Skip to main content

सैराट : माझीही एक भर

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 07/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
हा सैराटचा रिव्ह्यू नाही. या सिनेम्यामुळे आलेले मनातले असंबद्ध विचार तितक्याच असंबद्ध रितीने मांडायचा प्रयत्न समजा. असंबद्ध का तर.. सिनेमाबद्दल लिहायचं तर त्यातले कुठलेही कोर्सेस केलेले नाहीत. स्वयंपाक जमत नाही पण खायला जमतं, त्यामुळे मीठ मसाला कमी जास्त झालाय हे कळतं त्याच कुवतीने सिनेमाबद्दल लिहीणार आहे. सिनेमाबद्दल लिहीलं की सिनेक्षेत्राशी संबंधित काही जण अगदी वेड्यात काढत असतात. खरं म्हणजे इतकी वर्षे सिनेमा पाहत आल्यावर समोर जे दिसतं त्याबद्दल आपणही बोलावं असं वाटतंच की. पण त्या त्या व्यक्तीचा त्या क्षेत्रातला अधिकार मान्य असतो. पण काही वेळा अशा व्यक्तींना कारचा रिव्ह्यू लिहीताना पाहीलंय. अशा वेळी कारबद्दल तांत्रिक माहिती नसताना कसं काय तुम्ही लिहीता असं आपण विचारू नये . आपण इतकंच लक्षात ठेवावं की सिनेमा ही चलचित्रभाषा आहे. मुद्दा असा की योगायोगाने मी मागच्या वेळी पहिला गद्य लेख लिहीला तो फॅण्ड्रीबद्दल होता. त्या वेळी याच कारणाने भीत भीत लिहीलं होतं. आता पुन्हा लिहीताना त्याच दिग्दर्शकाचा सिनेमा आलेला आहे. फॅण्ड्री बद्दल प्रत्येकालाच लिहावंसं का वाटत होतं आणि आता सैराट बद्दलही का लिहावंसं वाटतंय हा प्रश्न सारखा सतावतोय. कदाचित प्रेक्षक बदलतोय. त्याला हवे ते बदल नागराज मंजुळेच्या निमित्ताने त्याला मिळालेत. माजिदीचे सिनेमे आमच्या प्रेक्षकांना अनंत काळापासून आवडत होते. नागराज येण्याआधी केतन मेहताही आवडला होताच की. पण केतन मेहता कळालेले प्रेक्षक त्या काळी खूप थोडे असावेत. भिवनी भिवाई या सिनेमाने देशी परदेशी सिनेरसिकांना वेड लावलं होतं. नंतर आलेल्या मिर्चमसाला ने केतन मेहता हे नाव कुठल्या कुठे जाऊन पोहोचलं. त्या वेळीही प्रत्येकाला मिर्च मसाला बद्दल लिहावंसं वाटलं होतं. मी तर म्हणेन भिवनी भिवई हा फॅण्ड्री पेक्षा थेट भाष्य करणारा सिनेमा होतं. तरी पण त्यात आणखी काही तरी शिल्लक राहत होतं, ते म्हणजे गोष्ट दाखवण्यची पद्धत. नेमकं तेच फॅण्ड्री मधे दिसल्यावर लोकांना तोच आनंद झाला. पण यावेळी सामान्यांनी देखील या प्रकारच्या सिनेमाबद्दल लिहीलं. त्या वेळी खरं म्हणजे हा सिनेमा जातव्यवस्थेवर आहे अशा समजुतीतून अनेकांनी लिहीलं होतं. त्यामुळेच पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे त्या त्या क्षेत्रातल्या जाणकारांचा मान ठेवायला पाहीजे असं म्हटलं होतं. फॅण्ड्री ही अयशस्वी कहाणी आहे जिला गावगाड्यातल्या व्यवस्थेचे पदर आहेत. एक वास्तव जे पडद्यावर सहसा येत नाही. केतन मेहताने ते दाखवलं होतं. हे सिनेमे स्वप्नाळू नव्हते. थेटच बोलणारे होते. फापटपसारा टाळून बोलणारे. जब्याचं अयशस्वी प्रेम. त्याची स्वप्नं आणि शेवटी त्याचं अगतिक होत नको असलेल्या व्यवस्थेला शरण जाणं इतकाच त्या सिनेमाचा आवाका होता. ते दाखवण्याची पद्धत माझ्यासारख्या भोळसट प्रेक्षकाला नवखी वाटली. कंटाळवाणा वाटूनही काहीतरी नवीन पाहतोय याचा आनंद होता. त्यामुळे लिहावंसं वाटलं होतं. आणि आता सैराट. या ही सिनेमाच्या वेळी लोक हा सिनेमा जातीव्यवस्थेवर आहे असं म्हणतात. जात तर कुठेच दिसली नाही. सामाजिक उतरंड आहे ती कुठल्याही कारणाने असू शकते. हिंदी सिनेमातले क्लिशे म्हणजे अमीर गरीब दाखवण्यापेक्षा गावगाडाच दाखवायचं धाडस सैराट करतो. सिनेमा नीट पाहीला तर सुरूवातीच्या क्रिकेट कमेण्ट्री मधे पाटलांचं आगमन झाल्यानंतर सर्वांची बदललेली देहबोली. त्या आधी फ्लेक्सवरच्या गंमतीजमती. असं बरंच काही कॅमेरा टिपत राहतो. हा सिनेमा कानानी ऐकायचाही आहे आणि डोळ्यांनीही ऐकायचा आहे कारण इथे कॅमेरा सुरूवातीपासून बोलत राहतो. कथा काय आहे यापेक्षा कथेतली माणसं उलगडण्याची पद्धत ब्रिलियंट आहे. आर्चीचे वडील आर्चीचे लाड वगैरे करताना दाखवलेले नाहीत. ऊस, गावची सत्ता, राजकारण आणि पुढारीपण यातून आलेल्या अनेक गोष्टी पाटील झालेले कलाकार छान दाखवतात. त्यांच्या कामाबद्दल फारसे बोलले गेलेले नाही. त्यांना यापूर्वी पाहीलेय असे वाटत राहते. हसरा चेहरा ठेवूनही राखलेला दरारा अतिशय सहज दाखवलेला आहे. दांडगा गडी हा अतिशय समर्पक शब्द वापरलेला आहे. सत्तेच्या पदामुळे असलेले उच्चस्थान, त्याचा अभिमान, गावातल्या इतरांनी पायरीप्रमाणे राहील्याने सुखावलेला इगो या पार्श्वभूमीवर नंतर जेव्हां विजयी उमेदवाराचा सत्कार त्याच स्टेजवर करावा लागतो तेव्हां दाखवलेली हताश देहबोली बरंच काही सांगते. त्याचं कारण काय हे त्याच्या चेह-यावर आपण वाचतो. पाटलीणबाई वेळप्रसंगी आई म्हणून अगतिक होताना दाखवलीये. सूक्ष्म बारकावे आहेत. मुलीचे आणि आईचे संवाद टिपतानाही नागराजने प्रत्येक संभाषणातून बदल दाखवला आहे. अनेकांना सिनेमा पहायचा असल्याने त्याबद्दल लिहीत नाही. फ्रेम्स किंवा कॅमेरा याचे ज्ञान नाही. त्यावर अनेक जाणकारांचे बोलूनही झालेले आहे. पण एक साधारण प्रेक्षक म्हणून जाणवलेला फरक म्हणजे मध्यांतरापर्यंत कॅमे-याने करमाळ्यासारख्या ठिकाणी अप्रतिम दृश्ये टिपलेली आहेत. प्रेमकहाणी फुलत असताना रम्य दृश्यांची रेलचैल आहे. अशक्य सुंदर चित्रं दिसत राहतात. हिरवंगार रान दिसत राह्तं. पण मध्यंतरानंतर कॅमेरा वेगळीच भाषा बोलतो. शहरातली बकाल दृश्ये दाखवताना पडदा रखरखीत वाटू लागतो. कथेतही त्याच वेळी बदल होत जातो. मध्यंतरानंतर मात्र नागराजने बॅटींग केली आहे. कॅमे-याचा वापर करत अनेक गोष्टी नागराज बोलतो. जातपंचायतीच्या दृश्याबद्दल जितकं बोललं गेलंय तितकं ते काही अंगावर येत नाही. सगळीच खरी माणसं धरून आणलीत कि काय असं कास्टिंग असल्याने हा प्रसंगही खराखुरा घडतोय असं वाटत राहतं. बाकि त्यात विशेष काही नाही. तो प्रसंग नसता तरी चाललं असतं असं मला वाटलं. नायक नायिका पळून जातात तेव्हां सल्याचा मित्र (चांगला मोठा दाखवलाय वयाने) त्यांची समजूत काढतो. त्याच्या लेक्चरमधे कुणालाच रस नसतो. जिवाला घाबरून मदत न करणा-यांच्या या शैलीची पण दखल घेतलीय. त्याचं ही म्हणणं खोटं नसतं. पण परक्या मुलखात मदत करणारी माणसं भेटतात. माणुसकीवर विश्वास असल्याचं दिग्दर्शक सांगतो. या सिनेमाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे ही नायिकाप्रधान कहाणी आहे. आर्ची ही बंडखोरीचं प्रतिक आहे. पुरूषप्रधान व्यवस्थेवर ती आसुड ओढत राहते. नायकाला सोडवायलाही तीच पुढाकार घेते. तसंच छाया कदम या अभिनेत्रीने साकारलेली अम्मा वागते. ती ही बंडखोरच. पळून आलेली. आता झालेली परवड.किडा मुंगीसारखं जिणं याला न कंटाळता आयुष्याची लढाई लढणारी. अशा अनेक गोष्टी सिनेमा पहायला जाणा-या प्रेक्षकाला अपील करत राहतात. नागराज मंजुळे तळागाळातून आलेला आहे म्हणून हा आमच्या माणसाचा सिनेमा आहे या कारणामुळेही अनेकांना लिहावंसं वाटतंय. लय भारीच्या वेळीही अशीच हवा होती. लय भारी ची तुलना इथे अनाठायी आहे खरं तर. पण सांगायचं म्हणजे मार्केटिंग मधे लभा कुठेही कमी पडला नाही. हवा केली, मात्र असं कुणाला लिहावंसं वाटलं नव्हतं. त्यामुळे अगदी तळगाळातला मनुष्य त्याला समजेल तसं या वेगळ्या सिनेमाबद्दल लिहीतो याचं कौतुकच वाटतंय. मराठी सिनेसृष्टीने प्रेक्षकांची बदललेई आवड लक्षात घेऊन सैराटद्वारे त्यांना साद घातली आणि बॉल प्रेक्षकांच्या कोर्टात टाकला. प्रेक्षकांनी अपेक्षेपेक्षा त्याला डोक्यावर घेऊन बॉल पुन्हा सिनेमावाल्यांच्या कोर्टात ढकलला आहे. चांगल्या कलाकृती बनवा आम्ही त्याचं सोनं करू हेच सांगितलेले आहे. प्रतिक्रियांचाही विचार करूयात. सिनेमा कमर्शियल असावा का, अजय अतुलचं संगीत कशाला हवं असे प्रश्न उपस्थित केले गेलेत. या प्रश्नाला आत्ताच असे प्रश्न का हे उत्तर नाही पटत. फॅण्डॄला उत्कृष्ट होता , त्याने धंदा किती केला ? सात ते आठ कोटी.पण सिनेमाच एक कोटीच्या आत झाला होता. कलाकारांनी मानधन घेतलेलं नव्हतं. त्यामुळे तो फायद्यात गेला असं म्हणता येईल. पण सैराट सारखी उच्च निर्मितीमूल्य असलेली कलाक्रुती हवी असेल तर खच्र होणार. त्याला तसा निर्माता लागणार. त्याचीही काही अपेक्षा असणार. त्याचा विचार नागराजने केला आणि तरीही तो सिनेमा व्यापून उरलाय. कलावंताला सिनेमा कमर्शियल की आर्ट फिल्म याचा फारसा फरक पडत नाही हे त्याने दाखवून दिलेलं आहे. त्याच्याकडे पैसे जमतील तेव्हां कदाचित तो हव्या तशा फिल्म्स बनवेल. सध्या तरी त्याच्याकडून फक्त आर्ट फिल्मच्या अपेक्षा ठेवणे अन्यायकारक आहे. सिनेमा जातीयवादावर आहे का ? स्पॉयलर अ‍ॅलर्ट सिनेमा ऑनर किलिंगबद्दल आहे. योनीशुचितेच्या खुळचट कल्पनांमधून आलेल्या पुरूषप्रधान मानसिकतेबद्दल, प्रतिष्ठेच्या विकृत कल्पनांबद्दल आहे. यात जातीचा संबंध सर्वात शेवटी, तो ही असला तर. जात काही दृश्यात दिसते, पण जो प्रचार चालू आहे त्याच्या एक शतांश देखील नाही. शेवटचं दृश्य अत्यंत परिणामकारक, सुन्न करणारं आणि अनेक प्रश्नांचं वादळ डोक्यात उठवणारं आहे. ती पावलं झोप उडवणारी आहेत. इथून पुढे प्रत्येक पालकाला तुम्ही मुलांना स्वातंत्र्य देणार नसाल तर जन्म देऊ नका असं सांगायचा कायदा असावा असा विचार डोक्यात यावा असं ते दृश्य आहे. आपल्या सूखापायी मूल जन्माला घालणा-यांना त्याची किंमत कळत नाही हेच खरं. मुलावर संस्कार करा आणि शांत बसा इतकं साधं अजून कळत नाही. ज्यांना मुलांना द्यायला वेळ नाही त्यांना मुलंच होऊ नयेत. इथून पुढे वाचू शकता सैराटने अशी चर्चा करायला भाग पाडलंय. एक परिपूर्ण कलाक्रुती पहायचा अनुभव तर मिळतोच. परश्याचे मित्र ,त्यातल्या त्यात लंगड्या या अतिशय सुंदर भूमिका आहेत. आपल्याला आवडलेल्या मुलीचं प्रेम मिळत नाही हे स्विकारणारा लंगड्या हे सूचक भाष्य आहे. मन सैराट करणारा अनुभव आहे एकंदरीत. ( चुभूद्याघ्या ) उरलेलं प्रतिसादातून बोलूयात :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9234
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

हा पिच्चर खरंच बघायचा असेल तर, परश्या आणि आर्ची वर लक्षच देउ नका, ते दोघं नुसत्या चेरी आहेत केकवर लावलेल्या,खरा केक बाकी उरलेला आहे आणि तोच जास्त चांगला आहे...

लय भारी हा कोणता सिनेमाय हे काही केल्या आठवत नाहीय ;) परिक्षण आवडलं . माझ्या ब्लॉगवरील या सिनेमाबद्द्ल लिहीलेले काही पुढे पेस्टवतेय सैराट पाहिला, आवडला. चित्रपटाचा वेळ जास्त आहे वैगेरे वाचलं होतं. पण चित्रपटाचा वेग आणि प्रेक्षकाला गुंगवून ठेवणं या बाजू एवढ्या जबरदस्त, की वेळ चाललाय असं नाही वाटलं. अतिशय ताजा, वेगळा आणि संवेदनाशील मनाने बनवलेला सिनेमा. यातली नायक- नायिका शाळकरी नाहीत १३वी तील दाखवले आहेत. भारतीय समाजात ज्याला रुढार्थाने जात म्हणतात तश्या जातीवर फार भाष्य नाही. जन्मजात जातींबरोबर अजून एक जात असते स्त्री आणि पुरुष. दुसरी जात म्हणजे सत्ताधारी- धनदांडगे आणि स्वत:च्या आयुष्यावरही सत्ता नसलेले आणि गरिब. बाकी जन्माने आलेली जात वैगेरे या दोन जातीमधल्या लढायात वापरण्याची हत्यारं. या जातींमधले ताणेबाणे या सिनेमाने असे दाखवले आहेत की क्या बात! मुलगी शिकली- प्रगती झाली, हे म्हणायला सोपंय पण ही प्रगती समाजातल्या कित्येकांना पचवता येत नाही. नोकरी करुनही आपल्या पैशांच्या नियोजनाचा अधिकार नसणारी, केवळ परंपरा म्हणून अनेक न पटणार्‍या गोष्टी वेळप्रसंगी स्वत:ला त्रास देऊन करणार्‍या शहरी स्रीपेक्षा यातली नायिका वरच्या स्लोगनला जागते. "किड्यामुंगीसारखं नाही जगावं वाटत", म्हणत आपल्या बळावर अचानक भेटलेल्या वास्तवाला धीरानं तोंड देणारी. कृष्णाच्या थाटात नायिकांची छेड काढणारे हिरो (चपलेने फोडून काढावेसे वाटणारे हे हिरो त्यातल्या हिरविणींना कसेकाय आवडतात ते तो ब्रम्हदेवच जाणे) दाखवून वीट आणणार्‍या मराठी सिनेमात ही विहिरीत पोहणार्‍या पुरुषांना पळवून लावणारी, सक्तीने आणलेल्या वधुपरिक्षेच्या प्रसंगात रड्याऐवजी राग दाखवणारी म्हणजे सुखद बदल आहे. त्याच प्रसंगात नायक मात्र मला तिला एकदाच बघायचय म्हणत रडतोय. अर्थात परिस्थितीची योग्य जाणीव त्याच्या स्थानामुळे त्याला आहे, तिला नाही. पण तरिही ती आपल्या सन्मानाला जपण्यासाठी आलेला प्रत्येक प्रसंग प्रचंड ताकदीने पेलते. आतापर्यंतच्या सिनेमात पळून आलेले नायक-नायिका रम्य ठिकाणी झोपडीबिपडी बांधून रहायचे. आणि लग्न झालेलं असल्याने दिग्दर्शकानं आपापल्याला नेमून दिलेली कामं करायचे. हे ही झोपडीत रहाताय. पण असं रहाणं तिला असह्य होणारं आहे, याची जाणीव असणारा नायक आहे. लग्नानंतर आपल्या पुरुषी स्वभावावर जात तिच्यावर संशय घेऊनही तिच्या नसण्याने कोसळणारा नायक आहे. जाणिवांशी प्रामाणिक रहाणार्‍यांवर परिस्थितीने आणलेल्या प्रसंगानं आयुष्याला सैराटपणाच्या वाटेवर नेलं तरिही ते रेषेवर ठेवत रहाण्यासाठी हिम्मत लागते ती पुरुषापेक्षा स्त्रीमध्येच असते आणि तिला पुरुषातल्या कोमलतेची साथ मिळाली की ते आयुष्य खूप सुंदर होतं. नक्की बघा. मुलांनाही दाखवा. मुलगी पसंत, सासू हवी, आणि लाडकी सून या मालिकांमधल्या किंवा नुस्त्या पाठांतरावरल्या संस्कारांपेक्षा मुलांना विचार करायला लावेल असा हा सिनेमा दाखवायला काहिही हरकत नाही. प्रेमाचा रस्ता लग्नापर्यंतच नाही तर त्यापुढे जास्त निसरडी असतो हे त्यांनाही नीटच कळेल, आणि त्या वाटेवर पाय रोवून ठामपणे उभं रहाणं सुद्धा.

In reply to by अंतरा आनंद

अजुन भर घालून स्वतंत्र धागा काढला असता तरी चालला असता कारण यात अजुन एक वेगळ्या दृष्टीचं लेखन होतं. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by अंतरा आनंद

नक्की बघा. मुलांनाही दाखवा. मुलगी पसंत, सासू हवी, आणि लाडकी सून या मालिकांमधल्या किंवा नुस्त्या पाठांतरावरल्या संस्कारांपेक्षा मुलांना विचार करायला लावेल असा हा सिनेमा दाखवायला काहिही हरकत नाही. प्रेमाचा रस्ता लग्नापर्यंतच नाही तर त्यापुढे जास्त निसरडी असतो हे त्यांनाही नीटच कळेल, आणि त्या वाटेवर पाय रोवून ठामपणे उभं रहाणं सुद्धा.
१००% पटल

In reply to by पूर्वाविवेक

माझ्या लिखाणाच्या पद्धतीमुळे मला म्हणायचे आहे त्याचा चुकीचा अर्थ घेतलात आपण. हा पॅरा मला असा लिहायला आवडेल बेगडी संस्कार शिकवण्यापेक्षा मुलांना विचार करायला लावेल असा हा सिनेमा दाखवायला काहिही हरकत नाही. प्रेमाचा रस्ता लग्नापर्यंतच नाही तर त्यापुढे जास्त निसरडी असतो हे त्यांनाही नीटच कळेल, आणि त्या वाटेवर पाय रोवून ठामपणे उभं रहाणं एकमेकांना समजून घेत किती सुंदर होऊ शकतं हेसुध्दा (आणि त्या सुंदरतेचा आपल्या अंहभावाने कसा विचका होऊ शकतो हे आपणही बघावं) . मला वाटतं हे जास्त स्पष्ट आहे.

In reply to by अंतरा आनंद

मस्तच लिहीलंय. डॉक्टरसाहेब म्हणतात तसा स्वतंत्र लेख होईल हा.
तरिही ते रेषेवर ठेवत रहाण्यासाठी हिम्मत लागते ती पुरुषापेक्षा स्त्रीमध्येच असते आणि तिला पुरुषातल्या कोमलतेची साथ मिळाली की ते आयुष्य खूप सुंदर होतं.
हा अर्क आहे तुमच्या लेखाचा. खूपच छान.

एकंदरित आमच्या नागराजभाऊने बऱ्याचजणांना कामाला लावलेलं दिसतंय!! हे अर्थातच एका अर्थी सामाजिक विचारांची/भावनांची कूस बदलत असल्याच लक्षण आहे असं मी म्हणेन. जे की चांगल आहे नव्हे, गरजेचं आहे!! हेही लेखन भावलं! Sandy

चित्रपटाबद्दलचं परीक्षण आवडलं. चित्रपटाची एक एक घडी चांगली उलगडून दाखवली आहे. ''सिनेमाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे ही नायिकाप्रधान कहाणी आहे. आर्ची ही बंडखोरीचं प्रतिक आहे. पुरूषप्रधान व्यवस्थेवर ती आसुड ओढत राहते. नायकाला सोडवायलाही तीच पुढाकार घेते. तसंच छाया कदम या अभिनेत्रीने साकारलेली अम्मा वागते. ती ही बंडखोरच. पळून आलेली. आता झालेली परवड.किडा मुंगीसारखं जिणं याला न कंटाळता आयुष्याची लढाई लढणारी.'' खासच. लिहित राहा. बाकी, सैराट चित्रपटाबद्दल अजुन पाच तरी समीक्षणं आली पाहिजेत. "तू परशाला हात तर लावून बघ नाही तुझं थोबाड फोडलं तर नावाची आर्ची नाय..." "तुज्यासारखं गुटखा खाऊन मरण्यापेक्षा आर्चीच्या प्रेमात मेलेलं बर..." "मला तर खरंच वाटेना मी इथं आहे, अन तू माज्या संग बोलतीया...त्यात खरं न वाटायला काय झालं...मी खरंच आले..." " मला तर एक मिनिट पण एका वर्षासारखं वाटायला लागलयं...तुझी शपथ...मला करमत नाही तुज्याशिवाय..." -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

__/\__

अस्ल्याने फार आवडला. आणि कुठेही सैराटच्या खाम्द्यावरून आप्ली मते/पुर्वग्रह फेकली नाहीत त्याचा आनंद. सुगरण असल्याने, हे चवीपुरते मसाले,पुरक पदार्थ वापरले आहेत ते लेखात ठाईठाई जाणवते. पुलेशु नाखु

सिनेमा पाहतांना सारख काहीतरी वेगळं पाहत असण्याची जण होत होती. सिनेमात जे काही जातीवाचक आहे ते आजची समाजिक घडी दाखवण्या पुरतंच दाखवलं गेलं आहे.जर आर्चि आन परश्या दुसऱ्या जातीतील असते तरी माझ्या मते असच काहीस घडलं असत. हा सिनेमा जातीपाती वर आधारित बिलकुल नाहीये. मंजुळे साहेबानी एकाच वेळी बऱ्याच गोष्टी ताकतीने उभ्या करून दाखवल्या आहेत. मध्यंतरीच्या आधी जे काही आपल्या समोर मांडलं जात, ते कुठल्याही गावात तसच असेल, इतकं प्रभावी आणि एकदम मस्त पद्धतीने मांडलं आहे. इथेच चित्रपट आपल्या मनाचा पक्का ताबा घेतो. आणि मध्यंतरा नंतर.... मंजुळे साहेबानी काही प्रश्न उभे आपणा सर्वां समोर उभे केलेले आहेत. जस की, पळून जाणे फार सोप्पी गोष्ट आहे हो, पण निभावणं? यानंतरच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण याच काय? त्यातही मंजुळे साहेबानी आशावाद दाखवलाय. हे फार भावलं. आणि सगळ्यात शेवटी आपल्या संपूर्ण भारतीय समाजाला मारलेली "झापड" तिथेच हात जोडले. _/\_

In reply to by बाबा योगिराज

पळून जाणे फार सोप्पी गोष्ट आहे हो, पण निभावणं? यानंतरच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण याच काय? हो, असाच मेसेज अजून लहान असणार्‍यांनी घ्यावा अशी अपेक्षा असेल. एक अतिषय साधी गोष्त आमच्या शेजार्‍यांनी केली होती ते आठवले. त्यांचा मुलगा व एक मुलगी यत्ता सातवी व आठवीत असतानाच प्रेमात पडली. घरी समजल्यावर आततायीपणे निर्णय घेण्याऐवजी त्या दोन्ही फ्यामिलीज एकत्र येऊन बसून बोलल्या. दोघांनाही प्रेमाने समजावले. एकमेकाला सहज म्हणून घरी भेटत राहण्यास परवानगी दिली म्हणजे बाहेर कोणी यांचा गैरफायदा घ्यायला नको. शिवाय जे चाललय ते मोठ्या लोकांच्या समोर आहे. आधी शिक्षण, नोकरी, पैसे अमूक एक रकमेपर्यंत साठवा व लग्न करा असे समजावल्यावर मुलांनीही ते ऐकले. यात मध्येच कुठेतरी हे नातं संपण्याची शक्यताही होतीच! तसे झाले नाही. मुले चांगली शिकली, नोकर्‍या केल्या व आईवडिलांनी सांगितलेल्या व्यवहारी गोष्ती पूर्ण करून लग्न केले. हे आमच्यासमोर होत होते व सहज होत होते म्हणून कोणाला काही जाणवलेही नाही. लग्न यशस्वी होण्याची वाट थोडी सुकर झाली. नंतरच्या अडचणी कोणाला चुकल्यात? पण मुलांना मार्ग दाखवणे हे काम बरोबर झाले.

In reply to by रेवती

अतिशय सुंदर प्रतिसाद आहे. खरं तर फेसबुक वर व्हायरल व्हायला हवी ही पोस्ट. मुलांची आयुष्यं आपल्या मर्जीनुसार व्हायला हवीत, मूल हे आपली प्रॉपर्टी आहे हे समजणं एक टोक आणि कुठलाही विचार न करता कपाळमोक्ष करून घेणे हे एक टोक. यातला सुवर्णमध्य आहे यात.

छान लिहिलंय .... सैराट मलाही आवडलाय, गारुड केलंय मनावर पण एके ठिकाणी सैराट च्या निमित्ताने जुन्या आठवणी लिहिल्या आहेत त्या वाचल्या. ती बाजूही पटली. त्यासाठी पुढील लिंक पहा. https://www.facebook.com/priya.prabhudesai.9/posts/1066214120115948

In reply to by पूर्वाविवेक

हो. वाचलाय तो लेख फेसबुकवर. आजपर्यंत कयामत से कयामत तक सारखे अनेक सिनेमे येऊन गेले जे तुफान चालले. पण कधीही अशी चर्चा झाल्याचे आठवत नाही. सैराटच्या निमित्ताने अशा चर्चा होतात, लोकांचे वेगवेगळे दृष्टीकोण मांडले जातात हे नवीन आहे. सिनेमा संपल्यानंतर आपण तो डोक्यात घेऊन घरी जातो. त्या लेखात अनेक उदाहरणे दिली आहेत. पण प्रेम हे ठरवून होत नाही. पालकांनी मुलांना निर्णय घेण्याइतपत सक्षम करावं, त्यांचे निर्णय त्यांना घेता येतील असे संस्कार द्यावेत, त्याबद्दल त्यांनी घरात सांगितलं पाहीजे असं विश्वासाचं नातं निर्माण करावंं एव्हढंच म्हणता येईल. त्यांच्या निर्णयावर फारतर साधकबाधक चर्चा होईल. निर्णय लादणे चूकच. प्रत्येक पालकाने हे समजून घेतलं तर फसवणूक झाल्याची भावना शिल्लक राहणार नाही आणि पळून जाण्याची पाळी मुलांवर येणार नाही.

In reply to by सांजसंध्या

खरं तर सिनेमा न पाहताच त्याच्या निमित्ताने लिहीलेय हे कौतुकास्पद वाटलं .. फॅण्ड्री बद्दलचं लेखिकेचं मत पण असंच कौतुकास्पद ! असा संदेश दिल्याचं जाणवलं नाही.

छान लिहिलंयस गं सांजसंध्या! मलाही यात काय आवडलं असेल तर दिग्दर्शनातलं डिटेलिंग.

सुंदर लिहिलंय. आत्तापर्यंत वाचून एवढं कळलंय की शेवट वाईट आहे. मला स्वतःला वाईट शेवट आवडत नाहीत म्हणून हा चित्रपट बघणार नाही. पण असं वाटतंय की दिग्दर्शकाचा शेवट वाईट करायचा निर्णय चित्रपटाला पूरक ठरतोय. चित्रपटाचा विषय हा कितीतरी घरामधला वास्तव असू शकतो. किमान त्या घरातल्या लोकांनि आपल्या मुलांना विरोध करताना किती करायचा आणि कुठपर्यंत करायचा ह्याचं भान आल तरी शेवट दुखद केला ते चांगला झालं असं म्हणेन मी.

नागराज येण्याआधी केतन मेहताही आवडला होताच की. पण केतन मेहता कळालेले प्रेक्षक त्या काळी खूप थोडे असावेत. बास पुढे वाचवले नाहि नागरा़ज असेल एक छान दिग्दर्शक पण जो उच्छाद लोक मांडतात आणि ...वगैरे...वगैरे ते फार होत

ती पावलं झोप उडवणारी आहेत.. खरच .. आणि खुप छान लिहिलेले आहे.. आज मिपावर आलो आणि सैराट मय झालो .. रविवारीच पिक्चर पाहिला आणि गाण्यासाठी अजुन एकदा पाहिनच .. गाणी खुप मस्त .. माझ्या भाषेतील म्हणुन.. बाकी पर्श्या आणि आणि अर्ची सोडुन असलेली पात्रे ही तितकीच खरी अआणि परिनाम कारक आहेत हे नक्कीच

आवडलं. चित्रपट बरा वाटला. प्रदीप आणि सलीम ही पात्र विशेष आवडली.