to by चौकटराजा

रिलायन्स बुडाली तर सरकार तुमचे तुम्ही पाहा असे म्हणेल ह्याबद्दल जरा डौट आहे. टू बिग टू फेल ह्या संकल्पनेत बसणारे उद्योग, व्यवस्था कोसळू देणे सरकारला परवडत नाही. त्यासाठी बेल-आउट पॅकेज आणि सतरा प्रकार असतात. सरकार विमा कंपनी नाही हे मान्य मग शेतीव्यवसायातला सरकार करत असलेला हस्तक्षेपही शंभर टक्के थांबायला हवा. सबसिड्या, कर्जमाफी, वीजबील माफ, कसलेच लाड नको तर मग आयात-निर्यातीतला हस्तक्षेप, जाचक नियमावली, हम करसो कायदा ह्या गोष्टीही सरकारने सोडून द्यायला हव्यात. आजतागायत सरकार फक्त बाजारात जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ होणार नाही यासाठी काम करते आहे, आणि शेतकरी अगदीच मरणार नाही इतपत सांभाळते आहे. सर्व सबसिड्या, कर्जमाफी, नियमावल्या त्यासाठीच आहेत. एकदा कांदा हजार रुपये किलो होऊ द्या, गहू चारशे रुपये किलो होऊ द्या, मेथीची जुडी पाचशे रुपयाला मिळू देत, मग सरकारची मजा बघू या. एवढ्यातच टोमॅटो शंभर रुपये किलो पर्यंत वाढल्यावर सरकारने निर्यातीवर निर्बंध आणत भाव पाडले, हे कांद्याबाबत झाले होते. कापसाची तर कहाणीच आहे. इथे सरकार तुमचे तुम्ही पाहा असे का म्हणत नाही?

In reply to by संदीप डांगे

उद्या रिलायन्स बुडाली, आणि सर्व २४००० नोकरांवर गदा आली, निवेशकांचे अब्जो रुपये बुडाले तर सरकार काय 'तुमचे तुम्ही बघा बॉ' म्हणत हात झटकणार नाही. किंबहुना असे नसते होत. काय सांगताय ? १९८२ साली मुंबईत गिरणी कामगारांचा संप झाला दीड लाख "मराठी" गिरणी कामगार बेकार झाले.(स्रोत विकी) मुंबईतील कापड गिरणी व्यवसाय उद्वस्त झाला. यातील बहुसंख्य लोक देशोधडीला लागले. त्याबद्दल कल्याणकारी सरकारने किंवा "मराठी माणसांचा उमाळा असणाऱ्या लोकांनी" काहीही केले नाही. २०१२ ला किंगफिशर कंपनी बंद पडली त्यातील ६ हजार कामगारांवर बेकारीची कुर्हाड पडली. तेंव्हाही कल्याणकारी सरकारने काहीच केले नाही. तेंव्हा तुम्ही हे विधान करताय ते काही पचत नाही बुवा.

In reply to by सुबोध खरे

+ १ - अनेक बनावट गुंतवणूक कंपन्यांनी लोकांना गंडा घातल्याची अनेक उदाहरणे आहेत. सरकारकडून त्यांना काहीही मिळालेले नाही. - अनेक खाजगी कंपन्यातून मोठ्या प्रमाणात अचानक लेऑफ होतात. त्यांनाही सरकारकडून काहीही मिळत नाही. - सुवर्ण सहकारी बँक, रूपी बँक, त्रिमूर्ती बॅंक, समृद्ध जीवन, सीआरबी, एनराई यासारख्या अनेक कंपन्यांनी लोकांचे पैसे बुडविले आहेत. त्यांना सरकारकडून मदत मिळालेली नाही. अर्थात यापैकी फारच थोड्या लोकांनी आत्महत्या करून जीवन संपविले असावे.

आत्तापर्यंत इतक्या वेळेला कर्जमाफी दिलेली आहे आणि तरीही प्रश्न तसाच आहे. लहरी हवामान, जमिनीचा कमी होणारा कस, अनिश्चित उत्पादन, पडणारे भाव, दलालांकडून कमी भाव मिळणे, उठाव नसल्याने पीक वाया जाणे, साठवणुकीची व्यवस्था नसणे यातले सगळे प्रॉब्लेम्स वर्षानुवर्षे तसेच आहेत. नुसती सरकारने कर्जमाफी द्यावी ही मागणी करून काय मिळणार आहे? परत पुढच्या वर्षी हीच परिस्थिती असणार आहे. मला शेतीतील फारसं माहित नाही पण इतकी वर्षे याच अडचणी असूनही आणि सरकार काही करत नाही असा आरोप असूनही स्थानिक पातळीवरसुद्धा कोणी काहीच करत नाही? एका गावातले शेतकरी एकत्र येऊन यातल्या काही गोष्टींवर तरी उपाय शोधू शकतात. असे प्रयत्न झाले असतील पण मग मोठ्या प्रमाणावर झाले आहेत का? त्यातल्या अडचणी तिथल्या स्थानिक नेत्यांनी सोडवायचा प्रयत्न केला का? माझ्या माहितीप्रमाणे सरकारने पण बरेच प्रयत्न चालवले आहेत जसे की पीक विमा योजना, सूक्ष्म सिंचन योजना, ग्रामीण गोदाम योजना, फलोद्यान लागवड योजना, मातीची प्रत तपासणी, युरियाला नीम कोटिंग करणे तसेच पूर्वीपासून असणारी बियाणांवर व खतांवर सबसिडी आहेच. पावसाचा अंदाज आजकाल बऱ्यापैकी बरोबर असतो आणि आधीपासून उपलब्ध असतो. मग फक्त कर्जमाफी करावी ही अपेक्षा आणि हाच एक उपाय असल्यासारखी बोंबाबोंब का असते?

In reply to by संदीप डांगे

असेल तर सोडतो की! पण मग काय आहे ते सांगा तरी. मला फर्स्टह्यांड अनुभव नाही हे आधीच सांगितलेलं आहे. मग वर सांगितलेलं काय खरं आहे आणि काय नाही हे सांगा. सरकारी योजना प्रत्यक्षात येईपर्यंत त्यांची वाट लागते असं पण ऐकून आहे. योजना करणारे करतात पण राबवणारे वेगळे आहेत ते गोंधळ घालतात का? शेतकऱ्यांपैकी किंवा संबंधित लोकांपैकी कोणीच या बाबत काही माहिती ठेवत नाही का? दरवर्षी फक्त कर्जमाफी दिली की प्रश्न सुटतील का?

In reply to by ट्रेड मार्क

सांगायला हरकत नाही हो पण काय कि लोकांना इथे मेगाबायटी प्रतिसाद नको असतात, कोणी स्वखर्चाने काही पुस्तके पाठवायची म्हणतो तर त्याची खिल्ली उडवली जाते. शेतीचे प्रश्न हे शिळोप्याच्या गप्पा मारण्याइतका casual विषय नाही. एका वाक्यात उत्तरे द्या असे नसते. शिवाय प्रश्न कळून घेण्यासाठी आधी अनुकंपा, सहानुभूती, तळमळ लागते, ती दिसत असेल तर उत्तर द्यावे वाटते. शिवाय प्रत्येक वेळी पहिल्यापासून तेच तेच टाईप करण्याचाही कंटाळा येतो. त्याचा काही उपयोग नाही, त्यापेक्षा जिथे उपयोग होतो तिथे वेळ देणे बरं.... वरचे वाक्य तुम्हाला स्पेसिफिक नाही, एकूण शेतकऱ्यांबद्दल बायस्ड मते असणाऱ्या पब्लिक साठी आहे.

In reply to by संदीप डांगे

कोणी स्वखर्चाने काही पुस्तके पाठवायची म्हणतो तर त्याची खिल्ली उडवली जाते ट्रक पेडगांवला पोचला वाटतं. लोकांना मेगाबायटी काय टेराबायटी प्रतिसाद असले तरी चालतात पण लॉजिकल असावेत इतकेच. ते आधी जमवा मग मिपाकरांवर शरसंधान करा. हे खिल्ली उडवणे प्रकरण "स्वखर्चाने काही पुस्तके पाठवायची" म्हणून झाले होते हे कुठल्या चष्म्याने वाचलेत..?

In reply to by मोदक

प्रतिसाद लॉजिकल आहेत की नाहीत ह्याची आधी पुरेशी अक्कल असणेही आवश्यक आहे, ते जमवा आधी.

In reply to by मोदक

खोटे? वरच्या कोणत्या प्रतिसादात काय खोटे लिहिले आहे? काहीही बिनदिक्कत ठोकून द्यायचे? बस करा हे धंदे आता...

In reply to by संदीप डांगे

नेहमीप्रमाणे तुम्ही एकटेच दीनदुःखितांचे कैवारी असल्याच्या थाटात "कोणी स्वखर्चाने काही पुस्तके पाठवायची म्हणतो तर त्याची खिल्ली उडवली जाते" हे म्हणाला आहात ते सिद्ध करा पाहू.

In reply to by संदीप डांगे

..म्हणून पहिल्यांदाच म्हटले होते की तुमचा ट्रक पेडगांवला पोहोचला वाटतं. तुमचे वाक्य - कोणी स्वखर्चाने काही पुस्तके पाठवायची म्हणतो तर त्याची खिल्ली उडवली जाते. हा मुटेंचा धागा - मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका हा धागा आणि प्रतिसाद आणखी एकदा नीट वाचा. (शक्यतो चष्मा काढून वाचा!) आणि नक्की कोणत्या प्रतिसादात "पुस्तके पाठवायची आहेत म्हटल्यावर खिल्ली उडवली गेली आहे" ते सांगा.

In reply to by संदीप डांगे

**आम्ही = "शेतकरी नसणारे", "शेती नसणारे", "शेतीतील न कळणारे" आम्हाला प्रश्नच कळला नाही, अनुकंपा, सहानुभूती, तळमळ नाही, मेगाबायटी प्रतिसाद नको असतात, आम्ही शिळोप्याच्या गप्पांचा विषय समजतो ईई सगळं तुम्हीच ठरवताय. म्हणजे एका वाक्यात सांगायचं म्हणलं तर आम्ही चर्चेत भाग घेऊ नये.

In reply to by ट्रेड मार्क

'चर्चा' होत असेल तर भाग घेण्यास कोणाची ना नाही. चिखलफेक असेल तर उपयोग नाही. शेतीबद्दल एकच प्रश्न आणि एकच उत्तर असे काही नसते हे अल्पकाळातील अनुभवांती कळले आहे. आणि 'सो कॉल्ड' चर्चांमध्ये विषय भरकटवले जातात (तेव्हा राजकिय धागा असेल तर समजू शकतो), इथे शेतकर्‍यांबद्दल जानी दुष्मन असल्यासारखे, आम्हीच त्यांची पोटे भरतो आहोत, भिकारी आहेत ते, कर्ज काढून दारूपार्ट्या करतात, घरे बांधतात, सरकारला फसवतातच असे एककल्ली बाजू मांडून समग्र शेतकरी वर्गाला एकाच तराजूत बसवून तोलल्या जाते ते पटत नाही. एकच बाजू घेऊन विचार करणार्‍यांत मीही होतो, दोन वर्षे प्रत्यक्ष खपल्यावर कळले, शेतकर्‍यांत सगळेच साव नाहीत की सगळेच चोर नाहीत. तेही इतर सर्वसामान्य माणसांसारखी आहेत, तुमच्यामाझ्यासारखे षडरिपू त्यांच्यातही आहेत. असे सर्व असले तरी जे प्रश्न जेन्युइन आहेत त्यांचे महत्त्वही कमी होत नाही. एवढे ज्यांना समजू शकते, समजून घेण्याशी इच्छा आहे त्यांच्याशी चर्चा करणे योग्य आहे असे मी समजतो. अन्यथा वंध्यामैथुनात मला रस नाही. बाकी तुम्ही काय आहात हे मी ठरवत आहे हा आपला गैरसमज आहे. मी या धाग्यावर आलेल्या एकंदर सरसकट शेतकरीविरोधी प्रतिक्रियांवर बोलत आहे.

In reply to by संदीप डांगे

माझ्या या प्रतिसादावर तुम्ही म्हणालात "शेतीचे प्रश्न हे शिळोप्याच्या गप्पा मारण्याइतका casual विषय नाही. एका वाक्यात उत्तरे द्या असे नसते. शिवाय प्रश्न कळून घेण्यासाठी आधी अनुकंपा, सहानुभूती, तळमळ लागते, ती दिसत असेल तर उत्तर द्यावे वाटते.". माझ्या प्रतिसादात मी कुठेही चेष्टा करायची म्हणून, उगाच टाईमपास म्हणून विचारलं असेल वा खिल्ली उडवलेली असेल तर निदर्शनास आणून द्यावे. तुम्हाला किंवा इतर कोणाला वाटते तेवढी अनुकंपा, सहानुभूती, तळमळ माझ्यात नसेलही कदाचित. पण म्हणून माझ्यासारख्यांनी या विषयावर बोलूच नये हा दृष्टिकोन चुकीचा आहे. जर कोणी कुठे चेष्टा करायला, खिल्ली उडवायला लागलं तर त्यावेळेला त्याला विरोध करणं ठीक आहे. मी कधी शेती केली नाहीये हे मी आधीच स्पष्ट केले आहे. दरवर्षी कर्जमाफीची मागणी होते, बरेचदा दिलीही जाते पण त्याने मूळ प्रश्न सुटतोय का हा मला पडलेला प्रश्न आहे. याआधी कर्जमाफी देऊन आत्महत्या कमी झाल्या का हे आकडेवारीने सिद्ध होत असेल तर एक तात्पुरता पर्याय म्हणून कर्जमाफी ठीक असावी. पण दूरगामी परिणाम करणारे उपाय करायलाच पाहिजे. मी आत्तातरी समजून घेणे आणि चर्चा करणे यापलीकडे फार काही करू शकणार नाही. पण एवढे प्रश्न विचारायचं कारण म्हणजे मध्यंतरी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अगदी परदेशस्थ भारतीयांकडूनही निधी गोळा करण्यात आला होता. पुढे त्याचं काय झालं हे माहित नाही, किती पैसे किती शेतकऱ्यांपर्यंत पोचले हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे नक्की काय चाललंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.

In reply to by ट्रेड मार्क

माझ्या या प्रतिसादावर >> त्या प्रतिसादावर नव्हे तर त्यातल्या शेवटच्या वाक्यावर एक वाक्याचा प्रतिसाद दिलाय. त्याच्यावर तुम्ही दुसरा प्रतिसाद दिला. त्यावर मग मी तो एक वाक्यात उत्तरे वाला प्रतिसाद दिला आहे. तसेच एकूण सरसकट विरोधी भूमिका ठेवणार्‍यांना तो प्रतिसाद आहे तुम्हाला नाही असेही लिहिले होते. परत परत तेच तेच लिहावे वाटत नाही असे माझे म्हणणे होते. तुमची भूमिका सरसकट खिल्ली उडवण्याची, किंवा शेतकर्‍यांचे प्रश्न उडवुन लावण्याची नाही ना? मग टेन्सन कसाला? माझ्यासारख्यांनी या विषयावर बोलूच नये हा दृष्टिकोन चुकीचा आहे. >> असे मी म्हटलेले नाही, विपर्यास करु नये. चर्चेत कोणीही बोलू शकतो, त्यास कुठेही असहमती तर मी दर्शवलीच नाही. मला स्वतःला कुठे बोलावेसे वाटते किंवा नाही ह्याबद्दल लिहिले होते. मी कधी शेती केली नाहीये हे मी आधीच स्पष्ट केले आहे. >> शेतीप्रश्न समजायला स्वतः शेती केलीच पाहिजे असे काही नाही. दरवर्षी कर्जमाफीची मागणी होते, बरेचदा दिलीही जाते पण त्याने मूळ प्रश्न सुटतोय का हा मला पडलेला प्रश्न आहे. >> मूळ प्रश्न काय आहे असे तुम्हाला वाटते? इथून चर्चा सुरु करुया. कर्जमाफीची मागणी करावी लागण्याची वेळ वारंवार येणे हा तुम्हाला मूळ प्रश्न वाटतोय का की कसे? याआधी कर्जमाफी देऊन आत्महत्या कमी झाल्या का हे आकडेवारीने सिद्ध होत असेल तर एक तात्पुरता पर्याय म्हणून कर्जमाफी ठीक असावी. >> कर्जमाफी हा तातडीचा व तात्पुरता उपायच आहे. कर्जमाफी देऊन आत्महत्या कमी झाल्या की नाही हे समजायला काही मॅट्रिक्स नाही ना. दरवर्षी अमुक इतके हजार मरतातच, कर्जमाफीने इतके कमी झाले असे कसे मोजणार, शिवाय ते नैतिकतेला धरुन आहे काय? मात्र मेल्यावर शेतकरी कर्जबाजारीपणाने मेला की अजून कशाने हे मात्र निश्चित मोजता येते. पण दूरगामी परिणाम करणारे उपाय करायलाच पाहिजे. >> ह्या उपाययोजना करण्याबाबतीत आतापर्यंतची सर्व सरकारे एकजात सारखीच आहेत. त्यांचे प्रयत्न शेतकर्‍याला मरु देत नाहीत इतपतच भरीव आहेत. साहजिकच जिथे प्रयत्न अपुरे पडतात तिथे शेतकरी मरतात. एक उदाहरण देतो. बागायतदार भागामध्ये म्हणजे नाशिक-पुणे-सोलापुर-कोल्हापूर भागात शेतकी-कन्सल्टंट असतात. शेतावर येऊन पाहणी करुन पिकाच्या स्टेजनुसार खते, औषधे, शेड्युल सांगतात. ह्याप्रकारचे काम मी गेले काही महिने केले होते. काही द्राक्षे-डाळींबाचे स्पेशालिस्ट असतात. काही सर्व प्रकारची पिके बघतात. साधारण नगदी पिकांच्या व्यवस्थापनासाठी ही प्रायवेट फी-बेस्ड व्यवस्था आहे. काही कन्सल्टंट खाजगी औषध कंपन्यांचे पगारी असतात तर काही वैयक्तिक व्यवसाय करणारे. ह्यामध्ये पिकांची उत्पादकतेची, दर्जाची पुरेपूर खात्री घेऊन क्लायंटला उत्तम पिक काढून देतात. अशा प्रकारचे काम करणारी सरकारी यंत्रणा आहे, तिची हेल्पलाइनही आहे. पण कोणीही सरकारी यंत्रणेला बोलवत नाही, किंवा ते स्वतः येतही नाहीत, आले तर त्यांच्याकडे अद्ययावत ज्ञान नसते. जुजबी नोकरीसाठीचे अहवाल तयार करण्याइतपत कागदोपत्री काम केले झाले. काही लोक खरोखर प्रामाणिकपणे काम करतात. सरकारी कर्मचारी म्हणून सरसकटीकरण नाही. पण सरकार कमी पडते आहे म्हणून ही स्वतंत्र समांतर कन्सल्टंट्स ची व्यवस्था उभी राहिली ना? मातीपरिक्षण, पाणीपरिक्षण, त्यानुसार पिकांची लागवड, खते नियोजन, बियाणे-रोपे निवडणे त्याबद्दल प्रोअ‍ॅक्टीव सल्ला देणे हे सर्व महाराष्ट्रात होऊ शकते. खरोखर सरकारी व्यवस्था तशीच आहे पण कागदोपत्री. वर उल्लेखित कामे असलेल्या योजना तुम्हीही अधून-मधून वाचत असाल. पण त्याची जमीनीवरची टक्केवारी फारच कमी आहे. सरकारने शेतकर्‍यांशी टीम बनवून खरोखर मेहनत करुन ही सर्व कामे केलीत तर बहार येईल याची मला खात्री आहे. हे झाले उत्पादकतेबद्दल. त्यापुढे त्याचे विपणन, मूल्यवर्धन, विक्री वगैरे गोष्टीत प्रत्येक टप्प्यावर सरकार मदत करु शकतेच. यातुन शेतकर्‍याला योग्य ती पिके काढून योग्य तो नफा मिळेल, जास्त झालेले उत्पादन बाहेर पाठवता येईल. त्यावर परिकिय चलन मिळेल. प्रत्यक्षात हे सर्व प्रयत्न सरकार करत आहेच पण शंभर टक्के नाही. शंभर टक्क्यांची गरज आहे. शेतकर्‍यांचे कर्जप्रकरण थोडी वास्तविकता, थोडं राजकारण अशाप्रकारे आहे. सर्वच विरोधकांनी आजवर कर्जमाफी प्रकरण वापरले आहे, कॉन्ग्रेसने पॅकेजवाटपच्या नावावर सत्ताधारी म्हणून राजकारणही केलं आहे. ही पॅकेजेस शेतकर्‍यांपर्यंत पोचत नाहीत. कर्ज घेतले, पेरणी-बियाणे-खते घेतली, पण पिक नाही आले, उत्पादन शून्य झाले, मिळकत शून्य. मात्र कर्ज तसेच. हाच फेरा दोन-तीन वेळा झाला की शेतकरी अडकलाच. आता कर्जमाफी झाली की बॅन्कांना आपले कर्ज परत मिळते. शेतकर्‍याला काही नाही मिळत. फक्त नव्याने कर्ज मिळते, सातबारा कोरा होतो. पुनश्च एकदा हरिओम! मला माहित असलेली इतकीच कथा, मी काही तज्ञ नाही शेतीतला, इतर कोणी अधिक स्पष्ट सांगू शकत असतील तर स्वागत आहेच. तर कर्जमाफी ही क्रोसिन आहे. आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे. उद्याच्या आशेवर. उद्या चांगले पिकपाणी झाले तर कर्ज फेडल्या जाते. आता काही नालायक लोक सरकारी लोकांना हाताशी धरुन गेम करतात, ते नीट करता येते. इच्छाशक्ती हवी. . सगळ्या कारणांचा एकमेकांशी संबंध जोडता जोडता ग्रंथ होईल. आता इथेच थांबतो. (आता परत वेळ मिळणार नाही काही दिवस. दोन दिवस होते म्हणुन आलो, अध्ये-मध्ये मिळाला तर येईन)

In reply to by संदीप डांगे

डांगे अण्णा, शेतीबद्दल तुम्ही मांडलेला प्रत्येक शब्द खरी वस्तुस्थिती आहे.

In reply to by संदीप डांगे

मला एक समजत नाही की सरकार असल्या गोष्टीत फेल होतय हे गेली अनेक दशकं दिसतय. तुम्हीच वर दिलेल्या उदाहरणांतून खासगी सल्लागार बरच उपयुक्त काम करतायत. तरी सरकारने हे काम चांगल करायला हवं असं का? सरकारी हस्तक्षेप, विशेषतः बाजारबाजूचा, कमी करणे ही मागणी सोडून सरकारने काम चांगलं करा या मागणीचा काय उपयोग? इट इज बाऊंड टू फेल.

In reply to by अनुप ढेरे

तरी सरकारने हे काम चांगल करायला हवं असं का?>>> ==> कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये भर पडतेय ना. खासगी सल्लागार बऱ्या पैकी सधन बागायतदारांना परवडतात. उत्पादकता कशी वाढवायची या मध्ये शेतकऱ्यांनी खूप पुढची मजल गाठली आहे. तिथे ते सरकारवर जास्त अवलंबित नाहीत. सरकार कडून शेतकऱ्याला खरी गरज वेळेवर हातात खेळते भांडवल पाहिजे आणि आयात निर्यात धोरणातून ग्राहकाचे हिताबरोबर शेतकऱ्याच्या हातात कसा पैका पडेल या कडे लक्ष दिले पाहिजे.

In reply to by विशुमित

आयात निर्यात धोरणातून ग्राहकाचे हिताबरोबर शेतकऱ्याच्या हातात कसा पैका पडेल या कडे लक्ष दिले पाहिजे.
बरोबर. पण ही मागणी करताना दिसत नाही कोणी. कर्जमाफी हा प्रकार आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असा वाटतो.

In reply to by अनुप ढेरे

माझ्या माहिती प्रमाणे हीच तर प्रमुख मागणी आहे. सरकार त्याची पूर्तता करत नाही म्हणून तात्कालिक उपाय म्हणून कर्जमाफी मागत आहेत. त्या बद्दलच्या लिंक मिळाल्या तर चिटकवतो. (लिंक शोधणे जरा महा-जिकिरीचे काम आहे. पण शिकतो आहे)