Skip to main content

दूध पोळलं

दूध पोळलं

Published on 05/09/2015 - 23:28 प्रकाशित मुखपृष्ठ
दूध पोळलं श्रीकृष्णाने फार पूर्वीच गोकुळ सोडले होते. तो आता द्वारकानाथ झाला होता. त्या अवधीत तो एकदाही गोकुळात फिरकला नव्हता. राधेला मात्र त्याचा विसर पडला नव्हता. बऱ्याच वर्षांनी ती मनाचा हिय्या करून कृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेस निघाली. तिने एकटीने प्रवास केला. किती केला, कसा केला! तिचा तिलाच माहित...... केवळ कृष्णाला पाहण्यासाठी, त्याला एकवार भेटण्यासाठी! साधीभोळी राधा, कृष्णाच्या श्रीमंत महालात पोहचली. तिथले वैभव पाहून, बिचारी भांबावली. जराशी गोंधळली. तिने निरोप पाठवला, तशी कृष्णाच्या राणीवशात ‘हीच का ती !’ च्या अनेक भिवया वर झाल्या. रुक्मिणी, सत्यभामेसह सगळ्या राण्यांचा जथा तिला पहायला आला. उत्सुकता आणि असूयेचे अजब मिश्रण सगळ्या राण्यांच्या डोळ्यात! राधा आणखी बिचकली. राधेचे साधेसरळ अनलंकृत रूप पाहून काही काही राण्यांनी तर, ‘काय हि राधा!’ असं म्हणत स्वतःच्या नेटक्या रुपाला, भरजरी वस्त्रांना, लखलखीत दागिन्यांना परत परत आरशात चाचपून पाहिले. राधेने ‘कृष्णाला भेटायचेय’ असे सरळ सांगितल्यावर, सगळ्या राण्यांनी आपापसात नेत्रपल्लवी केली आणि म्हणाल्या, ‘श्रीकृष्ण बाहेर गेलाय.इतक्यात येणार नाही!’ ‘मी वाट पाहीन’, राधेने सांगितले. प्रवासाने थकलेले डोके खांबाला टेकून ती एका कोपऱ्यात अंग चोरून बसली. बराच वेळ झाला, तो येत नाहीसं पाहून, ती जड अंतःकरणाने उठली. इतकी वर्षे वाट पाहणाऱ्या राधेला, त्या महालातल्या चार घटका जड वाटू लागल्या. ती अस्वस्थ मनाने, ‘मी निघते. मी येऊन गेल्याचे श्रीकृष्णाला सांगा,’ असं म्हणून निघणार, इतक्यात, रुक्मिणी चांदीचा पेला घेऊन पुढे आली आणि लटक्या आग्रहाने म्हणाली, ‘अगं! इतक्या दुरून आलीस, दूध तरी घेऊन जा!’ राधेला क्षणभर काही कळेचना. दूध घ्यावं तरी कसं..... आपल्याला राजवाड्यातील रितीरिवाज माहित नाहीत.आणि न घ्यावे तर राण्यांना वाटेल आपण शिष्ठ आहोत! शेवटी तिने तबकातला पेला हातात घेतला अन तिची बोटे चर्रर्र झाली. तरीही निग्रहाने तिने तो प्याला हातात धरला. इतकं कढत दूध ती कशी घेईल आणि तिची फजिती कशी होईल, हे पाहण्यासाठी सारा राणीवसा गालातल्या गालात हसत उभा होता. मग, राधेने कृष्णाचे मनोमन स्मरण केले आणि एका दमात कढत दुधाचा प्याला रिता केला. रिकामा प्याला तबकात ठेवला आणि राण्यांकडे एक नजर टाकून, शांतपणे महाला बाहेर पडली. ........... .......... ........... ती निघून गेल्यावर बऱ्याच वेळाने श्रीकृष्ण आला. सगळ्या राण्या त्याच्या स्वागतासाठी पुढे सरसावल्या. रुक्मिणीने कोमट सुगंधी जलाचे घंगाळ पुढे केले. श्रीकृष्णाने स्मित करून त्यात पाय बुडविले. जराशाने पाय बाहेर काढताच, रुक्मिणी रेशमी वस्त्राने त्याचे चरण पुसू लागली. पण, पाहता पाहता, त्याच्या पायांवर पुरूळ उठू लागले. रुक्मिणी घाबरून श्रीकृष्णाकडे पहात म्हणाली, ‘घंगाळातले पाणी तर कोमट होते... इतके कसे पोळले?!’ श्रीकृष्ण दुखावल्या स्वरात म्हणाला, ‘दूध पोळलं! पाणी नाही.’ ( ऐकलेली पारंपारिक कथा)

याद्या 8078
प्रतिक्रिया 40
कथा माहित आहे. परंतु पुन्हा वाचली. सांगण्याची पद्धत खूप आवडली. नाही म्हटलं तरी शेवटी डोळ्यात पाणी आलंच. आपण सर्वच त्या ईश्वरावर असलेल्या विश्वासावर निर्धास्त राहून दररोजाच्या जीवनात असे उकळत्या दुधाचे पेले पिऊन तोंड भाजून घेतच असतो. अर्थात हे दु:ख प्रत्येकाच्या नशीबाला वेगवेगळ्या पद्धतीचं येतं. कुणाला आजारपण, कुणाला दारिद्र्य, कुणाला प्रिय व्यक्तिंचा वियोग, इ. प्रकारे. वरकरणी आपला देह व मन हे दु:ख भोगताना दिसले तरी आतमध्ये तो परब्रह्म परमात्माच हे सर्व अनुभवीत आहे. हे १०० टक्के सत्य. हेच या कथेतून अधोरेखित होते.

छान आहे कथा . पारंपारीक ऐकलेली कथा असली तरी मूळ कथेत नसेल ना? कारण श्रीकृष्ण चरित्रात, कृष्णं गोकुळातून बाहेर पडल्यावर राधेचा कुठेही उल्लेख नाही.

ज्या कोणाला ही किंचीतही भावली असेल (मग ती बुध्दीला हास्यापद का वाटेना) त्याने समजुन जावे की त्याला भक्तीमधे नक्किच यश मिळणार आहे.

पण रुक्मिणीचे वर्णन परमात्म्याची चित्कला असे सगळीकडे वाचायला मिळते. श्रीकृष्णाला सर्वार्थाने अनुरूप. म्हणून तिला बघितलेले नसताना तिच्या एका पत्रिकेमुळे कृष्ण वायुवेगाने तिला कुंडिनपुरातून आणायला गेला होता. आठवतात त्या कथांप्रमाणे कृष्णाच्या बाकी राण्या या राजकारण किंवा इतर कारणाने त्याला दिल्या गेल्या. रुक्मिणी ही एकटीच अशी की जिच्यासाठी तो धावत गेला. राधेचा मोठेपणा ठसवण्यासाठी रुक्मिणीच्या नावावर इतका दुष्टपणा कोणी आणि का दिला असावा?

In reply to by पैसा

मलाही रुक्मिणीची या कथेतली वागणूक जरा खटकली कारण ती नेहमीच श्रीकृष्ण परिक्षेत उजवी ठरली आहे... पण मी लक्ष फक्त शेवटाकडे दिले कारण याचसाठी केला होता अट्टहास.. शेवट गोड व्हावा.

In reply to by पैसा

=)) राधा होती? कथाकारांनी भक्तीची परम अवस्था म्हणून राधेचं रुप स्वीकारल्यावर राधा 'विशेष' होते ना? असे दुष्ट मटेरियलिस्टीक प्रश्न या पातळीवर नाहीत पडू द्यायचे. उपासक नि उपास्यामधलं द्वैत संपलं म्हणून एकसारखा अनुभव आला एवढंच लक्षात घ्यायचं.

In reply to by पैसा

राधेचा मोठेपणा ठसवण्यासाठी रुक्मिणीच्या नावावर इतका दुष्टपणा कोणी आणि का दिला असावा?
भारतीय पौराणीक कथासूत्रांनी(कथाकारांनी) रंगवलेले देव असोत अथवा देवी असोत त्यांना कोणत्याही मानवी भावनांपासून अलिप्त ठेवलेले नाही सुष्ट असोत अथवा दुष्ट असोत ! या कथासूत्रांनी बर्‍याच कथांमधून सामान्य स्त्री, राण्या ते देवी सर्वांचेच सवती मत्सर रंगवले आहेत. सध्या चालू टिव्ही मालिकात अशोक सम्राट सिरीयल या नव्याने रंगवल्या जाणार्‍या मिथकात सवती मत्सर रंगवलाच आहे त्यातल्या त्यात सुष्ट राणी पण अल्पसा का होईना सवती मत्सर मनात बाळगतेच. राधा रुक्मीणीची अधिककृतपणे सवत नसली तरीही समकक्ष आपण त्यास समकक्ष मत्सर म्हणू शकतो. तसेच अलिकडील मराठी टिव्ही सिरीयलमध्ये मल्हारी देवाची म्हाळसादेवी पूर्णपणे सवती मत्सरात दाखवली आहे. रुक्मीणीचा राधा मत्सरही दाखवणे एक वेळ ठिक पुराणकारांनी देवींच्या नावावर तिसर्‍या स्त्रीचा पातिव्रत्य मत्सर दाखवलाच नाही तर तसे पाहता अनुसया मत्सर कथा म्हणजे हाईटच आहे. या सर्व कथासुत्रांचा परिणाम म्हणजे मत्सर विरहीत स्त्री असू शकते का असा प्रश्न पडावा ? ह्याच उत्तर स्त्रीयाच जाणोत :)

In reply to by माहितगार

मला वाटते पुरुषांना मोक्ष मिळवण्यासाठी मत्सररहीत असण्याची अट ठेवली असावी आणि पण स्त्रीयांना अशी अट होती/आहे का ? ( :) चुभूदेघे)

In reply to by शिव कन्या

जरा समजून घ्या, श्रीकृष्णाने कोणाचा मत्सर केल्याचे कुठे वाचले नाही, तसेच रुक्मिणीने मत्सर केल्याचेही वाचले नाही. तशा सत्यभामेच्या बर्‍याच कथा आहेत. ही कोणती तरी लोककथा दिसते आहे. अशाच एका जानपद रामायणात कैकेयीने सीतेचा छाळ करावा म्हणून तिला वनवासात पाठवले अशी गोष्ट आहे तसाच हा प्रकार आहे!

In reply to by पैसा

पैसा ताई, हि खूप वर्षांपूर्वी ऐकलेली कथा आहे. वाचलेली नाही. मौखिक परंपरेचा प्रकार म्हणा. सांगितलेले ऐकून, परत ते लिहिताना माझे लक्ष शेवटाकडे जास्त होते. रुक्मिणी कि सत्यभामा पेक्षा एकूण मनुष्य स्वभाव म्हणून मी त्याकडे पाहते. असो. ज्याचा त्याचा दृष्टीकोन. 'हि कोणतीतरी लोककथा दिसते' असे म्हणून समृध्द लोककथांना डावी वागणूक हि द्यायला नको, नाही?

In reply to by शिव कन्या

लोककथा या अनेकदा स्थानिक असतात. त्या रामायण किंवा महाभारत किंवा नाथांचे भागवत इ. इ. पुस्तकांप्रमाणे सर्वांनी ऐकलेल्या वाचलेल्या असतील असे नव्हे. मी फक्त मला काय जाणवते ते सांगत आहे. कोणाला डावे उजवे केले आहे असे मला वाटत नाही. तसे तुम्हाला वाटले असेल तर क्षमस्व.

In reply to by पैसा

कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी ही कथा ( अर्थात थोड्या वेगळया शब्दात कस्कायवर फिरत होती. पण पैताई म्हणतात त्याप्रमाणे गोकुळ सोडल्यानंतर राधेचा कुठेही उल्लेख नाही.

ह्या कथेतून राधेचा कृष्णाविषयीचा भक्तीभावच अधोरेखित झाला आहे. कथा आणि लेखन दोन्ही आवडले.

मूळ कथा धाग्यावर प्रतिसाद द्यावयाचे राहून गेले. कथा आधीपासून माहिती नव्हती प्रथमच वाचली. आणि आवडली.

अगोदर कधी एकली किंवा वाचली नव्हती. राधेने गरम प्याला तोंडाला लावला हे वाचून मनात चर्र झाल. खूप परिणामकारक लिहिली आहे कथा

खूप आवडली कथा. पहिल्यांदाच ऐकली. सुंदर