दुसरे मरण (पान ४, अखेर)
लेखनप्रकार
दुसरे मरण (पान ४, अखेर)
लेखक : होर्हे लुईस बोर्हेस
(तिसऱ्या पानाचा दुवा)
चमत्कार होईल हे त्यांना निश्चित माहीत नव्हते, पण तो व्हायची तयारी त्यांच्याकडून होत होती. मनात खोलवर त्यांचा ध्यास होता की "माझ्या भाग्यात आणखी एक युद्ध आले, तर मी आपल्या लायकीला साजेसे वागेन." चाळीस वर्षे त्यांनी या युद्धाची छुपी आस राखली, आणि मरणाच्या घटकेला भाग्याने त्यांना ते युद्ध दिले. ते बुद्धिभ्रमाच्या रुपाने आले, पण तरी काय - प्राचीन ग्रीक लोकांनादेखील ठाऊक होते की आपण तर स्वप्नातल्या केवळ सावल्या आहोत. त्या ग्लानीत ते लढाई पुन्हा जगले, पुरुषासारखे शत्रूला सामोरे गेले, आणि बंदुकीच्या गोळीने थेट त्यांच्या छातीचा वेध घेतला. मासोयेरची लढाई १९०४ च्या हिवाळ्या-वसंताच्या दरम्यान झाली, पण अशा प्रकारे, कित्येक वर्षांच्या दुर्दम्य इच्छेच्या परिणामस्वरूप, १९४६ मध्ये पेद्रो दामियन त्या मासोयेरच्या रणकंदनात मरण पावले. Summa Theologica (११) मध्ये प्रतिपादन केलेले आहे, की जे घडले त्याला देवही न-घडवू शकत नाही. पण त्यात कारणा-परिणामांच्या गुंतागुंतीच्या दुव्यांबाबत काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. हे जाळे इतके अफाट आहे, इतके घट्ट विणलेले आहे, की त्यात भूतकाळातली एकही घटना खोडली - ती किती का क्षुल्लक असेना - तर अवघे वर्तमान मिथ्या होण्यास ते पुरेसे आहे. कारण हा बदल केवळ त्या एका तथ्यातला बदल नव्हे. हे म्हणजे त्या घटनेचे सर्व, म्हणजे जवळजवळ अगणित परिणाम नाहिसे करणे होय. वेगळ्या शब्दांत सांगायचे, तर त्यायोगे दोन वेगवेगळे वैश्विक इतिहास निर्माण होतात. पैकी एकाला (नावापुरता) पहिला म्हणू, त्या पहिल्यात पेद्रो दामियान १९४६ मध्ये एंत्रेर्रीयोस राज्यात मेले, दुसऱ्यात ते १९०४ मध्ये मासोयेरमध्ये मेले. आपण हा दुसरा इतिहास जगतो आहोत, पण पहिला काही सुखासुखी नाही दडपला गेला. त्यातूनच मी सांगितलेल्या विसंगत घटना घडल्या. कर्नल दियोनीसियो तावारेस त्या आदलाबदलीच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून गेले. सुरुवातीला त्यांना आठवले की पेद्रो दामियान भेकडपणे वागले, मग ते त्यांना पूर्णपणे विसरून गेले, त्यानंतर त्यांना त्यांचे धाडसी मरण आठवू लागले. आबार्को यांची बाबही या अनुमानाला जी पुष्टी देते, ती थोडकी नव्हे. श्री. पेद्रो दामियान यांच्याविषयी खूप स्मृती राखल्यामुळे त्यांचे निधन झाले असे मी समजतो.
पण खुद्द मी तशा कुठल्याही धोक्यात नाही, असे मी समजतो. मनुष्याच्या झेपेबाहेरच्या या रहस्याचा मी भेद केला आहे - म्हणजे तर्कबुद्धीचा भ्रष्टाकारच म्हणा - पण माझ्या परिस्थितीचे काही तपशील या खुनशी सनदीच्या खतऱ्यापासून माझे रक्षण करतात. पहिली गोष्ट ही की मी जे लिहिले ते सगळेच सत्य आहे याची मला खात्री नाही. माझ्या वृत्तांतातल्या काही आठवणी चुकीच्या असाव्यात, अशी मला शंका आहे. मी सांगितल्यासारखा कोणी माणूस खराच होऊन गेला असेल तर त्याचे नाव पेद्रो दामियानच होते, का दुसरेच काही होते, अशी मला शंका वाटते. कदाचित पिएर दामियानीच्या ऊहापोहामुळे मला ही कथा सुचली असा बहाणा करता यावा, म्हणून त्याच्याच स्पॅनिश-केलेल्या नावाने मी या माणसाला ओळखत असेन. पहिल्या परिच्छेदात मी ज्या कवितेचा उल्लेख केला आहे, तिचाही विषय "भूतकाळ कधी बदलत नाही" असाच आहे - कदाचित तिच्यावरून मला ही कथावस्तू स्फुरली असेल अशी रदबदली मी करू शकतो. १९५२ साल उलटेल तोवर मला असे वाटू लागेल की ही मी एक अद्भुत कहाणी लिहिली, आणि अशा प्रकारे मी तथ्याला कल्पितात बदलून टाकेन. साधारण दोन हजार वर्षांपूर्वी व्हर्जिललाही (१२) अशाच प्रकारे वाटले की तो एका मनुष्याच्या जन्माचे वृत्त सांगत होता, पण खरे तर तो देवाचा अवतार वर्तवत होता. गरीब बिचारे दामियान! वयाच्या विसाव्या वर्षी, कुठल्याशा केवीलवाण्या गृहयुद्धातल्या कोणत्यातरी अनामिक लढाईत मृत्यूने त्यांना जगातून नेले. पण त्या प्रकारे काळाला खूप उशीराने का होईना, त्यांच्या हुरहुरणाऱ्या हृदयाची आस पूर्ण करता आली. कदाचित त्याहून मोठे कोणतेच सुख नाही.
***
El Aleph (१९४९) कथासंग्रहामध्ये प्रकाशित, तत्पूर्वी La Nación नियतकालिकात प्रसिद्ध झाली.
अनुवादक : धनंजय
दुवे : पान एक, दोन, तीन, चार
-----
११. तेराव्या शतकातील संत थॉमस आक्विनास यांचा धर्मशास्त्रावरचा ग्रंथ
१२. इ.स.पूर्व पहिल्या शतकातील एक रोमन कवी. त्याच्या Eclogues या काव्यात "शांतिदूत येणार" अशी कल्पना आहे. अनेक ख्रिस्ती लोक त्या कल्पनेला येशूच्या जन्माची व्हर्जिलला लागलेली चाहूल मानतात.
वाचन
10200
प्रतिक्रिया
0