मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लंपन, वानरांच्या फौजा आणि थोडं पाल्हाळ

नंदन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
काही फायदा होतो म्हणून वाचन करु नये, हे जरी खरं असलं तरी त्यातून वेगवेगळे अनुभव आपण लेखकाच्या दृष्टीतून घेऊ शकतो. नाहीतर एका आयुष्यात असे घेऊन घेऊन अनुभव तरी किती घेणार? बसल्याजागी वेगवेगळे अनुभव - व्हिकॅरियसली म्हणजे दुसऱ्याच्या उसन्या दृष्टीतून का होईना, आपण पुस्तकाच्या वाचनातून घेऊ शकतो. 'का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रु प्रकटिता', असं कमलिनीबद्दल ज्ञानेश्वरीत म्हटलंय तसंच काहीसं. अर्थात कुणाला कुठला अनुभव, कुठला विचार आवडेल हे सांगणं अवघड. त्या त्या व्यक्तीच्या पिंडावरती ते अवलंबून. कोसला काय किंवा द फाऊंटनहेड काय -- केवळ ती पुस्तकं ग्रेट आहेत यापेक्षा 'तुम्हांला' ती किती आवडतात हे महत्त्वाचं. केवळ गाजलेलं पुस्तक आहे म्हणून ते न आवडताच डोक्यावर घेऊ नये (उदा. शतकात सर्वश्रेष्ठ गणली गेलेली युलिसीस) किंवा जे बहुसंख्यांना आवडतं त्याला केवळ त्याच कारणाने हट्टाने नावं ठेवण्याचा अट्टाहासही करु नये. कविता आणि त्यांचा अर्थ, त्या आवडणं म्हणजे अजून एक पुढची पायरी. ग्रेसच्या सगळ्याच कविता कुठे कळतात? त्यांच्या ओळी हा एक वैयक्तिक अनुभव असतो. प्रत्येकाच्या मनात ती कविता वाचून तयार होणाऱ्या स्पष्ट - अस्पष्ट प्रतिमा वेगवेगळ्या, ज्याच्या-त्याच्या पिंडावर आणि आजवर घेतलेल्या अनुभवांवर बेतलेल्या. दहा हजार कवींना वेगवेगळ्या दिसणाऱ्या चंद्राप्रमाणे निरनिराळ्या असल्या तरी शेवटी प्रत्येकाचा 'जस्ट वन' असलेला चंद्र असतो, तशा खासगी. अगदीच ढोबळ उदाहरण म्हणून, मर्ढेकरांची 'या गंगेमधि गगन वितळले' वाचून मला हटकून बाणगंगेचा तलाव आठवतो. कुणाला थेट गंगा नदी आठवेल, कुणाला कविताच आवडणार नाही. शिवाय ही अनुभव ग्रहण करण्याची प्रत्येकाची पार्श्वभूमी काळाप्रमाणे बदलत जाते, हा भाग वेगळाच. आजचे नवीन अनुभव मग आपल्या पिंडाचा भाग बनतात. त्यामुळे आज एखादं पुस्तक/कविता आपल्याला जशी आवडली तशीच्या तशीच ती आपल्याला दहा वर्षांनी आवडणार नाही. जर आपल्याच आवडीत एवढा फरक पडू शकतो, तर दोन व्यक्तींच्या आवडी जुळणं हे अधिक कठीण. पण असं असलं, तरी याचंही एक उलट टोक आहे. अनुभव जसे वैयक्तिक असतात, तसेच वैश्विकही असतात. वाचनातून आपण लेखक/कवीचे अनुभव व्हिकॅरियसली जगायचा प्रयत्न करतो, पण त्याचवेळी आपल्या पूर्वसंचितातल्या अनुभवाशी सांगड घालायचाही कुठेतरी नकळत प्रयत्न करत असतो. आपण कधीच न घेतलेले अनुभव (उदा. रारंगढांग) जसे आपल्याला आवडू शकतात, तसेच त्याच्या उलट जिथे जिथे आपली 'येथीचा जिव्हाळा तेथे बिंबे' सारखी स्थिती होऊन ज्या अनुभवांशी आपण आयडेंटिफाय करु शकतो तेही बेहद्द आवडतात. लंपन आवडण्यामागे मग प्रकाश नारायण संतांची शब्दकळा, कथेची बांधणी, सूक्ष्म निरीक्षणशक्ती किंवा एका शब्दात सांगायचं झालं तर प्रतिभा/लेखनकौशल्य हे सारं असलं, तरी ही पुस्तकं वाचत असताना मी त्या वयाचा असताना असाच मॅडसारखा विचार करायचो असं वाचताना सतत वाटत राहतं आणि लंपनशी कुठेतरी धागा जुळतो; हेही एक महत्त्वाचं कारण असावं. लंपनची पुस्तके असू देत किंवा थोड्या मोठ्या वयातलं 'शाळा' किंवा पंचविशीतल्या क्वार्टर-लाईफ क्रायसिस मधला 'पांडुरंग सांगवीकर'; 'टू किल अ मॉकिंगबर्ड' मधली जीन लुईस असो वा जे. एम. कॉटझींच्या 'बॉयहूड' मधला मुलगा -- कुठेतरी आपली ओळख पटते आणि ते पुस्तक आवडण्यामागचं एकमेव नसलं तरी महत्त्वाचं कारण बनून जातं. फास्टर फेणे, गोट्या, हॅरी पॉटर इ. मध्ये आणि यासारख्या पुस्तकांत थोडा फरक आहे. पहिल्या गटातली पुस्तकं वाचताना मोठेपणीही हरवून जायला झालं, तरी 'पंखा' वाचताना बऱ्याचदा जी अंतरीची खूण पटते आणि क्वचित 'ते हि नो दिवसा: गता:' व्हायला होतं तसं वाटत नाही. जत्रेतल्या पाळण्यात बसून लहान मुलासारखा आनंद घेणं आणि खालीच थांबून पाळण्यातल्या हरखून गेलेल्या मुलांकडे पाहून त्यांच्या आनंदाशी, फार दिवसांनी भेटणाऱ्या जुन्या मित्रासारखी ओळख पटणं यात जो फरक किंवा साम्य आहे, तसंच काहीसं या दोन प्रकारच्या पुस्तकांत असावं असं मला वाटतं. हे एवढं पाल्हाळ लावण्याचं कारण म्हणजे नुकतंच श्रीनिवास विनायक कुलकर्णींचं 'डोह' वाचनात आलं. वाचताना लंपनची ओळोओळी आठवण यावी असं. शांताबाई शेळक्यांनी लिहिलेल्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे बालपणीच्या निरागस वृत्तीने टिपलेले संस्कार व्यक्त करताना प्रौढ वयातल्या विश्लेषक जाणीवेचीही अधूनमधून जोड दिलेलं. त्यातल्याच 'आम्ही वानरांच्या फौजा' या कथेतला हा काही आवडलेला भाग -- ... पाऊस पडत असायचा. पाऊसच पाऊस... नेहमीचे कोवळे निळेशारपण मावळून आभाळ ढगाळले कधी, कळायचेही नाही. पावसाचे तिरपे पारदर्शक पाते एकसारखे फिरत राहायचे. पात्यामागे पाते -- आणि त्या पातळ तलम पात्यांच्या पदरापदरांचे पुन्हा एक पारदर्शक पाते... आमच्या उघड्या पडवीच्या लाल कौलारओळींच्या थोडे अलीकडे आत आम्ही घरची सारी जणे ते कुतूहल डोकावून, न लवणाऱ्या डोळ्यांनी पाहत उभी असू. पाणी पाणी पापण्यांभरी पाहत... पाऊस कुठे कुठे पडत असेल, घाट कसा धुवून काळा लख्ख झाला असेल, वडाखालची तांबडमाती कशी सुवासत असेल, हे सारे मनात आणीत -- अंगणातून वाहत जाणाऱ्या पाण्यातून सोडलेल्या कागदी होड्या कुठल्या देशात वाहत जातील या तर्काच्या शिडाबरोबर हरवत... पाऊसधारांचा गारवा शरीरात भरीत आम्ही चहाचे गरम गरम घुटके पडवीत उभ्याउभ्या घेत असू. कौलारओळींच्या शेवटाला घासून थोड्या वरून देशपांड्यांच्या भिंतीची रेषा खालती उतरत येत असे. त्या रेषेच्या उतारावरून एक अंगभर भिजलेली लेकुरवाळी वानरी, पोटाला घट्ट चिकटून राहिलेल्या पोरासह आमच्याकडे पाहत गहूगहू खालती सरकत असे. ती बाई चिंब भिजलेली असे. छत्रीसारख्या डोक्यावरून पुढे आलेल्या तिच्या केसांची नोकदार झिपरी उसकटून गेलेली असे. तिच्या डोळ्यांच्या टिंबांत एक केविलवाणी इच्छा तेवे. ती खालती सरकायची आणि मग आई म्हणायची, "ये ग बाई, ये. भिजून गेली आहेस..." एखादी भिजून आलेली बाई आत यावी तशी ती खुशाल आमच्या जवळ येऊन थांबे. सारे अंग हलवी; आणि भिजलेल्या पोराच्या केसातून पाणी निपटून काढी. मी तिचे अंग अंग जवळून पाही. तिचे काळे तोंड. नकटे नाक. तिच्या अंगावरली केसाळ लव. तिचे हात. तिच्या हातावरल्या रेषा... नि वाटे की, आजोबा आपला हात पाहतात, हिचाही त्यांना एकदा पाहायला सांगावे. ... अगदी लहानपणापासून वानरासंबंधी मला काहीतरी निराळे वाटत असे. आईबरोबर जाताना कुठून तरी पुढे धप् दिशी उडी मारून तोंड विचकून गेलेले वानर मला आठवते. त्याच्या डोक्यावरल्या झिपरीमुळे ते छपराखाली राहिले आहे व त्या छपराला पाय फुटले आहेत असा माझा चमत्कारिक समज तेव्हा झाला होता. त्याचे लुकलुकते डोळे, त्याच्या शेपटाचा डौल माझ्या चांगल्या स्मरणात आहे. मला तो काहीतरी, अगदी गरीब, कपडे नसलेल्या माणसातलाच एक वेगळा प्रकार वाटे. ती गावातून कशासाठी तरी सतत धावत असतात. कुठेतरी काहीतरी त्यांचे मोठे काम निघालेसे भासे. थंडीच्या दिवसांत आजीबरोबर वडाखाली ऊन्ह खायला यावे तेव्हाही कितीतरी वानरे, पाराजवळ ओळीने उन्हाला पाठ देऊन बसलेली असत. आणि मनात येई, कुणाकुणाच्या मागे राहून गेलेल्या नुसत्या सावल्यांतच जीव भरला आहे नि त्यांची वानरे झाली आहेत. पतझडीच्या दिवसातल्या एका निष्पर्ण झाडाच्या सांगाड्यावर एकदा इतकी निश्चल वानरे मी पाहिली होती की, ते एखाद्या विचित्र झाडाचे फळपीकच वाटावे. ... आजारीपणात मी पडवीत वरती तोंड करून पडलेला असे. कौलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. एखादे वानर आपले दोन डोळे त्या छिद्रात लावून माझी तब्बेत पाही. नि मग ती सारी छिद्रे मला आढळायला आलेल्या असंख्य वानरांच्या डोळ्यांचीच झाली आहेत असे अतिशय वाटे. लहानपणी आपण वानर म्हणून का जन्मलो नाही याची सूक्ष्मशी खंत माझ्या मनात होती. वानरांच्या निर्भर जीवनाचे विलक्षण कडे तेव्हा वाढता वाढता माझ्याभवती पडलेले होते...संध्याकाळ होत आलेली असे. अंधार भरत येई. घरातला गार अंधार, घरांवर वरल्या झाडांचा अंधार आणि झाडांवर आभाळातून उतरत येणारा अंधार...अंधारावर अंधार...अंधार ही जशी दिवसाची कपऱ्याकपऱ्यातली झोप असे...दूरभर कुठे तरी हरवलेली झोप पाखरासारखी डोळ्यातून भरे. थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक घास तोंडात भरवी. पानातच हळुवारपणे हात धुवी. आपल्याजवळच्या दुलईत गुरगटून घेई. अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी. प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही: "बरं का, आपली आणि त्या मोठ्ठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते आहे...तो गोकुळात कृष्ण म्हणून आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो...तो रामराजा होता त्या वेळी आपण त्याच्या वानरांच्या फौजांत होतो... तुम्ही अवतरले गोकुळी, आम्ही गोपाळांच्या मेळी तुम्ही होते रामराजा, आम्ही वानरांच्या फौजा..." ... [हाच लेख येथेही वाचता येईल.]

वाचन 38309 प्रतिक्रिया 0