Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जव्हेरगंज on Fri, 10/16/2015 - 21:05
लेखनविषय (Tags)
कथा
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा
रांजणातलं गार पाणी पिऊन आबाला जरा तरतरी आली. अर्धा तांब्या पिऊन झाल्यावर राहिलेल्या पाण्यानं त्यानं तोंड धुतलं. पंच्यानं तोंड पुसत त्यानं अजुन एक तांब्या भरायला घेतला. "उनाचं लय पाणी पीव नकु रं, डोस्क धरतं अशानं" म्हातारी तुळशीपाशी बसुन शेंगा निवडत म्हणाली. आबानं एक ना दोन करत आख्खा तांब्या घटाघटा पिऊन टाकला. तोंडात राहिलेल्या पाण्याची चुळ भरत पिचकारी मारत म्हणाला " म्हातारे, लग्नाला का आली न्हाय?, वंदीनं तुझ्या नावाचा धोसरा काढला हुता" "मला एकतर दिसायचं कमी आलयं बाबा, डोळ्याचं आप्रिशन झाल्यापस्न मी लयशी कुटं जातबी न्हाय, त्यात वंदीच्या बापानं पत्रिकाबी दिली न्हाय, तुच सांग बाबा कसं जायचं आता?" म्हातारी त्याच्यापुढं गार्हाणं मांडायला लागली. "आगं त्यो पेताड माणुस, त्येझं काय यवढं मनावर घीती?, तुझ्या लीकीच्या डोळ्यात पाणी थांबत न्हवतं, पुरीच्या लग्नात आजी न्हाय मनुन कधीची त्वांड पाडुन बसलीय" आबा वट्यावर येत तिच्या शेजारीच मांडी घालुन बसला. "आबा, कायतरी बसायला घी कीरं, थांब मीच आणती आतनं कायतरी" म्हातारी उठायला लागली. " नगं नगं, आगं आमी मातीतली माणसं, बस जरा आशीच, भरलेल्या पंगतीतनं ऊठुन फकस्त तुझी गाठ घ्यायला आलुय, मनलं म्हातारीचं काय बिनसलयं बघावतरी" आबा भिताडाला टेकुन पाय पसरत हासतचं म्हणाला. "तसं काय न्हाय रं बाबा, आता समदं घरबार गेलयचकी, पण मला न्हाय पटलं, पावण्यानं आपल्याला हाडंतुडं करायचं आण आपुन मागतकऱ्यावनी त्येज्या दारात जायचं, मी आपली घरीच बरी, तेवढचं घराला राखान हुतयं" म्हातारी डोळ्याला पदर लावत बोलली. आबा नुसताच 'हु..' करत तिथचं पसरला. खरं म्हणजे म्हातारीचे लय ऊन्हाळे-पावसाळे आबानं बघितले होते. वंदीच्या बापानचं म्हातारीचा कायतरी मानापमान केला असणार, तवाच म्हातारी येवढी बिनसलीय. चिमीच्या लग्नाला चाळीस मैलांवरनं म्हातारी ईकटीच रातचं इंधारचं चार दिस आगुदरचं आलती. तिच्या बाळंतपणाला तर महिनाभर तळ ठोकुन होती. पण दोन मैलांवर असणारं वंदीचं लगीन म्हातारीनं चुकवलं होतं. आबाच्या जिवाला घोर लागुन राहिला. ह्यो आबा म्हणजे म्हातारीचा जिव्हाळा. म्हटलं तर पावना, म्हटलं तर ओळखीचा. म्हातारीचा जसा नातवंडावर जीव होता तसा या आबावरही होता. विचार करत करत बदामाच्या झाडाखाली न्हाय मनलं तरी आबाला गारगार झोप लागली. ऊन्हं ऊतरायला आली तसा म्हातारीनं त्याला कपभर चहा करुन दिला. पुन्हा एकदा आबानं तांब्याभर पाणी घटाघटा पिऊन पिचकाऱ्या उडवल्या. तोंड धुवून तो वट्यावरच चहा पित बसला. दुरवरून फुफाटा ऊडवत येणारं जीपडं त्याला दिसलं. हालगी वाजवत त्याच्या टपावर बसलेले चारजण सुरांचा धुमाकुळ घालत होते. म्हातारी लगबगीनं बाहेर आली. जीपडं दारात आलं तसं म्होरल्या शीटावरची नवरा नवरी खाली ऊतरली. शालूतल्या वंदीला बघुन म्हातारी गहिवरुन गेली. "म्हातारे पाचशेची ववाळणी पायजेल बरका!" वंदीचा बापानं मागल्या शीटावरुन उतरत मस्करीलाच सुरुवात केली. ऊतरणाऱ्यांची गर्दी वाढतच गेली. आणि आबाच्या डोळ्यांपुढचं चित्र हळुहळु अस्पष्ट व्हायला लागलं.
  • Log in or register to post comments
  • 9719 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 10/16/2015 - 21:12

Permalink

छान !

छान ! अगदी प्रसंग डोळ्या समोर उभा राहिला !
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 10/16/2015 - 21:21

Permalink

मस्त!

मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Fri, 10/16/2015 - 22:02

Permalink

छान उतरवलंय शब्दांत.

छान उतरवलंय शब्दांत.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 10/16/2015 - 22:06

Permalink

सुंदर !

सुंदर !
  • Log in or register to post comments

Submitted by दा विन्ची on Fri, 10/16/2015 - 22:21

Permalink

+ १

+ १
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Fri, 10/16/2015 - 22:52

Permalink

जहबहर्रहदह्स्त!

जहबहर्रहदह्स्त! ____/\____
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Fri, 10/16/2015 - 23:00

Permalink

छान लिहिलंय !

प्रसंग छान लिहिलाय पण शेवट कळला नाही. कदाचित ग्रामीण भाषेची, तेथल्या समाज जीवनाची नीट माहित नसल्यामुळे असं घडलं असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Sat, 10/17/2015 - 09:20

In reply to छान लिहिलंय ! by सौन्दर्य

Permalink

लग्न झाल्यानंतर नवीन जोडपं

लग्न झाल्यानंतर नवीन जोडपं थोरामोठ्यांच्या पाया पडतं. तेव्हा पायापडणी (किंवा ओवाळणी) म्हणुन जेष्ठ लोकं त्यांना पाच-पन्नास रुपये देतात. अशी आमच्याकडे तरी परंपरा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभू-प्रसाद on Fri, 10/16/2015 - 23:08

Permalink

आवडली

लेखनशैली आणि कथा एकदम मस्तच. ग्रामीण कथालेखकांच्या यादीत +१. लगे रहो!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 10/16/2015 - 23:25

Permalink

सूंदर चित्रण

सूंदर चित्रण
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा योगिराज on Fri, 10/16/2015 - 23:31

Permalink

वा वा जव्हेर भौ, आज

वा वा जव्हेर भौ, आज आमच्याकडून बियर तुमाला.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Fri, 10/16/2015 - 23:51

Permalink

एकदम गावात पोचवलं तुम्ही तर .

एकदम गावात पोचवलं तुम्ही तर ... लेखणीत ताकद आहे भाऊ तुमच्या !
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Fri, 10/16/2015 - 23:57

Permalink

मस्त ! खूप आवडली ही कथा!

मस्त ! खूप आवडली ही कथा!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Sat, 10/17/2015 - 09:34

Permalink

सर्व प्रतिसादकांचे आभार!

सर्व प्रतिसादकांचे आभार!
  • Log in or register to post comments

Submitted by जगप्रवासी on Sat, 10/17/2015 - 11:41

Permalink

आवडली कथा!

आवडली कथा!
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Sat, 10/17/2015 - 11:54

Permalink

मस्त लिहिता भाऊ.

मस्त लिहिता भाऊ.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sat, 10/17/2015 - 14:00

Permalink

वा! मस्त कथा.

वा! मस्त कथा.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Sat, 10/17/2015 - 15:33

Permalink

सहजसुंदर शैलीतली भिडणारी कथा.

सहजसुंदर शैलीतली भिडणारी कथा. शेवट जरा विस्तृत हवा.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Sun, 10/18/2015 - 00:17

In reply to सहजसुंदर शैलीतली भिडणारी कथा. by सस्नेह

Permalink

शेवट विस्तृत करताना कथा कमजोर

शेवट विस्तृत करताना कथा कमजोर होईल असे वाटले होते. तरीही सल्ल्याबद्दल आभार!
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Sun, 10/18/2015 - 09:29

Permalink

चांगलीय

चांगलीय
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 10/18/2015 - 09:33

Permalink

ग्रामीण कथांचा चित्तूर बरोबर

ग्रामीण कथांचा चित्तूर बरोबर पकडलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Sun, 10/18/2015 - 19:55

Permalink

धन्यवाद मित्रांनो.....!!!

धन्यवाद मित्रांनो.....!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Mon, 10/19/2015 - 11:36

Permalink

सुंदर लिहिलंय. शेवट तर खूप

सुंदर लिहिलंय. शेवट तर खूप छान, अगदी मनाला स्पर्श करणारा.
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Mon, 10/19/2015 - 11:53

Permalink

वा!

वा!
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन५८८ on Mon, 10/19/2015 - 12:01

Permalink

आवडली कथा

वा मस्त कथा.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 10/20/2015 - 15:39

Permalink

खूप आवडली

कथाही आणि तीचा बाजही एक्दम शंकर पाटलांची आठवण करून देणारा.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद कांबीकर on Tue, 10/20/2015 - 15:56

Permalink

आवडली भाऊ

...पण शेवटी आबाच्या डोळ्यासमोरचं चित्र धूसर झालं यांत काय सांगायचं ते नाही समझले
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Tue, 10/20/2015 - 18:51

In reply to आवडली भाऊ by आनंद कांबीकर

Permalink

खास म्हातारीसाठी नवीन जोडपं

खास म्हातारीसाठी नवीन जोडपं आणि पै पाव्हुणे तिच्या घरी आले होते. म्हणजे ताणलेलं नातं पुन्हा जोडलं जात होतं. हे पाहुन आबाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. म्हणुन त्याच्या डोळ्यांपुढचं चित्र हळुहळु अस्पष्ट व्हायला लागलं. आणि "म्हातारे पाचशेची ववाळणी पायजेल बरका!" हे वाक्य वंदीचा बाप मस्करीत म्हणाला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 10/20/2015 - 16:58

Permalink

"आबाच्या डोळ्यांपुढचं चित्र

"आबाच्या डोळ्यांपुढचं चित्र हळुहळु अस्पष्ट व्हायला लागलं" (माझ्यापण...!!) फारच सुरेख! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 10/21/2015 - 16:11

Permalink

मस्तच!

मस्तच!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 10/22/2015 - 02:14

Permalink

भा हा री ही!

भा हा री ही!
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on गुरुवार, 10/22/2015 - 09:27

Permalink

मस्त ....

मस्त ....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 10/22/2015 - 16:07

Permalink

आवडली कथा.

भारी लिहीलंय. म्हातारीच्या मानापमानाच्या तपशिलात न शिरताही त्या घटनेची उग्रता, म्हातारीच्या मोजक्याच शब्दांमधून, वाचकाच्या मनाला भिडते आणि वाचक तिच्या दु:खाशी एकरूप होतो. त्या मुळेच कथेचा शेवट अधिक उठावदार झाला आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on गुरुवार, 10/22/2015 - 16:14

Permalink

ही नात्यातल्या राजकारणांची,

ही नात्यातल्या राजकारणांची, हेव्यादाव्यांची अंतर्गत शिवण आपल्याला कधीच कळली नाही. कथा छान... गावरान शब्द असल्याने वातावरण निर्मिती एकदम झ्याक...
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 10/22/2015 - 21:07

Permalink

अरे वा,

एकदम काळ्या मातीतली जोमदार कथा! अवांतर - हलगी शब्द वाचल्याबरोबर ते शंकर पाटलांच्या धिंड कथेतली "ए डँग टिक टॅकटिक, टॅकटिक....घुमवा घुमवा" हलगी आठवली!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Tue, 05/03/2016 - 12:59

Permalink

खूप खूप धन्यवाद __/\__

खूप खूप धन्यवाद __/\__
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com