प्रसार माध्यमे आणि टिपिंग पॉईंट - एक रोचक संशोधन
दि न्यूयॉर्कर साप्ताहीकाचा पत्रकार माल्कम ग्लाडवेल, याने २००० मधे एक पुस्तक लिहीले होते - "The Tipping Point - How Little Things Can Make a Big Difference". कुठलिही गोष्ट अचानक मोठी होण्याआधी कशा घटना घडत असतात त्या एकमेकांना कशा लागलेल्या असतात, याचा अन्वयार्थ लावताना या पुस्तकात अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे. असा टिपिंग पॉईंट हा रोगराई, युद्धे, गुन्हेवारी वाढ इथपासून ते राजकीय बदल या सर्वत्रच दिसू शकतो. उदा. "ऑस्ट्रीयाच्या राजपुत्राचा खून हे पहील्या महायुद्धाचे तात्कालीक कारण" समजले जाते. पण त्याआधी घडलेल्या घटना या एकमेकांना लागलेल्या असतात...
आज हे सगळे लिहायचे कारण म्हणजे, जगात सर्वत्रच पण भारतात सध्या ज्या पद्धतीने माध्यमे विचार पेरायचे काम जोमाने करत आहेत ते पहाताना, या पुस्तकातील एक विशिष्ठ भाग आठवला आणि येथे सांगावासा वाटला.
१९८४ ची गोष्ट आहे. अमेरीकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा काळ. रिपब्लिकन पक्षाकडून तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन हे फेरनिवडणुकीस उभे होते. त्यांच्या विरोधात डेमोक्रॅटीक पक्षाकडून वॉल्टर माँडेल उभे होते. प्रचाराची रणधुमाळी चाललेली होती. त्यावेळेस किंबहूना त्यानंतर देखील जवळपास वीसएक वर्षे तीन पब्लिक चॅनल्सवरून तीन अमेरीकन पत्रकारांचे अमेरीकन जनतेवर राज्य होते - सिबीएस चॅनलचे डॅन रादर, एनबीसी चॅनलचे टॉम ब्रॉको आणि एबीसी चॅनलचे पिटर जेनिंग्ज. हे तिनही पत्रकार आपापल्यापरीने दिग्गज होते. संध्याकाळी साडेसहाला त्यांच्या बातम्या असत शिवाय इतर विशेष कार्यक्रम होत असत. निवडणुकीचा काळ तर माध्यमांसाठी आणि त्यातील राजकीय पत्रकारांसाठी खूपच महत्वाचा! १९८४ चा काळ हा असाच होता.
ह्याच काळात सिरॅक्युस युनिव्हर्सिटीमधील एक मानसशास्त्रावरील प्राध्यापक, ब्रायन म्युलेन यांनी बातम्यांचे श्रोत्यांवर होणारे नकळत परीणाम यावर संशोधन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी या तिनही वार्ताहारांच्या ३७ चित्रफिती गोळा केल्या, ज्यात दोन्ही उमेदवारांवर भाष्ये केलेली होती. मग स्टॅटीस्टीक्सच्या संशोधनाला अनुसरून त्यांनी "रँडम" प्रेक्षकवर्गाला गोळा केले आणि या चित्रफिती दाखवल्या. या प्रेक्षकवर्गाला हे संशोधन काय आहे याची अजिबात कल्पना दिलेली नव्हती. नंतर त्यांना या तिनही वार्ताहारांच्या हावभावावर आधारीत निरीक्षण सांगायला सांगितले. हे निरीक्षण २१ गुणांवर आधारीत होते. म्हणजे विशिष्ठ उमेदवाराबद्दल बोलताना वार्ताहाराचे हावभाव कसे होते? जितके कमी गूण तितके भाव नकारात्मक तर जितके जास्त गूण तितके सकारात्मक. त्यातून बाहेर आलेले विश्लेषण फारच रोचक होते.
सिबीएसच्या डॅन रादर यांचे चेहर्यावरील भाव आणि बातम्या देण्याची पद्धती ही दोन्ही उमेदवारांसाठी समान होती. मोंडेल १०.४६ तर रेगन १०.३७ इतकी समान. एन बी सी च्या टॉम ब्रॉकोंच्या चेहर्यावरील भाव देखील बर्यापैकी सारखेच होते - माँडेल ११.२१ तर रेगन ११.५०. मात्र एबीसीच्या पिटर जेनिंग्जबाबत वेगळेच घडले - माँडेल १३.३८ तर रेगन यांना १७.४४! या प्रेक्षकवर्ग या तिन्ही वार्ताहारांच्या वेगळ्या (आनंदी-दु:खी) बातम्या (कंट्रोल सेगमेंट) देखील दाखवल्या गेल्या. त्यात देखील या तिन्हींबद्दल तेच निरीक्षण दिसले!
नक्की पिटर जेनिंग्ज वेगळे काय करत होते? तर टॉम ब्रॉको आणि डॅन रादर यांच्या पेक्षा त्यांच्या आविर्भावात रेगन यांच्या बातम्या देताना अधिक सकारात्मकता, आनंद दिसत होता. गंमत म्हणजे इतर वेळेस एबीसी चॅनल हे रिपब्लीकन आणि रेगन या दोन्हींवर कडक टिका करणार्या बातम्यात पुढे होते. म्हणजेच त्यांचा प्रेक्षकवर्ग हा रिपब्लिकन असण्याची शक्यता फारच कमी होती. अर्थात याच संशोधनात पुढे हे देखील सिद्ध झाले की एबीसीचे तत्कालीन राजकीय वृत्तपरीक्षण बघणारे हे इतर दोन चॅनल्स पेक्षा रेगन-रिपब्लिकन्सना मते देण्यात अधिक होते!
फक्त किंचीत अधिक प्रसन्नता आणि त्याचा परीणाम मात्र विचारशक्तीहून अधिक. कदाचीत पिटर जेनिंग्जना पण इतके वाटले नसावे. (म्हणूनच ते या संशोधकास आणि संशोधनास शिव्या देण्यात कमी पडले नाहीत!).
ह्याच संशोधकाने असाच प्रयोग नंतरच्या जॉर्ज एच बुश (डब्लूचे वडील) विरुद्ध ड्युकॅकसच्या निवडणुकीच्या वेळेस केला. आणि तेच निष्कर्ष परत आले.
त्यांनी अजून एक प्र्योग केला ज्यात रँडम विद्यार्थ्यांचे गट तयार केले. त्यांना बाजारात नव्याने आलेला हेडफोन दिला आणि तो घातलेला असताना तत्कालीन प्रसिद्ध गाणी "संशोधनासाठी" म्हणून ऐकवली. अर्थात विद्यार्थ्यांना माहीत नव्हते नक्की काय संशोधन ते... पण एका गटास डोके वर-खाली (हो-हो स्टाईल) करायला सांगितले, दुसर्या गटाला "नाही-नाही" असे आडवे हलवायला सांगितले तर तिसर्या गटाला स्थीर ठेवण्यास सांगितले. तो कंट्रोल ग्रूप होता. विद्यार्थी तसे गाणे ऐकताना करत होते. मात्र दोन गाण्यांच्या मधे, मग हळूच बातमी सांगितली गेली की ज्यात कॉलेजच्या फी मधे काहीशे डॉलर्सनी वाढ करणे जरूरीचे आहे म्हणून चर्चा होती.... नंतर या तिन्ही गटांना प्रश्न विचारताना, या फीवाढीप्रस्तावावरून देखील विचारले. तर काय आढळले? - "हो-हो" असे डोके हलवणारी मुले फीवाढीस नकळत तयार झाली होती. "नाही-नाही" असे हलवणार्यांना फी अजून कमी करून हवी होती तर ज्यांनी डोके स्थीर ठेवले होते त्यांना सध्याचीच फी योग्य वाटत होती!
या सगळ्याचा अर्थ काय? तर लेखक म्हणतो त्याप्रमाणे प्रभावी विक्रेता हा कसा विकू शकतो आणि हावभाव-हालचाल या कधी कधी शब्दांपेक्षा देखील प्रभावी ठरू शकतात...
आता यातून आपण (त्यात मी देखील आलो) काय शिकावे? बातम्या बघत असताना अथवा वाचत असताना, त्यावर आपल्याला, ज्याला क्रिटीकल थिंकीग म्हणता येतील असे प्रतिप्रश्न करत वाचता येतात का? का आपण लगेच विश्वास ठेवतो? एखादी बातमी एका चॅनल/वर्तमानपत्रा कशी दिली आहे आणि दुसर्यात कशी आली आहे हे देखील बातमीच्या गांभिर्यतेनुसार आणि मते तयार करण्याआधी बघणे महत्वाचे ठरते...


वाचने
6487
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
इंटरेस्टिंग! मार्केटिंग मधे
बातम्या कधी 'बघू' नयेत.
In reply to बातम्या कधी 'बघू' नयेत. by गामा पैलवान
वाचतानाहि तोच अनुभव येतो.....
In reply to बातम्या कधी 'बघू' नयेत. by गामा पैलवान
ते टाईम्सनाऊ चा न्युजआर असेल
विकास स्टाइल मधला रोचक लेख
In reply to विकास स्टाइल मधला रोचक लेख by स्पा
+१
रोचक लेख !
In reply to रोचक लेख ! by डॉ सुहास म्हात्रे
मोहरीचा पर्वत
प्रसारमाध्यमे आणि मतदार
In reply to प्रसारमाध्यमे आणि मतदार by गॅरी ट्रुमन
प्रतिसाद आवडला.
In reply to प्रतिसाद आवडला. by गामा पैलवान
रंजक आणि रोचक प्रतिसाद आहे.
In reply to प्रसारमाध्यमे आणि मतदार by गॅरी ट्रुमन
किंचीत खुलासा आणि काही मते
negative publicity
साधारणपणे याच विषयावर उडन खटोला यांनी पूर्वी काढलेल्या
In reply to साधारणपणे याच विषयावर उडन खटोला यांनी पूर्वी काढलेल्या by बोका-ए-आझम
मस्त किस्सा!