Skip to main content

ओह माय गॉड - झणझणीत अंजन

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 02/10/2012 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
माझी एक आत्या आहे. वय साधारण ७३ वर्षे! आयुष्याचा बहुतेक काळ एका लहान गावात व्यतित केलेला. घरचे वातावरण कर्मठ! एकदा माझ्या चुलत भावाचे लग्न आटोपून मी आणि माझी ही आत्या पुण्यास परत येत होतो. त्यादिवशी एकादशी होती. भूक लागली म्हणून आम्ही एका ढाब्याजवळ थांबलो. आत्याला म्हटले की आपल्याला पुण्याला पोहोचायला अजून ३-४ तास तरी लागतील; आताच व्यवस्थित जेवून घे. आत्याच्या उत्तराने मी आश्चर्यचकितच नाही तर पुरता हबकलो. "आत्या, पटकन जेवून घेऊ आणि मग पुन्हा निघू" "तू जेवून घे; मला जेवता नाही येणार. आज एकादशी आहे." "अगं आज काही कार्तिकी किंवा आषाढी एकादशी नाही. साधी मंथली एकादशी आहे. एखाद्या वेळेस मोडली तरी हरकत नाही. इथे तुला सबुदाणा खिचडी वगैरे मिळणार नाही." "नाही नाही, एकादशीच्या दिवशी जेवणे म्हणजे डुकराचे मांस खाण्यासारखे आहे आणि त्याचे पाप खूप जास्त लागते" मी पुरता थक्क झालो. "अगं, इतर दिवशी तुम्ही हेच अन्न खाता ना? मग आजच खाल्ले तर डायरेक्ट डुक्कर ठरता? जगात कितीतरी माणसे आजच्या दिवशी हेच अन्न खात असतील. म्हणून काय ते डुक्कर ठरतात? आणि अमेरिकेत कसली आलीये एकादशी? तरी ते लोकं आपल्यापेक्षा शतयोजने पुढे आहेतच की नाही?" "नाही बाबा, इतकी वर्षे नियम पाळले आहेत; आज मोडून पापाचं धनी का म्हणून व्हायचं?" सवाल रोकडा होता. डझनभर केळी, बटाट्याचा चिवडा, चिक्की वगैरे घेऊन तिने थोडे अधिक पुण्य कमवले आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. काय म्हणावे याला? शतकानुशतकांच्या विचारांचा, निरर्थक संस्कारांचा पगडा म्हणावे तरी स्वत:ची अशी बुद्धी असते की नाही? स्वतःची अशी तर्कसंगत विचार करण्याची आणि योग्यायोग्य ठरवण्याची क्षमता असते की नाही? की आपली बुद्धी, आपली विचार करण्याची कुवत अजिबात वापरायची नाही असेच आपली तथाकथित कर्मकांडांवर आधारित संस्कृती शिकवते? मग तर कल्याणच म्हणायचे! साधी पोळी आणि भाजी खाल्ल्याने पाप लागतं? आणि पोट फुटेस्तोवर खिचडी, चिक्की, भगर, केळी, काजू, बदाम, दूध, राजगिर्‍याच्या लाह्या, बटाटा वेफर्स, बटाट्याची सुकी भाजी, रताळ्याचा पाकात घोळलेला आणि अस्सल तुपात तळलेला कीस खाल्ल्याने अमाप पुण्य लाभतं? कुठल्या गाढवाने हे लिहून ठेवलंय? कुठल्याही देवपूजेला पोट सुटलेले ब्राह्मण जेवू घातल्याने पुण्य लाभतं असा एक नितांतमूर्ख समज आपल्याकडे प्रचलित आहे. काय सबंध आहे? तुमच्या घरात काम करणार्‍या बाईच्या लहानग्या, शेंबड्या, चप्पल न घालणार्‍या मुलाला ५० रुपयांची चप्पल घेऊन देण्याची अक्कल सुचत नाही पण ढेरपोट्या ब्राह्मणांना आणखी खाऊ घालून पुण्य कमवल्याचं समाधान मात्र बरोबर समजतं. हा काय प्रकार आहे? मुंबईत कोणी राधे माँ म्हणून खूप प्रसिद्ध (?) बाई आहेत. लोकं त्यांना कडेवर घेऊन भजनाच्या तालावर नाचतात. असे केल्याने म्हणे पुण्य लाभते. ही बाई ओठांवर लिपस्टीक लावून नटून थटून बसते आणि तिचे मूर्ख भक्त तिच्या चरणी लाखो रुपयांचा 'चढावा' चढवतात. एखाद्या चित्रपटातली चवचाल बाई शोभावी अशी या राधे माँची राहणी आहे. तिच कथा आसाराम बापूंची आणि अजून कितीतरी कोट्यधीश, महागड्या गाड्यांमधून फिरणार्‍या बाबा-बुवांची! हे आसाराम बापू तर क्रोधाचे आगर आहेत. स्वतःला परमेश्वर म्हणवून घेतांना हा निर्लज्ज बाबा भक्तांवर चिडतो आणि प्रसंगी शिव्या देखील देतो. तरीही आपले मूर्ख लोकं त्याच्या नादी लागतातच. निर्मल बाबाला पाहिल्यावर तर शेंबडं पोरगं देखील सांगेल की या बाबाला साधं "श्री गणेशाय नमः" देखील धड म्हणता येणार नाही पण भक्तांना लुबाडून या निर्मल बाबाने कोट्यवधी रुपयांची माया जमवलेली आहे. याच्या समागमात उपस्थिती लावण्यासाठी दोन-दोन हजार रुपये मोजावे लागतात आणि हा बाबा फक्त हात वर करून "कृपा बनी रहेगी" असले काहीतरी बडबडतो. तिच कथा नरेंद्र महाराजांची. राजकारण्यांच्या पदरात लपणार्‍या या भोंदू बाबाला ३०० एकर जागा फुकट मिळालेली आहे. याच्या प्रवचनात हा नरेंद्र महाराज राजकारणाखेरीज क्वचित कुठल्यातरी विषयावर बोलतो. आणि आपल्या देशाचे दुर्दैव असे की आपली बिनडोक जनता या भोंदू आणि स्वतःला देव समजणार्‍या पाजी लोकांसमोर नतमस्तक होते. आमच्या गावातल्या घरासमोर एक कुटुंब राहते. ते अनिरुद्ध बापूंचे इतके पराकोटीचे भक्त आहेत की त्यांच्या घरातल्या प्रत्येक भिंतीवर अनिरुद्ध बापूंचे फोटो, स्टिकर्स वगैरे लावलेले आहेत. सतत २४ तास हे कुटुंब त्यांचे गुणगान गात असते. सकाळी पोट व्यवस्थित साफ झाले तरी अनिरुद्ध बापूंची कृपा असे त्यांना वाटते. आता बोला! "ओह माय गॉड" अशाच निरर्थक प्रथांवर आणि सगळ्या धर्मातल्या किळसवाण्या बुवाबाजीवर कोरडे ओढतो आणि ते ही सगळ्यांना पटेल अशा पद्धतीने. कानजीभाई मेहता हा देवाच्या मूर्तींचा व्यापार करणारा एक नास्तिक परंतु मध्यमवर्गीय कुटुंबवत्सल गुजराती गृहस्थ असतो. देवादिकांवर, कर्मकांडांवर, बुवाबाजीवर पैसे वाया घालवण्यापेक्षा त्या पैशांचा काहीतरी चांगला उपयोग करावा अशा धरतीची त्याची विचारसरणी असते. त्याच्या शेजारच्या दुकानातला मुस्लीम मालक जेव्हा हज यात्रेला जाण्याचा विचार बोलून दाखवतो तेव्हा कानजीभाई त्याला व्यर्थ पैसे दवडण्यापेक्षा दुकानाची डागडुजी करण्याचा सल्ला देतो. या कानजीभाईचे दुकान भूकंपात जमीनदोस्त होते. विमा कंपनी 'अ‍ॅक्ट ऑफ गॉड' या कलमाखाली बोट दाखवून हात वर करते. कानजीभाई रस्त्यावर येतो. मग कानजीभाई सरळ-सरळ देवावर खटला दाखल करतो. देवाचे दलाल म्हणून सगळे धर्मगुरु, पंडित, मौलवी, फादर यांना तो प्रतिवादी करून नुकसान भरपाईची मागणी करतो. राजकारणी आणि धर्म हे समीकरण दृढ असल्याने राजकारणी देखील या युद्धात ओढले जातात. पुढे काय होते? कानजीभाई सगळ्या धर्मातल्या धर्मगुरुंना धडा शिकवतो का? त्याला नुकसान भरपाई मिळते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चित्रपटात पाहणे श्रेयस्कर ठरेल. सध्या जे धर्माचे, धार्मिकतेचे, कर्मकांडांचे स्तोम सर्वत्र माजलेले आहे त्यावर हा चित्रपट विचार करायला लावणारे भाष्य करतो. महादेवाच्या पिंडीवर हजारो लीटर दूध अभिषेकाच्या नावाखाली कसे ओतले जाते आणि शेवटी ते कसे गटारात वाहत जाते याचा दाखला देऊन कानजीभाई अभिषेक या संकल्पनेतला फोलपणा अगदी स्पष्टपणे समोर आणतो. गरीबाच्या तोंडी न जाता हे दूध गटारात जाते हे बघून आपल्याला देखील अभिषेक या विधीचा तिटकारा आल्यावाचून राहत नाही. दर्ग्यांवर महागड्या चादरी चढवण्यापेक्षा गरीबाला ते कपडे दिले तर देवाची खरी सेवा करण्याचे पुण्य लाभेल हे ही तो मुस्लीम मौलवींना ठणकावून सांगायला घाबरत नाही. "धर्म का मनुष्य के जीवन में स्थान क्या हैं?" या प्रश्नावर कानजीभाई खिन्नपणे "या तो धर्म इंन्सान को बेबस बनाता हैं या फिर आतंकवादी!" असे उत्तर देतो. नीट विचार केल्यास आजकालचे चित्र असेच आहे. देवापुढे लाचार होणारे भक्त असोत किंवा मुल्ला-मौलवींच्या तद्दन चुकीच्या शिकवणीमुळे जिहाद सारख्या निरर्थक संकल्पनांना बळी पडून जग अस्थिर करणारे दहशतवादी असोत; धर्माच्या अतिरेकी विचाराने कुणाचे भले झाले आहे? त्यात राजकारणी आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी धर्माचा ज्वर अधिकाधिक पसरवतात. अबू आझमी असो, 'संभाजी ब्रिगेड' असो, बांग्लादेशी मुस्लीमांच्या घुसखोरीच्या समर्थनार्थ जाळपोळ करणार्‍या धर्मांध आणि माथेफिरू मुस्लीम संघटना असोत, किंवा भाजप असो...धर्माच्या राजकारणाखेरीज आणि आपापसात द्वेष पसरवण्याखेरीज हे राजकारण आणि धर्मकारण अजून काय करते? आपली जनता याचा विचार कधी करेल काय? आपापसात सलोख्याने राहणे म्हणजेच ईश्वराची, अल्लाची, येशूची खरी सेवा हे आपल्या लोकांना कधी कळेल? कानजीभाई आपल्या जनतेला हे सवाल नुसतेच विचारतच नाही तर श्रीमदभगवतगीता, बायबल, कुरान-ए-शरीफ या पवित्र धर्मग्रंथांचे अध्ययन करून श्लोकांसहित आणि आयतींसहित तो खर्‍या धर्माचा अर्थ समजावून सांगून या सवालांची समर्पक उत्तरे देखील देतो. इतक्या गंभीर आणि संवेदनशील विषयावर भाष्य करतांना चित्रपट कुठेही रटाळ किंवा उपदेशप्रचूर वाटत नाही. मनोरंजनासोबतच खणखणीत विचार मांडण्याचे काम 'ओह माय गॉड' यशस्वीरीत्या पार पाडतो. परेश रावलने कानजीभाई मेहताच्या भूमिकेत प्राण ओतले आहेत. अक्षय कुमारचे काम, कमी असले तरी एकदम संयत आणि पटण्यासारखे आहे. श्री श्री रविशंकर यांची छाप असलेले गुरु मिथून चक्रवर्तीने छान साकारलेले आहेत. संतापी, लबाड, आणि अहंकारी पंडित गोविंद नामदेव यांनी नेहमीच्या आक्रस्ताळेपणाने साकारले आहेत. बाकी सगळ्यांची कामे व्यवस्थित! चित्रपटाची पटकथा बरीच चांगली आहे. मूळ मुद्द्यावरून चित्रपट जराही भरकटत नाही. प्रभू देवा आणि सोनाक्षी सिन्हाचे धमाल गाणे अनावश्यक वाटत असले तरी घटकाभर बरे वाटते. चित्रीकरण मात्र थोडे अजून चांगले असू शकले असते पण तेवढी चूक क्षम्य आहे. शेवटी देव म्हणजे काय, देवाचे खरे अस्तित्व कोणते, पुण्य कमविणे म्हणजे काय, धर्म म्हणजे नक्की काय, माणसाचा देव बनवणे कसे चुकीचे आहे यासारख्या अवघड विषयांचा ऊहापोह कानजीभाई आणि त्याचा मित्र अगदी सोप्या पद्धतीने करतात. आणि विशेष म्हणजे ही चर्चा कुठेही कंटाळवाणी वाटत नाही. 'ओह माय गॉड' म्हणूनच प्रत्येकाने अवश्य बघावा असा चित्रपट आहे. शंभरपैकी एकाला जरी स्वतःच्या बुद्धीचा वापर करून धर्माच्या आणि देवाच्या निरर्थक संकल्पना तपासून बघता आल्या तरी या चित्रपटाचे यश म्हणावे लागेल. आणि हो, भंपक सिनेमे करत असतांना (दे दणादण, हाऊसफूल, जोकर) 'ओह माय गॉड' सारखा विचार करायला लावणारा आणि एक खरा-खुरा चांगला विचार मांडणारा संवेदनशील (ज्वलनशील) आणि धाडसी चित्रपट विचारपूर्वक बनवल्याबद्दल अक्षय कुमारचे अभिनंदन करावेच लागेल. शक्यतो चुकवू नकाच!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21977
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

In reply to by समीरसूर

>>मी आणि तुम्ही इथे कंठशोष करून काही फायदा नाही मग कशाला काथ्याकूट करत बसायचा? -- हौस, बाकि काहि नाहि >>आपण समजतो तितके हे कॉम्प्लिकेटेड नाहीये. -- आम्हा अर्धवटांकरता तसही कुठलीच गोष्ट कॉम्प्लिकेटेड नसते :) >>आपल्या इथे सगळ्याच गोष्टींवर पुटे चढतात (मारुतीच्या मूर्तीवर शेंदराची चढतात त्याप्रमाणे) त्यातला प्रकार आहे हा. -- अहो हे सगळीकडे आहे. माणसाची जित्याची खोड आणि काय. >>त्यात आपल्या प्रथा, कर्मकांडे आणखी काँप्म्लिकेशन्स वाढवून ठेवतात. -- कुठल्याही गोष्टीतलं मनोरंजन मुल्य हरवलं कि कॉम्प्लिकेशन्स शिवाय तसही काय हाती लागणार म्हणा. >>आपण कुठल्याही गोष्टींचे कसेही अवाजवी पृथ्थकरण करत बसतो आणि त्यामुळे आपली बस चुकते. -- हि देखील हौस. >>'स्पिरिच्युअ‍ॅलिटी मॅनेजमेंट' नाहीये आपल्याकडे. जे आहे ते सगळे भावनांचे व्यर्थ खेळ आहेत बाकी काही नाही. -- बघा, मी म्हणतोय ना.. एक उत्कृष्ट बाबा बनण्याचे सर्व गुण दिसतात तुमच्या लेखणीत. करायचा का धंदा सुरु? सायकल स्टॅण्ड, हार-फुलं-प्रसादाच कॉण्ट्रॅक्ट मात्र आमच्या द्यायचं हां. >>त्यामुळे नो टेंशन! हसा बघू आता... -- समीरसूर बाबा कि जय हो :) ( कृ.ह.घ्यावे ) अर्धवटराव

ह्या चर्चेमुळे प्रेरित होऊन काल अगदी अपेक्षेने वगैरे हा चित्रपट पाहिला. चित्रपट अगदीच 'बरा आहे' ह्या क्याटेगरितला आहे, खास वगैरे अजिबात नाही. नक्की कुठल्या मुद्द्यावर भाष्य करायचे आहे हे प्रस्तुत दिग्दर्शकाला समजले असले तरी ते पेलणे मात्र जमले नाही. चित्रपट हा बटबटीत म्हणावा इतका भडक झाला आहे, आक्रस्ताळे संवाद, अनावश्य्क सिन्स, अतर्क्य सिन्स ह्यामुळे चित्रपटातली मजा कमी होते. परेश रावल सोडला तर बाकी पात्रे अगदीच बालीश किंवा अभिनिवेशपुर्ण दाखवली आहेत, परेश रावलही नॉट अप टु मार्क. कास्टिंग चुकले म्हणावे इतकी काही पात्रे अस्थानी आहेत. संपुर्ण चित्रपटात टाळ्या वाजवाव्यात असा एकही सीन नाही. काही विडंबने करण्याचा प्रयत्न छान आहे पण केवळ तसे कपडे घातले व केशभुषा वगैरे केली म्हणुन विडंबन होत नसते, त्यात जीव ओतावा लागतो, अन्यथा त्याच्या कचकड्याच्या बाहुल्या होतात. ह्या चित्रपटातुन मेस्सेज वगैरे दिला असल्याचे मला तरी समजले नाही, उत्तरार्धात किंवा शेवटात चित्रपट पुर्ण गंडला आहे, त्यापेक्षा देऊळ कित्येक पटीने सरस होता. चित्रपटातली एक स्पेशल चीज 'गो गो गो गोविंदा' हे गाणे, मस्त आहे एकदम, सोनाक्षी आणि प्रभुदेवा अफाट नाचले आहेत. बाकी सर्व ठिकठाक म्हणावे इतकेच. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

अरेच्च्या! असं आहे काय! बरं झालं सांगितलस. पैसे वाचवलेस असं म्हणता येणार नाही कारण दोनच डॉलरला डिव्हिडी मिळते पण आणून ती घरीच ठेवावी लागते त्याचा वैताग येतो.माझा वरचा प्रतिसाद आता बदलावा लागेल. ;)

In reply to by छोटा डॉन

>>चित्रपटातली एक स्पेशल चीज 'गो गो गो गोविंदा' हे गाणे, मस्त आहे एकदम, सोनाक्षी आणि प्रभुदेवा अफाट नाचले आहेत. -- सोनाक्षीचा व्यायाम/दंडबैठका म्हणायचं आहे का तुम्हाला डॉनराव??

In reply to by अर्धवटराव

हो हो, आम्हाला तेच म्हणायचे आहे, जे काही असेल ते पण तो प्रकार भारी होता. असो, दहिहंडीका उत्सव शुरु किया जाय. - छोटा डॉन

म्हणाला होता "Religion is what keeps the poor from murdering the rich". जिथे भय आणि दहशतीचे साम्राज्य असते तिथे प्रस्थापितांचे हितसंबंध जपणाऱ्या कोणत्याही कृत्याला अधिकृत मान्यता मिळवून देणारी एक विचारप्रणाली असावीच लागते. मग त्यासाठी कुठलाही "इझम" चालू शकतो. नेपोलियनचे वाक्य हे थोड्याफार फरकाने कोणत्याही विचारप्रणालीला लागू पडते. याचे कारण म्हणजे विचार किती चांगले आहेत याला फारसे महत्व नसते. ते विचार राबवण्याची शक्ती ज्यांच्याकडे आहे त्यांचे हेतू काय आहेत हे अधिक महत्वाचे असते. आपण देवांना सलाम ठोकला नाही तर आपले काहीतरी तळपट होईल आणि सलाम ठोकला तर आपला फायदा होईल या भावनेतून जी कर्मकांडे केली जातात त्यांना भक्तीचा मुलामा देणे ही आपली सामाजिक आणि वैयक्तिक गरज आहे. मोक्ष मिळाला नाही तर या संसाराच्या भवसागरात आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि यातना भोगाव्या लागतील म्हणून देवाचे नाव घ्या; असल्या नकारात्मक भावनेतून जी भक्ती, साधना केली जाते त्यातून आत्मिक, नैतिक, मानसिक कोणतीही उन्नती होण्याची शक्यता फारच कमी असते. म्हणूनच संतांनी "भाव तसा देव" असे म्हटले आहे. "नाव तसा देव" असे म्हटले नाही. भयभीत जनता ही गोंधळलेली असते आणि गोंधळलेली जनता एकत्र येऊन अत्याचारी व्यवस्थेविरोधात बंड करू शकत नाही. जनतेला निर्भय बनवणारा कोणताही विचार आणि त्या विचारांचे प्रतीक म्हणून समाजाला दिशा दाखवणाऱ्या व्यक्ती यांचा त्या त्या व्यवस्थेतील प्रस्थापितांनी नेहमीच द्वेष केलेला आहे. ज्यांनी कोणी जगाला शांततेची शिकवण दिली आणि निर्भय होऊन आत्मनिर्भर व्हायला शिकवले त्यांची प्रस्थापित वर्गाकडून नेहमीच कत्तल झाली आहे. ही अस्तित्वाची लढाई आहे याचे नेमके भान प्रस्थापितांना असते. तेच भान सर्व सामान्य जनतेला येऊ नये म्हणूनच वेळोवेळी नवनवीन "इझम" जन्माला घालत राहणे ही त्यांची गरज आहे.

In reply to by अवतार

''भयभीत जनता... पासून ते ''....."इझम" जन्माला घालत राहणे ही त्यांची गरज आहे'' इथपर्यंतचा प्रतिसाद विशेष आवडला. -दिलीप बिरुटे

कालच लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रफुल्ल जोशी यांनी त्यांच्या अनुभवांवर लिहिलेले 'कर्नल नावाचा माणूस' हे पुस्तक (पद्मगंधा प्रकाशन) वाचले. धर्म, जात, देव, कर्मकांडे, वर्ण, वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सीमेवर आणि संरक्षण क्षेत्रात कशा आपोआप गळून पडतात हे या पुस्तकात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले आहे. आणि या निरुपयोगी गोष्टींची पुटे गळून पडल्यामुळेच माणूस एकमेकांच्या जास्त जवळ जातो आणि अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे देखील त्यांच्या अनुभवांवरून प्रकर्षाने जाणवले. केवळ मनुष्यधर्म पाळणार्‍या या क्षेत्राला मनापासून सलाम! हे सगळे त्यांचे त्यांच्या ३२ वर्षातल्या कारकीर्दीतले अनुभव आहेत; त्यामुळे शंका घ्यायला वावच नाही. जिथे जातीधर्माचे कुंपण जमीनदोस्त झाले तिथे शांतता आणि स्थैर्य आले हा नियम अनेकदा सिद्ध झालेला आहे. 'गप्पांगण' हे द. मा. मिरासदारांचे पुस्तक (मेहता पब्लिशिंग हाऊस) देखील याच शनिवार-रविवारी वाचनात आले. त्यात 'जेवण व जेवणावळी' या लेखात पंढरपुरातल्या त्यांच्या काळातल्या जेवणावळींचे वर्णन आहे. ब्राह्मणभोजन घातल्याने पुण्य लाभते या गैरसमजाचा लाभ घेऊन कित्येक ब्राह्मण दुपारी हात जोडून "दुपारची वेळ आहे; ब्राह्मण उपाशी आहे; जेऊ घातल्यास पुण्य लाभेल" असे अल्मोस्ट भीक मागून पुख्खा झोडत असत आणि वरून तांब्यामध्ये शिरा वगैरे चोरून नेत असत. कुणाला कळू नये म्हणून मान खाली घालून जेवत असत. मिळालेल्या दोन-चार आणे दक्षिणेत अकबर टॉकीजमध्ये जाऊन सिनेमा बघत असत. हे वर्णन द. मा. मिरासदारांनी केलेले आहे. मला वाटते यात भूषणावह असे काहीच नाही. आणि आपल्या बुरसटलेल्या विचारसरणीसोबतच आपण धर्माला देतो त्या अवास्तव महत्वाचा इथे खूप जबरदस्त संबंध आहे. त्यामुळे धर्म, जात या संकल्पना जितक्या वैयक्तिक पातळीवर राहतील (अगदीच नाही राहिल्या तर उत्तमच) तितक्या चांगल्या. वेळ मिळाल्यास नक्की वाचा ही पुस्तके. बाकी सिनेमा कसा होता यापेक्षा त्याने काय सांगायचा प्रयत्न केला हे अधोरेखित करण्याचा माझा प्रयत्न होता. त्या सिनेमाची चित्रपटीय मुल्ये उणे-अधिक असतीलही (ढोबळ, बटबटीत, वगैरे) पण त्यांनी ज्या प्रामाणिकपणे संदेश पोहोचविण्याची धडपड केली आहे ती जास्त महत्वाची आहे असे वाटते. सिनेमा आपल्याला कसा वाटतो यापेक्षा अधिकाधिक प्रेक्षकांना कसा वाटेल हे महत्वाचे! ताजा खबरः ओएमजीचा पहिल्या आठवड्यातला गल्ला ३५ कोटी आहे. परेश रावल हीरो असलेला चित्रपट आणि पहिल्या आठवड्यात ३५ कोटी? इंप्रेसिव्ह! :-) जास्तीत जास्त लोकांना बघायला मिळतोय हे खरे समाधान. :-) माहिती: मी स्वत: ब्राह्मणच आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आपले दोष उघड करणे, खुल्या दिलाने ते मान्य करणे, आणि सुधारण्याचा प्रयत्न करणे यात कसली आलीये hypocrisy? असे म्हणायचे झाले तर महादेव गोविंद रानडे, सावरकर, गाडगे बाबा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर यांनी जे आपल्या समाजात परिवर्तन घडवून आणायचे कष्ट उपसले ते व्यर्थच म्हणायचे. :-) मी फक्त ब्राह्मणांमधले दोष दाखवत नाहीये. असे मोठे मोठे दोष आपल्या देशात प्रत्येक धर्मात आणि जातीत आहेत. 'सिमी', 'संभाजी ब्रिगेड', मुस्लीम मूलतत्ववाद, जिहाद, जाट हॉनर किलिंग हे सगळे अत्यंत घातक असे धर्मिक दोषांचे मूर्तरूप आहेत. या दोषंमुळे हिंसा वाढते. समाजाचा तोल बिघडतो. खलिस्तान, प्रलोभने दाखवून केलेला ख्रिस्ती धर्मप्रचार ही त्याचीच उदाहरणे. असे प्रत्येकच जाती-धर्मात त्या-त्या जाती-धर्माच्या अवास्तव आणि किळसवाण्या घमेंडीमुळे शिरलेले प्रचंड हानीकारक असे दोष आहेत. ते आपणच शोधून गाडून टाकायला हवेल; किमान प्रयत्न तरी करायला हवेत. आमचे सगळेच भारी असे म्हणून स्वत:च स्वत:च्या पाठीवर शाबासकी मारून घेणारे फारसे पुढे जात नाहीत हा इतिहास आहे. वैयक्तिक पातळीवरही आपण आपले दोष शोधून काढतोच आणि त्यांना सुधारायचा प्रयत्न करतोच की नाही? त्यामुळेच प्रगती होते. स्वतःच्या व्यक्तीमत्वातले, समाजातले, जातीतले, वागण्या-बोलण्यातले दोष शोधून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करणे या कसली आलीये hypocrisy? हे म्हणजे कुठल्याही चांगल्या कामात प्रोत्साहन देण्याऐवजी कुजके बोलून पाय खेचणे झाले. अशी बरीच माणसे होती/असतात. कुणी काही चांगले केले किंवा करायचे म्हटले किंवा कुणाचे काही बरे होत असले तर उगीच जाऊन काहीतरी कुजकट बोलायचे, वागायचे आणि समोरच्याला यातना झाल्या किंवा त्याचे काम बिघडले की आनंद मानायचा अशी माणसे खूप पाहिली आहेत. मूळ मुद्दा बाजूला सारून निरर्थक गोष्टींवर वितंडवाद घालायचा ही आपली जुनी खोड म्हणूनच मराठी माणूस मागे पडतो. म्हणूनच म. फुल्यांना जोडे आणि शेणाचे गोळे सहन करावे लागले. असो. चालायचेच. hypocrisy? काहीतरीच... :-) :-)

In reply to by समीरसूर

अहो तुम्ही समाजाला इतके प्रबोधित करण्याचे बोलत आहात आणि त्यातही "त्यामुळे धर्म, जात या संकल्पना जितक्या वैयक्तिक पातळीवर राहतील (अगदीच नाही राहिल्या तर उत्तमच) तितक्या चांगल्या." असे व्हावे असे म्हणता आहात परंतु तुम्ही स्वतः जात वैयक्तीक जीवनातून काय सामाजिक जीवनात देखील मिरवताना दिसत आहात त्याला दुसरे काय म्हणायचे? परत पुढे जाऊन "स्वतःच्या व्यक्तीमत्वातले, समाजातले, जातीतले, वागण्या-बोलण्यातले दोष शोधून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करणे या कसली आलीये hypocrisy?" जातीतले दोष सुधारण्या बद्दल बोलत आहात. म्हणजे त्यासाठी जात तुम्ही ठेवत आहातच ना! आम्ही जालावरतरी सहज आणि थत्तेच्चाच्चा ही दोनच (आणि आमचा म्हातारं पण काय!) मंडळी जात सोडण्यास उत्सुक असलेली किंवा अदनुषंगाने लिहीलेली पाहीली. चूभूदेघे. म्हणूनच म. फुल्यांना जोडे आणि शेणाचे गोळे सहन करावे लागले. तसेही महात्मा फुलेंबद्द्ल माझे मत फारसे अनुकूल नसल्यामुळे त्याबद्दल मी अधिक काही बोलत नाही.

इतकं पर्फेक्ट लॉजिक, इतक्या उघडपणे मांडणं अवघड आहे आणि चित्रपटात ते यशस्वीपणे केलय. परेश रावलनं भूमिका अफलातून केलीये. पिक्चरचं एडिटींग जबरदस्त आहे. डायलॉग्ज तर इतके सुसंबद्ध आहेत की कुठेही तोल जात नाही. देव या माणसाच्या कल्पनेपायी किती अनागोंदी चालूये हे झकास दाखवलय. `देव नाही' ही कल्पना असह्य आहे म्हणून अक्षयचे दिलासा देणारे संवाद देखील उत्तम आहेत. अक्षयची जादूई `की चेन' जीनं स्वतःला मृत्यूतनं बाहेर काढलं ती परेश रावलं ताईत म्हणून जपेल असं वाटतं तेव्हा फेकून द्यायला सांगणं आणि फेकल्यावर ती निराकारात विलीन होणं हा क्लायमॅक्स अप्रतिम आहे देव जशी कल्पना आहे तशीच जात पण कल्पना आहे. ती देव या कल्पनेचाच परिणाम आहे. तुम्ही ज्याला देव मानता त्या समूहाची जात ती तुमची जात. तुमचे विचार योग्य आहेत. तुमच्या वरच्या प्रतिसादामुळे मात्र तुम्ही लॉजिक शेवटापर्यंत नेऊ शकणार नाही.जात देखील अव्हेरा आणखी एका धारणेतून मुक्त व्हाल.

मला हा चित्रपट बहुतांशी आवडला. चित्रपटपरिक्षणही आवडले.तरीही काही मुद्दे पटले नाहीत (माझा स्वतःचा कर्मकांडांना अजिबात पाठिंबा नाही आणि धर्मबिर्म या भानगडींमध्ये मला फारसा इंटरेस्टही नाही हे आधीच स्पष्ट करतो).
"अगं, इतर दिवशी तुम्ही हेच अन्न खाता ना? मग आजच खाल्ले तर डायरेक्ट डुक्कर ठरता? जगात कितीतरी माणसे आजच्या दिवशी हेच अन्न खात असतील. म्हणून काय ते डुक्कर ठरतात? आणि अमेरिकेत कसली आलीये एकादशी? तरी ते लोकं आपल्यापेक्षा शतयोजने पुढे आहेतच की नाही?"
वैयक्तिक पातळीवर इतरांवर सक्ती न करता पाळलेले नियम माणसाला शिस्तबध्द बनवितात.मी काही वाटेल ते झाले तरी सकाळी सहाच्या आतच उठेन अशा प्रकारचे स्वतःला बंधन घालणे आणि ते काटेकोरपणे पाळणे माणसाला शिस्त नक्कीच लावेल. तसेच काहीही झाले तरी मी तळलेले चमचमित पदार्थ खाणार नाही किंवा आठवड्याचा एक दिवस लंघन करेन अशा प्रकारची बंधने स्वतःलाच घालणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे हे नक्कीच. असे चांगले परिणाम धर्माच्या नावावर झाले तर त्यात टिका करण्यासारखे काय आहे हे समजले नाही. समजा मी ठरविले की पोटाला आराम द्यावा म्हणून मी दर महिन्याच्या १० तारखेला रात्रीचे जेवणार नाही आणि इतर कोणी एकादशीला निर्जळी उपास करायचे ठरविले तर या दोन गोष्टींमध्ये फारसा फरक नाही. पण धर्मात (म्हणजे नक्की कशात?) एकादशीला उपास करा असे सांगितले म्हणून कोणी उपास करत असेल त्याचा उपहास करणे अयोग्य आहे असे मला वाटते.कारण कोणतेही असेना की कोणीही सांगितले असेना जर कोणी आपल्या आरोग्यासाठी कळत-नकळत चांगली पावले उचलत असेल तर केवळ धर्मात सांगितले म्हणून ते केल्याबद्दल त्याचा उपहास का? आता कोणी एकादशीच्या उपासाच्या नावावर एकादशी आणि दुप्पट खाशी असे करत असेल तर तो मुळातल्या मुद्द्याचाच पराभव झाला. तसे केले तरीही जोपर्यंत ती व्यक्ती इतरांवर सक्ती करत नाही, कोणताही त्रास देत नाही आणि स्वतःपुरते नियम पाळत असेल तोपर्यंत त्या गोष्टीचा उपहास करणे अयोग्य आहे असे मला वाटते.
अमेरिकेत कसली आलीये एकादशी? तरी ते लोकं आपल्यापेक्षा शतयोजने पुढे आहेतच की नाही?"
अमेरिकेतले लोक एकादशा न पाळल्यामुळे नव्हे तर इतर अनेक कारणांमुळे आपल्यापुढे आहेत.त्यातील एक महत्वाचे कारण म्हणजे तिथल्या समाजातील शिस्त. अगदी एकादशीच्या कारणाने का होईना कोणी व्यक्ती अधिक शिस्तबध्द आयुष्य जगत असेल तर त्यात काय बिघडले? आणि हो मी स्वतः कुठल्याच एकादशा/पौर्णिमा/अमावास्या पाळत नाही.किंबहुना आजची तिथी कोणती हे पण मला माहित नसते हे पण सांगतो. बाकी तुमच्या परिक्षणातील मते पटली. उदाहरणार्थ अनेक तथाकथित साधू/बाबा लोकांना शेंड्या लावून आपला कार्यभाग उरकतात याला तुम्ही केलेला विरोध पटला.

In reply to by क्लिंटन

आत्ता हा धागा वाचला आणि प्रतिसाद लिहीणार त्या आधी लक्षात आले की क्लिंटन यांनी आधीच माझ्या मनातले लिहीले आहे. :-) हा चित्रपट मला देखील आवडला. म्हणूनच डॉनरावांचा प्रतिसाद वाचून "ओएमजी" असेच उद्गार आले! कारण हिंदी बॉलिवूड चित्रपट डॉनरावांनी एखादी सत्यजीत रे ची आर्ट फिल्म असल्यासारखी बघितली का काय असे वाटले! ;) मात्र देव नाही हे बिंबवताना देव आहे असे देखील का दाखवले हे समजले नाही. God is nowhere चे God is now here अशी शब्दफोड झाली का काय असे वाटले. त्यातील काही सटलीटी पब्लीकला समजेल असे वाटत नाही. उगाच सर्वधर्मसमभाव वगैरे वाटून राहायचे...पण तरी देखील एकंदरीत जनतेला समजेल अशा भाषेत मेसेज दिला आहे असे वाटले. तसेच सगळ्याच प्रमुख धर्मांना आणून देखील कुणाच्याही "धार्मिक भावना" न दुखावण्याची कसरत चांगली निभावली आहे. (मला माहीत आहे काही अपवाद आहेत त्याला, पण दुर्लक्ष करायचे अशांकडे!). या संदर्भात मला राहींचा प्रतिसाद आवडला. सहजरावांना डार्विन आठवला तो बरोबरच आहे. पण आजही अमेरीकेसारख्या देशात शाळेमधे विश्व निर्मिती शिकवताना ती उत्क्रांती (evolution) म्हणून झाली की ईश्वरनिर्मित (intellectual design) म्हणून सांगावे यावरून गंभीर वाद होतात... तेंव्हा आपल्याला दिल्ली खूपच दूर आहे. :-)

In reply to by क्लिंटन

कारण कोणतेही असेना की कोणीही सांगितले असेना जर कोणी आपल्या आरोग्यासाठी कळत-नकळत चांगली पावले उचलत असेल तर केवळ धर्मात सांगितले म्हणून ते केल्याबद्दल त्याचा उपहास का?
मुद्दा बरोबर आहे. एखादा देवावरील श्रद्धेपोटी चार चांगली कामे करीत असेल तर दुसरा आपल्या सदसदविवेकबुद्धीला पटते म्हणून करत असेल. या बाबत अंनिस ची भुमिका अशीच आहे कि सश्रद्ध माणसाशी आमचे भांडण नाही. देव धर्माबाबत आम्ही तटस्थ आहोत. आम्ही देव धर्मातल्या शोषणाविरुद्ध आहोत. प्रत्यक्षात अश्रद्ध माणसाकडून सश्रद्ध माणसाचा बर्‍याचदा उपहास होतो हे मात्र खरे आहे. कदाचित मानवी स्वभावाचा तो भाग असावा. आपल्या उपहासातुन तरी तो विचार करायला लागेल ही एक आशा (कदाचित भाबडी) अश्रद्ध माणसाला असते. त्याला दुखवायचे हा मूळ हेतु नसतो. असो चित्रपटा निमित्त व धाग्यानिमित्त आम्हाला पुर्वी आम्ही मिपावर घेतलेल्या कौलाची आठवण आली. 'बिअर उपवासाला चालते का?' आता त्याचा दुवा देता येत नाही. उडालेला दिसतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

या बाबत अंनिस ची भुमिका अशीच आहे कि सश्रद्ध माणसाशी आमचे भांडण नाही. देव धर्माबाबत आम्ही तटस्थ आहोत. आम्ही देव धर्मातल्या शोषणाविरुद्ध आहोत.
असे असले तर चांगलेच आहे आणि प्रकाशराव म्हणतात म्हणजे ते तसेच असेल असे मी समजेन. मात्र म्हणूनच असे वाटते की अनिस ज्या पद्धतीने लोकांसमोर येते त्यावरून त्यांचे प्रेझेंटेशन चुकते असे म्हणेन. अर्थात हे केवळ अनिसच्या संदर्भातच म्हणेन असे नाही... बर्‍याचदा भारतीयांच्या (किमान मराठी नक्की!) संदर्भात असेच होते असे वाटते.

याच विषयावर परवा पुण्यात साधना मिडिया सेंटर ला परिसंवाद झाला. सुनिल सुकथनकर, सुमित्रा भावे, संजय भास्कर जोशी परिसंवादात होते. कालच चित्रपट पाहिला.चित्रपट अतिशय सुंदर आहे. तुमी बी पघा!

उत्तम परीक्षण.. ह्यापुढे आपल्या परीक्षण वाचून चित्रपट बघण्यात येईल.. बाकी उपास / साबुदाणा खिचडी वैगेरे वाचून शामची आई मधला प्रसंग आठवला: श्यामला त्याचे वडील केस वाढले म्हणून रागावतात आणि श्याम आईला विचारतो "केसात कसला आलाय धर्म ?" " श्याम.. बाळ प्रत्येक गोष्टीत धर्म असतो, शेवटी केस वाढवणे म्हणजे मोहच ना ? ह्या मोहांपासून दूर राहण्यासाठी ह्या प्रथा आहेत" त्याचे उत्तर मला पटले.. कदाचित तुम्हालाही पटेल.. उपास करायला साबुदाणा खिचडी, फळे, वरईचा भात, शेंगदाणे लागतात हे कोणी सांगितले ? उपास म्हणजे लंघन.. ज्यांना ते जमत नव्हते त्यांनी सोयीस्करपणे हा शोध लावला आणि आपण तो पाळत आहोत. माझ्या बघण्यात ९० वर्षाचे आजोबा आहेत जे न चुकता आषाढी एकादशीचा उपास करतात.. फक्त सकाळी १ आणि संध्याकाळी १ ग्लास दुध पिऊन. ( त्यांना मधुमेह, रक्तदाब आदि विकार आहेत आणि २ वेळा हृदय शस्त्रक्रिया झाली आहे ) कसलाही त्रास होत नाही त्यांना. बाकी चालू द्या.. विषयांतर झाले असल्यास क्षमस्व

त्यांना उचलुन घेवुन नाचायला हरकत नाही.पण ते कसे घडवुन आणावे लागेल? चवचालबाई व माझा अनिरुध्द पन महान आहेत.