Skip to main content

ख्वाडा.....रामराम देवा!! ताणुन मारीन..!!

ख्वाडा.....रामराम देवा!! ताणुन मारीन..!!

Published on 21/11/2015 - 21:45 प्रकाशित मुखपृष्ठ
गावोगावच्या डोंगरदऱ्या, माळरानावर मेंढरं चरत राहतात. पाठीमागं घोडं, बैलगाडीवर संसाराच गाठोडं घेऊन 'धनगरडे' चालत असतात. संध्याकाळी एखाद्या पाण्याच्या रानात मुक्काम ठोकतात. वाऱ्या-कावदानात चुल पेटवली जाते. धगधगता निखारा पेटलेल्या भुकेल्या विझवत राहतो. चांदण्या राती थकलेले जीव गारगार झोपतात. मग पुन्हा सकाळी चारणीला मेंढरं घेऊन पाडा पुढच्या गावाला चालत राहतो. मेंढपाळांचं हे रोजचं आयुष्य. पिढी दरपिढी चारणीचा रुळलेला रस्ता. याच रस्त्यावर कित्येक खाचखळगे, काटेकुटे, दगडधोंडे लागतात. असाच एक रापलेला दगड रस्त्याच्या मधोमध येतो आणि आख्ख्या पाड्याला 'ख्वाडा' घालुन जातो. म्हातारा असे बरेच खाचखळगे कोळुन प्यायलाय. त्याची 'डंगरी' पण त्याला नीर्भीडपणे साथ देतेय. थोरला पांडा त्याचं अस्तित्व पुसटसं दाखवुन देतो. त्याची बायको आणि पोरं काळजीपुर्वक शोधत बसावी लागतात. धाकटा बाळू दंडबैठका, जोर काढत शरीर कमावतोय. पण तो एवढा लाजुळा का? हे काही केल्या समजत नाही. खाटी मेंढ आणि तान्या मेंढ्या हाकण्याच्या या रहाटगाड्यात 'आलतो फिरायला' म्हणत सरपंच दाखल होतो. आणि चाललेल्या मऊशार कथेला जोरदार तडका मारतो. अर्ध्याहुन कमी किंमतीत कोकरु नेणारा सरपंच पुढे फुकटात नेऊन आपला अस्सल माजुरडेपणा दाखवतो आणि उत्तरार्धातला सामना एकट्याच्या जिवावर गाजवतो. हा सरपंच भलताच ताकदीचा आहे. थोडक्या प्रसंगात जबराट भाव खाऊन जातो. म्हाताऱ्याचं पात्रं अस्सल आहे. तोंडची भाषा अतिशय भडक. पण ती फक्त कुटुंबासाठी. आल्यागेल्यांना 'रामराम देवा' घालत पाघळवायला बघतो. पण 'ताणुन मारीन' म्हणणाऱ्या सरपंचापुढे सपशेल शरणागती 'यशस्वीरीत्या' पत्करतो. "तुझ्या रुपाचं, तुझ्या रुपाचं चांदणं पडलय ना मला भिजु द्या" गात धमाल ऊडवणारा लग्नाळु बाळू मात्रं या संघर्षात मुकाट राहतो. एवढ्या सुंदर कथेत हे पात्र चक्कं फसलय. त्याचा लाजुळा चेहरा कथेत वारंवार बाधा आणतो. अभिनय, संवाद सगळच जेमतेम. दुर्दैवाने हेच सिनेमाचं मुख्य पात्र आहे.पण इतर ताकदीच्या कलाकारांत तो खपुन जातो. चित्रीकरण अव्वल दर्जाचं झालयं. साऊंड ईफेक्टलातर पैकीच्या पैकी गुण. एकंदर सिनेमाविषयी सांगायचं झाल्यास 'फँड्री' मधला जब्याचा दगड जसा पडदा फाडत बाहेर येऊन टाळक्यात बसतो त्यामानाने बाळूची कुऱ्हाड जरा बोथटच वाटली. एकदा जरुर पहावा असा नक्कीच आहे!!!!!
लेखनप्रकार

याद्या 8616
प्रतिक्रिया 29
बाळूचं पात्र तसंच आहे लाजाळू, स्वप्नाळू. मला आवडलं ते पात्र. त्याची स्वप्न मर्यादित आहेत. त्याचा व्यायाम, होणारी बायको यापलिकडे त्याला फार इट्रेस्ट नाही कशात. तो रिलक्टंटली या सगळ्यात ओढला जातो. त्याचे वडील, तो आणि सरपंच हे सोडले तर इतर कलाकारांचं काम दुबळं वाटलं. लो-बजेट मुळे जास्तं चांगले कलाकार घेता आले नसतील. पण तुम्ही म्हणालात तसं, फँड्रीचा इंपॅक्ट याच्या तूलनेत जास्तं होता.

वव! जव्हेरभौ, सिनमा बघतल्या सारखं वाटलं.

'समाजाला आरसा दाखवणार्‍या' चित्रपटांचा कंटाळा आला आहे, त्यामुळे बहूदा बघणार नाही. परिक्षणाबद्दल धन्यवाद.

बघितला पाहिजे असा चिञपट आहे. पाहताना आपण हरवून जातो त्यात. म्हातार्याचा अभिनय तर जबरीच आहे त्याचबरोबर डंगरीचा आहे. सरपंचाने खलनायक एकदम राग येण्यासारखा साकारलेला आहे. बाकी जब्याच्या दगडा एवढा परिणाम नाही यात.

कलाकार कोण कोण आहेत? सरपंचाचं काम कुणी केलंय ?

सहज मिळतो का बघू. पण परा म्हणतो तसे डोक्याला ताप देणारे सिनेमे आता नको वाटतात बघायला.

चित्रपटाची ओळख करुन देताना आखडता हात घेतल्यासारखा वाटतोय. ज्यांनी हा चित्रपट आधीच पाहिलेला आहे त्यांना कदचीत काही लिंक लागत असल्याने परिक्षण आवडले आसावे. पण माझ्या अल्पमतीला मात्र कसलाही बोध झाला नाही. -_-

In reply to by गणपा

कथा जास्त उलगडू नये म्हणुन आवरतं घेतलं!! अजुनही लिहीण्यासारखं बरच काही होतं!! सिनेमा ज्यांनी पाहीला नाही त्यांना बहुदा लिंक लागत नाही. त्याबद्दल क्षमस्व!!

In reply to by जव्हेरगंज

आच्छा असा डाव होता होय तुमचा. म्हटलंना आमचीच अल्पमती :P तरी म्हणतो (म्हणायला आमचं काय जातय? ;) ) अजुन लेखन खुलवलं असतत तरी आवडलं असतं. जिथं कुठं कथा जास्त उलगडतेय असं वाटलं तर डिस्क्लेमर टकुन तो भाग सफेद अक्षररंगात टंकायचा. मागे मिपावरच कुणी तरी असा प्रयोग केलेल्याचं स्मरत. असो, एक धागाकर्ता म्हणुन तुम्हाला तुमचे लेखन स्वातंत्र्य आहेच. :)

चला हवा येऊ द्या मध्ये मुलाखती पाह्यल्या होत्या, त्यामुळे थोडी लिंक लागली. अजून विस्ताराने लिहीलं असतंत तर बरं झालं असतं.