Skip to main content

'दिल्ली बेली' - एक बेली ढवळक अनुभव

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 05/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
"भाग भाग डीके बोस, डीके बोस, डीके बोस, भाग भाग डीके बोस डीके भाग..." अशी आर्त स्वरातली विनंती न ऐकून चालणारच नव्हतं. पहिल्यांदा हे गाणे ऐकले तेव्हा मला प्रश्न पडला की हा का एवढं 'भागायला' सांगतोय. बरं, गंमत म्हणजे हे गाणं मी एका रम्य आणि शांत सकाळी पहिल्यांदा ऐकलं होतं. मी अर्धवट झोपेत होतो; खिडकीतून उन्हाची कोवळी तिरीप माझ्या देखण्या चेहर्‍यावर प्रभा फाकवत होती; गॅसवर ठेवेलेल्या चहाच्या आधणाचा गोडसर उबदार वास नाकात शिरत होता; सोसायटीच्या पाण्याच्या पंपाचा मंद आवाज अस्पष्टपणे कानावर पडत होता, लिफ्टच्या दरवाजाचा आणि तो उघडा ठेवल्यानंतरच्या कर्कश अलार्मचा आवाज अधून-मधून कानावर पडत होता. किचनमधून बाबांनी पूजा झाल्यावर लावलेल्या उदबत्तीचा सुगंध नाकात शिरत होता. आता थोड्या वेळातच अंथरुणातून नाईलाजास्तव का होईना पण उठावे लागणार आहे असे 'इशारे' येण्यास सुरुवात झाली होती...आणि अचानक फुल्ल डॉल्बी साऊंडमध्ये "भाग भाग डीके बोस, डीके बोस, डीके बोस, भाग भाग डीके बोस डीके भाग..." असे जोशपूर्ण आव्हान सुरु झाले. अर्धवट झोपेत सुसंगत आणि तर्कसंगत विचार करणे मेंदूला तसे फारसे जमत नसावे. माझ्या मनाला प्रश्न पडला, माझ्या 'बेली'ची आर्त हाक मला अशी बाहेरून का ऐकू येतेय? आणि ती ही असल्या तारस्वरात? इतका मनकवडेपणा (तनकवडेपणा?)? गाण्याचा वेग आणि आवेग इतका जबरदस्त होता की आता दरवाजा ढकलून आत जाण्याची उसंत तरी मिळते की नाही असा विचार मनाला चाटून गेला आणि एकदम पोटात कळ उठली; खाडकन डोळे उघडले, पांघरूण बाजूला फेकले गेले आणि अस्मादिक तीरासारखे धावत जाऊन त्या परमसुखदायकउदरकळशामकगृहात गडप झाले. थोडी उसंत मिळाल्यावर मी त्या गाण्यावर विचार करू लागलो. च्यायला, हे काय नवीनच गाणे? कोण हा डीके बोस? आणि त्याने का पळायचं? शेजारच्या फ्लॅटमधल्या पोराने लावलेले ते गाणे अजूनही मला ऐकू येत होते. मी जरा लक्षपूर्वक ऐकू लागलो आणि अचानक गॅलिलिओने 'युरेका' करावे त्याप्रमाणे मला त्या गाण्यातली छुपी गंमत कळली. अस्स आहे होय हे? सेंसॉर बोर्डला चकवा (शिवी) देण्याचा हा प्रकार भलताच भारी होता. यथावकाश बाहेर आल्यावर तृप्तीचा ढेकर देत मी माझ्या इतर कामांकडे वळलो. नंतर कित्येक दिवस हे गाणे मला ऐकू येत राहिले. विशेषतः कॉलेजकुमारांमध्ये हे गाणे खूपच लोकप्रिय असल्याचे मला माझ्या सूत्रांकडून कळले. टीव्हीवर एक-दोनदा बघण्यात आले. 'दिल्ली बेली' काहीतरी वेगळंच प्रकरण असल्याची खात्री पटली. दरम्यान 'दिल्ली बेली' रीलिज झाला. चिकार गर्दीत हा चित्रपट चालू आहे अशी महिती मिळाली. परीक्षण वाचून उत्सुकता चाळवली. 'दिल्ली बेली'ने खूप हुशारीने चित्रपटाविषयी चर्चेची राळ उडवून दिली होती. एक हमखास यश मिळवून देणारे मार्केटिंग तंत्र वापरून 'दिल्ली बेली' चे प्रमोशन सुरु होते. आमच्या कार्यालयातदेखील 'दिल्ली बेली'च्या यशाच्या चर्चा झडू लागल्या. शिवाय अभिनय देव या मराठी माणसाने दिग्दर्शित केलेला चित्रपट इतकी गर्दी खेचतोय म्हटल्यावर 'दिल्ली बेली' बघण्याची कारणे वाढत गेली. शेवटी आम्ही 'दिल्ली बेली' पहायचे ठरवले. "यात काहीतरी खूप किळसवाणं, घाण आहे असं मी ऐकलंय; तुला बघायला चालणार आहे का?" मी. "म्हणजे काय आहे?" बायको चेहरा वाकडा करत विचारती झाली. "मला नक्की माहित नाही. भाषा खूप शिवराळ आहे हे मला नक्की माहिती आहे. वाक्या-वाक्यागणिक शिव्यांचे अत्तर शिंपडले आहे. तुला चालणार आहे का?" "बघूया. बघीतल्यानंतरच ठरवू" आमचा निर्णय ठरला. मल्टीप्लेक्सला तिकिट मिळण्याचा प्रश्नच नसल्याने आणि आमची चारशे रुपये एका चित्रपटात आणि पन्नास रुपये पिवळ्या लाह्यांमध्ये घालवण्याची ऐपत नसल्याने आम्ही मोर्चा स्वस्त, मस्त आणि टिकाऊ अशा नीलायमला वळवला. कधी नव्हे ते नीलायमला सुगीचे दिवस आले होते. आवार कॉलेजकुमारांनी ओसंडून वाहत होते. मी भिरभिरत्या नजरेने पाहिले. एकही स्त्री/मुलगी/महिला त्या गर्दीत दिसत नव्हती. मी एक कटाक्ष बायकोकडे टाकला. शेवटी हिय्या करून तिकिट घेतले. बाल्कनीची तिकिटे संपलेली असल्याने आम्ही ड्रेस सर्कलची तिकिटे काढली. आता १८-२० वयोगटातल्या मुलांना ड्रेस सर्कल, स्टॉल, मॅटीनी, बाल्कनी, बॉक्स ही टर्मिनॉलॉजी माहित नसेल कदाचित. स्थानापन्न झालो. आधीच टाळ्या, शिट्ट्या सुरु झालेल्या होत्या. चित्रपटाची सुरुवातच एका अत्यंत गलिच्छ खोलीत होते. कॅमेरा हळू-हळू फिरत एका निद्रिस्त अवस्थेत असलेल्या माणसाच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या देहाचे दर्शन घडवतो. एका विशिष्ट अवयवावरून अगदी संथ गतीने कॅमेरा जात असतांनाच टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर टिपेला पोहोचतो. चित्रपट पुढे सरकत होता. पारिजातकाच्या झाडाखालून जातांना पारिजातकाची फुले टपटप अंगावर पडावीत त्याप्रमाणे शिव्यांमधून बरसणारा अमृतरस कानात ओतला जात होता. तीन तरुणांकडून अजाणतेपणी एका गुंडाचे हिरे हरवतात आणि मग तो गुंड ते हिरे मिळवण्यासाठी जीवाचे रान करतो इतकी साधी, सोपी गोष्ट सांगण्यासाठी लेखक, दिग्दर्शक मंडळींनी जो धिंगाणा घातला होता तो म्हटलं तर खूप मनोरंजक होता आणि म्हटलं तर किळसवाणा होता. हिरे हरवणं (शान), कुठेतरी सुरक्षित ठेवून ती जागा माहित असणार्‍याचा मृत्यू ओढवणं (व्हिक्टोरिया नं. २०३, फिर हेराफेरी), चलाखीने हिरे चोरून बाहेर आणणं (शान), हिरे सांडून गंमती-जमती घडणं (अंदाज अपना अपना) इत्यादी हिर्‍यांचे पैलू आतापर्यंत बघण्यात आले होते. 'दिल्ली बेली'मध्ये एक वेगळाच 'पैलू' अगदी धडधडीतपणे समोर आला. इतका धडधडीतपणे आला की तो पैलू बघून आमच्या पोटाचे मळवली, नालासोपारा व्हायचे बाकी राहिले. नायिका हिर्‍यांचे पाकिट कुणालातरी द्यायला म्हणून नायकाकडे देते. नायकाला वेळ नसल्याने ते पाकिट तो त्याच्या मित्राकडे देतो. तो मित्र त्यांच्या एका दुसर्‍या मित्राकडे ते पाकिट देतो. एवढ्यावरच हे हिरेपुराण संपलं असतं तर मग 'दिल्ली बेली' ऐवजी निर्मात्याने हिर्‍यांच्या व्यापारावर एखादी डॉक्युमेंटरी नसती बनवली? इथे येतो एक ट्विस्ट! डॉन अगदी थाटात गर्भरेशमी रुमाल टेबलावर अंथरून हिर्‍यांची सुबक डबी रीती करतो आणि काय चमत्कार, त्या गर्भरेशमी लाल कापडावर चक्क आपल्या नको असलेला आणि म्हणून आपण प्रातःकाळी टाकून देणारा पदार्थ अगदी डौलात येऊन विराजमान होतो. कॅमेरा अगदी जवळ जाऊन आपल्याला त्या अमूल्य पदार्थाचे येथेच्छ दर्शन घडवतो. जेवढ्या भक्तीभावाने आपण देवाच्या मूर्तीकडे बघत नाही तेवढ्या भक्तीभावाने डॉन त्या थाटात निवांत बसलेल्या पदार्थाकडे बघतो. मी बायकोकडे पाहिलं; तिने तोंड मागे फिरवले होते; तिच्या चेहर्‍यावरचं हसू मात्र लपत नव्हतं हे खरं; उगीच खोटे कशाला बोला? माझ्या चेहर्‍यावरदेखील हसू होते; किंबहुना गडगडाट होता हे ही तितकेच खरे. म्हणजे आम्हाला तो प्रसंग आवडला होता का? कदाचित दृष्य आवडण्यासारखे नव्हते पण प्रासंगिक विनोद नक्कीच हसवणारा होता. 'कायमचूर्ण' किंवा 'धौतीयोग चूर्ण' या 'सुलभ शौचालय'छाप औषधांची जाहिरात हे प्रसंग वापरून नक्कीच चांगल्या प्रकारे होईल असे मला क्षणभर वाटून गेले. तसेही मुन्नीने बदनाम होता-होता झंडु बामचे 'नाम रोशन' केल्याचे उदाहरण आहेच. आणि आजकाल टीव्हीवरच्या जाहिरातींची झेप कुठपर्यंत पोहोचली आहे हे वेगळे सांगायला नकोच (उदाहरणार्थ तमाम पर्फ्युम्सच्या जाहिराती, नुकतीच आलेली आयडियाची लोकसंख्येवर गंभीर टिप्पणी करणारी जाहिरात). नीलायममध्ये हास्याची कारंजी वारंवार उसळत होती. ज्युसचा अभिनव उपयोग बघून तर प्रेक्षकांच्या घशाला कोरड पडली होती. पलंगावरचे धाडसी प्रसंग बघून प्रेक्षकांच्या अंगावरचे केस उभे राहिले होते. आंबा या फळाशी निगडित असणार्‍या क्रियापदाचा वापर करून योजिलेला एक (हिंदीत डब केलेला) संवाद सगळ्यांच्या (फक्त 'आंब'टशौकीनांच्या नाही) आंबावर...सॉरी, अंगावर रोमांच उभे करून गेला. तीन नायकांपैकी एकाचे शौचालयातले विविध प्रयोग बघून हसून-हसून मुरकुंडी वळत होती. "शी, काय घाणेरडं दाखवलंय हे..." असं म्हणत-म्हणत हसणं मात्र कुणी टाळत नव्हतं. दीड तासाच्या या अभूतपूर्व गोंधळानंतर आमिर खान आणि अनुष्का दांडेकर यांच्यावर चित्रित झालेल्या एका धमाकेदार गाण्याने चित्रपट संपला आणि सगळे हसू दाबत बाहेर पडले. चित्रपटात शिव्या, आचरटपणा, वाह्यातपणा, अश्लीलपणा, बीभत्सता यांची मनमुक्त उधळण होती. ही सगळी कथेची गरज होती असेही नाही. या सगळ्या पाहुण्यांशिवायही 'दिल्ली बेली' बनवता आला असता पण मग त्याचं नाव 'डायमंड - द चेस' वगैरे ठेवावे लागले असते. मग चित्रपट नक्की कसा होता? माझं प्रामाणिक मत विचाराल तर घाणेरडेपणाची फोडणी घातलेला एक मनोरंजक चित्रपट म्हणून 'दिल्ली बेली' चे वर्णन करावे लागेल. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात अशी थेट भाषा आणि माणसाच्या मनातली विकृती बेधडकपणे पडद्यावर रंगवणारा चित्रपट म्हणून 'दिल्ली बेली' ची नोंद करावी लागेल. माणसं विचार करत नाहीत किंवा कल्पना करू शकत नाहीत असा कुठलाच प्रसंग चित्रपटात नव्हता यावरूनच 'दिल्ली बेली'चे वेगळेपण जाणवते. एक बिनधास्त घाणेरडा पण वेगवान, मनोरंजक चित्रपट म्हणून 'दिल्ली बेली' एकदा बघण्यास माझी तरी हरकत नव्हती. कदाचित यामुळेच तो 'सुपर हिट' चित्रपटांच्या पंक्तीत जाऊन बसला....तो जर मनोरंजक नसता तर त्याचे भवितव्य 'डरावनी रात', 'रात की रानी' सारखे दयनीय असले असते...म्हणून सगळे डीके एकसाथ चित्रपटगृहाकडे 'भागले'...आणि हसले!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5577
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

In reply to by गणेशा

बघायला हरकत नाही हो...थोडं दुर्लक्ष केलं तर टाईम्-पास चांगला आहे. दिग्दर्शन, अभिनय चांगले आहे. विजय राजचं काम कडक आहे. अनुशा दांडेकर छान शोभलीये...आणि शहनाझ ट्रेजरीवाला कधी नव्हे ती हॉट वाटलीये...दागिन्यांचा व्यापारी भारी आहे; त्याने 'खोसला का घोसला' मध्ये एजंटचं काम केलं होतं. वीर दास आणि आदित्य रॉयकपूर पण झकास... :-)

मस्त लिहीलंय :)

आवडेश... १ रीक्वेष्टः पिक्चर आल्या आल्या बघून परीक्षण टाक्कू शकलात तर लै बाहरीच होईल :)

In reply to by मी-सौरभ

आहे. अगदी कबूल. पण आजकाल वेळेची थोडी पंचाईत झालीये...पण प्रयत्न नक्केच करेल.. :-)

पूव्रि राहूल ला ..... पिक्चर बघताना ...अशीच धमाल करायचो....टाळ्या, शिट्ट्या आणि काँमेण्ट्स.... पिक्चर हीट है ब्वा - डी के बॉस...... अम्हि मराठी ........हो का........मग मराठी तच बोला कि.........

In reply to by शुचि

भयानक नाहीये.. हो, थोडा किळसवाणा आहे हे खरे...पण बाकी शिव्या वगैरे तर सगळीकडे असतातच की. आणि २-३ प्रसंग सोडले तर एक चित्रपट म्हणून 'दिल्ली बेली' मनोरंजन हमखास करतो. मल्टीप्लेक्सेसमध्ये बायका-पोरींनी एंजॉय केला हा पिक्चर्...बघा, मजा येईल. घ्या देवाचं नाव... :-)

In reply to by समीरसूर

अहो पण त्या हिर्‍याच्या प्रसंगात नक्की काय दाखवलय? आणि जर मला जे वाटतं आहे ते दाखवलं आहे तर मग नको रे देवा ........ नाही पहावणार तो पिक्चर :( ........ नंतर जेवण कसं जाणार रोज? जाऊ द्यात. :(

In reply to by शुचि

त्या हिर्‍याच्या प्रसंगात नक्की काय दाखवलय? आणि जर मला जे वाटतं आहे ते दाखवलं आहे तर
ते जे काही असेल त्याला तुम्ही झणझणीत (?) पिठले इत्यादी काही मानून चित्रपट एन्जॉय करा असा कोणी सल्ला दिला तर ? (पळ काढायला हवा आता ... :) )

In reply to by शुचि

जे वाटतंय तेच दाखवलंय. पण तो एक सीन सोडला तर बाकी ठीक आहे. जेवण जातं हो...माणसाला विस्मृतीचं वरदान काही उगीच मिळालेलं नाही. वडापाव खात-खात पाहिला आम्ही तो सीन. काही वाटत नाही हो; एकदा प्रयत्न करून बघा. पिक्चर बाकी धमाल आहे हे खरं. बघून टाका; घाबरू नका. डोळे मिटून घ्या हवं तर त्या प्रसंगाच्या वेळी...

परीक्षण वाचूनच पोटात कसेसेच होऊ लागले आहे, मनोरंजन हे गलीच्छ मार्गानेच होते असे सिनेमा बनवणार्याला वाटत असावे असे वाटते. 'व्यक्ती तितक्या प्रक्रुति' हे जरी खरे असले तरी विक्रुती पडद्यावर दाखवलीच पाहिजे का ? सौन्दर्य

चित्रपटात ज्या काही शिव्या आहेत त्या दररोजच्या जीवनात सगळीकडे एकु येत असतात. त्यामुळे चित्रपट भिती दायक आहे म्हणणे चुकीचे आहे.राहिला प्रश्न त्यातील काही प्रसंगातील प्रणयाचा तो देखिल इतका गलिच्छ नाही आहे. आपणाला जर टायटॅनिक मधील मोटारीतील प्रणय बघता आला असेल तर ह्यातील देखिल तितका उत्कंट दाखवला नाही आहे,त्यामुळे चित्रपट एकदा बघायला हरकत नाही.

परिक्षण नेहमीप्रमाणेच क ड क ! अमिर आणि त्याच्याशी कुठल्याही प्रकारे रिलेटेड असणारे चित्रपट बघायचे टाळतोच. त्यामुळे चित्रपटाविषयी नो कॉमेंट्स.

In reply to by परिकथेतील राजकुमार

असं का? बरे असतात त्याचे चित्रपट. शाहरुखच्या 'एक लडकी थी दीवानी सी' छाप चित्रपटांपेक्षा बरे असतात आणि सलमानच्या देदणादण चित्रपटांपेक्षा जरा दर्जेदार असतात...मग एवढा का राग बिचार्‍याचा? की अजून तुम्ही 'अव्वल नंबर', 'दौलत की जंग', 'तुम मेरे हो', 'इश्क इश्क इश्क', 'जवानी झिंदाबाद', 'मेला', 'आतंक ही आतंक', 'मन' या धक्क्यांमधून सावरला नाहीत? :-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

कसं बोललास परा. एक 'दिल चाहता है' (तो सुद्धा या बैलापेक्षा इतरांमुळे पाहण्यालायक होता) वगळता या महाभागाचे कोणतेही चित्रपत पहाण्यालायक नसतात. उगा लेकाचा परफेक्शनिस्टच्या गप्पा मारतो, बरेच दिवस मीडियात हवा तापवत ठेवतो नि अखेर एक पर्फेक्ट भिकार चित्रपट देतो. अभिनय तर आनंदच. 'सामवेदी'... म्हणजे तीनच स्वरात फिरणारा सपाट आवाज नि चेहर्‍यावरचे डोळे मिचकावण्या इतपतच हलणे, त्यात एक नेमका भाव दिसेल तर शपथ. मीडियाचा पुरेपूर वापर करून आपले चित्रपट खपवणारा हा पहिला महाभाग, आता सगळेच त्या मार्गाने जातात. अभिनयावर, दिग्दर्शन कौशल्यावर चित्रपट हिट होण्याचे 'ते हि नो दिवसा गतः' . वस्तू खपत नाही 'खपवावी' लागते चा जमाना आहे. पब्लिक मेमरी इज शॉर्ट... अँड इट लाईक्स इट दॅट वे. दीर्घकाळ रुजावं असं तयार करायची तसदी घेत नाही, नि केलं तरी ते जपाव एवढी आस आहे कुणाकडे. थेट्रातून बाहेर पडतानाचा पुढचा चित्रपट कधी नि कुठे बघायचा याची चर्चा सुरू होते. आपलं तर लाडकं मत आहे ब्वॉ. पंचतंत्रातल्या गोष्टीतल्या तात्पर्याप्रमाणे बेडकांचा राजा बेडूकच असला तर सगळं सुरळित चालतं, एरवी घडी बिघडते. अर्थात 'यथा प्रजा तथा राजा'. त्यामुळे तक्रार करू नये, क्काय?

हा चित्रपट म्हणजे फारेली भावंडांच्या उत्सर्जनाच्या प्रभावाखाली येऊन उत्सर्जित केलेली कृती आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. बाकी परीक्षणाची भाषा चित्रपटाच्या मानाने फारच सोवळ्यातली वाटली. ;)

In reply to by नगरीनिरंजन

काय बोलता ननि ? ही पण माहिती नविनच. अजुन एका माहिती प्रमाणे हा चित्रपट Next Day Air वरुन प्रेरीत आहे. पण दोन्ही चित्रपट बघितले नसल्याने खात्री नाही. देल्ही बेली बघितलेले कोणीतरी ह्या इंग्रजी चित्रपटाचा प्लॉट वाचुन खात्रीशीर माहिती देईल काय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

बरोबर आहे. कथाबीज नाही म्हणत आहे मी. पण चित्रपटातले प्रसंग आणि 'शी'क्षण नक्कीच फारेली भावंडांच्या वासाने सुचलेले आहेत. (आठवा: आय,मी अ‍ॅन्ड आयरिन मधला अंगणात 'बसलेला' जिम कॅरी आणि त्यानंतरचे सॉफ्टी आइस्क्रीम)

आँ? तुम्ही अगदी स्पष्ट लिहिलंय तरीही खात्री करुन घेण्यासाठी विचारतो.. या सिनेमात टेबलवर "शी" ठेवलेली दाखवली आहे? खरंच? किळसवाणा आहे असं ऐकलं होतं पण इतका खुल्ला प्रकार असेल असं इमॅजिन केलं नव्हतं. आणि क्लोज अप वगैरे दाखवला असेल तर मला वाटते तेवढ्या सीनपुरता कॅमेरामन काढून त्याजागी पॅथॉलॉजी लॅब अ‍ॅनालिस्टला आणला असेल. कॅमेरामनला तरी कसे शक्य आहे असले बिनसरावाचे काम? परीक्षण आवडले. चित्रपट बघणार. नेमके डोळे कुठे मिटायचे ते कळल्याने अत्यंत धन्यवाद.

In reply to by गवि

याचे उत्तर मला 'होय' असे द्यावे लागत आहे. :-( त्या प्रसंगामध्ये तुम्ही जे म्हणता तेच दाखवले आहे आणि अगदी क्लोज-उप शॉटमध्ये दाखवलेले आहे. विजय राज त्या पदार्थाकडे एकटक बघत बसलेला असतो आणि त्याचा एक चेला "बॉस, ये तो टट्टी है" असे निर्विकारपणे बॉसला सांगतो. पनीरच्या तुकड्यासारखे काहीतरी त्या पदार्थात दिसते. पनीर बटर मसाला सारखे ते भासते. पिक्चर बघायला काहीच हरकत नाही; धमाल कॉमेडी आहे. विजय राजचा अभिनय नंबर वन! इम्रान खान आणि शहनाझ ट्रेजरीवाला यांच्यातला एक सीन खूपच धाडसी आहे. हिंदी चित्रपटात असा सीन कधीच आलेला नाही. अर्थात दाखवलेले काहीच नाहीये. --समीर

In reply to by समीरसूर

शेण खाल्ले हा वाक्प्रचार ऐकला आहे व कोणाला ते आवडत असल्यास आपले काहीच म्हणणे नाही. परंतु लोक नावडीने का होईना पण खातील असे 'फेक पूप' चॉकलेट, पीनटबटर, कॉर्नफ्लेक्स यांचे ओलसर मिश्रण करुन बनवता येईल. जर तुम्ही आयसिंग कोन मधुन "तश्या" आकाराचे कडबोळे केलेत तर हा इफेक्ट येणे शक्य आहे. पटत नसल्यास गुगल, युट्युब बघणे. माईंड ओव्हर मॅटर. :-)

कमल हासनच्या 'पुष्पक' मध्येही (समीर कक्कर बरोबर) असेच बेली ढवळक चित्रण होते. याला आम्ही 'याक-विनोद' म्हणतो. कुठे च्यॅनेलवर लागला की दिल्ली बेलीही पाहू.