बाबा...
फादर्स डे च्या निमित्ताने...
१५ जून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. कधी पासून ते नाही माहिती.
खरं तर मदर्स डे आणि फादर्स डे हे साजरे करण्यासाठी अमुक एखादी तारिखच हवी असं नाही. कारण आपल्या मात्यापित्यांचे आपण नेहमीच ऋणी असतो.
माझ्या बाबांबद्द्ल काय सांगू मी??
आई सांगते की, माझा जन्म झाला त्याचदिवशी माझ्या काकाच्या पॉवर लूम्सच्या कारखान्याचं उद्घाटन झालं. सगळे जण कार्यक्रम आटोपून बसले होते आणि बाबा सांगत आले की, "मुलगी झाली, मुलगी झाली". त्या काळाला शोभेल अशीच असलेली माझी आजी थोडी नाराज झाली.. .. आणि आई का नाराज झाली या विचाराने माझे बाबा ही नाराज झाले. पण गोखले घराण्यातलं पहिलं मूल आणि त्यातूनही मी खूप म्हणजे खूपच लवकर बोलायला लागलेली.. त्यामुळे आजीची ही नाराजी पुढे आजीबात टिकली नाही. आणि बाबा मात्र माझ्यामध्ये पूर्ण गुंतून गेले. मी नेहमी बाबांकडेच असायचे. काही लागलं, खुपलं तर सगळी मुलं "आई......." म्हणून रडतात पण मी "बाबा...." म्हणून रडायचे. आजही बाबा मला यावरून चिडवतात. माझी नक्कल करतात.
माझे बाबा शांत, संयमी आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही. खरं सांगायचं तर, आजही ते तसे नाहीत. वयाच्या ५५व्या वर्षीही माझे बाबा बर्याच वेळेला लहान मुलासारखे वागतात आणि ते त्यांना शोभतंही.
आई अंघोळीला गेली होती आणि बाबांना कपाटातल्या लॉकर मधून काहीतरी काढायचे होते. आईने लॉकरची चावी तिथेच कपाटातल्या एका खणात ठेवली होती. पण बाबांकडे असणार्या जुडग्यामधल्या चाव्यातून लॉकरला चावी लागेल. तेव्हा ती चावी हरवली असं समजून त्यांनी स्क्रू ड्रायव्हरने ते लॉकरचं लॉक तोडून काढलं. आई बाहेर आल्यावर तिला विचारावं आणि मग पुढे काय करायचं ते ठरवावं हे त्याना सुचलंच नाही. पण आईनं मात्र नंतर त्यांना फैलावर घेतलं. मला आणि माझ्या भावाला एक विषय मिळाला बाबांना चिडवण्यासाठी.
एक प्रसंग मला आठवतो, मी ५ वीत होते तेव्हा आमची शाळेची ट्रीप जाणार होती. बाबा ऑफिसच्या कामासाठी मुंबईला गेले होते. जाण्याआधी मला म्हणाले होते," मी तुझ्यासाठी येताना ड्रेसेस घेऊन येतो मस्त.. तेच घेऊन जा तू ट्रिपला" मलाही आनंद झाला. पण मुंबईला गेल्यानंतर बाबांचं काम वेळेत नाही उरकलं आणि त्यांना ऐनवेळी रेल्वेचं टिकीट नाही मिळालं. त्यांच्यापुढे प्रश्न होता घरी वेळेत पोहोचण्याचा. मी आणि आई, ट्रीपच्या आदलेदिवशी रात्री पर्यंत बाबांची वाट पाहात होतो. शेवटी आईने माझी बॅग भरली. म्हणाली,"आता बाबा तू जाईपर्यंत येतील की नाही माहिती नाही. तू हे कपडे घेऊन जा." मी ही निराश झाले होते. पण नाईलाज होता. पहाटे ६.०० ला शाळेत पोहोचायचं होतं. बॅग भरून आम्ही झोपलो. एकदम कधीतरी आईने हाक मारली.."तायड्या, उठ बघ, बाबा आलेत. बघ तुझ्यासाठी कित्तीतरी ड्रेसेस आणले आहेत..." मी पटकन उठले. आणि बाबांच्या गळ्यात पडले...पाहिलं तर पहाटेचे ४.३० झाले होते. माझे बाबा रिझर्वेशन न मिळाल्यामुळे मुंबईहून माझ्यासाठी गाड्या बदलत.. रात्रभर हेक्टीक प्रवास करत.. इचलकरंजीत पोचले होते. तेव्हा डोळे भरून यण्या इतकी मी मोठी नब्व्हते किंवा बाबांनी आपल्यासाठी वेगळं काहीतरी केलं याचीही जाण नव्हती. मला बाबा म्हणाले, "तू तुझं आवरून घे सगळं.. तोपर्यंत मी तुझी बॅग भरतो. हे आणलेले सगळे ड्रेस घालतो बॅगेत". इतके दमलेले माझे बाबा पण सगळा शीण विसरून माझी बॅग भरायला बसले आणि मला शाळेत सोडायलाही आले. आज या प्रसंगाची किंमत मला समजते आहे.
इतरांशी म्हणजे माझ्या भावाशी, ऑफिसमधल्या इतर लोकांशी अतिशय कडक असणारे माझे बाबा माझ्याबाबतीत अतिशय हळवे आहेत.
मी ११ वर्षाची असताना, एकदा आई तिच्या शाळेतल्या मुलांची ट्रिप घेऊन गेली होती. घरी मी, बाबा आणि माझा भाऊ. कामवल्या बाईंनी पोळ्या आणि भाजी केली होती. पण बाबांचं थोडं डोकं दुखत होतं त्यामुळे ते जेवणार नाही म्हणाले. मग मी विचारलं, "आमटी भात खाणार का?" त्यांना गंमत वाटली. पण त्यांनी मला "तुला जमणार नाही. तू नको करू" असं अजिबात म्हंटलं नाही. मला म्हणाले,"करशील?? येईल तुला?? कर मग." त्यांच्या या बोलण्यातूनच जे काही मी करेन ते खाण्याची मानसिक तयारी किती आधीपासून त्यांनी केली होती हे आता जाणवते. मी कुकरला भात केला अणि छान फोडणी करून आमटी केली. बाबा जेवायला बसले तर म्हणाले ," अगं.. आमटीत डाळ कुठे आहे?" मला माहितीच नव्हतं की, आमटित आई डाळ घालते ते. मी आपली मसालेदार पाणी केलं आणि वाटित घालून बाबांना दिलं भातासोबत खाण्यासाठी. पण माझ्या बाबांनी, जराही का कू न करता ते पाणी भातावर घेऊन खाल्लं. तो स्वयंपाक कसा झालाय यापेक्षासुद्धा तो मी केला होता म्हणजे त्यांच्या लाडक्या लेकीने... ही भावना जास्ती होती. त्यानंतर जसजशी मी मोठी होत गेले तसतशी गरज नसतानाही स्वयंपाकघरातली माझी लुडबूड वाढत गेली. सगळे प्रयोग बाबांवरच होत असत.
मला दिलेल्या रूपयांचा बाबांनी कधीही हिशोब मागितला नाही की, पैसे कशाला हवेत असं विचारलं नाही. कधी सांगायला गेलेच तर, ते रूपये तुला दिलेत... आणि दिलेत म्हंटल्यावर दिलेत. मला त्याबद्दल सांगू नको.. असंच उत्तर मिळालं. कदाचित, आपली मुलगी उधळपट्टी करणार नाही याची खात्री आणि त्यांनी केलेल्या संस्कारांवर ठाम विश्वास, हेच कारण असावं त्या मागचं. माझ्या अभ्यासातल्या यशावर, वक्तृत्व, कथाकथन, नाट़क नाट्यवाचन... गाण्याच्या परिक्षा या सगळ्याचा माझ्या बाबांना खूप अभिमान असायचा आणि आजही आहे. बाबांचं काम सगळं भव्यदिव्यचं असतं. अगदी भाजी घ्यायची झाली तरी. किलो दोन किलो चा भाव बाबा कधीच विचारत नाहीत. बुट्टी कशी देणार?? हाच प्रश्न त्या भाजीवाल्याला विचारणार... आणि मग आमच्या घरी आणि शेजारी पाजारी पुढचे २-३ दिवस बाबांनी आणलेलीच भाजी !! घर बांधलं ते ही इतकं मोठं.. राहणार माणसं ४. आणि घर झाडायला, पुसायला कामवाल्या ४ .. असा प्रकार.
मी प्रेमाने बाबांना "बाबड्या " म्हणते आणि बर्याचद 'डॅड ' असंही म्हणते. अशा नावानी त्यांना बोलवण्यावर आईने बर्याचदा आक्षेप घेतला पण बाबांनी कधीच नाही. आपल्या मुलीची क्षमता ते पूर्णपणे जाणून आहेत. आजपर्यंत कोणत्याही बाबतीत त्यांनी मला अडवलं नाही. सतत प्रोत्साहन देत राहिले. किंबहुना मी तर असं म्हणेन की, माझ्या भावापेक्षा जास्ती त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. पहिल्यांदा अमेरिकेला एकटी माझ्या २ वर्षांच्या मुलाला घेऊन निघाले ... खूप भिती होती मनांत... आय मस्ट से इट वॉज माय डॅड हू एन्करेज्ड मी टू ट्रॅवल अलोन.
पिता होणं फारसं कठीण नसतं पण "बाबा" होणं खूप कठीण असतं. आणि एखाद्या मुलीचा बापच "बाबा" होणं म्हणजे काय ते सांगू शकेल.
मी पिता पुत्रात भांडणं झालेली खूप पाहिली आहेत. पण मुलगी आणि वडील यांचं भांडण कधीच नाही पाहिलं. जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं असं मी म्हणेन.
माझ्या बाबांसाठी..
बोट तुझे धरूनी पाऊल माझे स्थिरावले..
मायेच्या वर्षावात माझे बालपण विसावले..
छोटी पोळी , छोटा भात... वरण इवलसं
बाहुलीचं घर आपण बांधलं.. ते ही इवलसं..
क्षितिजाच्या पारचे विश्व मला तू दाखवले
पंखामध्ये बळ घेऊनी.. मी आभाळाकडे झेपावले
सारे जन्म तुमच्या पोटी घ्यावे.. हेच स्वप्न उराशी
आशिर्वाद तुमचे राहोत सदैव माझ्या पाठिशी..
- प्राजु
वाचने
15967
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
सुंदर..
मी पिता
In reply to मी पिता by ऋचा
मी पण...
मस्तच !
प्राजु,
सुरेख
ख-या
सुंदर....
फारच सुरेख !
खरंय..
छान!
छान लिहिले आहेस प्राजू
छान.
In reply to छान. by शितल
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by आनंदयात्री
हेच म्हणतो
प्राजु
छान लिहिलं आहेस प्राजू!
In reply to छान लिहिलं आहेस प्राजू! by चतुरंग
अगदी खरं
`बाबापण`
प्राजु..
हृदयातून
ए प्राजु
फार सुरेख लेख..
छान
चांगला लेख.
मस्त !!!
सुंदर लेख
सुंदर.....
In reply to सुंदर..... by प्रभाकर पेठकर
सहमत..
बाबा...
प्राजुताई...
आपल्या
सुरेख
सुरेखच.....
हृद्य लेख!
In reply to हृद्य लेख! by ऋषिकेश
+१
बाप-लेकीचे प्रेमच वेगळे....
In reply to बाप-लेकीचे प्रेमच वेगळे.... by पिवळा डांबिस
वा!