बर्ट्रांड रसल, माझा सर्वात आवडता लेखक
डिस्क्लेमर> बर्ट्रांड रसल (Bertrand Russell) हा माझा सर्वात आवडता लेखक असल्यामुळे माझी मतं आत्यंतिक (चांगली) असण्याची शक्यता वाढते.
मला संदर्भ म्हणून हा लेख लिहायचा नाही, तर फक्त एक ओझरती ओळख म्हणून! माहितीजालावर त्याच्याबद्दल खूप जास्त माहिती अर्थातच आहे आणि अनेक मिपाकरांना रसल आधीच माहित असेल. तर हा लेख त्यांच्यासाठी ज्यांना रसलबद्दल माहिती नाही, किंवा फक्त नावच ऐकून आहेत. थोडी माहिती या माणसाबद्दल आणि थोडी त्याच्या काही पुस्तकांबद्दल! थोडी अशासाठी कारण माझं वाचन अपूर्ण आहे.
{backslash}डिस्क्लेमर>
मला एकेकाळी अशोक काकांनी बर्ट्रांड रसलची ओळख करून दिली आणि माझा अनेक नव्या गोष्टींशी, खरंतर एका नव्या जगाशीच ओळख झाली. पुस्तकांबद्दल चर्चा करताना (http://misalpav.com/node/3141) बर्ट्रांड रसल हा विषय निघाला आणि काही लोकांनी मला आणखी माहिती विचारली. म्हणून इथे माझ्या आवडत्या लेखकाबद्दल काही शब्द! रसलनी अनेक विषयांचा अभ्यास केला, अनेक पुस्तकं लिहिली, त्याच्या आत्मचरित्राचे तीन खंड उपलब्ध आहेत. त्याचं आयुष्यही वादळी म्हणावं असंच काहीसं होतं, त्याबद्दलही थोडं लिहित आहे.
मागच्या शतकातील काही हुशार आणि अतिप्रसिद्ध व्यक्तिंमधे एक नाव आहे बर्ट्रांड रसल! अनेक विषयांचा अभ्यास करून, अनेकविध पुस्तकं लिहून, समाजासाठी खूप साठा ठेवून जाणारा रसल बालपणी मात्र आयुष्याला कंटाळलेला होता. बर्ट्रांडचे आई-वडील अतिशय हुशार, समाजात प्रतिष्ठीत आणि समाजोपयोगी कामं करणारे, पण त्याबरोबरच अतिशय पुढारलेल्या विचारसरणीचे! त्यावेळच्या इंग्लंडमधे त्यांचे विचार अतिशय जहाल किंवा पुढारलेले मानले जात होते (काळ आणि स्थळ महत्त्वाचं आहे, आज कदाचित ते विचार सर्वमान्य असतील.) इंग्लंडमधे जनननियंत्रण (हा शब्द "बर्थ कंट्रोल"साठी योग्य आहे का?) करणाय्रा काही मोजक्या लोकांमधे बर्ट्रांडचे पालकही होते. बर्ट्रांड आणि त्याचा मोठा भाऊ फ्रँक थोडे मोठे झाल्यावर त्यांना शिकवायला घरी काही हुशार आणि पुरोगामी लोक येत. त्यांच्यातल्या एकाला क्षयरोग झाला होता. याच कारणामुळे त्यानी लग्न केलं नव्हतं. पण त्याला शारिरीक संबंधांपासून वंचित रहायला लागू नये म्हणून बर्ट्रांडच्या आईचे त्याच्या वडीलांच्या माहितीत या शिक्षकाबरोबर संबंध होते. या असल्या गोष्टी त्याच्या आजी-आजोबांना अजिबात खपत नव्हत्या, आणि त्याहीपेक्षा आपल्या नातवंडांवर असे संस्कार व्हावेत हे तर अजिबातच चालण्यासारखं नव्हतं. दुर्दैवाने, बर्ट्रांडचे आईवडील त्याच्या लहानपणीच गेले आणि आजी-आजोबांकडे या मुलांचा ताबा आला.
रसलनी स्वतः असं लिहिलं आहे, की त्याची आजी अतिशय कर्मठ होती तरीही त्याच्यावर देवधर्माची सक्ती झाली नाही. त्याला देवाच्या अस्तित्वाविषयी साशंक (agnostic) असण्यासाठी कधीही आडकाठी झाली नाही. आणि स्वतंत्र बाण्यात आडकाठी न झाल्यामुळे त्याला आजीबद्दलही प्रेम होतं. त्याच काळात त्याला आयुष्य नकोसं झालं होतं. कशासाठी जगायचं हा प्रश्न त्याला अनेकदा पडला आणि अनेकदा त्याने जीव देण्याचाही विचार केला. (सुदैवाने त्यावर अंमलबजावणी केली नाही.) पण एक दिवस मोठ्या भावानी त्याला युक्लीडची भूमिती शिकवायला सुरूवात केली. एकदा युक्लीडशी ओळख झाली आणि मग मात्र जीव देण्याचे विचार मागे पडले. पुढे रसल शिकण्यासाठी केंब्रिजमधे आला आणि त्याला लक्षात आलं की या बाकीच्या इतर विद्यार्थ्यांमध्ये जे नाही ते आपल्यात आहे, गणित! आणि हळूहळू जगासमोर आला गणिती रसल!
तिथेच त्याची ओळख अमेरीकन ऍलिसशी झाली; ती त्याच्यापेक्षा काही वर्षांनी मोठी, पण दोघांनी प्रेमात पडून (त्याच्या आजीच्या इच्छेविरुद्ध) लग्न केलं (पुन्हा, काळ वेगळा होता). लग्नानंतर ७-८ वर्षांनी त्याला असं जाणवलं की त्याचं ऍलिसवर प्रेम नाही. त्यानंतर २० वर्षांनी त्यांनी घटस्फोटाची प्रक्रिया घाईघाईत पूर्ण केली कारण रसलची तेव्हाची मैत्रीण, डोरा ब्लॅक, गरोदर होती म्हणून त्यांना लग्न करायचं होतं. मधल्या काळात अनेक स्त्रियांबरोबर त्याची मैत्री झाली आणि काही वेळा त्याचे एकाच वेळी एकाहून अधिक स्त्रियांशी संबंध होते.
याच मधल्या काळात त्याने Principia Mathematica या ग्रंथाचे तीन खंड प्रकाशित केले (मी वाचले नाहीयेत, पण फार कठीण आहेत असं ऐकलं आहे; याच रसलनी एके काळी आईनस्टाईनच्या सामान्य सापेक्षतावादाबद्दल (general theory of relativity) म्हटलं होतं की जगात तीनच लोकांना त्याचं संपूर्ण गणित फक्त तीन लोकांनाच कळलंय, एक म्हणजे ज्याने ते गणित मांडलं, दुसरा रसल आणि तिसरा कोण ते आता मी विसरले.). त्याच काळात त्याने "जर्मन सोशल डेमॉक्रसी" लिहून त्याचा राजकारण आणि समाजकारणातला रस दाखवून दिला. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्याने युद्धाला विरोध दाखवून तुरुंगाची सफरही केली.
डोरा ब्लॅकबरोबर त्याने एक शाळाही काढली. तेव्हाची प्रचलित शिक्षणपद्धती त्याला मान्य नव्हती, त्यामुळे स्वतःच्या मुलांसाठी हा शाळेचा प्रयोग त्या दोघांनी केला. पण लोकं त्या शाळेला उनाड आणि फुकट गेलेल्या मुलांना शिस्त लावण्यासाठी एक चांगली जागा अशी समजले आणि त्या शाळेचा प्रयोग व्यर्थ गेला. या सगळ्या प्रयोगात बय्रापैकी पैसा खर्च झाल्यामुळे त्याने Conquest of happiness लिहिलं. पुस्तकाची तडाखेबंद विक्री झाली आणि पुन्हा रसलच्या दारी पैसा आणि कीर्ती उभे राहिले.
डोराबरोबर रसलचं लग्न काही वर्ष टिकलं आणि नंतर त्याने ऑक्सफर्डमधल्या पॅट्रिशिया स्पेन्स बरोबर त्याने पुन्हा एकदा संसार सुरू केला. त्या दोघांचा मुलगा कॉनरॅड पुढे प्रसिद्ध इतिहासकार आणि इंग्लंडमधल्या लिबरल डेमोक्रॅट पक्षाचा नेता झाला.
रसलच्या काही निबंधांमुळे त्याच्यावर बरीच टीका झाली, उदा: Why I am not a Christian, What I believe (या दोन नावांच्या पुस्तकात रसलचे हे दोन आणि इतर काही उत्तम निबंध/लेख संग्राहित केले आहेत.) हे दोन निबंध सुंदर, ओघवत्या शैलीत, अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने रसलचा निरीश्वरवाद (atheism) मांडतात. आणि याच निबंधांमुळे रसलवर न्यूयॉर्कच्या सिटी कॉलेजमधे तत्त्वज्ञान शिकवण्यास बंदी घालण्यात आली. "जो माणूस देवावर विश्वास ठेवत नाही त्याच्या शिकवणीमुळे आमची मुलं वाया जातील", या आणि अशा प्रकारच्या भीतीमुळे पालकांचा रसलला खूप विरोध होता. त्यासंदर्भात न्यायालयात खटला झाला (The Bertrand Russell case या नावाने त्या खटल्याबद्दलच्या माहितीचा संग्रह प्रसिद्ध आहे.) त्यात न्यायाधीशांनी रसल कॉलेजच्या मुलांना शिकवण्यास morally unfit आहे असा निर्वाळा दिला. त्यानंतर रसल परत केंब्रिजमधे ट्रिनिटी महाविद्यालयात परत आला, तिथे त्याने पाश्चिमात्य तत्वज्ञानावर त्याने जी व्याख्याने दिली तीच पुढे The history of western philosophy या पुस्तकाचा आधार ठरली. (दोन वर्षांपूर्वी मी मोठ्या उत्साहाने हा ठोकळा मागवला आणि उघडलाही, पण पुस्तकाचा आकार, भाषा, अगम्य विषय यामुळे लवकरच तो अशोक काकांच्या हातात आणि पुढे त्यांच्याच कपाटात गेला.)
दुसय्रा महायुद्धात मात्र त्याने आधीपेक्षाही जास्त प्रकट विरोध दाखवला. आणि पुन्हा एकदा तुरुंगाची हवा खाऊन आला. पण या सगळ्यात त्याची लोकप्रियता वाढतच गेली. तेव्हा पॅट्रिशियाशी काडीमोड घेऊन त्याने ज्युडिथ फिंचबरोबर लग्नं केलं होतं. त्याच्याच काही वर्ष आधी त्याला ब्रिटीश राजाकडून ऑर्डर ऑफ मेरीट मिळालेलं होतं, तुरुंगात जाऊन येणाय्रा लोकांना राजाकडून सन्मान, हे जरा विचित्रच होतं. आणि त्याच्याच पुढच्या वर्षी त्याला साहित्यातला नोबल पुरस्कारही मिळाला. बी.बी.सी.वर अनेक माहितीपटांत, मुलाखतींमधे रसल दिसायचा. त्यामुळे कोणत्याही (हो अगदी कोणत्याही) विषयावर "तुम्हाला अमुक गोष्टीबद्दल काय वाटतं?" असं त्याला विचारलं जात असे (म्हणजे आपल्याकडची ही प्रथापण इंपोर्टेडच!). एका अपघातातून वाचलेल्या थोडक्या लोकांत तो असल्यामुळे The history of western philosophy ची विक्री वाढली आणि रसलचं उत्पन्न स्थिरावलं.
पुढे शांततेचा पुरस्कर्ता अशी त्याची ओळख जगाला झाली. व्हिएटनाम युद्धाच्या विरोधात आणि संदर्भात रसल आणि आईनस्टाईनने अकरा अणुशस्त्रसज्ज देशांनी ती अस्त्रे निकामी करावीत असा मॅनिफेस्टो (मराठी प्रतिशब्द?) प्रकाशित केला. महात्मा गांधी आणि रसल यांच्यातही अहिंसा, शांतता अशा विषयांवर पत्रांद्वारे चर्चा झाली होती. आयुष्याच्या शेवटच्या वर्षात त्याने आत्मचरीत्राचे तीन खंड लिहिले. शरीर म्हातारं झालं तरी त्याचा मेंदूमात्र मरेपर्यंत पूर्वीसारखाच तल्लख राहिला. अगदी शेवटच्या दिवशीही त्याने टाईम्ससाठी लिखाण केलं.
रसलची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली. (त्यांची माहिती अर्थात जालावर मिळेलंच, पण मी वाचलेली पुस्तकं आणि त्यावर माझी थोडी मतं, ती नाही लिहिली तर मग काय लिहिलं? थोडी मतं "जुनी" आहेत, कारण आता गेल्या पहिलं पुस्तक वाचून पूर्ण झाल्याला पाचेक वर्ष झाली.)
मी रसल वाचायला सुरूवात Why I am not a Christian पासून केली. हे पुस्तक वाचायचं असेल आणि सगळ्या निबंधांचा आस्वाद घ्यायचा असेल तर ख्रिश्चन धर्माबद्दल, १९व्या शतकाचा शेवट आणि २०व्या शतकाची सुरूवात या काळात इंग्लंडमधे कसं वातावरण होतं याची माहिती असेल तर हे माहिती असलं तर बरं. नसेल तरीही बरेचसे निबंध/लेख समजतात. Thomas Paine वरचा लेख मात्र मला (माझ्याच आळसामुळे) नीट समजला नाही.
पण मला सगळ्यात आवडलं ते Science and religion! तडाखेबंद फलंदाजी ... आपलं आर्ग्युमेंट्स! एकेक वाक्य अगदी मोजून मापून, अभ्यास करून लिहिलं आहे (मला असा एक परिच्छेद लिहिता नाही येत). एक शब्द इकडचा तिकडे नाही, कमी नाही की जास्त नाही. यातसुद्धा धर्म म्हणून ख्रिश्चॅनिटीच घेतली आहे, पण थोडे संदर्भ बदलले तर थोड्या-बहुत प्रमाणात सगळीकडे सारखेच लोक दिसतात त्याचं प्रत्यंतर येत रहातं (मी हे वाचलं तेव्हा त्याच्याच देशात होते, म्हणूनही मला असं वाटलं असेल, आणि दोनेक वर्षांपूर्वी वाचलंय त्यामुळे आता खूपसं आठवत नाहीये). हिंदू धर्माबद्दल त्याने जे लिहिलंय त्यात मात्र बय्राच "चुका" वाटतात; करण बहुदा तेव्हाएवढा कर्मठपणा आजच्या हिंदू समाजात नाही, उदा: सती, विधवा केशवपन प्रथा!
Conquest of happiness हे त्याचं पुस्तक सगळ्यात गाजलं. ते त्यानी पैशांसाठीच लिहिलं होतं. वाचताना अगदी ए-वन नाही वाटलं तरी बाजारू वगैरे अजिबातच नाही. याचं मराठी भाषांतर "सुखी माणसाचा सदरा"ही तेवढ्याच ताकदीने करुणा गोखल्यांनी उभं केलंय. गेल्या शतकाच्या सुरवातीच्या कालात लिहिलं गेलेलं हे पुस्तक आजही, आपल्या भारतीय समाजालाही वाचण्यासारखंच आहे. विशेषतः त्याने जे लग्नाचं पिढीनिशी वाढत जाणारं वय, एकटं रहाण्याची, मुलं जबाबदारी वाढवतात म्हणून मुलं होऊ न देण्याची किंवा उशीरा होऊ देण्याची सगळ्यांची वृत्ती, कामाचा अतिरिक्त ताण, त्यांचा माणसाच्या घरावर आणि स्वतःवर होणारा परिणाम या सगळ्यांवर त्याने जवळजवळ १०० वर्षांपूर्वी जे लिहिलंय ते आजही वाचताना तेवढंच लागू पडतं असं वाटतं.
The problems of philosophy आणि The history of western philosophy या दोन पुस्तकांवर माझी काहीही मतं नाहीत. आधी लिहिल्याप्रमाणे, ही दोन पुस्तकं कपाटात ठेऊन द्यायची, लोकांवर इंप्रेशन मारायला! मी The problems of philosophy ची दोन पानं वाचली आहेत, काहीही न समजता, तेव्हा कोणाला त्यात गती असेल तर कृपया मदत करा.
What I believe सध्या माझ्यासाठी "work under construction" आहे, त्यामुळे फार काही लिहिता येणार नाही. पण पुन्हा एकच वर्णन, तडाखेबंद फलंदाजी!
रसलची आणखीनही बरीच पुस्तकं, निबंध वाचण्यासारखे आहेत. त्याचा एक निबंध, In praise of idleness, माझ्यासारख्या आळशी आणि अनेक गोष्टींत रस असणाय्रांना आवडेलसा; त्याचं मराठी भाषांतर इथे आहे. (धन्यवादः बिपीन कार्यकर्ते). आता त्याच्याच विचारांचं, आळशीपणाचं समर्थन करून थांबते.
वाचने
19612
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
पुन्हा एक डिस्क्लेमर!
अदिती,
In reply to अदिती, by विसोबा खेचर
श्रेय!
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to छान by नंदन
भाषांतर
धन्यवाद...
छान ओळख
In reply to छान ओळख by धनंजय
धन्यवाद
In reply to छान ओळख by धनंजय
एक अनुवाद
माहीतीपूर्ण
थोडं स्पष्टीकरण
व्वा !!!
एकदम
लेखाला
In reply to लेखाला by मेघना भुस्कुटे
मॅरेज ऍण्ड मॉरल्स
In reply to मॅरेज ऍण्ड मॉरल्स by ३_१४ विक्षिप्त अदिती
लेख..
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सहज
अवांतर
In reply to अवांतर by मेघना भुस्कुटे
मला फक्त
ओझरता परिचय
In reply to ओझरता परिचय by अवलिया
अपेक्षा!
वा!
छान
In reply to छान by आनंदयात्री
हेच म्हणते
सुंदर
धन्यवाद.
वा!
थॉमस पेनबद्दल थोडेसे
सुंदर परिचय
रसेल थोडा कळला