Skip to main content

प्रभू मास्तरांचे अभिनंदन

लेखक सरपंच यांनी शुक्रवार, 22/06/2012 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव सुरू झालं आणि इथे अनेक लोक येऊ लागले. त्यातले काही अगदी शांतपणे इथे राहू लागले तर काहींनी अल्पावधीत स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले. आमचे प्रभू मास्तर ऊर्फ विनायक प्रभू हे त्यातलेच एक भन्नाट व्यक्तिमत्व. (http://www.misalpav.com/user/1235/guestbook) इथे आल्यावर त्यांच्या क्रिप्टिक बोलण्यामुळे चक्रावला नाही असा एकही सदस्य नसेल. पण आज प्रभू मास्तर हे स्वतःच एक इन्स्टिट्युशन होऊन बसले आहेत. अनेक क्षेत्रांची जाण असलेला पण मन खर्‍या अर्थाने शिक्षण क्षेत्रात रमणारा हा कलंदर माणूस. झोपेतही कोणासाठी काहीतरी (आणि ते ही निरपेक्ष वृत्तीने) करण्याची स्वप्नं बघणारे आणि जागेपणी ती स्वप्नं प्रत्यक्षात आणणारे प्रभू मास्तर. मिसळपावसारख्या माध्यमाचाही त्यांनी केवळ याच दृष्टीने उपयोग केला. गुणवंत पण गरजवंत असलेल्या विद्यार्थ्यांना खूप आधीच शोधून काढून त्यांना हरप्रकारे मदत ते करतात. या मदतीत काय नसतं? या मुलांना दहावीमधे उत्तम गुण कसे मिळवायचे, बारावी / सीइटीसाठी मार्गदर्शन करणे, शिष्यवृत्ती मिळवून देणे इतकंच नाही तर त्यांच्या पालकांनाही गरजेप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असं कोणत्याही प्रकारे प्रभू मास्तर त्यांचं काम करत असतात. सांगण्यास आनंद होतो की या वर्षीप्रभू मास्तरांच्या मार्गदर्शनाखालील १५ पैकी १२ विद्यार्थ्यांनी मेडिकल व इंजिनियरिंग सीइटीमधे शासकिय महाविद्यालयांमधे प्रवेश मिळवण्याइतके गुण मिळवले आहेत. या सगळ्या मुलांना गेल्या दोन तीन वर्षांपासून प्रभू मास्तरांची साथ लाभलेली आहे. इतकंच नव्हे तर या मुलांचा पुढच्या सगळ्या शिक्षणाच्या खर्चाचीही (सुमारे रु. २,५०,०००/-) सोय प्रभू मास्तरांनी केली आहे. या घवघवीत यशाबद्दल मास्तरांचे अभिनंदन आणि ते एक मिपाकर आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो हे आम्ही कृतज्ञापूर्वक नमूद करतो. या सीइटी परिक्षांमधे १७२ किंवा अधिक गुण मिळवणारे आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २,५०,०००/- किंवा त्याहून कमी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे अजूनही मदतीचे मार्ग उपलब्ध आहेत. इच्छुकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा आणि इतरांनी ही बातमी गरजूंपर्यंत पोचवावी.

वाचने 12079
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

अभिनंदन असं म्हणणार नाही कारण तुम्ही त्याच्या पलिकडे आहात. फक्त धन्यवाद! तुमच्या सारखी काही वेडी माणसे समाजात असणे आवश्यक आहे त्यामुळे समाज थोडाफार का होईना चैतन्यशील आहे अन्यथा "झोम्बीज" च्या पलिकडे जास्त नाही.