Skip to main content

::: मिपा विडंबन स्पर्धा :::

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 02/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
अरे होली के दिन, दिल खिल जाते है रंगो मे रंग मिल जाते है... अरे होली खेले रघुवीरा अवध में होली खेले रघुवीरा... आज ना छोडेंगे बस हमजोली; खेलेंगे हम होली...
काही नाही; होळी, रंगपंचमीचे वेध लागलेत. होळी जवळ आली की असंच होतं; हो की नाही? कुणाच्या नावाने बोंबा मारायच्या; कुणाला रंगवायचं, असे बेत मनात शिजायला लागतात. तसं, आपलं मिपा सदोदित रंगलेलंच असतं वेगवेगळ्या रंगांत; पण होळी, रंगपंचमी म्हणजे स्पेशलच. याच स्पेशल रंगपंचमीच्या निमित्ताने एक स्पेशल स्पर्धा घ्यायची ठरलेली आहे. रंगपंचमीत जशी रंगांची उधळण असते तसेच रंग कवितांच्या विश्वातही असतात. अनेक रंग, अनेक ढंग यांनी हे कवितांचं जग बहरलेलं आहे. त्यापैकी एक रंग असा आहे की जो बोंबा मारत येतो; आणि तो ज्या रंगात म्हणून मिसळेल त्या रंगाला खुलवून टाकतो; आणि एक वेगळाच रंग तयार होतो. विडंबन. रंगीबेरंगी काव्यविश्वातला हा अतरंग. याच रंगात आपण आपलं मिपा रंगवायचंय. मराठी विडंबनविश्व ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही अशा आचार्य अत्र्यांचं, किंवा केशव कुमारांचं प्रथम स्मरण करुयात. मिपा विडंबन स्पर्धा तर विडंबनहौशींनो सज्ज व्हा. विडंबनहौशी नसाल तरीही सज्ज व्हा. स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे असतील. १. विडंबन कुठल्याही मराठी कवितेचं/गाण्याचं करता येईल. म्हणजेच, कच्चा माल तुम्ही आपापल्या पसंतीचा निवडायचाय. पण अट अशी आहे की विडंबनातून तयार होणारं नवकाव्य हे खाली दिलेल्या तीन पैकी एका रंगात रंगलेलं असायला हवं, म्हणजेच ते खालीलपैकी एका विषयावरचं काव्य व्हायला हवं. २. प्रत्येक स्पर्धक प्रत्येक विषयाची एक अशा एकूण तीन प्रवेशिका विडंबन स्पर्धेसाठी देऊ शकतो. ३. विडंबनाची भाषा मराठीच असायला हवी. ४. मूळ काव्याच्या चौकटीला कमीत कमी धक्का लावून विडंबन केलं जावं. म्हणजेच, वृत्त, मात्रा, गण इत्यादींचे नियम पाळून केल्या गेलेल्या विडंबनाला जास्त मार्क असतील. ५. विडंबनाची भाषा अश्लील नसावी. ६. विडंबनाला समर्पक शीर्षक देणे आवश्यक आहे. ७. कोपरखळ्या, टोमणे चालतील, परंतु व्यक्तिगत टीका, ताशेरे असलेली काव्य ग्राह्य धरली जाणार नाहीत. ८. विडंबन मिपावर पूर्वप्रकाशित नसावे. प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीस व्यनितून किंवा sahityasampadak.mipa@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवायच्या आहेत. प्रवेशिका पाठवताना मूळ काव्य, कवी व इतर उपलब्ध तपशिलासकट पाठवायच्या आहेत. विजेता निवडण्याकरता मतदान पद्धत अवलंबली जाईल. तीन विषयांच्या कवितांचे तीन स्वतंत्र धागे काढले जातील व त्यावर ग्राह्य प्रवेशिका प्रकाशित होतील. मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल. आज दिनांक २ मार्च पासून १७ मार्च पर्यंत प्रवेशिका पाठवण्यासाठीची मुदत असेल. १८ ते २४ मार्च पर्यंत मतदानासाठी वेळ असेल. २८ मार्च रंगपंचमीच्या दिवशी स्पर्धेचे विजेते जाहीर केले जातील. मग तयार आहात रंगांची उधळण करायला? विडंबन करायचे विषय खालीलप्रमाणे
  • प्रेम
  • राजकारण
  • फजिती
चला तर.... मुरलेले मिपाकर एव्हाना सरसावले असतीलच. पण नवमिपाकरांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमच्याकडून आग्रहाचं निमंत्रण आहे.
'विडंबनी नव्या दिसोत नव रंग हे लोकहो उडून कल्ला मिळोत बहुरंग मिपास हो' किती भिजवू नि रंगवू कुणाला रंगपंचमीचा सण आला रंगपंचमीचा सण आला फुगे फुगवू चला पिचकारी भरा आला आला हा बकरा आला
चला चला, येऊदेत एक से एक काव्य!

वाचने 21516
प्रतिक्रिया 60

प्रतिक्रिया

कुनी 'ट' ला 'ट' आनि 'फ' ला 'फ' जुळिवनार, अनं पब्लिक त्ये आतून आलंय म्हननार, आमास्नी नाय कवा आतून आल्यागत वाटनार, तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार!!

हे तत्तर तत्तर तत्तर... भारीच है! आता फूल्ल्ल टू धिंगाणा! एखाद्या गोष्टीला 'अधिकृत' कसे करावे, हे मिपाकडून शिकले पाहिजे! Sandy

धमाल स्पर्धा होईल ही.विडंबनकारांना पायघड्या घालुन आमंत्रण! फेका फुगे मारा बोंब!

मिपा-टव्वाळा, चेष्टपंथेची जावे तरी हास्य हो पाविजे ते स्वभावे कपाळीस आठ्यांस सोडून द्यावे जनीं दंत ते सर्व दावीत जावे जय जय रघुवीर समर्थ!

In reply to by मुक्त विहारि

हे छाणच आहे हो, पण त्या शिंच्या लघुगुरू मात्रांमध्ये बसत नै ना! आता ही एंट्री नसली म्हणून काय झालं, सगळं कसं पद्धतशीरप्रमाणे व्हायला पायजेल नाय का?

In reply to by सस्नेह

पूछते है वोह कि गालिब कौन है कोई बतलाओ के हम बतलाये क्या

In reply to by प्रचेतस

त्यांना परवानगी मिळेल का पण? हल्ली ते रोज होम-हवनही होममिनिष्टरांच्या परवानगीशिवाय करत नाहित असं नाखुकाका म्हणाले बॉ परवा. खखोदेजा.

मला विडंबने वाचायला आवडत नाही आणि करायला तर त्याहूनही आवडत नाही. प्रत्येक कवितेच्या निर्मिती मागे एक प्रचंड मोठा इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र असते. काहीच भाग्यवान कवी असे असतात ज्यांना कळ आल्या आल्या कविता होते. त्यातले सुध्दा फार थोडे कवी सुखसारक वटीच्या बाटल्याच्या बाटल्या रिचवल्या सारख्या कविता पाडत असतात. पण हे भाग्य सर्व कविंच्या नशिबी असतेच असे नाही. कवितेची असहाय्य कळ येउनही कविता न होणार्या कवीची आवस्था एखाद्या अडलेल्या बाई सारखी असते. बराच वेळ जोर लावल्यावर देखिल कविता होत नसली तरी सुध्दा हे कवी लोक चिकाटी सोडत नाहीत, कुंथुन कुंथुन तो शेवटी ते एकदाची कविता पाडतातच. मग आपले ते डाउनलोडवलेले पुण्यसंचित विनय पूर्वक रसिकांच्या चरणी सादर करतात. हि सर्व प्रक्रियाच मोठी कष्टदायक आहे. आणि आपण त्यावर विडंबनाचे पाणी ओतायचे? छे छे त्या कोमल कवी मनाला काय वाटत असेल? नाही नाही माझ्या हातुन हे असले पातक कदापि घडणार नाही. हे परमेश्वरा या असल्या स्पर्धा भरवणार्यांना आणि त्या स्पर्धांमध्ये भाग घेणार्या पाषाण हृदयी विडंबकांना तू सद्बुद्धी दे. एक मिपाकर म्हणुन.... जाऊ दे...... समस्त कविवृंदा तर्फे मिपा च्या सा. सं मंडळाचा जाहीर णिशेढ. आणि इथुन पुढे जो पर्यंत सासं मंडळाचे संपूर्ण मण:परिवर्तन होत नाही तो पर्यंत मी दुपारच्या चहा बरोबर आठ ऐवजी केवळ सात बिस्कीटे खाउन प्राणांतिक उपोषण करणार आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

कवितेची असहाय्य कळ येउनही कविता न होणार्या कवीची आवस्था एखाद्या अडलेल्या बाई सारखी असते.
अडला हरी गाढवाचे पाय धरी अडला कवी बाटलीला ओठ लावी

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अगगागा. पैजारबुवा म्हणजे अशा कवींचे कर्दनकाळच जणू.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पण, तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे, तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे... हे एकदम वर्जिनल म्हणायचं का? ;) म्हणजे विडम्बनाचे पाणी ओतण्याऐवजी तर्री ओतावी!! :)

ऐसी कुंथण्याची कळा येऊ द्यावी मिपाबाळां कवींचा तो कळवळा सोडून द्यावा

In reply to by अजया

=)) =))

फुगे फुगवू चला पिचकारी भरा आला आला हा बकरा आला
;) सासं अवघड हो हे

In reply to by माहितगार

हा तुमचा आपुलाचि संवाद आपणासि वाचून मला एकदम कोणाचंतरी फोनवर बोलणं एका बाजूने ऐकल्याचा भास झाला. "हो हो, नक्की. मी स्वतःच जाईन ना" .... "नाही, काहीच टेन्शन नाही. गेली दहा वर्षं करतो आहे मी हे." .... "आता गावचं पाणी ते शेवटी गावचं पाणीच ना. तुम्हीसुद्धा काय बोलता राव." .... वगैरे वगैरे...

मस्त स्पर्धा! (एकाहून एक विडंबनांच्या प्रतिक्षेत) सुमीत भातखंडे

लई भारी आयड्या ! आता सर्व आयड्या / डुआयड्या बाहू सरसावून कीबोर्डातून पिचकार्‍या मारायला तयार झाल्या असतील. मज्जाच मजा येणार ! =))

यमक्या कवींचा पसारा, न साहावे संपादकसागरा.. तेणे वैतागोनि क्षणभरा, विडंबनस्पर्धा योजिलीसे...

In reply to by सूड

देवाचिये दादुलेपणाचा उभारा, न साहवेची साता सागरा भेण वोसरोनी राजभरा, दिधली द्वारावती

केसु गुर्जी, रंगाशेट, खोडसाळ अँड सो ऑन..

खुपच छान ! मिसळपाववरील असल्या अभिनव उपक्रमांमुळेच मिपा अखिल मराठी साहित्य संकेत स्थळां मध्ये शोभुन दिसते ! मराठी भाषा टिकवण्यात मिसळपावाचे अमुल्य योगदान आहे ! स्पर्धेला शुभेछा :)

चांगलय.. आता होळीच्या प्रतिक्षेत ..

कवीता थेट इथेच प्रसिध्द करायची आहे कि संपादकांना धाडायची आहे की आणि मग ते ती प्रसिध्द करणार?

प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीस व्यनितून किंवा sahityasampadak.mipa@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवायच्या आहेत. प्रवेशिका पाठवताना मूळ काव्य, कवी व इतर उपलब्ध तपशिलासकट पाठवायच्या आहेत.

म्हणजे आता मिपावर दंगा करायला ऑफिशियली परवानगी, लेखकाचे नाव देऊ नये याच्याशी सहमत, प्रत्येक एन्ट्रीला क्रंमाक वगैरे देता येईल. कितीही नाही म्हटले तरी, काय लिहिले पेक्षा कोणी लिहिले याला महत्व.. वगैरे वगैरे :)

In reply to by नीलमोहर

+१००

In reply to by जेनी...

लेखकोंको जुतोके निचे तू कहे तो छपवाऊ पीजे दिन रात निकालू धांगे मराठी इंग्लिस नये पुराने... हुकुम चला रिक्वेष्ट न कर पढ़ती जा बेबी रेष्ट न कर पेशंट हु अनहितोंका पेशंस मेरी टेस्ट न कर ओय फेक्टरी वाले वाले विडंबन बनादे कबसे पब्लिक कह रही है बाकी पूरी करदुंगा मै कोई कसर जो रेह रही है....

(सरणार कधी रण...) स्फुरणार विडंबन कधी तरी हे कुठवर पाहू वाट परी