एक होती म्हातारी
लेखनप्रकार
रांजणातलं गार पाणी पिऊन आबाला जरा तरतरी आली. अर्धा तांब्या पिऊन झाल्यावर राहिलेल्या पाण्यानं त्यानं तोंड धुतलं. पंच्यानं तोंड पुसत त्यानं अजुन एक तांब्या भरायला घेतला.
"उनाचं लय पाणी पीव नकु रं, डोस्क धरतं अशानं" म्हातारी तुळशीपाशी बसुन शेंगा निवडत म्हणाली.
आबानं एक ना दोन करत आख्खा तांब्या घटाघटा पिऊन टाकला. तोंडात राहिलेल्या पाण्याची चुळ भरत पिचकारी मारत म्हणाला " म्हातारे, लग्नाला का आली न्हाय?, वंदीनं तुझ्या नावाचा धोसरा काढला हुता"
"मला एकतर दिसायचं कमी आलयं बाबा, डोळ्याचं आप्रिशन झाल्यापस्न मी लयशी कुटं जातबी न्हाय, त्यात वंदीच्या बापानं पत्रिकाबी दिली न्हाय, तुच सांग बाबा कसं जायचं आता?" म्हातारी त्याच्यापुढं गार्हाणं मांडायला लागली.
"आगं त्यो पेताड माणुस, त्येझं काय यवढं मनावर घीती?, तुझ्या लीकीच्या डोळ्यात पाणी थांबत न्हवतं, पुरीच्या लग्नात आजी न्हाय मनुन कधीची त्वांड पाडुन बसलीय" आबा वट्यावर येत तिच्या शेजारीच मांडी घालुन बसला.
"आबा, कायतरी बसायला घी कीरं, थांब मीच आणती आतनं कायतरी" म्हातारी उठायला लागली.
" नगं नगं, आगं आमी मातीतली माणसं, बस जरा आशीच, भरलेल्या पंगतीतनं ऊठुन फकस्त तुझी गाठ घ्यायला आलुय, मनलं म्हातारीचं काय बिनसलयं बघावतरी" आबा भिताडाला टेकुन पाय पसरत हासतचं म्हणाला.
"तसं काय न्हाय रं बाबा, आता समदं घरबार गेलयचकी, पण मला न्हाय पटलं, पावण्यानं आपल्याला हाडंतुडं करायचं आण आपुन मागतकऱ्यावनी त्येज्या दारात जायचं, मी आपली घरीच बरी, तेवढचं घराला राखान हुतयं" म्हातारी डोळ्याला पदर लावत बोलली.
आबा नुसताच 'हु..' करत तिथचं पसरला.
खरं म्हणजे म्हातारीचे लय ऊन्हाळे-पावसाळे आबानं बघितले होते. वंदीच्या बापानचं म्हातारीचा कायतरी मानापमान केला असणार, तवाच म्हातारी येवढी बिनसलीय. चिमीच्या लग्नाला चाळीस मैलांवरनं म्हातारी ईकटीच रातचं इंधारचं चार दिस आगुदरचं आलती. तिच्या बाळंतपणाला तर महिनाभर तळ ठोकुन होती. पण दोन मैलांवर असणारं वंदीचं लगीन म्हातारीनं चुकवलं होतं. आबाच्या जिवाला घोर लागुन राहिला. ह्यो आबा म्हणजे म्हातारीचा जिव्हाळा. म्हटलं तर पावना, म्हटलं तर ओळखीचा. म्हातारीचा जसा नातवंडावर जीव होता तसा या आबावरही होता.
विचार करत करत बदामाच्या झाडाखाली न्हाय मनलं तरी आबाला गारगार झोप लागली. ऊन्हं ऊतरायला आली तसा म्हातारीनं त्याला कपभर चहा करुन दिला. पुन्हा एकदा आबानं तांब्याभर पाणी घटाघटा पिऊन पिचकाऱ्या उडवल्या. तोंड धुवून तो वट्यावरच चहा पित बसला. दुरवरून फुफाटा ऊडवत येणारं जीपडं त्याला दिसलं. हालगी वाजवत त्याच्या टपावर बसलेले चारजण सुरांचा धुमाकुळ घालत होते. म्हातारी लगबगीनं बाहेर आली. जीपडं दारात आलं तसं म्होरल्या शीटावरची नवरा नवरी खाली ऊतरली. शालूतल्या वंदीला बघुन म्हातारी गहिवरुन गेली.
"म्हातारे पाचशेची ववाळणी पायजेल बरका!" वंदीचा बापानं मागल्या शीटावरुन उतरत मस्करीलाच सुरुवात केली.
ऊतरणाऱ्यांची गर्दी वाढतच गेली. आणि आबाच्या डोळ्यांपुढचं चित्र हळुहळु अस्पष्ट व्हायला लागलं.
वाचने
9763
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
छान !
अगदी प्रसंग डोळ्या समोर उभा राहिला !
मस्त!
छान उतरवलंय शब्दांत.
सुंदर !
+ १
जहबहर्रहदह्स्त!
____/\____
प्रसंग छान लिहिलाय पण शेवट कळला नाही. कदाचित ग्रामीण भाषेची, तेथल्या समाज जीवनाची नीट माहित नसल्यामुळे असं घडलं असेल.
In reply to छान लिहिलंय ! by सौन्दर्य
लग्न झाल्यानंतर नवीन जोडपं थोरामोठ्यांच्या पाया पडतं. तेव्हा पायापडणी (किंवा ओवाळणी) म्हणुन जेष्ठ लोकं त्यांना पाच-पन्नास रुपये देतात. अशी आमच्याकडे तरी परंपरा आहे.
लेखनशैली आणि कथा एकदम मस्तच.
ग्रामीण कथालेखकांच्या यादीत +१.
लगे रहो!!!
सूंदर चित्रण
वा वा जव्हेर भौ, आज आमच्याकडून बियर तुमाला.
एकदम गावात पोचवलं तुम्ही तर ... लेखणीत ताकद आहे भाऊ तुमच्या !
मस्त ! खूप आवडली ही कथा!
सर्व प्रतिसादकांचे आभार!
आवडली कथा!
मस्त लिहिता भाऊ.
वा! मस्त कथा.
सहजसुंदर शैलीतली भिडणारी कथा. शेवट जरा विस्तृत हवा.
In reply to सहजसुंदर शैलीतली भिडणारी कथा. by सस्नेह
शेवट विस्तृत करताना कथा कमजोर होईल असे वाटले होते. तरीही सल्ल्याबद्दल आभार!
चांगलीय
ग्रामीण कथांचा चित्तूर बरोबर पकडलाय.
धन्यवाद मित्रांनो.....!!!
सुंदर लिहिलंय. शेवट तर खूप छान, अगदी मनाला स्पर्श करणारा.
वा!
वा मस्त कथा.
कथाही आणि तीचा बाजही एक्दम शंकर पाटलांची आठवण करून देणारा.
...पण शेवटी आबाच्या डोळ्यासमोरचं चित्र धूसर झालं यांत काय सांगायचं ते नाही समझले
In reply to आवडली भाऊ by आनंद कांबीकर
खास म्हातारीसाठी नवीन जोडपं आणि पै पाव्हुणे तिच्या घरी आले होते. म्हणजे ताणलेलं नातं पुन्हा जोडलं जात होतं. हे पाहुन आबाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. म्हणुन त्याच्या डोळ्यांपुढचं चित्र हळुहळु अस्पष्ट व्हायला लागलं. आणि
"म्हातारे पाचशेची ववाळणी पायजेल बरका!" हे वाक्य वंदीचा बाप मस्करीत म्हणाला होता.
"आबाच्या डोळ्यांपुढचं चित्र हळुहळु अस्पष्ट व्हायला लागलं"
(माझ्यापण...!!)
फारच सुरेख! धन्यवाद!!
मस्तच!
भा हा री ही!
मस्त ....
भारी लिहीलंय. म्हातारीच्या मानापमानाच्या तपशिलात न शिरताही त्या घटनेची उग्रता, म्हातारीच्या मोजक्याच शब्दांमधून, वाचकाच्या मनाला भिडते आणि वाचक तिच्या दु:खाशी एकरूप होतो. त्या मुळेच कथेचा शेवट अधिक उठावदार झाला आहे.
अभिनंदन.
ही नात्यातल्या राजकारणांची, हेव्यादाव्यांची अंतर्गत शिवण आपल्याला कधीच कळली नाही.
कथा छान... गावरान शब्द असल्याने वातावरण निर्मिती एकदम झ्याक...
एकदम काळ्या मातीतली जोमदार कथा!
अवांतर - हलगी शब्द वाचल्याबरोबर ते शंकर पाटलांच्या धिंड कथेतली "ए डँग टिक टॅकटिक, टॅकटिक....घुमवा घुमवा" हलगी आठवली!
खूप खूप धन्यवाद __/\__
छान !