मवाली भट नी पै
शीर्षक वाचून धागा उघडल्याबद्दल स्वताची पाठ थोपटून घेतो. स्वतःच्या लेखनाचा दर्जा ओळखून असल्याने अशी रोचक शीर्षके देऊन वाचक मिळवण्याचा क्षीण प्रयत्न.... असो आता मुद्द्याकडे वळूया. तसा आमचा प्रांत भटकंती या सदरातला , परंतु गेले २-३ महिने बंगळुरुला वास्तव्य असल्याने दुर्ग भ्रमंती होत नव्हती. त्यामुळे लेखन होत नव्हते, परंतु बंगुळूरुतील अनुभवांवर लेख लिहायचा विचार होता. तसे आम्ही पडलो अभियंता वर्गातले त्यामुळे ते अनुभव सर्वांस रुचातातच असे नव्हे. त्यामुळे आपल्या खाद्य्भ्रमंतीवर लेख लिहिण्याचा एक प्रयत्न!
MTR (Mavalli Tiffin Room) ला जाण्याचा योग तसा अचानकच जुळून आला .मुंबईला परत येत असतांना सहज चक्कर मारतांना आनंदराव circle जवळ हे हॉटेल दृष्टीस पडले .नाव ऐकून होतोच ,त्यामुळे पाऊले आपसूक तिकडे वळली . दुपारी जेवायची वेळ होती त्यामुळे जास्त मेनू संशोधन न करता डिलक्स थाळी मागवली . बंगळुरुत स्पेशल वा डिलक्स थाळी मागवली कि स्टार्टर म्हणून टोमाटो सूप मिळतेच !!! पण पहिलाच सुखद धक्का ! पन्हेसदृश पेय welcome ड्रिंक प्रमाणे मिळाले.त्यानंतर पंक्तीतील जेवणाप्रमाणे कप्प्यांचे ताट दिले (वाट्यान्नी भरलेले ताट नव्हे). व भाजी वाढतान्नासुद्धा वाटीचा हिशेब न लावता पोटास पुरेल इतकी भाजी ,कोन्शिम्बीर ,रस्सम वाढण्यात आले . पुरी वा चपातीची choice होती.दक्षिणेतील चपात्यांचा दर्जा ओळखून असल्याने निमुटपणे पुरी order केली . पुरीपण xxl size वाली होती . तसा माझा आहार भक्कम असल्यामुळे 3 पुर्या आरामात खाल्ल्या .आता बिसिबेली भाताकडे मोर्चा वळविला . तो संपवून जातीला जागून दहीभात मागविला .तसे नाव ठेवण्यात मी पटाईत. पण येथील एकही पदार्थातील मीठ ,तिखट ,तेलाच्या प्रमाणावर टीका करायला मलासुद्धा जड जाईल . येथील जेवणावर प्रसन्न झाल्याने संध्याकाळचा नाश्ता इथेच करायचे पक्के करून बाहेर पडलो .
संध्याकाळी दुपारच्या तृप्ती भोजनामुळे भूक नव्हती . पण काही नवीन पदार्थ ट्राय करायचाच या उद्देशाने हॉटेलात शिरलो . हॉटेलात मंद प्रकाश होता . जणू काय मद्यालय च ! परंतु mtr हे फक्त पदार्थांचा दर्जा पाळतात इतर गोष्टीत नव्हे , हि माहिती गुगल बाबाकडून मिळाली . येथे हॉटेलातील उजव्या बाजूच्या भिंतीवर MTR गाथा लिहिली आहे . जरी ती इंग्रजीत असली तरी नको तितक्या शेड्स नि विचित्र रंसंगती कि २ मिनिटाची कथा वाचण्यास मला ५ मिनिटे लागली .
मसाला दोस्याची order केली .ज्या पद्धतीने तो serve करण्यात आला ते बघूनच दिल खुश झाला . सांबर नि चटणी बरोबर छोटाश्या वाटीत तूप दिले होते .डोसा अप्रतिम होता . येथील स्पेशल रवा इडली खायची होती पण पोटात जागा नव्हती. पण पट्टीचा खाणार थोडीच ऐकतोय म्हटले सोडा वा तत्सम शीतपेये पिउन पोटात जागा करू .पण अहो आश्चर्यम ! येथे शीतपेये मिळत नाही . फळरस मिळतात . त्यामुळे मौसंबी रस पिउन या हॉटेल बाबत अधिक माहिती मिळवून हा अनुभव मिपा कारांबरोबर share करायचा असा निश्चय करून बाहेर पडलो . ( MTR वर विकिपेडीयावर page आहे, जरूर वाचा. रवा इदालीमागील कथा , चंद्रहार पदार्थाच्या नावाची कथा, आरस्पानी मुदपाकखाना अश्या अनेक गोष्टी आहेत).
भट - या हॉटेलचा मालकाबरोबर पुढील भेटीत फोटो काढण्याचे ठरविले आहे .कारण या हॉटेल म्हणा वा धाबा ,इथली चव घरच्या जेवणाला पण येणार नाही .अतिशयोक्ती वाटते का ? स्वानुभवावरून सांगतो बाकी तुमची मर्जी .हे हॉटेल नसून रस्त्याच्या कडेला असलेली मोठी टपरी आहे . तरीसुद्धा इथे लोकांचा रतीब असतो , जेवणाच्या वेळेस इथे बसायला जागा मिळत नाही . या भटांची आख्यायिका अशी आहे कि या माणसास १० शहरातून हाकलण्यात आले आहे .कारण जेवणाचा दर्जा उच्च असला तरी किंमत अगदी खिश्यास परवडणारी असते. इथे एक अफलातून पदार्थ मिळतो .केळ्याचे काप ,vanila ice cream नि गुलाबजाम . जीभ अडखळली ना ? एकदा खाऊन बघा इथे ,आयुष्यात तुम्ही चव विसरणार नाही.येथे संध्याकाळी नाश्त्यास अजून गर्दी असते. हि संधी मला मिळाली नाही. परंतु पुढील भेटीत जरूर संध्याकाळी तेथे जाणार हे नक्की. हे हॉटेल पिन्या औद्योगिक वसाहतीत आहे. (NTTF circle वरून जवळ )
पै - हे हॉटेल corporation circle ला आहे .KSTDC च्या कार्यालयाजवळ . ह्या हॉटेलची चव थोडी मुंबईतील कामतांच्या जवळ जाणारी आहे . तसेच उत्तर भारतीय पदार्थ वा चाट खायची हौस झाली तर वरील दोन हॉटेलात आपणास पर्याय नाही . परंतु इथे मुंबैया स्ताइल पदार्थ मिळतील .तसेच यांचे guest house सुद्धा आहे .guest house बाह्यरूपाने तरी चांगले वाटते .येथील अनुभव नाही . पै हॉटेलातील चहा वा कॉफ्फी एकदातरी हाणाच !
वरील तिन्ही हॉटेल हि नॉर्थ कॅनरा कडची माणसांची आहेत . त्यामुळे नॉर्थ कॅनारातील माणसे अभिमान्युप्रमानेच पाक कला शिकून येतात कि काय अशी रास्त शंका !
इति लेखनसीमा .
ता. क. - बंगुळूरातील मुक्कामात तिरुपती दर्शन करून घेतले, त्यावरील लेख सवडीनुसार टंकण्यात येईल.
वाचन
5503
प्रतिक्रिया
0