बरेच काही उगवून आलेले...[अंतिम भाग]
[प्रस्तावना - या लेखाचा पहिला भाग येथे वाचता येईल. हा (थोडा रुक्ष) भाग, झाडांचा चेतनागुणोक्ती अलंकारात झालेल्या साहित्यातील उपयोगाविषयी आहे, आणि उदाहरणार्थ द.भा. धामणस्कर, रेगे, बोरकर यांच्या काही कविता उद्धृत केल्या आहेत.]
माणसाचं किंवा मानवी जीवनाचं रुपक म्हणून झाडांचा साहित्यात उपयोग कायमच होत आला आहे. पण याचं 'मूळ' काय? उत्क्रांतीच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर झाडालाही आपल्यासारखा जीव आहे, कदाचित भावनाही आहेत हे आपल्याला समजलं असावं? आदिमानवाला जेव्हा आपल्यासारख्याच वाढणार्या, खुरटणार्या, बहरणार्या आणि उन्मळून पडणार्या झाडाबद्दल प्रथम आत्मीयता वाटली, ही झाडं तर आपल्यासारखीच असं वाटून जिवाचे मैत्र जडले; तो क्षण 'मा निषाद'च्याच तोडीचा असावा. आणि कदाचित सुसंस्कृत होण्याचा पहिला टप्पाही.
ज्या गोष्टीबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटतो, तिला आपल्या गोटात ओढण्याचा आपण जाणता-अजाणता प्रयत्न करत असतोच, त्यातलाच झाडांचे रूपक, हा एक भाग असावा असं मला वाटतं. (ममता हा शब्दच मुळात मम-ता म्हणजे माझेपणा यातून आला असावा. आत्मीयता, आपलेपणा यांचे शब्दशः अर्थही तसेच.) एखाद्या जिवलग मित्राला भावासारखा म्हणून अधिक आतल्या वर्तुळात आपण ओढत असतो, त्यातला प्रकार. तेव्हा झाडांवर होणारं हे मानवी भावभावनांचं 'रोपण' वृक्षवल्ली आम्हां सोयरी याच भावनेतून उगवलं असावं.
'जो खांडावया घाव घाली, की लावणी जयाने केली, दोघां एकची साऊली, वृक्षु जैसा' म्हणत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगणारे आणि काव्य म्हणजे काय, विचारल्यावर जिच्याकडे बोट दाखवावं अशा 'कोंभाची लवलव, सांगे मातीचे मार्दव' सारख्या ओळी लिहून गेलेले ज्ञानेश्वर; वृक्षवल्लींना सोयरी म्हणणारे तुकाराम आणि कांदा, मुळा, भाजीत विठाई पाहणारा सावतामाळी; पाण्यात पाय सोडून बसलेला बालकवींचा औंदुबर; नितळ न्याहारीला काळा वायू घेणारी मर्ढेकरांची झाडं; गीतरामायण लिहिताना झालेल्या उन्मनी अवस्थेचे वर्णन 'चंद्रभारल्या जिवाला नाही कशाचीच चाड; मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड' अशा शब्दांत करणारे गदिमा; 'प्रत्येक झाडामाडा त्याची त्याची रुपकळा, प्रत्येक पानाफुला त्याचा त्याचा तोंडवळा' म्हणत प्रत्येक माणसातलं वेगळेपण शोधणारे, पावसाळ्यात 'वेली ऋतुमती झाल्या गं' असं लिहून जाणारे बोरकर; तमाच्या तळाशी दिवे लागल्याचा अपूर्व अनुभव 'रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले; तिथे मोकळा मी मला हुंगिताना, उरी गंध कल्लोळुनि फाकले' अशा शब्दांत मांडणारे शंकर रामाणी; निष्पर्ण तरुंच्या राईत 'झाडांत पुन्हा उगवाया'ची आस लागलेले ग्रेस; 'आणिक तुझिया लाख स्मृतींचे, खेळवीत पदरात काजवे; उभे राहुनी असे अधांतरी, तुजला ध्यावे, तुजला ध्यावे' अशी रक्तामध्ये ओढ मातीची लागलेल्या इंदिराबाई संत; युगानुयुगीच्या चिर-तंद्रीत कृष्णाची प्रतीक्षा करणार्या राधेला 'जलवाहिनी निश्चल कृष्ण, वन झुकले काठी राधा, विप्रश्न' म्हणणारे पु. शि. रेगे; 'ग्रासली झाडे दिशांनी नग्नदेही, कोरड्या डोळ्यांत आता थेंब नाही' असं लिहून जाणारे महानोर; 'रांडेपेक्षा आहे रांड, मुलापेक्षां आहे मूल' असे रोखठोक वर्णन करणार्या विंदांचे 'उगाचफूल'; काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग लिहिणारे दासू वैद्य; 'नेमस्त झाड मी आहे, मूळ फांद्या जिथल्या तिथे' म्हणणारा संदीप खरे; गद्यातले उदाहरण द्यायचे झाले तर अंतू बर्व्याच्या दारातला गेली चाळीस वर्षं न मोहरलेला हापूस, 'कोसला'मध्ये वेताळाच्या टेकडीवरचं झाड पाहून - 'खरं झाड म्हणजे जमिनीत असतं. वरचं झाड म्हणजे आतडी, फुफ्फुसं असं. माणसाचं जमिनीत काय आहे?' असे आणि तत्सम प्रश्न पडणारा पांडुरंग सांगवीकर किवा बर्ट्रांड रसेलला 'गर्भश्रीमंतीचे झाड' म्हणणार्या पद्मजा फाटक; चौकट राजातलं बोन्सायच्या झाडाचं उघड रुपक आणि जवळचा भाग असूनही गूढ, अज्ञात राहिलेल्या देवराईचं तरल प्रतीक; शाकुंतलातील 'आद्ये वः कुसुमप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः' अशा शकुंतलेच्या वर्णनापासून ते रुदालीत गुलजारच्या 'तेरा छूंआ लागे, मेरी सूखी डाल हरियाए' पर्यंत अक्षरशः एक प्रबंध लिहिता येईल इतकी उदाहरणं सापडतील.
...
जन्माला, नवनिर्मितीला पालवीची उपमा अगदी प्राचीन आहे. आणि ह्या वाढणार्या अंकुराला पाहून, 'सोसंल का त्याला, ऊन वारा पानी' म्हणत धास्तावणारे जन्मदात्यांचे वात्सल्यही तितकेच सनातन. द. भि. धामणस्कर त्यांच्या 'बरेच काही उगवून आलेले' मधल्या 'केळीचे पान' या कवितेत म्हणतात तसे -
...तर हिरव्या पाना
अस्तित्वाच्या लांबलचक देठाभोवती मातीनं
सुरक्षित गुंडाळून ठेवलेलं तुझं
शैशव उलगडत जाताना मी
किती हळुवार, किती हळवा झालो होतो हे
तुला नीट सांगताही येणार नाही आता मला...
सुरुवातीच्या पहाटत्या हिरव्यात
अधिकाधिक हिरवेपण कसे भरत गेले याचा
क्षणाक्षणांचा हिशेब माझ्या डोळ्यांत...
आता ऐन नव्हाळीत एक सौंदर्यसंपन्न हिरवा
तुझ्यात काठोकाठ भरून आणि मी
बराचसा कृतार्थ तुझा
आत्यंतिक उत्कटतेचा दिवसही
पाहतो आहे म्हणून्; तसा खूपसा भयभीतही -
तथाकथित जगरहाटीनुसार तुझ्या विनाशाला आता
कधीही सुरुवात होईल म्हणून...
मला दिसते आहे, प्राणपणाने
जपावे असे काही तुझ्यात - तू
एक देखण्या पूर्णत्वाचं प्रतीक तुझ्या अखंडतेत;
या प्रदेशातून वाहणारे चंचल वारे मात्र
माझ्याशी सहमत नाहीत. भय वाटते ते
त्यांचेच...
स्त्री ही क्षणाची पत्नी, पण अनंतकाळची माता असते असं म्हणतात. तसंच पत्नीत 'गृहिणी सखी सचिवः' च्या जोडीला आईपण शोधणार्या पुरुषालाही पितृसुलभ वात्सल्याची भावनाही जाणवत असतेच. अशाच समजूतदार, प्रेमळ सख्याच्या रुपातली पु. शि. रेग्यांची 'शेवगा' ही छोटेखानी कविता.
दोन प्रहर. निवांत सारें.
श्रमभराने बाजेवरतीं
पांगुळलेली तू.
खिडकीबाहेर ढाळितो चवरी
आसुरलेला शेवगा दारचा.
'सा विद्या या विमुक्तये' सारखाच प्रगल्भ प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे हा आपल्या वात्सल्याचे बंधन न होऊ देण्याचा. अडनिड्या वयात उगाच रागावून अबोल होऊन बसणारी टीन-एजमधली मुलं काय किंवा वेगळ्या वाटा शोधायला घर सोडून निघालेलं तारुण्य काय; सोशिक अनाग्रही आईबाप धामणस्करांच्या 'परिपक्व' झाडांसारखेच -
रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही...
मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;
गाणे आपल्याच कंठात उद्भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत...
कशासाठी जगावं, हा प्रश्न कळतं झाल्यापासून प्रत्येक टप्प्यावर पडत असावा. पण वृद्धत्वात आणि 'मिड-लाईफ'मध्ये कदाचित जरा जास्तच वेळा. बोरकरांची ही कविता, अनंत काणेकरांच्या त्या प्रसिद्ध लघुनिबंधातलं तत्त्वज्ञानच सांगते ('दोन मेणबत्त्या'मधील दुसर्यासाठी जगलास तर जगलास, स्वत:साठी जगलास तर मेलास); पण जरा बदलून. 'स्वतःला विसरून दुसर्यांसाठी जगा' पेक्षा 'स्वतःबरोबरच दुसर्यांनाही आनंद देत जगा' असे. गीतेतल्या वर मुळे, खाली फांद्या असलेल्या अश्वत्थ वृक्षाचे रूपक रंजक आहेच, पण आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता जितके जमतील तितके वेगवेगळे अनुभव घ्या, असं शेवटच्या ओळीत सांगणारे बोरकर या एका ओळीतूनच 'बाणा कवीचा' दाखवून जातात. आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात त्यातले इतर अन्वयार्थही स्पष्ट होत जातातच.
कुणासाठी तरी या रे, या रे मोडून फळांनी
कुणासाठी तरी झुका, झुका जडून फुलांनी
कुणासाठी तरी, या रे गाढ भरून सुखांनी
कुणासाठी तरी, गा रे मुक्त सहस्र मुखांनी
पसरून पाळेमुळे, धरा धरित्रीचा तळ
पानोपानी खेळवा रे, तिच्या कुसव्याचे जळ
भुजाबाहूंनी कवळा, स्वैर धावणारे वारे
लक्ष हिरव्या डोळ्यांत, रात्री बिंबवा रे तारे
व्हा रे असे अलौकिक, लोकी येथल्या अश्वत्थ
कंप भोगा शाखापर्णी, मुळी राहून तटस्थ
उत्पत्ती, स्थितीबरोबरच लयाचा निर्देश करण्यासाठीही झाडांचं रूपक वापरलं जातं. छान पिकत जाणार्या वृद्धत्वाची तुलना अनाग्रही, समजूतदार झाडांशी होणे साहजिकच. वाढत्या वयात, कळत जाते तसे राग-रोष सरून एक अलिप्त एकटेपणा येतो. पाडगावकर म्हणतात तसा 'सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालण्याचा' समजूतदारपणा. 'जो तो आपापला येथे कुणी ना आधार' चा शहाणा स्वीकार. अशा वेळी, बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर -
कळत जाते तसे, कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून, कसे तळ्यामधेच पेंगू लागतात
अशी अवस्था होते. बोलण्यात वारंवार पिकल्या पानांचे, वठलेल्या खोडाचे संदर्भ येतात. असं असलं तरी, मागे वळून पाहताना मनाच्या एका समाधानी अवस्थेत, आपलं आयुष्य अगदीच काही वाया गेलं नाही अशी कृतकृत्यतेची जाणीवही कधी दिलासा देऊन जाते. 'जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले, तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले' सारखी. द. भा. धामणस्करांची ही शेवटची कविता अशीच नम्र कृतार्थतेची भावना अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त करते -
तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...
[समाप्त]
वाचने
13600
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
किती, किती
In reply to किती, किती by यशोधरा
सहमत
नितांतसुंदर
शब्दांच्या पलिकडे...
दुबळी माझी झोळी
In reply to दुबळी माझी झोळी by अभिजीत
+१
In reply to दुबळी माझी झोळी by अभिजीत
+१
शांता शेळक्यांच्या एका लेखातून
वा वा वा, नंदन!!
In reply to वा वा वा, नंदन!! by चतुरंग
सहमत आहे
In reply to वा वा वा, नंदन!! by चतुरंग
सहमत
अप्रतिम!
फारच सुंदर
In reply to फारच सुंदर by प्रियाली
आणखी काय म्हणावे
उत्तम
नंदनसायबा,
दोन्ही लेख अत्युत्कृष्ठ
नंदन
सुंदर लेख!!!
व्वा..
धन्यवाद
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
फार सुंदर
वा!!
सुरेख !!!
झाडे...
.
अप्रतिम
मिपा क्लासिक-४-ब