Skip to main content

देऊळ.!! तु झोप मी जागा आहे!!

लेखक किसन शिंदे यांनी शनिवार, 05/11/2011 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात पाहिलेल्या रा-वण मुळे डोक्याला बराच मनस्ताप सहन करावा लागला होता त्यामुळेच कि काय? किमान महिनाभर आता कोणताच सिनेमा पहायचा नाही असच ठरवलं होतं, पण गिरिश आणी उमेश कुलकर्णी या जोडीचा देऊळ हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित होतो आहे म्हटल्यावर मला माझा निर्णय बदलावाच लागला. महाराष्ट्रातलं एक गाव, मंगरूळ!! ज्या गावात दळणवळाणासाठी चांगले रस्ते नाहीयेत, शेतीसाठी लागणार्‍या पाण्याची टंचाई मोठी आहे, चांगलं रुग्णालय नाही, विजेटंचाई अशा समस्या आहेत पण त्याबरोबरच या मागासलेल्या गावात मोबाईल फोन्स, संगणक, रंगीत दुरचित्रवाणी यासारखं तंत्रज्ञान मात्र पोहचलयं यातला विरोधाभास जाणवतो. अशा त्या गावात राहणारा एक साधा-सज्जन देवभोळा तरूण केशा!! आपली हरवलेली 'करडी' गाय शोधता शोधता त्याला माळावर असलेल्या उंबराच्या झाडात त्याला गुरूदेव दत्त दिसतात आणी मग तो हि बातमी संपुर्ण गावभर करतो. तिथून पुढे एक साधं गाव ते एक मोठं तिर्थक्षेत्र असा त्या गावाचा प्रवास सुरू होतो. सुरूवातीला त्याच्या या बोलण्यावर काहिजण विश्वास ठेवतात तर काही जण त्याचं म्हणणं उडवून लावतातं. गावातल्या महिला मंडळात या गोष्टीची चवीचवीने चर्चाही होते. काहितरी नविन करायचं या ध्यासातून तिथले तरूण कार्यकर्ते मग या बातमीचा उपयोग करून घ्यायचं ठरवतात, फोन मेसेजेस, वर्तमानपत्रातील बातम्या याद्वारे दत्तगुरूंच जागृत ठाणं असा आपल्या गावाचा ते व्यवस्थितरित्या प्रचार करतात, याबाबतीत महासंग्राम हा वृत्तपत्रकार त्यांना मदत करतो. सुरूवातीला या सगळ्या गोष्टींना विरोध दर्शवणारे गावाचे प्रमूख भाऊसाहेब वरिष्ठांच्या दबावापुढे झुकतात आणी देऊळ बांधण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देतात. केशा बरोबरच भाऊसाहेब आणी गावातल्या सगळ्यांना समजूतीच्या चार गोष्टी सांगणारे जेष्ठ आणी जाणकार अण्णा मात्र सुरूवातीपासूनच त्या सगळ्यांना समजवतात पण शेवटी त्यांचाही नाईलाज होतो. "" पुढे काय होतं?? देऊळ बांधून होतं का?? भाऊसाहेब आणी अण्णांची नंतरची भुमिका काय असते?? या सगळ्या गोष्टींसाठी देऊळ हा सिनेमा तुम्ही सिनेमागृहातच जाऊन पहायला हवा. गिरिश कुलकर्णीने केशाच मद्ध्यवर्ती पात्र अगदी व्यवस्थितरित्या साकारलयं. चित्रपटाच्या प्रत्येक टप्प्यात त्याने त्याच्यातला अभिनेता अगदी समर्थपणे पेललाय. आतीशा नाईक, विभावरी देशपांडे, उषा नाडकर्णी, ज्योती सुभाष, सोनाली कुलकर्णी यांनी त्यांच्या भुमिकेप्रमाणे योग्य कामं केली आहेत. ह्रषिकेश जोशी, महासंग्राम पत्रकार किशोर कदम, श्रीकांत यादव आणी त्यांच्याबरोबर असलेल्या अभिनेत्यांनी तरूण कार्यकर्ते धम्माल वठवलेत. डॉ.मोहन आगाशेंचा साहेब अगदीच कमी वेळा समोर येतो. हिंदी अभिनेते नसिरूद्दीन शहा हे ही एका दृष्यापुरते अनपेक्षितपणे आपल्या समोर येतात. सर्वात जास्त उत्सूकता होती ती नाना पाटेकरांचा भाऊसाहेब आणी अण्णा असलेल्या दिलीप प्रभावळकर या दोन दिग्गजांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्याची, पण शेवटी शेवटी अगदी छोट्या स्वरूपात का होईना माझी ती इच्छा पुर्ण झाली. अर्थात त्यांनी त्यांच्या भुमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने पार पाडल्याच ही गोष्ट वेगळी. "अगदी शुन्य मिनिटात करतो" हा नाना पाटेकरांचा डायलॉग धम्माल आणतो. कंचुकी तंग दाटली उरी, मट्रीअल आत मायीना... आनं माळावर प्रकटला दत्त, पर भाव मनी दाटना.... आध्यात्माचा ताप भारी आनं केशाभोवती जमती नारी... यांसारखे चुरचूरीत संवाद मजा आणतात. कथा, पटकथा आणी संवादांच या तिन्ही आघाड्यावरचं काम गिरीश कुलकर्णीने चांगलच जमवलयं. देवा तुला शोधू कुठं आणी तु झोप तुझा दत्त जागा आहे हि दोन्ही गाणी निदान श्रवणीय तरी आहेत पण त्यातलं आयटम साँग हे मात्र सहनशिलतेच्या पलिकडचं आहे. त्याचे नेमके शब्दचं कानावर पडत नाहीत. एखाद्या चांगल्या पुलाव भातामध्ये अचानक खडा लागावा तसं ह्या आयटम साँग बद्दल माझं मत झालयं अर्थात हे माझं स्वतःच वैयक्तीक मत आहे. मंगेश धाकडेच पार्श्वसंगीत ठिक आहे. सुरूवातीपासून चांगला चाललेला चित्रपट मध्ये थोडासा रेंगाळतो पण शेवट बघण्याची उत्सुकताही तेव्हढीच निर्माण करतो. उमेश कुलकर्णीच दिग्दर्शन वळूच्या तुलनेत थोडसं कमी पडलयं असं जाणवतं. वळू या चित्रपटामुळे गिरिश आणी उमेश कुलकर्णी यांच्याकडून अपेक्षा खुप वाढलेल्या होत्या अगदी तेवढ्या नाही पण त्याच्यापेक्षा थोड्या कमी अपेक्षा या जोडीने नक्कीच पुर्ण केल्यात. एकंदरीत काय तर, एकदा तरी सिनेमागृहात जाऊन देऊळ बघायला हरकत नाही. *** (३/५)

वाचने 39529
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

In reply to by आशु जोग

वरती आलेच काही मुद्दे. तेच. नसीरुदीन शहा मुळात आणलाय कशाला काहीही समजले नाही. त्याला इथे आणणे म्हणजे बांधकामातले फावडे घेउन ते चमच्यासारखे वापरत खाण्याचा प्रयत्न करण्यासारखे वाटले. त्याच्या हस्ते चित्रपटात मराठीचा जाहिर खून करण्याच काय हशील होते? चित्रपटात दिसणार्‍या सुंदर सुंदर गोर्‍या-घार्‍या (ग्रामीण साज्,ग्रामीण बाज नसणार्‍या)पोरी "आमच्यातल्या" आहेत हो; गावाकडल्या वाटल्या नाहित. मागे येशू ख्रिस्त ह्या जन्माने ज्यू व मागील पन्नास पिढ्या आशियात घालवलेल्या व्यक्तिवरील माहितीपटात तो चक्क निळ्या डोळ्याचा, युरोपिअन धाटणीच पाहून असाच त्रास झाला होता. असाच वैताग महेश मांजरेकरला छत्रपतींच्या भूमिकेत पाहून व त्याचे डोळे पाहून आला होता.(व्यावसायिक चित्रपट म्हनून "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" आवडला होता, तो भाग वेगळा.) एकूण माझी तक्रार लक्षात यावी म्हणून हा इतका पसारा सांगतोय. तो अण्णा(दिलीप प्रभावळकर) गावात काय करतोय तेही सांगितले असते तरे बरे झाले असते. नानाचेही काम आवडले. पण यशवंत दत्तांनी "सरकारनामा" मध्ये रंगवलेला नेता किंवा "सामना" मधला निळू फुल्यांचा हिंदुराव ह्यांची उंची त्यात वाटली नाही. शेवटच्या वीस मिनिटात माझे घद्याळाकडे लक्ष जात होते, "अजून किती वेळ"असे म्हणून. पण तरीही चित्रपटातल्या चांगल्या आणि वाइट गोष्टी ह्यांची गोळाबेरीज केली तर शेवटी चांगल्या गोष्टी थोड्या अधिकच जाणवल्या. आवडलेल्याही गोष्टी बर्‍याच आहेत, त्यातली एक महत्वाची म्हणजे ""देवा/द्येवा तुला शोधू कुठं" हे सुंदर, अस्सल काळ्या मातीतनं बनलेले शब्द, त्याला अनुरुप साज चढवणारं पारंपरिक ह्या मर्‍हाटी मातीचं संगीत. दुर्मिळ होत चाल्लय हो हे. बादवे, कुलकर्णी टाइप लोकांनी काढलेले पिक्चर थोडेफार मिरासदारांच्या चित्रणाच्या वाटेवर वाटतात. "मिरासदारटाइप" बद्द्ल तुमचे काय विचार आहेत?

In reply to by मन१

>> "मिरासदारटाइप" बद्द्ल तुमचे काय विचार आहेत? मिरासदारटाइप चालेल कारण ते खरे खेड्यातले होते. पण लई, कंच, आत्ता, आत्ता ग बया, व्हय व्हय, बिगी बिगी हे काही खरं नाही आपली नैसर्गिक भाषा बोलावी

मन१ >>पण यशवंत दत्तांनी "सरकारनामा" मध्ये रंगवलेला नेता किंवा "सामना" मधला निळू फुल्यांचा हिंदुराव ह्यांची उंची त्यात वाटली नाही. तुम्ही अगदी बरोबर बोललात. अलिकडे या लोकांनी जो ग्रामीण चित्रपटाचा गवगवा चालवलाय तो जरा अतिच झालाय. महाराष्ट्राला ग्रामीण चित्रपट नवीन नाहीत. चंद्रकांत, सूर्यकांत यांचे चित्रपट आपण पाहिलेले आहेत. नंतरच्या काळातील निळू फुले यांचा सहज अभिनयही प्रेक्षकांनी पाहिला आहे. ती सहजता ज्योती सुभाष, अमृता सुभाष, नंदू माधव यांच्या अभिनयात दिसत नाही. आणि मग कृत्रिमता डोक्यात जाते. - मागे काही वर्षांपूर्वी 'वळू' पहायला गेलो. प्रचंड गर्दीचा ६ वा आठवडा इ जाहीराती पाहिल्या होत्या. थिएटरात गेलो तर वर आणि खाली मिळून जेमतेम २० लोक. प्रेक्षक नसतानाही चित्रपट काही आठवडेच्या आठवडे चालवणे शक्य व्हावे म्हणूनच कधी ए बी सी एल, कधी मुक्ता आर्टस ला प़कडले जात असावे.

In reply to by आशु जोग

जाहीरात तर अशी केली होती की जणू वळू पकडण्यावर थ्रीलर चित्रपट बनवलाय. आता अगदीच मॅटॅडॉर्स नाही तरी तत्सम सिन असतील व एकूणच फास्ट पेस्ड थरारक काही असेल म्हणून गेलो तर , "लाइफस्टाइल दाखवणे" पध्दतीचा रटाळ (अर्थातच मराठी) चित्रपट निघाला. त्या वळूकड बघून किव येत होती, भिती अथवा थरार सोडूनच द्या.

In reply to by आत्मशून्य

कुठली जाहिरात बघून गेला होतात देव जाणे. युट्युब वर ५ प्रोमो आले होते. अजूनही असतील. त्यातला एकही बघून चित्रपट थरारक वगैरे वाटत नाही. विनोद ढंगाने जाणारा वाटतो, आणि तो तसाच आहे. उगाच चुकीच्या अपेक्षा ठेवल्या तर निराशा होणारच. आणि ते पोलिटीकल सटायर आहे. त्यात भीती किंवा थरार वाटावा अशी अपेक्षा नाहीच आहे मुळात.

(एकदाचा) देऊळ पाहिला. आवडला. गावाबद्दल स्वप्नाळू कल्पना बाळगणार्‍यांनी तर 'देऊळ' जरुर बघावा. चित्रपटात भारतीय सवंग राजकारणावरही आणि तसे राजकारण करण्याच्या अपरिहार्यतेवरही चांगला प्रकाश टाकला आहे. समाज नेत्याला विकासाच्या राजकारणापासून कसा दुर घेऊन जातो आणि लोकशाहीत लोकांची इच्छा असल्याशिवाय विकासही कसा होऊ शकत नाही याचे चित्रण नेमके आहे. त्याही पेक्षा उत्तम टिपणी नाना करतो जेव्हा तो म्हणतो "शहरातल्या लोकांना गाव सतत छान, शांत हवं. ते मात्र तिथे बसून पैसा ओढणार!" हे या परिस्थितीचं मुळ नेमकं पकडलं आहे. अण्णांचं पात्र मात्र अगदी तकलादू वाटतं, त्याहुनही ते निराशावादी (आणि पुचाट) वाटतं. "हे चक्र आता इतकं गतिमान झालं आहे की आता ते थांबणं तुम्हालाच काय कोणालाही शक्य नाही" म्हणून लेखक (आण्णांद्वारे) या परिस्थितीवर उतारा नाही हेच सांगतो. हे आहे हे असं आहे आणि असंच चालु रहाणार हा वास्तववादी दृष्टिकोन आहे का? यावर मात्र नकारात्मक प्रतिक्रीया देताना जीभ चाचरते हेही तितकच खरं! :(