सैराट : माझीही एक भर
हा सैराटचा रिव्ह्यू नाही. या सिनेम्यामुळे आलेले मनातले असंबद्ध विचार तितक्याच असंबद्ध रितीने मांडायचा प्रयत्न समजा.
असंबद्ध का तर..
सिनेमाबद्दल लिहायचं तर त्यातले कुठलेही कोर्सेस केलेले नाहीत. स्वयंपाक जमत नाही पण खायला जमतं, त्यामुळे मीठ मसाला कमी जास्त झालाय हे कळतं त्याच कुवतीने सिनेमाबद्दल लिहीणार आहे. सिनेमाबद्दल लिहीलं की सिनेक्षेत्राशी संबंधित काही जण अगदी वेड्यात काढत असतात. खरं म्हणजे इतकी वर्षे सिनेमा पाहत आल्यावर समोर जे दिसतं त्याबद्दल आपणही बोलावं असं वाटतंच की. पण त्या त्या व्यक्तीचा त्या क्षेत्रातला अधिकार मान्य असतो. पण काही वेळा अशा व्यक्तींना कारचा रिव्ह्यू लिहीताना पाहीलंय. अशा वेळी कारबद्दल तांत्रिक माहिती नसताना कसं काय तुम्ही लिहीता असं आपण विचारू नये . आपण इतकंच लक्षात ठेवावं की सिनेमा ही चलचित्रभाषा आहे.
मुद्दा असा की योगायोगाने मी मागच्या वेळी पहिला गद्य लेख लिहीला तो फॅण्ड्रीबद्दल होता. त्या वेळी याच कारणाने भीत भीत लिहीलं होतं. आता पुन्हा लिहीताना त्याच दिग्दर्शकाचा सिनेमा आलेला आहे. फॅण्ड्री बद्दल प्रत्येकालाच लिहावंसं का वाटत होतं आणि आता सैराट बद्दलही का लिहावंसं वाटतंय हा प्रश्न सारखा सतावतोय. कदाचित प्रेक्षक बदलतोय. त्याला हवे ते बदल नागराज मंजुळेच्या निमित्ताने त्याला मिळालेत. माजिदीचे सिनेमे आमच्या प्रेक्षकांना अनंत काळापासून आवडत होते.
नागराज येण्याआधी केतन मेहताही आवडला होताच की. पण केतन मेहता कळालेले प्रेक्षक त्या काळी खूप थोडे असावेत. भिवनी भिवाई या सिनेमाने देशी परदेशी सिनेरसिकांना वेड लावलं होतं. नंतर आलेल्या मिर्चमसाला ने केतन मेहता हे नाव कुठल्या कुठे जाऊन पोहोचलं. त्या वेळीही प्रत्येकाला मिर्च मसाला बद्दल लिहावंसं वाटलं होतं. मी तर म्हणेन भिवनी भिवई हा फॅण्ड्री पेक्षा थेट भाष्य करणारा सिनेमा होतं. तरी पण त्यात आणखी काही तरी शिल्लक राहत होतं, ते म्हणजे गोष्ट दाखवण्यची पद्धत.
नेमकं तेच फॅण्ड्री मधे दिसल्यावर लोकांना तोच आनंद झाला. पण यावेळी सामान्यांनी देखील या प्रकारच्या सिनेमाबद्दल लिहीलं. त्या वेळी खरं म्हणजे हा सिनेमा जातव्यवस्थेवर आहे अशा समजुतीतून अनेकांनी लिहीलं होतं. त्यामुळेच पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे त्या त्या क्षेत्रातल्या जाणकारांचा मान ठेवायला पाहीजे असं म्हटलं होतं. फॅण्ड्री ही अयशस्वी कहाणी आहे जिला गावगाड्यातल्या व्यवस्थेचे पदर आहेत. एक वास्तव जे पडद्यावर सहसा येत नाही. केतन मेहताने ते दाखवलं होतं. हे सिनेमे स्वप्नाळू नव्हते. थेटच बोलणारे होते. फापटपसारा टाळून बोलणारे.
जब्याचं अयशस्वी प्रेम. त्याची स्वप्नं आणि शेवटी त्याचं अगतिक होत नको असलेल्या व्यवस्थेला शरण जाणं इतकाच त्या सिनेमाचा आवाका होता. ते दाखवण्याची पद्धत माझ्यासारख्या भोळसट प्रेक्षकाला नवखी वाटली. कंटाळवाणा वाटूनही काहीतरी नवीन पाहतोय याचा आनंद होता. त्यामुळे लिहावंसं वाटलं होतं.
आणि आता सैराट.
या ही सिनेमाच्या वेळी लोक हा सिनेमा जातीव्यवस्थेवर आहे असं म्हणतात. जात तर कुठेच दिसली नाही. सामाजिक उतरंड आहे ती कुठल्याही कारणाने असू शकते. हिंदी सिनेमातले क्लिशे म्हणजे अमीर गरीब दाखवण्यापेक्षा गावगाडाच दाखवायचं धाडस सैराट करतो. सिनेमा नीट पाहीला तर सुरूवातीच्या क्रिकेट कमेण्ट्री मधे पाटलांचं आगमन झाल्यानंतर सर्वांची बदललेली देहबोली. त्या आधी फ्लेक्सवरच्या गंमतीजमती. असं बरंच काही कॅमेरा टिपत राहतो. हा सिनेमा कानानी ऐकायचाही आहे आणि डोळ्यांनीही ऐकायचा आहे कारण इथे कॅमेरा सुरूवातीपासून बोलत राहतो.
कथा काय आहे यापेक्षा कथेतली माणसं उलगडण्याची पद्धत ब्रिलियंट आहे. आर्चीचे वडील आर्चीचे लाड वगैरे करताना दाखवलेले नाहीत. ऊस, गावची सत्ता, राजकारण आणि पुढारीपण यातून आलेल्या अनेक गोष्टी पाटील झालेले कलाकार छान दाखवतात. त्यांच्या कामाबद्दल फारसे बोलले गेलेले नाही. त्यांना यापूर्वी पाहीलेय असे वाटत राहते. हसरा चेहरा ठेवूनही राखलेला दरारा अतिशय सहज दाखवलेला आहे. दांडगा गडी हा अतिशय समर्पक शब्द वापरलेला आहे. सत्तेच्या पदामुळे असलेले उच्चस्थान, त्याचा अभिमान, गावातल्या इतरांनी पायरीप्रमाणे राहील्याने सुखावलेला इगो या पार्श्वभूमीवर नंतर जेव्हां विजयी उमेदवाराचा सत्कार त्याच स्टेजवर करावा लागतो तेव्हां दाखवलेली हताश देहबोली बरंच काही सांगते. त्याचं कारण काय हे त्याच्या चेह-यावर आपण वाचतो.
पाटलीणबाई वेळप्रसंगी आई म्हणून अगतिक होताना दाखवलीये. सूक्ष्म बारकावे आहेत. मुलीचे आणि आईचे संवाद टिपतानाही नागराजने प्रत्येक संभाषणातून बदल दाखवला आहे. अनेकांना सिनेमा पहायचा असल्याने त्याबद्दल लिहीत नाही.
फ्रेम्स किंवा कॅमेरा याचे ज्ञान नाही. त्यावर अनेक जाणकारांचे बोलूनही झालेले आहे. पण एक साधारण प्रेक्षक म्हणून जाणवलेला फरक म्हणजे मध्यांतरापर्यंत कॅमे-याने करमाळ्यासारख्या ठिकाणी अप्रतिम दृश्ये टिपलेली आहेत. प्रेमकहाणी फुलत असताना रम्य दृश्यांची रेलचैल आहे. अशक्य सुंदर चित्रं दिसत राहतात. हिरवंगार रान दिसत राह्तं. पण मध्यंतरानंतर कॅमेरा वेगळीच भाषा बोलतो. शहरातली बकाल दृश्ये दाखवताना पडदा रखरखीत वाटू लागतो. कथेतही त्याच वेळी बदल होत जातो. मध्यंतरानंतर मात्र नागराजने बॅटींग केली आहे. कॅमे-याचा वापर करत अनेक गोष्टी नागराज बोलतो. जातपंचायतीच्या दृश्याबद्दल जितकं बोललं गेलंय तितकं ते काही अंगावर येत नाही. सगळीच खरी माणसं धरून आणलीत कि काय असं कास्टिंग असल्याने हा प्रसंगही खराखुरा घडतोय असं वाटत राहतं. बाकि त्यात विशेष काही नाही. तो प्रसंग नसता तरी चाललं असतं असं मला वाटलं.
नायक नायिका पळून जातात तेव्हां सल्याचा मित्र (चांगला मोठा दाखवलाय वयाने) त्यांची समजूत काढतो. त्याच्या लेक्चरमधे कुणालाच रस नसतो. जिवाला घाबरून मदत न करणा-यांच्या या शैलीची पण दखल घेतलीय. त्याचं ही म्हणणं खोटं नसतं. पण परक्या मुलखात मदत करणारी माणसं भेटतात. माणुसकीवर विश्वास असल्याचं दिग्दर्शक सांगतो.
या सिनेमाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे ही नायिकाप्रधान कहाणी आहे. आर्ची ही बंडखोरीचं प्रतिक आहे. पुरूषप्रधान व्यवस्थेवर ती आसुड ओढत राहते. नायकाला सोडवायलाही तीच पुढाकार घेते. तसंच छाया कदम या अभिनेत्रीने साकारलेली अम्मा वागते. ती ही बंडखोरच. पळून आलेली. आता झालेली परवड.किडा मुंगीसारखं जिणं याला न कंटाळता आयुष्याची लढाई लढणारी.
अशा अनेक गोष्टी सिनेमा पहायला जाणा-या प्रेक्षकाला अपील करत राहतात. नागराज मंजुळे तळागाळातून आलेला आहे म्हणून हा आमच्या माणसाचा सिनेमा आहे या कारणामुळेही अनेकांना लिहावंसं वाटतंय. लय भारीच्या वेळीही अशीच हवा होती. लय भारी ची तुलना इथे अनाठायी आहे खरं तर. पण सांगायचं म्हणजे मार्केटिंग मधे लभा कुठेही कमी पडला नाही. हवा केली, मात्र असं कुणाला लिहावंसं वाटलं नव्हतं. त्यामुळे अगदी तळगाळातला मनुष्य त्याला समजेल तसं या वेगळ्या सिनेमाबद्दल लिहीतो याचं कौतुकच वाटतंय.
मराठी सिनेसृष्टीने प्रेक्षकांची बदललेई आवड लक्षात घेऊन सैराटद्वारे त्यांना साद घातली आणि बॉल प्रेक्षकांच्या कोर्टात टाकला. प्रेक्षकांनी अपेक्षेपेक्षा त्याला डोक्यावर घेऊन बॉल पुन्हा सिनेमावाल्यांच्या कोर्टात ढकलला आहे. चांगल्या कलाकृती बनवा आम्ही त्याचं सोनं करू हेच सांगितलेले आहे.
प्रतिक्रियांचाही विचार करूयात.
सिनेमा कमर्शियल असावा का, अजय अतुलचं संगीत कशाला हवं असे प्रश्न उपस्थित केले गेलेत. या प्रश्नाला आत्ताच असे प्रश्न का हे उत्तर नाही पटत. फॅण्डॄला उत्कृष्ट होता , त्याने धंदा किती केला ? सात ते आठ कोटी.पण सिनेमाच एक कोटीच्या आत झाला होता. कलाकारांनी मानधन घेतलेलं नव्हतं. त्यामुळे तो फायद्यात गेला असं म्हणता येईल. पण सैराट सारखी उच्च निर्मितीमूल्य असलेली कलाक्रुती हवी असेल तर खच्र होणार. त्याला तसा निर्माता लागणार. त्याचीही काही अपेक्षा असणार. त्याचा विचार नागराजने केला आणि तरीही तो सिनेमा व्यापून उरलाय. कलावंताला सिनेमा कमर्शियल की आर्ट फिल्म याचा फारसा फरक पडत नाही हे त्याने दाखवून दिलेलं आहे. त्याच्याकडे पैसे जमतील तेव्हां कदाचित तो हव्या तशा फिल्म्स बनवेल. सध्या तरी त्याच्याकडून फक्त आर्ट फिल्मच्या अपेक्षा ठेवणे अन्यायकारक आहे.
सिनेमा जातीयवादावर आहे का ?
स्पॉयलर अॅलर्ट
सिनेमा ऑनर किलिंगबद्दल आहे. योनीशुचितेच्या खुळचट कल्पनांमधून आलेल्या पुरूषप्रधान मानसिकतेबद्दल, प्रतिष्ठेच्या विकृत कल्पनांबद्दल आहे. यात जातीचा संबंध सर्वात शेवटी, तो ही असला तर. जात काही दृश्यात दिसते, पण जो प्रचार चालू आहे त्याच्या एक शतांश देखील नाही.
शेवटचं दृश्य अत्यंत परिणामकारक, सुन्न करणारं आणि अनेक प्रश्नांचं वादळ डोक्यात उठवणारं आहे. ती पावलं झोप उडवणारी आहेत. इथून पुढे प्रत्येक पालकाला तुम्ही मुलांना स्वातंत्र्य देणार नसाल तर जन्म देऊ नका असं सांगायचा कायदा असावा असा विचार डोक्यात यावा असं ते दृश्य आहे. आपल्या सूखापायी मूल जन्माला घालणा-यांना त्याची किंमत कळत नाही हेच खरं. मुलावर संस्कार करा आणि शांत बसा इतकं साधं अजून कळत नाही. ज्यांना मुलांना द्यायला वेळ नाही त्यांना मुलंच होऊ नयेत.
इथून पुढे वाचू शकता
सैराटने अशी चर्चा करायला भाग पाडलंय. एक परिपूर्ण कलाक्रुती पहायचा अनुभव तर मिळतोच. परश्याचे मित्र ,त्यातल्या त्यात लंगड्या या अतिशय सुंदर भूमिका आहेत. आपल्याला आवडलेल्या मुलीचं प्रेम मिळत नाही हे स्विकारणारा लंगड्या हे सूचक भाष्य आहे.
मन सैराट करणारा अनुभव आहे एकंदरीत.
( चुभूद्याघ्या )
उरलेलं प्रतिसादातून बोलूयात :)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चांगल लिहिलयस.
वेगळं परिक्षण.
असेच म्हणतो!
मी ही.
संयमित भाषेत मांडलेली मतं.
त्रुटी असतील तर कळवा ना प्लीज
हा पिच्चर खरंच बघायचा असेल तर
आमचे लक्ष
लय भारी हा कोणता सिनेमाय हे
प्रतिसाद आवडला.
नक्की बघा. मुलांनाही दाखवा.
माझ्या लिखाणाच्या पद्धतीमुळे
मस्तच लिहीलंय. डॉक्टरसाहेब
वेगळे कहितरी....!
अरेवा!
क्लास.
__/\__
थेट सिनेमाबाबत
याड लावणारा सिनेमा.
अतिशय उत्कृश्ठ लेख आणि
सिनेमा पाहतांना सारख काहीतरी
आणि सगळ्यात शेवटी आपल्या संपूर्ण भारतीय समाजाला मारलेली "झापड"तिथेच हात जोडले. _/\_पळून जाणे फार सोप्पी गोष्ट
सुंदर आठवण सांगितलीत रेवतीतै,
अतिशय सुंदर प्रतिसाद आहे. खरं
हे व्हत्सप्प वर पसरवा...आम्ही
छान लिहिलंय ....
हो. वाचलाय तो लेख फेसबुकवर.
खरं तर सिनेमा न पाहताच
छान लिहिलंय ....
सैराट पाहवणार नाही पण धागा व
सैराट पाहवणार नाही पण.....
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
छान लिहिलंय!
सुंदर लिहिलंय. आत्तापर्यंत
नागराज येण्याआधी केतन मेहताही
आवडला लेख...
ती पावलं झोप उडवणारी आहेत..
लेखन
खरोखरच.....आवडलं.
आवडले