मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जाणता राजा

महासंग्राम · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गाव : विदर्भातलं एक खेड वेळ : सकाळची , स्थळ : गावाची चावडी पात्र : रामराव आणि शामराव, वय : ५५-६० च्या आसपास. रामराव : "राम राम ओ शामभौ कुटी चालले इतक्या घाई मदी." शामराव : "राम राम, ते शेतात गेल्तो जरा सोयाबीन ले पानी द्याचं व्हतं, तुमाले मालूम नाई का रातीची इज देतात ना ते MSEB वाले." "न आता जरा उमरावातीले जाऊन येतो, ते मावा पडलाय सोआयबीन वर त्यासाठी कीटकनाशक घेऊन येतो जरा. लौकर जा लागते सकायची बस गेली का त वडाप नायतर कोणाच्या तरी गाडीवर जा लगीन मले शहरात." रारा : "जाशीन ना बे, पण हे बातमी पायली का त्वा, आताच लाईट आली अन टिव्ही लावला तर ते बातमी सुरु होती." " पाह्यलं का किती जंगी उदघाटन झालं स्मारकाचं, आता आपल्या राजाची किर्ती जग भर पोहोचणार पायतच जाय बाबू तू" !!! शारा : "अबे हो, तुय सारं बरोबर पन त्या साठी तर लैच पैका खर्च झाला म्हने ?" रारा : "हो मग ३६०० करोड रुपये खर्च होणारे, असं तसं स्मारक नाही जागतिक दर्जाचं स्मारक व्हनार आहे ते तेवढा खर्च किरकोळ आहे बे." शारा : "त्याले तिथल्या मच्छीमारांचा पन विरोध आहे असं ऐकलं बे म्या खरं व्हय का ते ?" रारा : "व्हय हुईन त्यायले थोडा प्रॉब्लेम, थोडा त्रास सहन करावाच लागन त्यायले. पण त्यामुळे पर्यटनाले किती हातभार लागीन बाबू याचा इचार कर न तू . जगभरातले लोकं येतीन ते पाहाले." शारा : " पण मले एक सांग शिवाजी राजाच सारं आयुष्य गडकिल्ल्यावर गेलं. मग हे स्मारक कायले ते गडकिल्ले ते काऊन दुरुस्त नाई करत सरकार त्या पैशातून ? " अन स्मारक शिवाजी राजाने तर जलदुर्ग बांधेल हायेत ना मंग तटी काऊन नाही केल स्मारक. रारा : "सरकार कुटी-कुटी लक्ष दिन बे. लोकाईन त थोडं काम कराले पाइजे कि नाई ?" शारा : "तुयी गोस्ट बरोबर हाये, तू म्हणत तसं काई संस्था काम करतात बी जीव वतुन किल्ले बांधाच, पण त्यायले पैका कसा पूरन. सरकार न जर त्या लोकयाले मदत केली किती भारी हुईन ते, स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून काम करणाऱ्या लोकाईले किती हुरूप येईन याचा बी इचार करन तू जरा." रारा : " हम्म, तुया बोलन्यात पॉईंट हाय थोडा. " शारा: "आता मले सांग आपल्या अटीच लाईट नसते, यस्टी वेळेवर येत नाई. सकायी सकायी अर्धे लोकं त्या कमानीपाशी रस्त्यावर बसत्यात. गावात नवीन कोणी पावना आला कि त्याले सलामी देत उबे रायतात." "आता माया शेतात म्या जलयुक्त शिवार अंतर्गत शेततळं करून घेतलं त्यामुळे माया न बाजूच्या सुदाम्या अन सुभानरावाच्या शेतात पाण्याची सोय झाली. पण गावात असे बी कास्तकार हायेत त्यायच्या कडे या साठी पैसा नाई, त्यामुळे त्यायले रब्बीत काय करावं,कास्तकारी सोडून द्यावी का ?" "हे झाली आपल्या गावाची कंडिशन, तू जरा खाली मेळघाटात जाय बरं तिकडं प्याले पानी नाई, रस्ते नाई, लाईट नाई. त्याहिनं काय करावं ?" आता तू सांग कोणत्या राजाळे आपल्या प्रजेले असा त्रास झालेला आवडीन. रारा : "अबे पन !!!" शारा : "पन गिन काई नाई मी काय बोलतो ते बघ आदी. हा स्मारकावर खर्च होणारा पैका थोडा किल्ले दुरुस्त कराले. थोडा जिकडे रस्ते, पानी, लाईट नैत अशा म्हणजे मेळघाट, चंद्रपूर मदल्या दूरच्या खेड्यात थोड्याफार त सोई देता येतीन. " "अन शिवाजी राजाले 'रयतेचा राजा' म्हटलं जायचं, मग तो पैसा त्याच्या रयतेसाठी वापरला तर त्यायचं कल्याण हुईन ना." रारा : "लैच चाबऱ्या तोंडाचा होयेस बे तू . देवाले असं एकेरी नावानं बोलतेत का ?" शारा : "बरं मी निगतो आता, पण त्या आदी व्हॉटसऍप वर माया पोरानं एक 'नरहर कुरुंदकर' म्हणून मोठा माणूस हुन गेला त्याचा म्यासेज पाटवला तो ऐक अन तुया डोक्शात काय प्रकाश पडते का बग." कुरुंदकर म्हन्तेत, " माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे.""समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो."

वाचन 17362 प्रतिक्रिया 0