मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आंधळी कोशिंबीर - एक धमाल करमणूक

श्रीगुरुजी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बापू सदावर्ते (अशोक सराफ) एक निवृत्त विधुर. एका मोठ्या बंगल्यात तो आपल्या रंगा (अनिकेत विश्वासराव) नावाच्या तरूण अविवाहीत मुलाबरोबर राहतो. बापू स्वतः अत्यंत काटकसरी व प्रचंड भांडकुदळ. भांडणात कोणालाही हार जात नाही. शांती चिटणीस (वंदना गुप्ते) आपल्या वयात आलेल्या पण अत्यंत पोरकट असलेल्या राधिका (मृण्मयी देशपांडे) नावाच्या मुलीबरोबर एकटीच राहणारी विधवा. ती सुद्धा प्रचंड भांडकुदळ. राधिका जराशी पोरकट, काहीशी अर्धवट. तिच्या शेजारी दुष्यंत मारणे (आनंद इंगळे) हा अविवाहीत वकील आहे. त्याचा शांतीवर क्रश आहे. शांतीला पटविण्यासाठी तो तिला वेळोवेळी स्वतःच रचलेल्या कविता पाठवितो आणि राधिकाला सारखे मिठाईचे बॉक्स पाठवत राहतो. शांतीने फाडफाड बोलून त्याचा अपमान करून त्याला हाकलून सुद्धा तो तिचा नाद सोडत नाही. रंगा एक टिपीकल नवयुवक आहे. बापाच्या पैशावर मनसोक्त उधळपट्टी करणारा. फोटो स्टुडिओ चालविणारा त्याचा वसंता (हेमंत ढोमे) नामक मित्र त्याच्यासारखाच. रंगाने वेळोवेळी गोरक्ष (हृषिकेश जोशी) नावाच्या टपोरी गुंडाकडून उसने पैसे घेतलेले असतात. गोरक्ष वडगाव, धायरी भागातल्या अंगावर भरपूर सोने बाळगणारा टिपीकल टपोरी गुंड राजकारणी. गोरक्षची बहीण (प्रिया बापट) हिला मॉडेलिंगचे वेड आहे. घरातल्या घरात वेगवेगळे रोल करून पाहणे हा तिचा छंद. पैशासाठी गोरक्ष रंगाला तगादा लावतो व एक कल्पना सुचवितो. बापाचा बंगला गहाण टाकून आपले १३ लाख रूपये फेडावेत अशी कल्पना तो रंगाला सुचवितो. पण आपला बाप गहाण टाकण्याच्या कागदावर कधीही सही देणार नाही याची रंगाला कल्पना असते. पण बापाला वेडा ठरविला तर त्याच्याऐवजी रंगाची सही चालेल असे मारणे वकील सुचवितो. बापाला वेडा ठरविण्यासाठी त्याला कोणीतरी भांडणात हरविणे आवश्यक आहे असे रंगाला वाटते. भांडणात हरल्यामुळे त्याला वैफल्य येऊन तो वेडा होईल अशी त्याची कल्पना. त्यासाठी तो आणि वसंता शांती चिटणीसला थाप मारतो की आपला बाप वेडा आहे व त्याच्याशी कोणतरी भांडले तरच तो पुर्ववत होईल आणि म्हणून शांतीने त्याच्या घरी जाऊन बापूशी जोरदार भांडण करावे असे तो शांतीला सुचवितो. इकडे रंगा आणि वसंता बापूला तीच थाप शांतीविषयी मारतात. शांती वेडी असून तिच्याबरोबर कोणीतरी भांडण केले तरच ती पूर्ववत होईल असे सांगून तिच्याशी भांडायला तो बापूला राजी करतो. शांती बापूशी भांडायला येते आणि हळूहळू परिस्थितीला कलाटणी मिळते. ती कशी ते प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. इकडे रंगा गोरक्षच्या बहीणीच्या प्रेमात पडतो तर अर्धवट राधिका वसंताच्या प्रेमात पडते. शांतीला पटविण्याचे मारणे वकीलाचे प्रयत्न सुरूच असतात. बापू आणि शांती दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. शेवट अपेक्षेप्रमाणेच गोड आहे. चित्रपट एकंदरीत धमाल करमणूक आहे. चित्रपटात एकूण ३ गाणी आहेत व सर्व गाणी चित्रपटाच्या कथेला साजेशी आहेत. श्रीकांत मोघेही एका छोट्याश्या भूमिकेत चमकून जातो. मेंदू घरी ठेवून जास्त विचार न करता हा चित्रपट पाहिला तर पैसे नक्कीच वसूल होतील.

वाचन 9024 प्रतिक्रिया 35