थोड्या दिवसांपूर्वी आमच्या ऑफिसमधली ज्येष्ठ (आणि श्रेष्ठ!) पार्शिण बरेच दिवस गायब होती. पारशी लोक हे तसे खुशालचेंडू आणि स्वच्छंदी असल्यामुळे ऑफिसातल्या कोणालाच तसं तिचं नसणं खटकलं नाही. मात्र बरेच दिवस होऊनही ती ऑफिसला न आल्यामुळे तिच्याविषयी थोडी चर्चा हळूहळू सुरु झाली. अखेर एक दिवस बाईसाहेब उगवल्या ती एक चित्तथरारक कहाणी घेऊनच ! तो अख्खा दिवस ती प्रत्येकाला वेगवेगळे गाठून तीच गोष्ट सांगत होती. खास लोकाग्रहास्तव तिने पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांसाठी ती हकीकत साभिनय करून दाखवली ती अशी :
ह्या बाईची एक मुलगी मुंबईत बांद्रा इथे राहते. एके दिवशी वैतागून तिने आपल्या आईला ( म्हणजे आमच्या पर्शियन फुलाला ) फोन केला आणि म्हणाली , आई, "हल्ली मला रात्रीची झोप मिळत नाही. " फुलाने विचारलं , त्यात काय नवीन ? सगळ्या नवीन लग्न झालेल्या मुलींची ही तक्रार असतेच ! त्यावर तिची मुलगी अजूनच चिडली आणि म्हणाली, तुला जसं वाटतंय तसं काही नाहीये गं …दोन दिवस आमच्या घरी येउन राहा म्हणजे तुला कळेल ! त्यावर पर्शियन फूल तिच्या घरी जाउन मुक्काम ठोकून बसलं …. दिवस बारा गेला…. मग रात्र झाली ….सगळे आपापल्या खोलीत झोपले … मध्यरात्री २ वाजता घरामागच्या झोपड्यांच्या बाजूने १ दणकट कोंबडा ह्यांच्या घराखाली येउन सकाळी ६ वाजेपर्यंत घसा साफ करत होता …. त्याला हाकलले तरी तो उडून जायचा आणि परत परत येउन तोच कुचकुचाट करत होता. घरातले सगळे त्यामुळे हैराण झाले होते. सकाळी त्यांच्या घरी गोलमेज परिषद भरली… विषय एकच … कुक्कुट स्वामींचा बंदोबस्त !
सगळ्यांनी सगळ्या युक्त्या सांगितल्या मात्र त्या आधी तो कोंबडा नक्की कोणाचा आहे हे शोधणे क्रमप्राप्त होते म्हणून सगळे कुटुंब मागच्या झोपडपट्टीत गेले आणि चौकशी केली पण त्याचा मालक किंवा मालकीण सापडली नाही. तसेच सगळे परत आले. पर्शियन फुलाने हुशारी करून बृहनमुंबई महानगरपालिकेच्या वार्डला फोन लावला आणि ह्याचा उपाय विचारला. त्यांनी पहिले २ तास फोन उचललाच नाही. नंतर पलीकडच्या माणसाने ही बाब आमच्या अखत्यारीत येत नाही अशी माहिती दिली आणि पालिकेच्या चतुष्पाद विभागाला फोन करा असे सांगितले. चतुष्पाद विभागाने समस्या ऐकून कोंबडा हा द्विपाद असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही असे सांगितले. तुम्ही देवनार कत्तलखान्याला फोन करा असा सल्ला दिला.
देवनार कत्तलखान्याच्या विभागात मुळातच शुकशुकाट पण करणार काय … तिने नंबर शोधून तिथे फोन लावला… त्यांचे ठराविक साचेबद्ध उत्तर …. इथे फक्त भाकड चतुष्पाद जनावरे येतात आणि तसेही कोंबडा पकडण्याचे आम्हाला प्रशिक्षण नाही त्यामुळे तुमचा प्रश्न तुम्हीच सोडवा. पर्शियन फूल स्वत वार्डला गेले आणि तिथल्या लोकांना स्वताची व्यथा सांगितली. वार्डच्या लोकांना तिची भाषा आणि अजीजी पाहून दया आली आणि त्यांनी काहीतरी मदत करतो असे आश्वासन दिले. मात्र ह्या लोकांनीही " आम्हाला कोंबडा पकडता येत नाही तसेच आमच्याकडे माणसे आणि जाळी नाही… त्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल असे सांगितले. सदरच्या गोष्टी दुसर्या वार्डला उपलब्ध आहेत पण त्या तुम्हालाच खर्च करून आणाव्या लागतील असे सांगितले. त्यांच्याकडून त्या माणसांचा पत्ता घेऊन पर्शियन फूल तिथे गेले . त्या दिवशी ती माणसे भेटली नाहीत. त्यांच्यातली एकच फोन नंबर मिळाल्यामुळे तिने त्याला फोन केला आणि मदत करण्याची विनंती केली. त्याने टेम्पो,जाळी आणि ४ माणसे ह्याचा रु. ६०००/- खर्च होईल असे सांगितले. तुम्ही आम्हाला घ्यायला या कारण आम्हाला रस्ता माहित नाही असेही त्यांनी सांगितले . बाई त्यालाही तयार झाल्या. पर्शियन फूल तसे नाजुक असल्यामुळे हा सगळा द्राविडी प्राणायाम बाइसाहेब ट्याक्सिनेच करत होत्या त्यामुळे त्या खर्चाची गणतीच नसते.
ठरलेल्या दिवशी पर्शियन फूल उठून बांद्र्याहून मालाडला गेले आणि टेम्पोसकट ४ माणसे आणि जाळी घेऊन आले पण बाईंचे दुर्दैव आड आले …. त्या दिवशी कोंबडा दिसलाही नाही …. अर्धा दिवस वाया गेला पण कोंबडा काही दिसला नाही … माणसे मात्र पैसे घेऊन गेली …. पर्शियन फूल रागाने लालेलाल झाले …. घरातला फोन फोडून झाला …. चिडलेल्या अवस्थेत ती शेजारच्या पोल्ट्री सेंटर मध्ये गेली आणि तिथल्या माणसाला तू तो कोंबडा पकडशील का असे विचारले. तो तयार झाला पण त्याचेही त्याने ५०० रुपये मागितले. बाई नाईलाजाने हो म्हणाली. कोंबडी वाल्याने जाळी न वापरतच एकदाचा ३ दिवसांनी तो उच्छादी कोंबडा पकडला आणि त्याला दुकानात घेऊन गेला. त्याचे म्हणणे होते कि त्याचा मालक आला तर त्याला तो कोंबडा परत द्यावा लागेल म्हणून तो त्याने २ दिवस ठेवून घेतला . पर्शियन फुलाने एका प्राणीमित्र संघटनेच्या वकिलाला गाठून असे सापडलेले प्राणी किती दिवस ठेवावेत वगैरे कायदेशीर सल्लाही घेतला.
एक ख्रिश्चन म्हातारी तो कोंबडा पाहून त्याच्याकडे तो मागायला आली. त्याने पर्शियन फुलाला फोन करून बोलावून घेतले. म्हातारीने कोंबडा खायला मागितला म्हणून फूल अवाक झाले. म्हातारी म्हणाली, हा कोंबडा माझाच आहे मात्र मला आता वयोमानपरत्वे त्याला पकडणे शक्य होत नाही. पकडायला गेले कि तो उडून झाडावर बसतो. कोणीतरी मला सांगितले कि तुम्ही त्याला पकडलाय म्हणून मी इथे पाहायला आले. आज आमच्याकडे पाहुणे येणार असल्यामुळे मला तो हवा आहे , मी घरी पाणी तापवत ठेवलेच आहे .…तुम्हि तो माझ्या हवाली करा म्हणजे मी त्याला घेऊन जाईन . कोंबडीवाला म्हणाला आता तुम्हाला हा माझ्याकडून विकत घ्यावा लागेल … म्हातारी चिडली आणि बडबड करायला लागली… तिने पर्शियन फुलाला सांगितले मुकाट्याने माझा कोंबडा मिळवून दे नाहीतर मी तक्रार करेन… शेवटी पर्शियन फुलाच्या नवर्याने अजून ५०० रुपये दिले आणि कोंबडा म्हातारीला दिला. त्यावर म्हातारी खुश होऊन पर्शियन फुलाला म्हणाली माझ्या अजून २-३ कोंबड्या अजून अशाच फिरत आहेत… त्या पकडून देतेस का ? मी तुला पैसे देईन !!!पुढे म्हातारीने कोंबड्याला त्याच दिवशी रीतसर मुक्ती दिली.
ह्या सगळ्या प्रसंगात पर्शियन फुलाचे जवळपास ७-८ हजार रूपये आणि ऑफिसची ५ दिवस सुट्टी इतकी सामग्री घालवून तिच्या मुलीच्या घरी शांती (खेचून !!) आणली. सगळी कथा ऐकून झाल्यानंतर मी तिला शांतपणे विचारले कि कोंबडीवाल्याचा पर्याय अगोदरच वापरला असतास तर तुझे कितीतरी पैसे वाचले असते त्यावर ती शांतपणे म्हणाली … वी आर बावाजीस नो …. अवर ब्रेन वर्क्स धिस वे ओन्ली !!
छान आहे, एका कोंबड्याची गोष्ट