Skip to main content

मुंबई लोकलने प्रवास कसा करावा?

लेखक साधा मुलगा यांनी शनिवार, 18/06/2016 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईची रेल्वे लोकल(उपनगरीय रेल्वे सेवा) हा मुंबईच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. १६ एप्रिल १८५३ साली पहिल्यांदा भारतातच नव्हे तर आशिया खंडामध्ये सर्वात पहिले रेल्वेची गाडी धावली ती मुंबईतच. तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा रेल्वेचा प्रवास थक्क करणारा आहे. आज जी काही मुंबईची प्रगती झाली,विकास झाला त्यात मुंबईच्या लोकल रेल्वेचा मोठा वाटा आहे. जरा का मुंबईत रेल्वे नसती तर मुंबईची कशी आणि किती प्रगती झाली असती याबाबत शंकाच आहे. मुंबईच्या दळणवळणाचा विचार केल्यास रेल्वेचा प्रवास मुंबईमध्ये अतिशय स्वस्तातला आणि कमी वेळात होणारा आहे. (जर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर traffic असेल तर रेल्वेने कमी वेळात पोहोचतो असा स्वतःचा अनुभव आहे). त्यामुळेच मुंबईत रेल्वेच्या जवळ असणाऱ्या घरांना जास्त भाव असतो. realestateवाले आपल्या जाहिरातीत स्टेशन पासून १० मिनिटेअंतरावर वगैरे जाहिरातीत लावत असतात. सध्याचा मुंबई लोकलचा प्रवास मात्र जीवघेणा झाला आहे. रोज मुंबई लोकलमधून सुमारे ७५ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणारा मुंबईकर सरासरी रोज किमान २-३ तास तरी प्रवास करतो(जाऊन येऊन). त्यातही पुढे रिक्षा बस असेल तर विचारायलाच नको. पूर्वी लोकलने प्रवास करणारी लोक जी आता म्हातारी झाली आहेत त्यांनाही प्रवासाची दगदग सहन होत नाही. मागे व्हात्साप्प वर एक मेस्सागे होता, “ मुंबईत माणसं प्रवासाची salary घेतात बाकी जॉब वगैरे अंधश्रद्धा आहे.” सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रवास करणे हे अर्ध रक्त आटवणारे आहे. कितीही प्रयत्न केले तरी या गर्दीवर काही उपाय आहे असे मला वाटत नाही. कारण मुंबईची लोकसंख्या हि फुगत चालली आहे आणि जागा कमी आहे. कितीही रेल्वेचे डबे अथवा गाड्यांची संख्या वाढवली तरी काही फरक पडणार नाहीये. त्यामुळे तुडुंब भरून जाणारी गर्दी , होणारे अपघात , डब्यात होणारी भांडणे हे चित्र अजून काही वर्षे तरी बदलेल असे वाटत नाही. आपले रेल्वे मंत्री काही चांगल्या उपाययोजना करत आहेत पण त्यामुळे काही चित्र बदलेल अशी शक्यता नाही. मी दररोज कामाच्या निमित्ताने लोकलने प्रवास करतो. मिपावरील बरेच लेख मी गाडीत बसून, उभे राहून वाचलेले आहेत. लोकलच्या प्रवासाबद्दल काही माहितीपर लेख लिहावा असे बरच दिवसापासून मनात होते. जेणेकरून रेल्वेने प्रवास करणार्यांना याचा उपयोग होईल. माझा रेल्वेने प्रवास करण्याचा अनुभव हा जेमेतेम ६-७ वर्षांचा आहे. लोक नोकरीची ३०-४० वर्षे रेल्वेने प्रवास करत आहेत , करत राहतील त्यामानाने माझा अनुभव तोकडा आहे, त्यामुळे अनुभवी मिपाकरांनी यात भर घालावी अशी विनंती. या धाग्याचा विस्तारभयास्तव तीन भागात विभागण्याचा विचार आहे. १) मुंबई लोकल रेल्वेची मुलभूत माहिती २) प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव आणि फुकटचे सल्ले ३) महत्वाच्या स्थानकांची माहिती, आजूबाजूचा परिसर आणि प्रेक्षणीय स्थळे मुंबई लोकल रेल्वेची मुलभूत माहिती तर मंडळी मुंबई लोकलने प्रवास करणे येरागबाळ्याचे काम नाही. पण तरीही सवयीने तुम्हाला कुठे कसे जायचे याची माहिती झाली, प्लॅटफॉर्म क्रमांक समजले , दिशा समजल्या कि लोकल प्रवास करणे कठीण नाही. लेखाची सुरुवात करण्यापूर्वी m-indicator या एका उपयुक्त app ची ओळख करून देतो. जर मुंबई लोकलने प्रवास करणार असाल , करत असाल, तर नक्की हे app download करा. सचिन टेके नावाच्या एका मराठी मुलानेच हे app तयार केलेले आहे, यात मुंबईच्या सर्व मार्गावरील लोकल, बस, मेट्रो यांचे वेळापत्रक, तिकिटाचे दर याची माहिती अक्षरशः एका क्लिक वर मिळते. आता यावर पुण्याच्या PMT चे वेळापत्रकही मिळते. इतरही शहरात या app चा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे. mumbai local map मुंबई लोकल हि मुख्यत्वे भारतीय रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत येते. लोकलच्या चार मुख्य lines आहेत. (वरील नकाशा बघा, नकाशाच्या सहाय्याने संदर्भ घेऊन वाचल्यास चांगले समजेल, नकाशा आंतरजालावरून साभार , जर इथे दिसत नसेल तर ही लिंक बघावी ) १) सेन्ट्रल लाईन- (याला मेन लाईन असेही म्हणतात). ही लाईन छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST पूर्वीचे विक्टोरिया टर्मिनस अथवा VT) ते कल्याण (K) पर्यंत आहे आणि पुढे ती दोन दिशेला दुभागली जाते. एक कल्याणपासून कर्जत(S) पर्यंत आणि पुढे कर्जत ते खोपोली(KP) पर्यंत. कर्जत पासून मुंबई लोकलचा प्रवास संपतो पुढे हि लाईन पुण्याकडे- दक्षिणेला जाते. यामुळे या स्थानकाचे indication ‘S’ असे करतात. दुसरी कल्याणपासून कसाऱ्यापर्यंत(N) आहे. इथे लोकलचा प्रवास संपतो आणि हि लाईन उत्तरेकडे – मनमाडमार्गे नाशिकच्या दिशेने जाते. खालीलप्रमाणे एकूण ४८ स्थानके क्रमाने येतात. CST-मस्जिद बंदर – sandhurst रोड- भायखळा – चिंचपोकळी-करी रोड-परळ-दादर-माटुंगा-सायन(शिव)-कुर्ला-विद्याविहार-घाटकोपर-विक्रोळी-कांजुरमार्ग-भांडुप-नाहूर-मुलुंड-ठाणे-कळवा-मुंब्रा-दिवा-कोपर-डोंबिवली-ठाकुर्ली-कल्याण. दक्षिण दिशेला- कल्याण-विठ्ठलवाडी-उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर-वांगणी-शेलू-नेरळ-भिवपुरी रोड-कर्जत ते पुण्याकडे कर्जत ते खोपोली-पळसदरी-केळवली-डोलावली-लौजी-खोपोली. कल्याणपासून उत्तर दिशेला- आंबिवली-शहाड-टिटवाळा-खडवली-वाशिंद-आटगाव-खर्डी-कसारा. दादर ते मुंबई CST या भागात ऑफिस बिल्डिंग जास्त (commercial area) आहेत, दादर पासून ठाण्याकडे आणि पुढे कल्याण डोंबिवली ते कर्जत कसारा पर्यंत नागरी वस्ती जास्त आहे. त्यामुळे सगळी गर्दी सकाळी दादर ते CST या स्थानकांकडे वळलेली असते. CST ते मुलुंड हि स्थानके BMC म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येतात तर ठाण्यापासून पुढे ठाणे जिल्ह्यात येतात. मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना UP trains आणि बाहेर जाणाऱ्या गाड्यांना DOWN trains म्हणतात. एक्सप्रेस ट्रेनचे थांबे हे साधारणतः (सर्व गाड्यांना लागू नाही) कर्जत, कसारा, कल्याण , ठाणे, दादर या स्थानकांवर असतात. २) वेस्टर्न लाईन – हि चर्चगेट(C) पासून सुरुवात होऊन आता याचा पल्ला थेट डहाणू रोड (DN) पर्यंत गेला आहे. हि सरळसोट आहे ही कुठेही दुभागालेली नाही. डहाणू ला लोकल प्रवास संपतो पुढे हि लाईन सुरतकडे जाते. या लाईन वर सुमारे ३६ स्थानके आहेत. स्थानकांचा क्रम अश्या प्रकारे आहे: चर्चगेट –मरीन लाईन्स- चर्नी रोड- ग्रांट रोड- मुंबई सेन्ट्रल- महालक्ष्मी- लोवर परेल-elphinston रोड- दादर- माटुंगा रोड- माहीम- बांद्रा- खार रोड- सांताक्रूझ –विलेपार्ले-अंधेरी-जोगेश्वरी-गोरेगाव-मालाड-कांदिवली-बोरीवली-दहिसर-मीरा रोड-भाईंदर-नायगाव- वसई रोड- नालासोपारा-विरार-वैतरणा-सफाळे-केळवे रोड-पालघर-उमरोली-बोईसर-वाणगाव-डहाणू रोड इथे दादरच्या ते चर्चगेट मध्ये commercial ऑफिस बिल्डिंग खूप आहेत. सध्या अंधेरी आणि परिसरातही ऑफिसेस वाढली आहेत. तरी दादर ते अंधेरी आणि पुढे या परिसरात residential भाग जास्त आहेत. त्यामुळे सेन्ट्रल प्रमाणे इथेही सगळी गर्दी सकाळी दादर ते चर्चगेटच्या दिशेने वाहत असते. इथे बोरीवली पर्यंत BMC ची हद्द आहे त्यापुढे दहिसरपासून पालघर जिल्हा (पूर्वीचा ठाणे जिल्हा ) सुरु होतो. मुंबईला येणाऱ्या तसेच मुंबई बाहेर जाणाऱ्या गाड्यांचे थांबे साधारणतः (सर्व गाड्यांसाठी नाही) चर्चगेट,मुंबई सेन्ट्रल,दादर,अंधेरी,बोरीवली या स्थानकांवर वर असतात. ३) हार्बर लाईन – हि थोडी वेडी वाकडी आणि समजायला थोडी कठीण आहे. CST पासून चालू होऊन ती sandhusrt रोड ला वडालाकडे वळते आणि पुढे कुर्ला-वाशीमार्गे पनवेलला जाते. तसेच अंधेरी पासून चालू होऊन महिममार्गे वडाल्यास जाते. आणि पुढे कुर्ला-वाशीमार्गे पनवेलला जाते. मध्य रेल्वेचे लोकमान्य टिळक टर्मिनस(जे हार्बर लाईन वर नाहीये) हार्बरच्या टिळकनगर या स्थानकाला लागून आहे. हे सोडल्यास बाकी कुठल्याही लांब पल्ल्याच्या गाड्यांचा या लाईनशी संबंध येत नाही. ४) ठाणे–वाशी/पनवेल लाईन (नवी मुंबईसाठी) पहिले फक्त मालवाहतुकीसाठी असलेली लाईन पुढे २००४ नंतर प्रवासी वाहतुकीसाठी खुली झाली. यामुळे नवी मुंबईचा विकास झपाट्याने झाला. नवी मुंबईच्या घराच्या किमती वाढल्या, ऑफिस बिल्डिंग वाढल्या, तिथल्या कॉलेजेसना ठाणे-मुंबईचे विद्यार्थी मिळू लागले. या स्थानकांची रचना देखील आपल्या सेन्ट्रल आणि वेस्टर्नच्या स्थानाकांपेक्षा वेगळी आणि थोडी ऐसपैस आहे. सुरुवातीला हि लाईन फक्त ठाणे –वाशी एवढीच मर्यादित होती. नंतर तिला आता पनवेललाही जोडण्यात आले आहे. ठाणे ते तुर्भेपर्यंत असणारी लाईन पुढे दुभागून एक मार्ग वाशीकडे तर एक मार्गिका पनवेल कडे जाते. पुढे ह्या मार्गावर पहिले पेणपर्यंत आणि पुढे अलिबाग पर्यंत लोकल नेण्याचा रेल्वेचा विचार आहे असे समजते. कोकण रेल्वेच्या बहुतांश गाड्या या पनवेलला थांबतात मात्र पुढे ठाण्याला येण्याचा मार्ग हा दिव्यामार्गे आहे , कोकण रेल्वे ठाणे –वाशी/पनवेल या मार्गावरून येत नाही. या मार्गावरची लोकलची वारंवारता चांगलीच वाढली आहे पूर्वी अगदी अर्ध्या तासाने असणार्या गाड्या सकाळी गर्दीच्या वेळी ५-७ मिनिटाच्या फरकाने असतात तर इतर वेळीही सुमारे १० मिनिटाने असतात. पण गर्दी थोडीही कमी झालेली नाही , गाड्या तुडुंब भरून जातात. ५) डहाणू-पनवेल ,दिवा-वसई रोड गाड्या- याची वारंवारता फार कमी आहे, नीट वेळ बघून जावे लागते. काही ठराविक प्रवासी या गाडीने प्रवास करतात पण तरीही या गाड्यांना गर्दी असते. मुंबईत राहणाऱ्या अर्ध्या लोकांना असा काही रेल्वे मार्ग आहे हे देखील माहिती नसेल. डोंबिवलीच्या आधी लागणारे कोपर स्थानक बनविल्यापासून लोकांची चांगली सोय झाल्याचे समजते. दिवा आणि कोपर हि दोन main लाईन वरील स्थानके या लाईनशी जोडली गेली आहेत. काही एक्ष्प्रेस गाड्या आणि मालगाड्या या मार्गाने जाताना दिसतात. एका लाईन वरून दुसऱ्या लाईनला जाण्यासाठी महत्वाची जंक्शने: १) दादर : सेन्ट्रल वरून वेस्टर्नला जाण्यासाठी आणि vice-versa सेन्ट्रल दादर आणि वेस्टर्न दादर हि दोन वेगवेगळी स्थानके आहेत आणि ती तीन पुलांनी जोडलेली आहेत. त्यामुळे सेन्ट्रल लाईन वरून वेस्टर्न अथवा vice-versa जायचे असेल तर दुसर्या लाईनच्या स्थानकावर येऊन गाडी पकडावी लागते. इथेच लोकांचा गोंधळ होतो. बरेच वेळा वेस्टर्नच्या फलाटावर उभे राहून कल्याण गाडीची वाट बघणारे लोक मी बघितले आहेत. २) कुर्ला : इथे दादरप्रमाणे दोन वेगेवेगळी स्थानके नाहीत. शेवटचे दोन प्लॅटफॉर्म हार्बरसाठी आहेत. ३) अंधेरी ते माहीम: हि स्थानके वेस्टर्न आणि हार्बरला सामाईक आहेत आणि पुढे माहीम पासून हार्बर लाईन वेगळी होते. असे जरी असले तरी हार्बर आणि वेस्टर्नचे प्लॅटफॉर्म वेगवेगळे आहेत. अंधेरीला नुकतेच प्लॅटफॉर्म क्र. १ आणि २ वर हार्बर गाड्यांसाठी खुले केले आहेत जे पहिले ९ आणि १० साठी होते. ४) ठाणे : ठाण्याचे प्लॅटफॉर्मक्रमांक ९ आणि १० हे वाशी गाड्यांसाठी आहेत बाकी १ ते ६ सेन्ट्रल रेल्वेसाठी आहेत. ५) याशिवाय तुम्हाला रस्ता माहिती असेल तर एलीफिनस्तन रोड आणि परळ हि दोन स्थानकेही पुलावरून जाऊ शकता. माटुंगा आणि माटुंगा रोड ही दोन स्थानके z-bridge ने (काही लोक s-brigde म्हणतात)जोडलेली आहेत. पण सध्या हा पूल दुरुस्तीच्या कारणासाठी बंद ठेवलेला आहे काही दिवसांनी पुन्हा चालू करतील. लोवर परेल आणि करी रोड स्थानकेही चालायच्या अंतराइतकी जवळ आहेत. ६) मेट्रो/मोनो रेल्वे : यातील मोनो रेल्वेचा फारसा काही उपयोग झालेला प्रवाश्यांना दिसत नाही. अत्यंत गाजावाजा झालेली हि ट्रेन सध्या तोट्यात आहे अश्या बातम्या आहेत. चेंबूर ते वडालाच्या दरम्यान हि मोनोरेल धावते ज्यामुळे काही मर्यादित लोकांना याचा उपयोग होतो. तिचा विस्तार जेव्हा दादर भागात होईल, KEM हॉस्पिटल वगैरे भाग टप्यात आले कि मग काहीसा उपयोग आहे असे म्हणता येईल. एकदा main लाईनला जोडले अथवा जवळ नेले तरच मोनो रेलचे पुनरुत्थान होईल नाहीतर कठीण आहे. मेट्रो रेल्वे : जेव्हा मेट्रो रेल्वे सुरु झाली होती तेव्हा मी दोन वर्षांपूर्वी त्यावर मी एक धागा काढला होता. मेट्रो रेल्वेचा मात्र लोकांना खूप फायदा झालाय. घाटकोपर ते अंधेरी आणि पुढे वर्सोवा पर्यंत जाणारी लोकांच्या खूप उपयोगाची आहे. घाटकोपर सेन्ट्रल रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानक हि जोडलेली आहेत म्हणजे अक्षरशः मेट्रोमधून उतरल्यावर तुम्ही घाटकोपरच्या १ नं. स्थानकावर येता. अन्धेरीलाही दोन्ही स्थानके जोडलेली आहेत पण इथे थोडे चालावे लागते. पुढच्या भागामध्ये मेट्रोचा उपयोग कसा करावा यावर सविस्तर लिहीन. पूर्व-पश्चिम दिशा आणि प्लॅटफॉर्मक्रमांक : साधारणतः रेल्वे हि दक्षिण मुंबई ते ठाणे अथवा बोरीवली अशी दक्षिणेकडून उत्तर दिशेने धावते. त्यामुळे मुंबईच्या उपनगरांचे पूर्व पश्चिम असे भाग पडतात. आता कुठल्या बाजूला पूर्व भाग येतो आणि कुठल्या बाजूला पश्चिम भाग येतो ही दिशा समजणे लोकांना अवघड जाते यासाठी काही क्लुप्त्या सांगतो तरीही कळले नाही तर सहप्रवासी किंवा पोलीस/ स्टेशन मास्तर भेटला तर विचारा. बहुतेक स्थानकांवर पूर्व/ पश्चिम अश्या पाट्या लावलेल्या आहेत पण त्या पुलांवर आहेत फलाटावर नाहीत, पण त्या आपल्याला दिसत नाहीत किंवा आपले लक्ष जात नाही. तुम्ही चर्चगेट/ CST दिशेने तोंड करून उभे असाल तर उजव्या बाजूला पश्चिम भाग येतो आणि डाव्या बाजूला पूर्व भाग येतो. जर तुम्ही कल्याण/कसारा/कर्जत अथवा बोरीवली/ विरार/डहाणू दिशेने तोंड करून उभे असाल तर उजव्या बाजूला पूर्व विभाग येतो आणि डाव्या बाजूला पश्चिम विभाग येतो. प्लॅटफॉर्मना क्रमांक हे पश्चिमेकडून पूर्वेकडे दिलेले आहेत. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १ हा पश्चिम दिशा दर्शवतो तर ४,६, १० जेवढे असतील तेवढे हे पूर्व दिशेला असतात. कधी कधी पश्चिम दिशेला नव्याने तयार झालेल्या फलाटाला क्रमांक १ न देता ७/८ असे नवीन क्रमांक देतात , असे अपवाद सोडल्यास पश्चिमेकडील पहिला प्लॅटफॉर्म हा १ नंबरच असतो. तसेच प्लॅटफॉर्म नं. १,२ हे स्लो गाड्यांसाठी असतात तर पुढचे (नेहमी नाही, एखादे स्थानक किती मोठे आहे त्यावर ठरते) फास्ट गाड्यांसाठी असतात. तिकीट खरेदी आणि पर्याय : तिकिटाचे सर्व दर तुम्हाला m-indicator वर तुम्हाला एका क्लिकवर मिळतील. किमान भाडे Rs.५ आहे पण प्लॅटफॉर्म तिकीट मात्र आता १० रुपये केले आहेत. म्हणजे ठाणे ते मुलुंड तुम्ही ५ रुपयात जाता येते पण नुसते प्लॅटफॉर्मवर उभे राहण्यासाठी १० रुपये मोजावे लागतील. रिटर्न तिकीटाची सुद्धा सोय आहे. परतीच्या प्रवासासाठी ते तिकीट दुसर्या दिवशीपर्यंत लागू असते. हापिसात जाणारी लोक मात्र पासचा वापर करतात. पास एका महिन्याचा आणि तीन महिन्याचा असे मिळतात. तीन महिन्याचे जास्त स्वस्त असतात हे सांगण्याची गरज नाही. आगाऊ पास मात्र देत नाहीत म्हणजे ज्या दिवशी पास संपत असेल त्याच्या दुसर्या दिवसापासून पास मिळतो पण त्या आधी एक दिवस आधी जरी गेलात तरी पुढच्या तारखेचा देत नाही असा अनुभव आहे. आता online सुद्धा पास काढायचा पर्याय उपलब्ध आहे( मी तरी असा काढला नाहीये) college मधील मुलांना वयाच्या २५ शी पर्यंत पासावर सुमारे ४०% सूट मिळते(आमच्यावेळी तरी होती). फर्स्ट क्लासचा नेहमी पास काढतात, तरीही एका वेळेसाठी फर्स्ट क्लासचे तिकीट काढणारे महाभागही मी पहिले आहेत. तुम्हाला कंपनीकडून खर्च मिळणार असेल तर वेगळी गोष्ट आहे. तुम्ही मुंबईत फिरायला आला असाल तर एक ४४० रुपयांचा tourist पास मिळतो ज्यायोगे तुम्ही फर्स्ट क्लासनी मुंबईच्या कुठल्याही लाईनवर (उपनगरीय सेवेच्या अंतर्गत येणारी सर्व स्थानके) तीन दिवसांसाठी प्रवास करू शकता. तिकीट काढायचा पारंपारिक उपाय म्हणजे तिकीट खिडकीवर लाईन लाऊन तिकीट काढणे. पण याला सुद्धा बरेच जलद पर्याय आलेले आहेत. फक्त फर्स्ट क्लासच्या लोकांना तिकीट काढायला लाईन लावावी लागत नाही. ATVM म्हणजेच automatic ticket vending machine: हि खरी वापरासाठी लोकांना किचकट वाटतात पण एकदा सवय झाली कि मात्र वापरायला अतिशय जलद आहेत. मी आता सवयीने अक्षरशः ५ सेकंदात तिकीट काढू शकतो. त्याचा वापर करण्यासाठीचा डेमो येथे मिळेल. त्यासाठी तुम्हाला smart कार्ड खरेदी करावे लागते जे तिकीट खिद्दकीवर मिळते. ५० रुपये डीपोझिट आणि ५० रुपये वापरायला असे १०० रुपयांना मिळते. पुढे तुम्ही ५० ते ५०० रुपयांपर्यंत रिचार्ज करू शकता. लोकांना वापरता येत नाही म्हणून काही वेळा रेल्वेचे लोक गर्दीच्या वेळी स्वतः बसून तुम्हाला तिकीट काढून देतात. यात काही मायनस पोइन्टस आहेत ते म्हणजे तुम्हाला तिकिटाच्या slab नुसार तिकीट मिळत नाही. उदा. दादर ते अंधेरी हे तिकीट तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला तेवढेच तिकीट मिळते, इथे जर का तुम्ही तिकीट खिडकीवर काढलेत तर ते तुम्हाला बोरीवली पर्यंतचे मिळेल कारण दादरपासून अंधेरी ते बोरीवली तिकिटासाठी १० रुपयेच लागतात. तसेच तुम्ही एकाच वेळी दोन अथवा जास्त तिकिटे काढलीत तर त्यासाठी एकच तिकीट येते ज्यावर दोन किंवा जास्त तिकिटांची नोंद असते. म्हणून मग अश्यावेळी प्रत्येकासाठी वेगवेगळी तिकिटे काढत बसावी लागतात. हे दोन दुर्गुण वगळता ATVM मशीन अत्यंत सुलभ आणि जलद आहे. अधिकृत रेल्वे तिकीट केंद्रे: रेल्वेने काही लोकांना फ्रांचायझी देऊन रेल्वे तिकीट counters( म्हणजे proper stall/दुकाने असतात) काढायला दिले आहेत. तुम्हाला स्टेशन परिसराबाहेर हटकून असे counters दिसतील. यात प्रत्येक प्रवासामागे तुम्हाला १ रुपया ज्यादा द्यावा लागतो (कायदेशीररीत्या त्याचा उल्लेख तुमच्या तिकिटावर असतो काळजी नसावी) म्हणजे रिटर्नला २ रुपये जास्त द्यावे लागतात. तुम्हाला घाई गर्दी असेल अथवा तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर यासारखा दुसरा चांगला पर्याय नाही. गर्दीच्या वेळी मात्र मोठ्या स्टेशनजवळ या counters वरही गर्दी होते. प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव आणि माहिती , गाडी गर्दीच्या वेळी गाडी कशी पकडावी यासारखे सल्ले पुढच्या भागात तोवर आपली रजा घेतो, आणखी काही माहिती हवी असल्यास आणि काही उणे दुणे राहिल्यास लक्षात आणून द्यावेत. क्रमश:
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 29961
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

In reply to by सचु कुळकर्णी

पश्चिम रेल्वेचा इतिहास पाहिलात तर त्याची सुरुवात बॉम्बे-बरोडा & सेन्ट्रल इंडिया कंपनी म्हणून सुरुवात झाली होती, त्यामुळे मराठी , हिंदी ,इंग्रजी सोबत गुजुरती पाट्याही होत्या हे त्यामागचे मूळ कारण.अधिक माहितीसाठी विकिपीडियावरील ही लिंक पहा. मलाही काही छान माहिती मिळाली.चर्चगेट च्या पुढे कोलाबा नावाचे स्टेशन होते १९३३ सालापर्यंत ही एक नवीन माहिती मला मिळाली. ही रेल्वेसेवा पुढे १९५१मध्ये इतर पश्चिम राज्यांच्या रेल्वेसेवेशी जोडून पश्चिम रेल्वे बनवण्यात आली. बाकी तीन भाषांमधून होणाऱ्या घोषणेबाबत सहमत. पुढील स्टेशन ‘वांद्रे’, अगला स्टेशन ‘बांद्रा’, नेक्ष्त स्टेशन ‘बॅंड्रा’ याला काही अर्थ नाही.

(हाच प्रतिसाद वर भलतीकडेच पडला आहे, कृपया तो उडवावा ) लोकल गाड्यांच्या डब्यांच्या वर जो पेंटोग्राफ असतो , तो ज्या ज्या डब्यांवर असतो, त्या डब्यात प्रवासामध्ये अधून मधून घुरर S S घुरर असा आवाज येतो. याचा आजारी किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ शकतो, या साठी युक्ती अशी की, मोटरमन आणि गार्ड पासून २ , ५ , ८ आणि ११ व्या डब्यावर असा पेंटोग्राफ असतो (मोटरमन आणि गार्ड कडून २,५ , ८ , ११ वे डबे तेच येतात, जो डबा मोटरमन कडून दुसरा तो गार्ड कडून मोजल्यावर ११ वा इ. ), असे डबे वगळून गाडीत चढायचे.

फारच उत्तम व माहितीपूर्ण लेख. जुने दिवस आठवले, कॉलेजची सहा आणि नोकरीची चार अशी दहा वर्षे लोकल ने प्रवास केला. नंतर सुदैवाने (की दुर्दैवाने) खंड पडला. आता तर सवय सुटली आहे. नातेवाईकंकडे जायचे झाल्यास उलट दिशेने प्रवास करण्यास प्राधन्य देतो. प्रामाणिक पणे सांगायच झाल्यास लोकल चा प्रवास सुटल्याने खालील तोटे झाले. १) सकाळी अर्ध्या तासात आवरायचो, आता कुठे लोकल पकडायची आहे म्हणून आरामात आवरतो. २) दिवसातून किमान चार ते सहा वेळा जिने चढ उतार केल्याने आपोआप व्यायाम व्हायचा, आता व्यायाम व्हावा म्हणून कचेरिचे जिने चढ-उतर करतो. ३) सगळ्यात महत्वच म्हणजे मित्र भेटायचे आणि थेट संवाद व्हायचा, आता फक्त WhatsApp वर. असो, पुढील लेखातून अधिक मार्गदर्शन आपेक्षित. तूर्तास धन्यवाद.

लोकहो, आता सुरसुरी आलीये तर लिहूनच टाकतो आठवते ती माहिती. १. बोरीबंदर : बोरीची झाडं होती. जवळ बंदर आहे. म्हणून बोरीबंदर. इथे पुढे व्हिक्टोरिया टर्मिनस नामे स्थानक ब्रिटिशांनी उभारलं. पुढे याचं १९९५ च्या आसपास कलमाडींनी छत्रपती शिवाजी टर्मिनस केलं. मी मात्र यास गोब्राह्मणप्रतिपालक-क्षत्रियकुलावतंस-प्रौढप्रतापपुरंदर-सिंहासनाधीश्वर-महाराजाधिराज-छत्रपति-श्रीशिवाजीमहाराज टर्मिनस असं संबोधतो. २. मशीद : इथे शनवारतेल्यांची म्हणजे बेणे इस्रायली यहुद्यांची मशीद आहे. जवळच्या साम्युअल स्ट्रीटवर. कोकणात सिनेगॉगला मशीद म्हणतात. ३. स्यांडहर्स्ट रोड : माहीत नाही. नाव बदलून डोंगरी ठेवायला हवं. ४. भायखळा : भाया नावाच्या माणसाचे खळे म्हणजे शेत होते ते भायाखळे. ५. चिंचपोकळी : चिंच आणि पोकळीची झाडं चिक्कार. पोकळी म्हणजे काय ते माहीत नाही. ६. करी रोड : माहित नाही. बदलून लालबाग करा. ७. परळ : परळी सारखं नाव. ८. दादर : म्हणजे जिना किंवा भुयार ९. माटुंगा : मातंगशाला यावरून पडलं. मातंग = हत्ती १०. शीव : म्हणजे गावची वेस. सायन हा आंग्लोच्चार आहे. ११. कुरला : कुरल्या नामे खेकड्यांवरून पडलं. (जवळंच चेंबूर आहे चिंबोरीवरून पडलेलं, पण ते खाडीमार्गावर आहे.) १२. विद्याविहार : सोमय्या न्यासाची शिक्षणकेंद्रे आहेत. १३. घाटकोपर : घाटाचं कोपर. म्हणजे काय ते माहित नाही. कोपर हे नाव मुंबईच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी दिसतं. १४. विक्रोळी : मूळ नाव विखरोळी. अर्थ माहित नाही. १५. कांजूरमार्ग : अर्थ माहित नाही. कांजूर सारखे अंजूर हे गाव भिवंडीपाशी आहे. १६. भांडूप : अर्थ माहित नाही. तत्सम नावही सापडलं नाही. १७. नाहूर : अमाना. पहूर, माहूर, इत्यादी तत्सम नामे. १८. मुलुंड : मूळ नाव मुळुंद. अमाना. १९. ठाणे : श्रीस्थानक. अगदी रेल्वे सुरू व्हायच्या आधीपासूनही हे स्थानकच आहे. २०. कळवा : अमाना. कळवे मूळ नाव. बहुतेक हे एक भौगोलिक नाव आहे. २१. मुंब्रा : मुंबरे. मुंब ही भौगोलिक संज्ञा वाटते. मुंबई, मुंबके इत्यादि गावे कोकणात आहेत. मुंबरे वरून मुंबरकर आडनाव आहे. २२. दिवा : मूळ नाव दिवे. परिसरात अंजूर दिवे आणि केवणी दिव अशी दोन इतर गावे आहेत. २३. कोपर : अमाना २४. डोंबिवली : अमाना २५. ठाकुरली : अमाना. ठाकरांवरून पडलेले दिसते. २६. कल्याण : कोणाचं कल्याण ते माहीत नाही. नाशिक फाटा धरूया. २७. शहाड : अमाना. बहुतेक शहा + हाट म्हणजे रॉयल मार्केट असावे. महाड सारखे वाटत्ते. २८. आंबिवली : आंबीची आवली म्हणजे ओळ. अमाना. २९. टिटवाळा : अमाना. काश्मिरात टिथवाल नावाचे गाव आहे. ३०. खडवली : खडाची आवली. अमाना. ३१. वाशिंद : अमाना. ३२. आसनगाव : कसलेसे आसन असावे. अमाना. ३३. आटगाव : आट म्हणजे आड का? एखादी विहीर होती काय? ३४. खर्डी : मूळ नाव खरडी. अमाना. ३५. कसारा : एखादे कासार म्हणजे तळे होते काय? कल्याणहून पुणे फाटा धरूया. ३६. विठ्ठलवाडी : आधुनिक नाव दिसते. अर्थ उघड आहे. ३७. उल्हासनगर : स्वातंत्र्योत्तर सिंधी निर्वासितांच्या वसाहती बांधल्या. त्यावेळी उल्हास नदीवरून नवं नाव ठेवलं. ३८. अंबरनाथ : इथल्या सुप्रसिद्ध हेमाडपंती शिवमंदिरावरून पडलं. ३९. बदलापूर : अमाना. मात्र रेल्वे स्थानक कुळगावात आहे. ४०. वांगणी : अमाना. वांग किंवा वेंग हा शब्द कोकण, विदर्भ व आंध्रात अनेक गावांत आढळतो. ४१. शेलू : अमाना. बहुतेक शिला म्हणजे टणक खडक यावरून पडलं. कल्याणजवळ शिळफाटा हे तत्सम नाम आहे. ४२. नेरळ : अमाना. ४३. भिवपुरी : भिवा नावाचा कोणी राजा होऊन गेला असावा. ४४. कर्जत : मूळ नाव करजत. कर आणि जत ही दोन नावे जोडून केलेले वाटते. नगर जिल्ह्यात याच नावाचे एक गाव आहे. ४५. पळसदरी : अर्थ उघड आहे. ४६. जामरुंग (केबिन) : जांबरुख म्हणजे जांबवृक्ष अर्थात जांबाची झाडे होती. ४७. ठाकुरवाडी (केबिन) : अर्थ उघड आहे. ४८. मंकी हिल : अउआ. बदलून मर्कटवाडी करायला हवं! ४९. खंडाळे : खंडाचे आळे? अमाना. रायगड आणि सातारा जिल्ह्यात हेच नाव आढळते. ५०. लोणावळे : लोणाचे आळे? की लोणाची आवळी? अमाना. आता खोपोली फाटा पकडूया. ५१. केळवली : अमाना. ५२. डोलवली : अमाना. ५३. लावजी : म्हणजे काय? ५४. खोपोली : खोपवली? खोपाची ओळ? आता करजत पनवेल फाटा. ५५. चौक : ? ५६. दांड : दंड? का आजून काही? ;-) ५७. शेडुंग : निवडुंग सारखं नाव वाटतं. या नावाची वनस्पती आहे का? ५८. पनवेल : पानवेलींवरून पडलं. नेरळ माथेरान रेल्वेवरील स्थानके जुम्मापट्टी, वॉटर पाईप, अमन लॉज पूर्णपणे नवीन नावांची आहेत. तर माथेरान म्हणजे डोंगराच्या माथ्यावरील रान. हुश्श ! उरलेली नावं नंतर. आ.न., -गा.पै.